जाऊ नको दूर. भाग-२

बापलेकीच्या निर्मळ नात्याची कथा.

जाऊ नको दूर.
भाग -दोन.


"असू दे गं. लाडाचं कोकरू आहे. माझ्याजवळ नाहीतर आणखी कोणाजवळ हट्ट करेल ती?"
त्याने हसून विषय बाजूला सारला. मनात मात्र वेगळ्याच भीतीने त्याला ग्रासले होते.


तिच्याशी झालेले एक एक संवाद रोहनला आठवत होता नि हलकेच त्याच्या ओठावर हसू उमटले.

'जन्माला आली तेव्हा एवढीशी तर पिल्लू होती. माझ्या हाताच्या कोपरापेक्षाही कमीच लांबीची. आणि आता पाहता पाहता आपल्या आईपेक्षाही उंच झालीय. तिचे आता फुलात रूपांतर व्हायला लागलेय अन मी अजूनही कळीच समजतोय.'

त्याला आठवलं, लहान असताना ईशू त्याच्याशी किती अटॅच होती. आता फक्त कामपूरती बोलते. बोलते काय? फक्त फर्मान सोडते. एखाद्या राणीसारखी! काही म्हटले तर तिचं एकच उत्तर, " मी तुझी छोटूशी राजकुमारी नाहीये. आय एम अ क्वीन! " काय तर म्हणे "आय एम ओन्ली आय. एम."
तिचे बोलणे आठवून परत त्याला हसू आले.


'माझे राणी, तू कितीही मोठी झालीस तरी ह्या बाबाची प्रिन्सेसच राहशील. आणि अशी किती मोठी झालीस गं तू? फक्त आईपेक्षा उंचच झालीस ना? आणखी खूप मोठी हो. आकाशाला गवसणी घाल. आपल्या कर्तृत्वाने खूप उंच हो.'

तो मनातच म्हणत होता. कारण प्रत्यक्षात बोलला असता तर तिने परत त्याला आऊटडेटेड बॉक्स मध्ये टाकले असते.


'चिमणी होती तेव्हा सतत कशी मागे मागे करायची? आईची लाडकी होतीच पण तिच्यापेक्षा पोरगी आपल्यावर जास्त जीव टाकते ही फिलिंग पण किती मस्त होती ना?' तो स्वतःशीच विचार करत बसला होता.



हे खरेच होते. आईच्या पोटात असतानापासूनच तिला बाबाची विशेष ओढ होती.

"थकले रे रोहन, आता झोपूया? बाळ देखील झोपलेय बहुधा. तेवढी हालचाल जाणवत नाहीये." रात्री रीमाने असे म्हणायचा अवकाश की हा सरळ तिच्या पोटावर अलवार हात फिरवायचा.


'और इस दिल मे क्या रखा है,
तेरा ही नाम लिखा रखा है..'

त्याच्या गाण्याचा सुर कानापर्यंत पोहचला की दुसऱ्याच सेकंदाला रीमाच्या पोटातील तो इवलासा गोळा हालचाल करायला लागे. बाबाच्या आवाजाची जादू आईच्या उदरात असल्यापासूनच तिने ओळखायला लागली होती.

जन्माला आली तीच मुळी प्रिमॅच्युअर बेबी म्हणून. जणू बाबाला भेटण्याची भारीच ओढ.

मग आयसीयू मध्ये भरती. काचेच्या पेटीत आईबाबाविना अनोळखी दोन तीन आपल्यासारख्याच चिमण्या जिवासोबत तिचे वास्तव्य!

तिथे तिला भेटताना पायावर नाव लिहिलेली पट्टी वाचून ओळखायचं की हीच आपली लेक. कारण सगळी लेकरं सारखीच दिसायची. पण ही पट्ठी मात्र बाबाचा आवाज कानावर पडला की हळुवार का होईना पण हालचाल करून प्रतिसाद द्यायची.



आपल्या लेकीला त्या अवस्थेत बघून रीमाने त्याच्या मिठीत रडून तरी घेतलं होतं. तो मात्र डोळ्यातील अश्रू डोळ्यातच ठेऊन "होईल ती लवकर बरी." असा बायकोला धीर देत होता.

बाप होता ना? बापाने रडून कसे चालणार?

दवाखान्यातून निघतांना "चल रे पिल्ल्या, निघतो आता." असं जरी याने म्हटलं तरी डोळे मिटून असलेली ती चार पाच दिवसांची चिमणी आपला गुलाबी ओठ बाहेर काढून हुंदका द्यायची.

" बाबा.. जाऊ नको दूर!" असेच काहीसे ती त्या हुंदक्यातून सांगायची.

तो मग "बरं बाळा नाही जात. थांबतो." असा म्हणाला की ही लबाड बरोबर गप्प व्हायची.

तीन चारदा असे झाले की पाचव्यांदा हा काही न बोलताच डोळे पुसत निघून जायचा. डोळे मिटून असलेल्या तिला बाबा गेलाय हे गावीही नसायचे.

:
क्रमश :
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
इतकी प्रेमळ ईशू खरंच का बाबापासून दुरावलीय? वाचा पुढील भागात.

फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all