जाऊ नको दूर. भाग -१

कथा बापलेकीच्या निर्मळ नात्याची.


जाऊ नको दूर.
(बाबा आणि मुलीच्या निर्मळ नात्याची छोटीशी कथा!)
भाग -एक.

"बाबा, माझ्या सिक्स्टीन बर्थडेला ना मला आय फोन थर्टिन प्रो मॅक्स मोबाईल हवाय!"



"अगं राणी हा मोबाईल काय वाईट आहे?" आपल्या हातातील मोबाईल लेकीच्या हातात ठेवत तो म्हणाला.

"आणि इतके दिवस हाच मोबाईल तर 'माझा, माझा' म्हणून वापरत होतीस ना? ह्यावरचे वॉलपेपर बघ, तुझ्याच आवडीचे आहे आणि त्यावर नाव पण तुझेच लिहिलेय की नाही." तो.


"हो, पण आता ओल्ड वाटतोय हा पीस. डॅड, नॉऊ आय एम ग्रोअन अप. तुझी ती चिमुकली ईशी नाही राहिलेय मी. आय एम ओन्ली 'आय.एम.' इनिशिअल्स ऑफ ईशा माहिरे!" ईशा कपाळावरचे केस उडवत म्हणाली.


"डॅड? हे काय नवीन आता? आत्तापर्यंत बाबा म्हणत होतीस ना? अचानक डॅड?" तो चमकून.

"या, बट फ्रॉम टुडे आय विल कॉल यू डॅड."

"पण का?"

"माय लाईफ, माय रुल्स!" कपाळावर आलेले केस आपल्या विशिष्ट स्टाईलने उडवत ती म्हणाली अन त्याचा मोबाईल त्याच्याच हातात ठेवत ईशू आपल्या खोलीत निघून गेली.

हा आहे रोहन अन ही त्याची लाडाची लेक, ईशी! तिच्या भाषेत सांगायचे तर 'आय. एम.' म्हणजे ईशा माहिरे.



"काय चाललंय हिचं? आज एकदम डॅड? मग तुला काय मॉम वगैरे म्हणते की काय?" रोहन स्वयंपाकघरात येत बायकोला म्हणाला.

"नाही. मी अजूनपर्यंत तरी आईच आहे तिची. तू तेवढा बदलला आहेस." रीमा हसून म्हणाली.
तो तिच्याकडे काही न समजून बघत राहिला.


"अरे, आई म्हणताना आपले ओठ एकमेकांना टच होत नाहीत. बाबा म्हणताना ते हमखास चिपकतात. म्हणून ती तुला डॅड म्हणतेय. कदाचित चिपकू बाबा तिला नको असेल?"


"हे काय गं? मला कळेल असे सांग काहीतरी." तो 'बाबा' आणि 'डॅड' म्हणून बघत आपल्या ओठावर लक्ष केंद्रित करून म्हणाला.

"अरे मॅडमनी ओठांना लिपस्टिक लावलीय. ओठ एकमेकांना टच झाले तर लिपस्टिक खराब होते असं यू ट्यूब वरून ज्ञान मिळालंय तिला. बाकी काही नाही. काही दिवसांनी गाडी परत बाबावर येते की नाही ते बघ.

ही घे मस्त कडक कॉफी. फ्रेश वाटेल." कॉफीचा कप त्याच्या समोर ठेवत ती.



" ईशू माझ्यापासून दूर होत चाललीय का गं? " काळजीने रोहन.

"अहं, जराशी मोठी झालीय!" कॉफीचा घोट घेऊन रीमा म्हणाली.

********

ईशी, रोहनची लाडकी लेक नुकतीच बाराव्या वयात पदार्पण करत होती. हे वय म्हणजे आपल्यालाच तेवढे सगळे कळते नि आईबाबा म्हणजे एकदमच आऊटडेटेड, ओल्ड फॅशन्ड असे वाटणाऱ्या वयाच्या टप्प्याची सुरुवात. आपली ईशी याच मुलांच्या टप्प्यातील.



"बाबा, हा पेन बघ. मला ना अगदी असाच पेन हवाय. ओन्ली फिफ्टी रुपीज चा आहे यार!"

"अगं, आत्ताच नाही का तीन दिवसांपूर्वी दोन पेन घेतलेत?"

"ते आता मला आवडेनासे झालेत. आता मला हा पेन हवाय."
****

"बाबा, ही पिंक बॅग का आणलीस रे?"

"अगं,जनरली मुलींना पिंक कलर जास्त आवडतो ना म्हणून."

"आय एम नॉट द्याट एनी जनरल मुलगी. आय एम स्पेशल वन अँड आय लाईक ओन्ली ब्लॅक कलर!"

'लहान असताना पिंक पिंक हवे म्हणणारी आता ब्लॅक ची दिवानी झालीय.' तो मनाशीच हसला.

"काय? अतिलाडाने चढलीय ना डोक्यावर? आधीच सांगत होते, कधी कधी तिला नाही म्हणायला शिक रे. पण नाही. लाडाची लेक ना? "
स्वयंपाकघरातून बापलेकीचा संवाद ऐकणारी रीमा बाहेर येत त्याला म्हणाली.

"असू दे गं. लाडाचं कोकरू आहे. माझ्याजवळ नाहीतर आणखी कोणाजवळ हट्ट करेल ती?" त्याने हसून विषय बाजूला सारला. मनात मात्र वेगळ्याच भीतीने ग्रासले होते.

:
क्रमश :
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)


रोहनला वाटतेय तसे ईशी खरंच त्याच्यापासून दूर जातेय का? वाचा पुढील भागात.
******

फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all