जरी वेगळे एकच आपण

Nature Of Relationship Between Husband And Wife
कवितेचे शीर्षक :- जरी वेगळे एकच आपण
कवितेचा विषय :- दोन ध्रुवांवर दोघे आपण
उपविषय :- राज्यस्तरीय कविता स्पर्धा फेरी 2
टीम :-अमरावती



डोळेभरून प्रेम, काळीजभर साठवण
तुझ्या मायेचं आभाळ ,ती मनभर आठवण
कितीतरी अलगद,सहज अन् नटखट
प्रीत जपूनी दोन ध्रुवावर दोघे आपण

तुझ्या मनी तू गुलाब जपला
माझी नुसती सुगंध उधळण
उरी हवासा स्पर्श सोहळा
होत राहु दे पवित्र मिलन
जरी दोन ध्रुवावर दोघे आपण

माझा असतो शब्द सपाटा
तुझा कधी ना शब्द अकारण
फार भावला तुला हिवाळा
मला मोहवत येतो श्रावण
दोन ध्रुवावर दोघे आपण

जवळ असता कहरच होतो
दूर जाता उगाच आठवण
लबाड तुही खट्याळ मीही
सत्वर ये गं मला निमंत्रण
दोन ध्रुवावर दोघे आपण

बेगड शोभा ,दागदागिने
तुझ्याचसाठी सारे लेपण
सोबत असतो जेव्हा जेव्हा
माझे तुझे अन् तुझ्यात मीपण
दोन ध्रुवावर दोघे आपण


©® रोशनी कडू
टीम - अमरावती.