जरा विसावू या वळणावर भाग 6 अंतिम

Kathamalika

ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी

जरा विसावू या वळणावर अंतिम
टीम - 'प्रेषित'

आज 15 दिवस झाले होते शशांकला घर सोडून. आर्यन त्याला भेटायला जात होता. अनुजसोबत तो फक्त ऑफिसमध्ये कामापुरतं बोलत होता. प्रॉपर्टीचे पेपर्स सह्या करून त्यांना दिले होते. घर सोडल्याची बातमी वसुधाला कळू दिली नव्हती. मुलं जोपर्यंत स्वीकारत नाहीत तोपर्यंत भेटायचं नाही ठरलं होतं.

वसुधा द्विधा मनस्थितीत सापडली होती. 'कशाला यात पडले अस वाटू लागलं तिला. काय गरज होती शशांकला भेटायला जायची, त्याचं ऐकून घ्यायची. इतके वर्ष आपण स्वतःला सांभाळलंच ना? जगत होतोच आपण, तसंच राहिलो असतो मरेपर्यंत. पण आपल्यालाही आनंदी राहायचा अधिकार आहे ना? आधी आईवडिलांमुळे त्याच्यापासून दुरावलो, आता मुलांमुळे.' श्रावणीच्या बोलण्याने दुखावलेली ती राजसकडे बघून स्वतःला सावरत होती.

श्रावणी निलच्या समजवण्याने बरीच शांत झाली होती. तरी आईसोबत अजून बोलली नव्हती. निलने मात्र वसुधाला भेटुन काळजी करू नका म्हणून सांगितलं होतं.

अनुजला आता हा अबोला असह्य झाला. तो आईबाबांसोबत खूप ऍटॅच होता. आई गेल्यावर बाबांशी तो अधिकच कनेक्ट झाला होता. त्यांचं घरी नसणे, कंपनीत दुर्लक्ष करणे, यामुळे तो अस्वस्थ राहात होता. सानिकाला ही आपली चूक जाणवत होती. 'इतकी मोठी कंपनी चालवतात बाबा, असं कुणावरही विश्वास ठेवणार नाहीत. आधी चौकशी करून मग आपण बोलायला हवं होतं.' त्यात अनुजचा त्रास बघून तिचंच मन तिला खात होतं.

अनुजला आई-बाबांची खुप आठवण येत होती. त्याने आईचं कपाट उघडलं. आई गेल्यावर पहिल्यांदा तो ते कपाट उघडत होता. जुने फोटो अल्बम बाहेर काढले. ते चाळताना त्याचे डोळे भरून आले. असंच अल्बम्स चाळताना त्यातून एक चिठ्ठी बाहेर पडली. कागद थोडा जीर्ण झाला होता. सहजच त्याने ती उघडली. वेड्यावाकड्या अक्षरात त्याच्या आईने लिहिलं होतं. ते वाचून त्याला धक्का बसला. त्याच्या थरथरत्या हातातून ती चिठ्ठी गळून पडली. आपली आई असं वागू शकते त्याला विश्वासच बसत नव्हता.

सानिका त्याला शोधत तिथे आली. अनुज शून्यात हरवलेला बघून तिच्या काळजात धस्स झालं. खाली पडलेली चिठ्ठी तिने वाचली.

प्रिय शशांक,

मी तुझी गुन्हेगार आहे. कदाचित म्हणूनच त्याची ही कॅन्सररुपी शिक्षा मला मिळाली. मला माहित आहे मी थोड्याच दिवसांची सोबती आहे. मरणापूर्वी खूप वर्षांपासून लपवलेलं एक सत्य आज सांगते.

तुझ्यापासून तुझं प्रेम मी तोडलं. वसुने इतक्या विश्वासाने दिलेली चिठ्ठी मी तुझ्यापर्यंत पोचवली नाही. ती तुझी वाट बघत होती. पण मी..माझ्या स्वार्थासाठी तुला शेवटचा निरोप दिला नाही.

तुला गमवायच्या भीतीने.

हो.. मला तू पहिल्यापासून आवडायचास. पण तू कधी लक्ष दिलं नाहीस माझ्याकडे. वसू भेटल्यावर तू तिच्याबद्दल मला विचारायचास. किती राग यायचा तुझा. तिच्याकडे किती प्रेमाने बघायचास. त्याच प्रेमळ नजरेसाठी मी व्याकुळ व्हायचे.

तुमच्याबद्दल मीच अफवा उठवली होती. तिच्या घरी मीच बातमी पोचवली होती, जेणेकरून तिच्या घरातून विरोध व्हावा आणि तेच झालं. ती घरी सगळ्यांना समजावू पाहत होती तुझ्याबद्दल. कोणी ऐकलं नाही तिचं. तुझ्यापर्यंत तिची कुठलीच खरी बातमी मी पोहोचू दिली नाही. नेहमी खोटं सांगत राहिले. नवरा श्रीमंत आहे, ती स्वतःहून तयार झाली, खुश दिसत होती, एक ना अनेक खोटंनाटं सांगितलं. तू ही विश्वास ठेवलास.

आपल्या घरी ही मीच लग्नाचा विषय काढला होता. बाबांना ही तू आधीपासून आवडायचास. एकुलती एक असल्याने ते तुला जावई करून घ्यायला लगेच तयार झाले. तुझ्याही घरी सगळेजण माझ्याकडून होते. फक्त तू सोडून. पण तू ही अखेर तयार झालासच. आनंदाने वेड लागायचं बाकी होतं मला.

तू माझ्याशी प्रामाणिक राहिलास रे. सगळं सुख माझ्या पायाशी आणलंस. फक्त एक सोडून. तुझ्या मनात जी वसूची जागा होती, ती मला नाही देऊ शकलास.

तू म्हणशील हे असं चिठ्ठी लिहून का सांगितलं..? मी मरताना तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल तिरस्कार बघू शकणार नाही. जमलं तर मला माफ कर.

- तुझी असून नसलेली
सुनीता

आईने जी चूक केली त्याला आपण सुधारू शकतो. पण आईच्या जागेवर कुणी दुसरी बाई कसं स्वीकारू? आई म्हणून नको पण त्यांच्या प्रेमाखातर तरी. पण ती अजूनही तशीच असेल कशावरून? सानिका म्हणते तशी प्रॉपर्टीसाठी सगळं करत असेल तर?  द्विधा मनस्थितीत तो अडकला होता. एकीकडे आईबाबांवरच प्रेम, आईची चिठ्ठी, बाबाचं असं अचानक घर सोडून जाणे. विचारांच्या जंजाळ्यात अडकलेला अनुज डोकं धरून बसला होता.

सानिकाला ही आता वाईट वाटलं. तिने अनुजसोबत बोलायचं ठरवलं. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तो भानावर येत तिला मिठी मारून रडू लागला. तिने त्याला शांत होऊ दिले. शांतपणे समजावलं. दोघांनी काहीतरी ठरवलं आणि स्मित हास्याने त्या कामाला लागले.



"हॅलो" वसुधा

"वसू.." शशांक

"शशांक काय झालं तुला..? असा का आवाज येतोय..? बरं नाहीये का..?" वसुधाने क्षीण आवाज ऐकून काळजीने विचारलं

"काही नाही गं. कणकण वाटते थोडी." शशांक

"तू आराम कर. कुठला विचार नको करू. काही खाल्लं का..? औषध..?" वसुधा

फोनवर फक्त धाप लागल्याचा आवाज येत होता. वसुधाला आता खूप काळजी वाटू लागली.

"शशांक काय होतंय तुला..? तू कुठे आहेस..? घरी सांग कुणाला तरी डॉक्टरला बोलव. शशांक ऐकतो आहेस ना..?" वसुधा

फोन कट झाला होता. तिला काहीतरी वेगळी विचित्र फिलिंग येत होती.

"राजस, आर्यनला फोन कर पटकन. शशांक ठीक वाटत नाहीये. पटकन डॉक्टरला बोलवायला सांग." वसुधा अगतिक झाली होती

"हो आई. मी करतो." राजस

त्याने पटकन आर्यनला फोन केला. आर्यनला पण हे ऐकून धक्का बसला. त्याने तिथे काम करणाऱ्या नोकराला फोन लावला. बाबांकडे बघायला सांगितलं. डॉक्टरांना फोन लावला. तिथला पत्ता देऊन स्वतः तिथे जायला निघाला.

शशांक तापाने फणफणला होता. 15 मिनिटांत डॉक्टर आले. आयर्न ही पोचला. बाबांची तब्बेत बघता त्याला कसंतरी वाटलं. त्याने राजसला ही फोन केला होता. तो ही वसुधाला घेऊन तिथे पोचला. वसुधाच्या काळजात चर्रर्रर झालं.

ती त्याच्या उशाशी बसून त्याच्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेऊ लागली. काळजीने डोळ्यातून आसवे वाहत होती.

सहजच लक्ष साईड टेबलवर ठेवलेल्या शशांकच्या फोटोकडे गेली. सुनीताला बघुन तिला धक्काच बसला. सुनीता याची बायको..? मग आपली चिठ्ठी हिने नसेल का दिली..? शशांक खोटं बोलतोय कि सुनीता खोटं बोलली..? वसुधाला काहीच कळत नव्हतं. विचार करता करता ती फ्रेम हातात कधी घेतली कळलं ही नाही.

शशांकच्या आवाजाने ती भानावर आली. तो तापात काहीतरी बरळत होता,

"वसू, माफ कर मला. आता नाही सोडणार तुला कधी..वसू.." असं काही पुटपुटत होता.

"शशांक, शांत हो राजा. मी इथेच आहे. कुठेच जाणार नाही. आणि मी रागावले पण नाही. तू आधी बरा हो. मग तू म्हणशील तिथे जाऊ. मी असेन तुझ्या सोबत. तू लवकर बरा हो राजा.." त्याच्या केसातून हात फिरवत वसुधा त्याला समजावत होती. ती आता कॉलेजमधली वसू वाटत होती. शशांकची वसू.

शशांकने झोपेतच वसुधाचा हात स्वतःच्या हृदयाशी धरला. तिच्या डोळ्यातून मूकपणे अश्रू बरसत होते. आणि हे सगळं बघणाऱ्या अनुज आणि सानिकाच्या डोळ्यातून ही अश्रू वाहू लागले होते.

शशांकला झोप लागल्यावर वसुधा बाहेर आली. अनुज आणि सानिका तिच्याजवळ आले.

"थोडं बोलायचं होतं." सानिका चाचरतच म्हणाली

ते तिघे एका खोलीत गेले.

"काकू, कुठून सुरवात करू कळत नाहीये. पण तुमची माफी मागायची होती." अनुज

"कसली माफी?" वसुधा गोंधळली

"आमच्यामुळे बाबा घर सोडून इथे आले?" अनुज खाली मान घालून म्हणाला

"काय? हे कधी झालं? शशांक मला काहीच बोलला नाही." वसुधा

"सगळं आमच्यामुळे झालं. आणखी एक सांगायचं होतं." अनुजने ती चिठ्ठी तिच्यासमोर धरली.

चिठ्ठी वाचून वसुधाला खुप मोठा धक्का बसला. डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. इतका मोठा धोका आपल्या मैत्रिणीने दिला हे तिला सहनच होत नव्हतं. ती लडखडत तिथल्या बेडवर जाऊन बसली. थोड्यावेळ कोणी काहीच बोलल नाही. तिने एकदा अनुज आणि सानिकाकडे बघितलं. आणि एकदा चिठ्ठीकडे बघितलं. शांतपणे ती चिठ्ठी घडी घालून अनुजकडे दिली.

तिच्या या कृतीने दोघेही गोंधळले. ती नक्की आता काय म्हणेल कळत नव्हतं.

"जे झालं ते झालं. ते बदलू शकत नाही कोणी. हीच नियतीची इच्छा होती." वसुधा स्वतःला सावरत म्हणाली

"काकू, माझ्या आईने जी चूक केली, ती माफ करण्यासारखी नाही. तरी मी विनंती करतो प्लिज तिला माफ करा." अनुज हात जोडून म्हणाला

"माफ करणारी मी कोण आहे..? आणि तुमची तरी काय चूक यात. कुणाचीच चूक नव्हती ही. फक्त खेळ होता नियतीचा." वसुधा

"काकू, बाबांना हे कळू देऊ नका प्लिज." अनुज

"नाहीच सांगणार. त्याने सुनीताचा तिरस्कार करावा हे मला मान्य नाही." वसुधा ठामपणे म्हणाली

"थँक्स काकू. तुमच्याशी बोलून खूप मोठं ओझं उतरल मनावरचं." सानिका

तिने हसत दोघांच्या गालावरून मायेने हात फिरवला. भारावलेले ते तिला बिलगले.



दुसऱ्या दिवशी ताप उतरला. शशांकला जाग आल्यावर समोर वसुधाचा चेहरा बघून त्याला प्रसन्न वाटलं. थोडासा नाष्टा पाणी घेऊन वसुधाने त्याला गोळ्या दिल्या. अनुज तिथे आला.

"माफ करा बाबा. प्लिज घरी चला. मला नको प्रॉपर्टी. तुम्ही हवे. तुम्ही दोघे हवे आहात मला. प्लिज मी चुकलो. हवं तर शिक्षा करा पण घरी चला परत." अनुज रडत शशांकच्या पायाशी बसला

"अनुज बेटा, शांत हो आधी. मी तुझ्यावर रागावलो नाहीये. बस आता वसूची साथ द्यायची आहे. या शरीरात प्राण असेपर्यंत. मी तिच्यावर अन्याय केला रे. त्याची सल नेहमी बोचत होती मला. मरण्याआधी त्यातून सुटका हवी." शशांक बोलत होता की वसुधाने त्याला अडवलं

"अस मरणाची गोष्ट केलीस तर माझ्याइतकं वाईट कोणी नसेल. सांगून ठेवते. शरदना गमवल आहे मी. आता तुला गमवायची ताकद नाही माझ्यात." वसुधा

"दोघेही कुठे ही जाणार नाहीये. आमच्यासोबत राहायचं आपल्या घरी. अजून आर्यन राजसचं लग्न बाकी आहे आणि नातवंडही खेळवायचं आहे. तुमचं प्रमोशन झालं आता." अनुज लाजत म्हणाला

"म्हणजे? खरंच का गं." वसुधा आनंदाने म्हणाली

सानिका लाजत हो म्हणाली.

शशांक गोंधळलेला होता.

"नवरोबा सोबत आजोबाही होणार आहात." वसुधा हसत म्हणाली

"काय खरंच?" शशांकने अनुजची पाठ थोपटली

"चला आता तयारीला लागा. आज्जीचा पायगुण चांगला म्हणायचा." शशांक हसत म्हणाला

श्रावणी ही निल सोबत भेटायला आली. आईवर किती दिवस रुसून बसणार होती. दोघी गळ्यात पडून खूप रडल्या. शशांकसोबत ही छान गप्पा रंगल्या तिच्या. आर्यन, राजस ही खुश होते. सगळीकडे आनंदी वातावरण होते.

संध्याकाळी दोघे बोलत बसले होते.

"वसू, कधी वाटलं नव्हतं गं अशी अचानक या वळणावर तू भेटशील. नजर कायम तुला शोधत राहायची. आज तिचा शोध पूर्ण झाला. आता अजिबात साथ सोडणार नाही तुझी. आयुष्यात कुठलेही वळण येऊ दे. आता या वळणावर विसावेन ते तुझ्यासोबतच. कायमचं." शशांक वसुधाचा हात हातात घेत म्हणाला

"मी ही अशीच विसावेन तुझ्यासोबतच. या वळणावर. कायमची." वसुधा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली

नियतीने उतारवयात का होईना दोघांच्या आयुष्यात हे सुखद वळण आणलं होतं. पुनः एकदा.

समाप्त.

- श्रिया❣️
12-02-2021

🎭 Series Post

View all