जरा विसावू या वळणावर भाग 5

Kathamalika

ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी

जरा विसावू.. या वळणावर.. भाग 5
टीम - 'प्रेषित'

"आर्यन, वसुधा माझी कॉलेजमधली मैत्रिण आहे. आज योगायोगाने भेट झाली आणि सोबत कॉफी घेऊ म्हणून येथे आलो. आपण रात्री बोलूया, मी आता जरा गडबडीत आहे." शशांक

"ठीक आहे बाबा. बाय. बाय वसुधा काकू." आर्यन इतकं बोलून त्याच्या मित्रांकडे गेला.

वसुधा अजूनही घाबरलेली वाटत होती. आर्यनच्या अशा अचानक समोर येण्याने तिला काही सुचत नव्हतं. मनातली अस्वस्थता चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्याने तिचा हात धरून कॉफी शॉपच्या बाहेर आणलं आणि तिला आपल्या कारमध्ये बसवलं. आणि तिच्या घरी जायला निघाले.

वसुधाने मनाशी पक्के केले की मुलांना आपण घेतलेल्या निर्णयाची कल्पना आज  द्यायचीच. पण मनावर दडपण ही येत होते. 'कसं सांगावं बरं? ती कशी प्रतिक्रिया देतील', घर येईपर्यंत विचारांचा भुंगा तिच्या डोक्यात भुणभुणत होता. कोणी कुणाशी बोललं नाही. घर आलं तसं शशांकने कार थांबवली.

"मी आज मुलांना सांगते. माहीत नाही ते काय म्हणतील, किती समजावून घेतील आणि कसं..?" वसुधाने उतरायच्या आधी त्याला सांगितलं. तिच्या चेहऱ्यावर चिंतेचं जाळ दिसत होतं.

"सगळं ठीक होईल. मी म्हटलं ना काळजी नको करू. टेंशन तर अजिबात घेऊ नको." शशांक म्हणाला खरं पण त्याला वसुधाची काळजी वाटू लागली.

'एकदा वाटलं आपणही तिच्या घरी जावं तिला धीर होईल. पण मग आपल्यापेक्षा ती तिच्या मुलांना योग्य पद्धतीने समजावू शकेल. अगदीच गरज वाटली तर आपण भेटून समजावू त्यांना.' असा विचार करून तो शांत झाला.

7 वाजत आले होते. वसुधाला घरी सोडून तो ही सरळ घरीच गेला. त्याने ही आजच घरी बोलायचं ठरवलं होतं. नाहीतरी आर्यनने पाहिलं होतंच. त्यामुळे साहजिकच विषय निघणार होता. गैरसमज होण्याआधी आपली बाजू मांडलेली बरी.

वसुधा घरी आली तर राजस कॉलेजमधून अगोदरच आला होता. फ्रेश होऊन तिने दोघांसाठीही आलं-वेलचीयुक्त चहा बनवला. चहाचे घोट घेत घेत राजसशी गप्पा मारत असतानाही तिचं विचारचक्र सुरू होतच, मुलं काय म्हणतील?.

तेवढ्यात बेल वाजली. राजसने दार उघडले. लगबगीने आत येत घुस्स्यातच श्रावणी सोफ्यावर दाणकन बसली. तिने रागातच वसुधाला प्रश्न विचारला.

"आई, सध्या तुझं काय चाललंय?" श्रावणी रागातच म्हणाली

"काय चाललंय म्हणजे.? नेमकं काय म्हणायचं आहे तुला?" वसुधा

"थोड्यावेळापूर्वी कॉफी शॉपमध्ये तुझ्याबरोबर कोण होतं? कुणाच्या कार मधून तू निघून गेलीस..?" श्रावणी

तिच्या या प्रश्नावर वसुधा अवाक झाली.

"म्हणजे..तू..कॉफी शॉपमध्ये होतीस..?" वसुधाने घाबरतच विचारलं

कॉफी शॉपच्या बाहेर एका बाजूला श्रावणी तिच्या मैत्रिणीला भेटायला आली होती. तिची नजर वसुधा आणि शशांकवर पडली. तिला धक्काच बसला. 'आपल्या आईचा हातात हात घेणारा हा पुरुष कोण आहे बरं? यापुर्वी त्याला कुठे पाहिले नाही.? आई असं कुणाचा हात पकडू शकते.?'मैत्रिणीसोबत असली तरी डोक्यात प्रश्नांचे काहूर माजले होते. कसं बसं मैत्रिणीला कटवून तिने वसुधाला फोन केला. थोड्यावेळात मी घरी येतेय, असं सांगितलं होतं.

तेव्हा वसुधाच्या हे लक्षात आलं नव्हतं. पण आत्ता तिला श्रावणीच्या रागात असण्याचं कारण समजलं होतं.

"हो. माझ्या सुदैवाने म्हणून तरं तुझी थेरं कळली मला." श्रावणी

"श्रावू, थोडं पाणी पी आणि शांत हो जरा. डोक्यात राख घालून घेऊ नकोस. तुला वाटते तसे काही नाही." वसुधा

"मग.? मी पाहिले ते खोटे होते का? अगोदर माझ्या प्रश्नाचे उत्तर दे." श्रावणी

"आईला जाब विचारायला आलीस ना? तुम्हा दोघांनाही मी सगळे सांगणार आहे. त्याचसाठी मी तुला येथे बोलवणार होते." वसुधा आता सावरली होती. जे होईल ते होईल, मनातलं बोलून मोकळं होऊ. असा विचार तिने केला.

"शशांक देवधर, माझा कॉलेजमधला मित्र. प्रेम होतं आमचं एकमेकांवर. आम्ही लग्न ही करणार होतो. पण नियतीला ते मंजुर नव्हते. तेव्हा एका वेगळ्याच वळणावर आणून ठेवलं होतं नियतीने आणि आता या वळणावर भेटवलं तिने आम्हाला." असं म्हणत वसुधाने थोडक्यात तिचा भूतकाळ मुलांसमोर उलघडला आणि त्याने मला परत एकदा लग्नासाठी विचारलं आहे, हे सांगितलं.

खूप वेळ कुणी काहीच बोलल नाही.

"आई, अगं सर खुप मोठे उद्योजक आहेत. अगदी जंटलमन आहेत. खुप मोठ्या मनाचे आणि उमद्या स्वभावाचे आहेत ते. आर्यनमुळे मी त्यांना बऱ्याचवेळा भेटलो ही आहे. तू जर त्यांच्यासोबत लग्नाचा निर्णय घेतला असशील तर मी तुझ्या सोबत आहे." राजसने स्वतःचे मत व्यक्त केलं.

"काहीही फालतू बडबडू नको, गप्प बस जरा. आई, या वयात हे शोभतयं का तुला?" श्रावणी कडाडली.

"एवढं आभाळ कोसळल्यासारखं काय बोलते.? मी काही गुन्हा नाही केला." वसुधा

"अच्छा? मुलांच वय लग्नाचं झालंय आणि आई आपलं लग्न जुळवते. व्वा. खूप छान." श्रावणी टाळ्या वाजवत उपहासात्मक हसत म्हणाली

वसुधा आपल्या परीने श्रावणीला समजावत होती. पण ती काही ऐकायला तयार नव्हती.

"ही नाटकं थांबवं. तुझ्या या निर्णयाने सासरी मला तोंड दाखवायला जागा उरणार नाही." श्रावणी तरातरा निघून गेली.

वसुधा व्यथित झाली. तिच्या डोळ्यात पाणी तरळले. 'हीच का ती मुलगी जिला लहानाच मोठं करताना आपण खस्ता खाल्ल्या..? उच्च शिक्षण देऊन सुसंस्कार केले. एवढ्या मोठ्या मुलीला आपल्या आईच मन कळू नये. जरा ही मला समजुनही घेत नाही तिला.' वसुधा बराच वेळ विमनस्क अवस्थेत बसून होती.

राजसने हलकेच तिला थोपटले. ती रडत त्याच्या कुशीत शिरली.

"काळजी नको करू आई. तू काही चुकीचं नाही करत आहेस. कसलाच गुन्हा नाही करत आहेस. तिला थोडा वेळ दे. समजेल तिला ही. मी आहे तुझ्यासोबत." राजस शांतपणे तिला समजावत होता.

तिला क्षणभर शरदचा भास झाला. तो ही असंच समजूत काढायचा तिची.

"का सोडून गेलात मला असं एकटीला ठेऊन..? सोबत तरी घेऊन जायचं होतं. कमीतकमी सुटले तरी असते सगळ्या त्रासातून.." वसुधाने हंबरडा फोडला.

इतक्या वर्षांचं दुःख आज बाहेर पडत होतं. राजस तिला सावरत होता.



श्रावणी तणतणतचं घरी आली. निल नुकताच ऑफिसमधून आला होता. तिचा मूड खराब आहे ते त्याला कळलं.

"श्रावू, काय झालं राणी? आज तु खूप डिस्टर्ब दिसत आहेस." निलने विचारताच श्रावणी त्याच्या गळयात पडून रडू लागली.

निलने तिला थोपटलं. थोडं शांत झाल्यावर श्रावणीने सगळा वृत्तांत त्याला सांगितला.

निलला आधी थोडं आश्चर्य वाटलं. पण थोडा विचार केल्यावर त्याला वसुधाचा निर्णय पटला.

"श्रावू, अगं आईंच्या निर्णयात वावगे काहीच नाही. त्यांना ही मन आहे, भावभावना आहेत ना? लवकर वैधव्य येऊन ही त्यांनी केवळ तुम्हा दोघांच्या संगोपनावर लक्ष केंद्रित केले. स्वत: न डगमगता खंबीर राहून येईल त्या प्रसंगाला त्यांनी धीराने तोंड दिले. तुमची शिक्षणं पूर्ण केली. थाटामाटात आपलं लग्न लावून दिलं. आत्तापर्यंत त्या कधीच चुकीच्या वागल्या नाहीत. मग आत्ता जर त्यांनी स्वतःबद्दल विचार केला तर यात काहीही वाईट नाही." निल

"यामुळे माझ्या बाबांची प्रतारणा होतेय? श्रावणी

"प्रतारणा.? ती कशी काय? लहान होतीस तू बाबा गेले तेव्हा. तुला थोडं तरी आठवत असतील ते. राजसला तर काहीच आठवत नसेल. 3-4 वर्षांचा असेल तो. आईबाबांची भुमिका एकट्या आईने पार पाडली. तुझ्या सुखासाठी आईने आपल्या प्रेमविवाहाला लगेच संमत्ती दिलीच ना? ते ही जातपात न बघता. कारण विरहाच्या वेदना त्यांनी भोगल्या होत्या‌ आधी. कदाचित तुला तुझ्या प्रेमापासून दूर करून आणखी एक वसुधा जन्माला घालायची नसेल त्यांना." निलच्या बोलण्याने श्रावणी विचारात पडली. तो जे बोलत होता त्यात तथ्य होतं.

"पण म्हणून दुसरं लग्न? ते ही या वयात.?" श्रावणी

"या वयातही त्यांना मानसिक आधाराची, सहवासाची, आपलेपणाची खुप गरज आहे. त्यांच्या मनाची रिक्त पोकळी आपण भरून काढू शकत नाही ना..?" निल

"अरे पण लोकं काय म्हणतील?" श्रावणी

"या विचार ते त्या आपल्या लग्नाला संमती देताना ही करू शकल्या असत्या. त्यांनी केला का.? तुझे बाबा गेल्यावर कोण लोकं आले होते तुम्हाला मदत करायला सांग.?" निल

त्याच्या या बोलण्यावर श्रावणी शांत झाली. निलचं बोलणं तिला पटत होतं. पण तरी ही..

"शांतपणे विचार कर श्रावू. लोकांपेक्षा आईच्या मनाचा विचार कर." निल तिला थोपटत म्हणाला



शशांकने रात्री जेवण झाल्याल्यावर वसुधाचा विषय काढला. थोडक्यात सगळी माहिती सांगून आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे, असं सांगितलं. सगळ्यांना एकदम शॉक बसला.

"हे काय बोलताय तुम्ही? लग्न ते ही या वयात?" अनुज

"मी वसुधाशी लग्न करतोय. काही झालं तरी मी तिची साथ सोडणार नाही." शशांक

"दादा, वसुधा काकू म्हणजे माझा मित्र राजस आहे ना त्याची आई. त्या खुप चांगल्या आहेत, असं मित्रांकडून मी ऐकलयं. बाबा, मी तुमच्या निर्णयाचा आदर करतो." आर्यन

सानिका म्हणजे अनुजच्या बायकोचं तोंड पाहण्यासारखं झालं होतं. तिने एक जळजळीत कटाक्ष आर्यनकडे टाकला. अनुजला ही ती तु गप्प का? काहीतरी बोल, असं भुवया उंचावून खुणावत होती.

"माझ्या आईची जागा दुसऱ्या कुणी घेतलेली मला आवडणार नाही." अनुज रागाने म्हणाला आणि सानिका सोबत त्याच्या खोलीत निघून गेला.

"बाबा, काळजी नका करू. मी आहे तुमच्यासोबत." आर्यन त्यांच्या खांद्यावर हात ठेवत धीर देत म्हणाला

'हो बेटा, तुमच्या आईशी मी आयुष्यभर प्रामाणिक राहिलो, पण आत्ता वसुधा माझं कॉलेजमधल पहिलं प्रेम मला भेटलं आहे. तीला ही लवकर वैधव्य आलं. आम्हा दोघांनाही या वयात एकमेकांच्या सहवासाची नितांत गरज आहे. लग्नाचा निर्णय झाला आणि आता तुमच्या कानावर घातला. असो." शशांक त्यांच्या रूममध्ये जायला निघाले

रूममध्ये आल्यावर सानिकाने अनुजला चांगलेच फैलावर घेतले.

"तु अजुन विरोध करायला हवा होतास. नुसता गप्प बसुन राहिलास." सानिका

"त्यांचा निर्णय झालेला आहे. त्यांनी केवळ फॉर्मलिटी म्हणून आपल्याला सांगितलय." अनुज

"असा कसा निर्णय झाला.? तुझ्या काहीच कसं लक्षात येतं नाही. अरे विनापाश एखादी स्त्री असती तर चालले असते, हिला एक मुलगा ही आहे. आपल्या प्रॉपर्टीत तो वाटेकरी होऊ शकतो. भलतीच चाप्टर बाई दिसते. चांगली मोहिनी घातली बाबांवर. दोघांनाही या वयात नाही तेचं सुचतंय." सानिका तावातावाने बोलत होती.

रूममधला आवाज शशांकच्या कानावर पडला. त्याला खुप दु:ख झाले.

'लोकांना फक्त पैसा हवा असतो का.? सगळ्यांना एकाच तराजूत का तोलतात. माझ्या भावनांना काही महत्व आहे का नाही.? वसुधा खुप स्वाभिमानी आहे. तिला जर हे कळले तर ती लग्न करण्याच्या निर्णयापासून मागे हटेल. मलाच काहीतरी निर्णय घ्यावा लागेल.' असा विचार करून वकिलांना फोन केला. काही पेपर्स बनवायला सांगितले.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने सगळ्यांना बोलवलं.

"नवीन घेतलेला एक फ्लॅट सोडून बाकी ही सगळी प्रॉपर्टी तुमच्या दोघांच्या नावावर करत आहे. वकिलांना तसे पेपर्स बनवायला सांगितले आहे." शशांक शांतपणे म्हणाला

"पण बाबा..?" अनुज काही बोलणार तोच शशांकने त्याला अडवलं

"तुमची प्रॉपर्टी तुम्हालाच मिळेल. मी हे घर सोडतोय. कायमच." शशांकने सानिकाकडे कटाक्ष टाकला आणि बाहेर निघून गेला.

आर्यन आणि अनुजला आणखी एक शॉक मिळाला होता.

क्रमशः

- सुप्रिया जाधव
10-02-2021

एकीकडे श्रावणी, दुसरीकडे अनुज सानिका. काय करतील वसुधा शशांक. या वळणावर तरी नियतीची साथ मिळेल..? वाचत राहा 'जरा विसावू या वळणावर'.

🎭 Series Post

View all