जरा विसावू या वळणावर भाग 4

Kathamalika

ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी

जरा विसावू.. या वळणावर.. भाग 4
टीम - 'प्रेषित'

"वसु, अगं वसुधा काय झालं? ऐकतीयेस ना मी काय बोलतोय ते." शशांकच्या बोलण्याने वसुधा भानावर आली.

तो जे काही बोलला होता त्यामुळे तिच्या पायखालची जमीन सरकली होती.

"वसुधा, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. उर्वरित आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे. भूतकाळात ज्या काही चुका झाल्या त्या सुधारून पुढे जायचं आहे. माझ्याशी लग्न करशील का?" शशांकचे बोलणे ऐकून वसुधाला धक्काच बसला होता.

"शशांक, तुला कळतंय का तू काय बोलत आहेस ते? अरे वय काय आपलं.? बोलतोय काय आपण.? याचं जरा भान असू दे. घरात एक तरुण मुलगा आहे, जावई आहे मला आणि मी लग्न करू या वयात?" वसुधा चिडूनच शशांकला म्हणाली.

"अगं, ऐक तरी माझं. काय वावगं आहे यात? अगं सुनीताच्या मृत्यूनंतर मी खूप एकटा पडलो गं. स्वतःच्या पायावर उभं राहून मग तुझा हात मागूया, या विचारात मी होतो. मला नोकरी करण्यात स्वारस्य नव्हतं. काहीतरी स्वतःच सुरु करावं या विचारात भटकू लागलो. ध्येयाच्या शोधात इतका लांब गेलो कि तुझ्यापासून दुरावलो. शेवटी स्वतःला सिद्ध करून ही कंपनी चालू करून त्यानंतर खूप शोध घेतला तुझा, पण तुझा काहीच पत्ता लागेना.

हताश झालो, काय करावं सुचत नव्हतं, घरात लग्नाचे वारे वाहू लागले. थोडं थांबू, सेटल व्हायचंय ही कारणं मी देऊ शकत नव्हतो. शेवटी ठरवलं घरचे ठरवतील ते करायचं. मग काय? काही दिवसात सुपारी फुटली आणि माझं लग्न झालं. तुला खोटं वाटेल पण माझ्या लग्नानंतरही मी तुला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. शेवटी मी हारलो. परिस्थितीचा स्वीकार केला. माझ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या बायकोवर मी अन्याय करतोय असं वाटू लागलं, म्हणूनच कदाचित तिच्या सुखासाठी मी माझं दुःख विसरून तिच्या आनंदात आनंद मानू लागलो आणि भूतकाळातील तुझ्या गोड आठवणी घेऊन मी वर्तमानात जगू लागलो.

एखाद्या प्रवाहासारखं समोर येईल त्याला सोबत घेऊन जगू लागलो पण पाच वर्षांपूर्वी हिने कॅन्सरमुळे या जगाचा निरोप घेतला आणि मी पुन्हा एकटा पडलो. हे उतरवाय भयानक चेष्टा करतंय माझ्यासोबत असं वाटू लागलं. मुलांकडे बघत जगू लागलो आणि त्या दिवशी कार्यक्रमाच्या निमित्ताने तू  पुन्हा भेटलीस मला. इतक्या वर्षांनी तुला पाहिल्यावर कोरड्या मातीत पावसाचे थेंब पडून जसा गंध मातीचा निर्माण करतात तसं तुला पाहून पुन्हा मन आठवणीत ओलं चिंब झाले. वसू खरचं मला तू अजूनही आवडतेस." शशांक बोलत होता पण मध्येच वसुधाने त्याला थांबवले.

"बास.. पुरे तू मला समजतोस काय रे? नवरा नाहीये, मुलाचे शिक्षण पूर्ण व्हायचे आहे म्हणून मी तुझ्याशी पैशासाठी लग्न करणारी बाई वाटले का मी तुला? तुझी हिंमत कशी झाली मला मागणी घालायची?" वसुधा आता भलतीच संतापली होती.

"वसू, अगं गैरसमज करून घेऊ नकोस. तू माझं पहिलं प्रेम आहेस. मला वाटतं या वयात सहानभूतीपेक्षा कोणाच्यातरी साथीची गरज असते. हा एकाकीपणा एक दिवस जीव घेईल माझा. मी तुझ्याबद्दल कुठलाही चुकीचा विचार करत नाही. मी तुझा आदर करतोय. पण समाज काय म्हणेल हे बाजूला ठेऊन तुझं मन काय म्हणतंय ते मला सांग." शशांक वसुधाला समजावत होता; पण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिला शशांकच्या वागण्याचा भयंकर राग आला होता.

"मला वाटलं आपल्यात मैत्री झाली आहे, त्यामुळे एकमेकांची सुख दुःख वाटून घेऊ; पण तुझ्या डोक्यात भलतेच विचार चालू आहेत. या पुढे मला पुन्हा भेटू नकोस आणि फोन सुद्धा करू नकोस." असं म्हणून वसुधा तिथून निघून गेली.

वसुधाने रागातच घराचं दार उघडलं. सोफ्यावर हातातली बॅग आपटली आणि डोक्याला हात लावून खाली मान घालून बसली. तिची छाती धडधडत होती. डोळ्यातील अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. शशांकच्या धक्कादायक वागण्यामुळे ती कोसळून गेली होती. मनात विचारांचं काहूर माजलं होतं, संमिश्र भावना उमटल्या होत्या.

'शशांक देवधर' याच्या आठवणीत मी कितीतरी रात्री जागून काढल्या असतील. शरदसोबत शरीराने होते मात्र मनाने मी शशांकच्या आठवणीतच होते. त्याच्यासोबत जीवन व्यतीत करायला एका पायावर तयार होते. मग आज काय झालं मला? हीच तर माझी इच्छा होती. हेच तर मला पाहिजे होते. हीच सल घेऊन मी जगत होते आणि आज त्याने मला आयुष्याचा जोडीदार होणार का म्हणून विचारले. मग मी का त्रागा करून घेत आहे? का माझी छाती त्याचं बोलणं आठवून अजूनही धडधडत आहे? का माझ्या पोटात गोळा आला? का माझ्या अंगावर शहारा आला? हे प्रेम नाहीतर काय आहे?

खरंच माणूस शरीराने म्हातारा होतो पण मनाने कधीच नाही.एखाद्या तरुण मुलीला तिच्या प्रियकराने प्रेम व्यक्त केल्यावर जसा आनंद होत असेल ना तेच आज मी अनुभवतीये. शेवटी शशांकही माझं पहिलं प्रेम आहे.' असा विचार करत असतानाच दारावरची बेल वाजली.

त्या आवाजाने वसुधा भानावर आली. पटकन डोळे पुसले, स्वतःला सावरलं आणि तिने दार उघडलं. कॉलेजमधून राजस घरी आला होता. त्याने आईचा चेहरा पाहिला.

"आई अगं, काय झालं आहे तुला? बरं नाही वाटत का? चेहरा बघ कसा झाला आहे तुझा.." राजस

"अरे बाळा काही नाही, डोकं दुखतंय म्हणून. बाकी काही नाही. जा तू फ्रेश होऊन ये, तुझ्यासाठी चहा करते." वसुधाने विषय बदलला.

"थांब आई, तुला बरं नाहीये ना. मी करतो चहा, माझ्या हातचा चहा पिऊन तर बघ. लगेच बरं वाटेल तुला." असं म्हणून राजस फ्रेश होण्यासाठी गेला.

राजसचं बोलणं ऐकून वसुधाला शरदची आठवण आली. असंच अगदी असंच, मला जेव्हा बरं नाही वाटायचं तेव्हा शरदसुद्धा छानसा चहा करून द्यायचा आणि काय जादू व्हायची देव जाणे; पण मला त्याच्याहातचा चहा पिऊन फ्रेश वाटायचं. किती काळजी घ्यायचा तो माझी आणि मी आत्ता काय विचार करत होते, शशांक..पहिलं प्रेम आणि लग्न? किती चुकीचा विचार करत होते मी. सोन्यासारखी दोन मुलं आहेत आहेत मला, शरदची विधवा आहे म्हणून काय झालं? आज कशाचीच कमी नाहीये मला. बास आजपासून पुन्हा शशांकचा चाप्टर बंद." असा विचार करून वसुधा कामाला लागली.
      
असेच काही दिवस गेले. शशांकने पुन्हा वसुधाला फोन केला नाही. कदाचित तिला नीट विचार करायला आपण वेळ दिला पाहिजे, असं त्याला वाटले आणि इकडे वसुधाचं कशातच लक्ष लागत नव्हतं. ती सतत कुठेतरी हरवल्यासारखी असायची. रोज रात्री घरातील हॉलच्या भिंतीवर असणाऱ्या तिच्या फॅमिली फोटोसमोर उभी रहायची, नीट जवळून ती फोटो न्याहाळून पहायची.

फोटोवर हात फिरवत म्हणायची, "मी शरदची विधवा आहे, दोन मुलांची आई आहे आणि जावईबापूंची सासू आहे. फोटोमध्ये दिसतंय हेच माझं आयुष्य आहे." कदाचित असं म्हणून ती स्वतःची खोटी समजूत घालण्याचा प्रयत्न करायची पण तिचं मन शशांक जे बोलला त्याच्याभोवती फिरत असायचे.
    
असचं एके दिवशी वसुधा बँकेतून लवकर घरी आली. तिचं डोकं जाम दुखत होतं. घरी येऊन ती थेट स्वयंपाकघरात गेली. आलं,वेलची घालून तिने फक्कड असा चहा केला आणि वाफाळलेला चहाचा कप घेऊन ती बाल्कनीत गेली. तिची घरातील सगळ्यात आवडती जागा म्हणजे बाल्कनी. तिथे तिने लावलेली निरनिराळ्या प्रकारची झाडं होती. शरद गेल्यावर बागकामात मन रमवून तिने तिचा एकाकीपणा दूर केला होता.

तिला वाटायचं या झाडांमध्ये अजब जादू आहे. ती आपल्यासोबत हसतात,रडतात, निस्वार्थीपणे आपल्यावर प्रेम करतात. कधी एकाकी वाटलं कि नुसता या झाडांवरून हात फिरवावा, सोबत कोणी असल्याची जाणीव होते. म्हणून तिचं मन शांत करायला ती झाडांच्या सानिध्यात येऊन बसली होती.

तितक्यात तिची नजर समोरच्या जुईच्या वेलीवर गेली. ती वेल आता वाढू लागली होती. त्या वेलीला आधार द्यावा म्हणजे ती चांगली फुलेल, असा वसुधा विचार करत होती तितक्यात तिच्या मनात विचार आला, 'आपलं आयुष्यही या वेलीप्रमाणेच आहे. जशी ही वेल वाढतीये तसं तिला जास्त आधाराची गरज आहे. तसचं वयाच्या या टप्प्यावर मलाही जास्त आधाराची गरज आहे. माझ्या आयुष्यवेलीला प्रेमाचं खतपाणी मिळालं आणि सहवासाचा आधार मिळाला तर तीसुद्धा अशीच बहरेल. आयुष्य एखाद्या शांत, खोल असणाऱ्या डोहाप्रमाणे व्यतीत करण्यापेक्षा निखळ वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे व्यतीत केलेलं केव्हाही चांगलंच. कारण खळखळाट करणाऱ्या पाण्यात डुबण्याची भीती नसते. स्वछंदीपणे आयुष्य जगण्याचा मला सुद्धा अधिकार आहे आणि प्रेमाला वयाचं बंधन कधीच नसतं.' मनोमन असा विचार करून वसुधाने शशांकला फोन करून दुसऱ्या दिवशी भेटायला बोलवलं.

दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेवर दोघेही जण एका कॉफी शॉपमध्ये भेटले.

"शशांक तू काही दिवसांपूर्वी जो प्रस्ताव मांडला माझ्यासमोर, त्यावर मी खूप विचार केला आणि मला असं वाटतंय.." वसुधा जरा बोलायला बिचकतच होती.

"काय वाटतंय वसू..? बोल पटकन आणि मोकळी हो." शशांक म्हणाला.

"मला वाटतंय आपल्याला या वयात साथीदाराची जास्त गरज आहे. म्हातारपण आणि बालपण अगदी सारखं असतं ना. लहान मुलाला जसं जपलं जातं, त्याच्याकडे लक्ष दिलं जातं, तसचं आपल्या हळव्या मनाला देखील प्रेमाने जपायची गरज आहे. आपल्यालाही प्रेम करायचा आणि ते व्यक्त करायचा अधिकार आहे. या वयात सर्वाधिक गरज आहे ती एका साथीदाराची. म्हणून मी तुझा लग्नाचा प्रस्ताव मान्य करते." वसुधा म्हणाली.

"काय..? वसू,खरचं..? मला बरं वाटतंय तुझ्या मनातला माझ्याबद्दलचा गैरसमज दूर झाला आणि अगदी खरंय या वयात साथीदाराची जास्त गरज आहे. मुलांना म्हातारपणीची काठी करण्यापेक्षा साथीदाराचा हात धरून चालेलेलं केव्हाही चांगलंच. वसू, मला फार बरं वाटतंय तू मला समजून घेतल्याबद्दल." शशांक म्हणाला.

"हो, पण पण माझ्या काही अटी आहेत..?" वसुधा

"कसल्या अटी वसू..?" शशांक

"मुलांनी होकार दिला तरच मी लग्न करेन. त्यांना डावलून मी काही करणार नाही.." बोलता बोलता वसुधाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

"आपल्याला आपल्या मुलांनी समजून घेतलं पाहिजे. त्यांना आपल्याबद्दल नीट समजावून सांगणं गरजेचं आहे. त्यांच्याशी शांतपणे बोललं पाहिजे." त्याने तिला समजावत तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाला, "काळजी करू नको वसू. एकमेकांच्या साथीने नक्कीच आपण हा अवघड गड सर करू. आता मात्र या वळणावर मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये." शशांक तिचा हात आपल्या हृदयाशी घट्ट पकडत म्हणाला

वसुधाने ही स्वतःला सावरत त्याच्या हातावर आपला हात ठेवत त्याच्या बोलण्याला अनुमोदन दिले.

त्याच कॉफी शॉपमध्ये मित्रांसोबत आलेल्या आर्यनने वडिलांना आणि वसुधाला असे पाहिले. त्याला धक्काच बसला. तो थेट त्या दोघांसमोर गेला आणि त्याने शशांकला आवाज दिला.

"बाबा.. तुम्ही इथे आणि ते पण वसुधा काकूसोबत?"

आर्यनला असं अचानक समोर उभं राहिलेला पाहून शशांक आणि वसुधा बावरले. वसुधाचा चेहरा कावराबावरा झाला. त्यांनी पटकन आपला हात सोडवला आणि उठून उभा राहीले.

शशांकला तर आत्ता लगेच काय बोलावं ते सुचत नव्हतं आणि आर्यन त्या दोघांकडून उत्तराची अपेक्षा करून तिथेच उभा होता.

क्रमश :

- सिद्धी भुरके
08-02-2021

वसुधाने तर होकार दिला; पण सोबत अटी ही ठेवल्या. आर्यनचं असं अचानक भेटणं..? त्यांचं आयुष्य आता कुठलं वळण घेईल..? वाचायला विसरू नका 'जरा विसावू या वळणावर'. धन्यवाद.

- टीम 'प्रेषित'.

🎭 Series Post

View all