जरा सुखाचा तपास घे रे..

जरा सुखाचा तपास घे रे

कवितेचे शीर्षक :- जरा सुखाचा तपास घे रे..

कवितेचा विषय- सुखाची परिभाषा

राज्यस्तरीय करंडक कविता स्पर्धा 

रिता रिता हा खिसा मनाचा रिता घडा का घरात आहे 

जरा सुखाचा तपास घे रे तुझ्या मनाच्या तळात आहे

कधी तरी तू लहान होता

लबाड मुंगीसमान होता

सुखास शोधी नभात कोठे

रसाळ खाऊ फळात आहे 

जरा सुखाचा तपास घे रे तुझ्या मनाच्या तळात आहे 

उसंत थोडी तुला हवी रे 

कळावयाला कथा नवी रे 

जसा सुखाचा ढगात साठा 

तसा घराच्या नळात आहे 

जरा सुखाचा तपास घे रे तुझ्या मनाच्या तळात आहे 

जगायचे ते कशास सोडा

उगाच माथे कशास फोडा

असो सुखाला कितीक टाळे 

हरेक चावी पळात आहे

जरा सुखाचा तपास घे रे तुझ्या मनाच्या तळात आहे 

किती किती रे उन्हे जळाली

तुझीच छाया पुढे पळाली 

शहाणपण ते कुणास फळले? 

मजा सुखाची खुळात आहे 

जरा सुखाचा तपास घे रे तुझ्या मनाच्या तळात आहे 

कुठे निघाला प्रवासपक्षी 

अनंत लाटा उधाणताना 

तुला हवा तो खुशाल मोती 

उनाड काठी बिळात आहे 

जरा सुखाचा तपास घे रे तुझ्या मनाच्या तळात आहे 

© परेश पवार `शिव"

जिल्हा - रायगड रत्नागिरी