Login

जाणून घे तू स्वतःला...भाग 10

Swatachi olakh nirman kar
जाणून घे तू स्वतःला...भाग 10

विक्रांत सायलीच्या जवळ जाऊन बसला.

"उठ ना ग, अजून किती वाट बघायला लावणार आहेस.
सायली तुझा आवाज ऐकायला माझे कान आतुर झालेत. तू उठ आणि मला आवाज दे."

विक्रांत रात्रभर सायलीच्या उशाशी बसून होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीला शुद्ध आली तिने हळूहळू डोळे उघडले, हात हलवला तिच्या हाताला स्पर्श जाणवला. तिने हात चाचपडत विक्रांतच्या डोक्यावर नेला. तिच्या स्पर्शाने तो उठला.

"सायली तुला शुद्ध आली." त्याला खूप आनंद झाला.

"डॉक्टर डॉक्टर.." तो धावत बाहेर गेला.

काही वेळाने डॉक्टर आले, डॉक्टरांनी सायलीला चेक केलं.

"आता धोका टळलाय. तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता पण हो तुम्हाला तिची काळजी घ्यावी लागेल."

"हो डॉक्टर आम्ही तिची पूर्ण काळजी घेऊ."

विक्रांत सायलीला घेऊन घरी आला.

पूजा दारात आरतीचं ताट घेऊन आली.

"थांब दादा." विक्रांत घाबरला.

'आता काय झालं?' मनात विचार येऊन गेला.

"अरे वहिनी हॉस्पिटलमधून बरी होऊन आली, तिला असंच आत घ्यायचं का? मला तिचं औक्षण करू दे."

"अच्छा असं होय तर.." विक्रांत हसला.


"तुला काय वाटलं?"

"मला वाटलं आम्हाला घराच्या बाहेरच ठेवतेस की काय?"

"माझी एवढी मजल कुठली, हे घर माझं थोडेच आहे जीच घर आहे ती तर आतमध्ये बसली आहे ना, तिला काहीच पडली नाहीये." पूजा चिडवण्याच्या उद्देशाने बोलली.


"ये असं कसं म्हणतेस ग तू मला काहीच पडली नाहीये. माझे गुडघे दुखत आहेत म्हणून मी उठून तिथपर्यंत आले नाही आणि म्हणून मी तुला आरतीचे ताट घेऊन तिकडे पाठवलं ना." विक्रांतची आई आतून बोलली.

तिच्या बोलण्यावर सगळे हसायला लागले.

"बर लवकर लवकर करा, तिला आराम करायचा आहे."


पूजाने सायलीचं औक्षण केलं, तिची दृष्ट काढली आणि तिला आत घेतलं.

विक्रांत तिला खोलीत घेऊन गेला, तिला बेडवर लेटवलं.

"तू बस मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो."

"घरी आल्यानंतर खूप छान वाटतं. तुम्ही रूम फ्रेश करून ठेवली आहे ना? खूप छान सुगंध येत आहे, मला खूप बरं वाटतंय आता."

"हो मला माहितीये तुला घरी आल्यावर बरं वाटतंय. पण आता जास्त बोलू नकोस आराम कर मी आलोच."


विक्रांत तिची खूप काळजी घेऊ लागला.
सायली हळूहळू बरी होऊ लागली.

दोघांमध्ये हळूहळू प्रेम फुलायला लागलं.

"तुम्ही किती करताय माझ्यासाठी?"

"करेलच माझं प्रेम आहे तुझ्यावर."

"माझ्या सारख्या मुलीवर कुणीतरी प्रेम करू शकत ह्यावर विश्वास बसत नाही."

"का तुझ्यावर प्रेम करण्याचा अधिकार नाही कुणाला? तुला अधिकार नाही प्रेम करण्याचा?"


"माहीत नाही, मला फक्त एवढंच कळत होतं की माझी आई.."


त्याने लगेच तिच्या तोंडावर हात ठेवला.


"आता त्या आठवणी काढायच्या नाहीत."

त्याने तिला मिठीत घेतलं.


"तुला माहिती आहे मला आपल्या दोघांच्या आयुष्यात प्रेमाचा रंग भरायचाय. आपलं आयुष्य बहारदार बनवायचंय. उद्या जाऊन आपण म्हातारे झालो तर या आठवणी आपण आपल्या जवळ जपून ठेवू शकतो. आयुष्याच्या उतारवयात जेव्हा या आठवणी आपल्या डोळ्यासमोर येतील ना तेव्हा आपल्या डोळ्यात चमक यायला हवी. चेहऱ्यावर हलकं स्मितहास्य यायला हवं. हळुवारपणे स्पंदन वाढायला हवीत. एकमेकांचा सहवास हवा हवासा वाटायला हवा.

तुला माहितीये या आठवणी आपल्याला जगण्याची उमेद देतात. या आठवणीत दडलेला रम्य भूतकाळ कधी पुसट होऊ नये म्हणून अधूनमधून आपण त्यात शिरण्याचा प्रयत्न करत असतो. थोडासा निवांत मिळाला की भूतकाळात शिरायचं आणि पुन्हा वर्तमानातील आयुष्याला सामोरं जायचं. मात्र असं करतानाही आठवणी, दुरावलेल्या प्रेमाच्या माणसांसाठी मन हुरहूरतं." त्याने त्याची मिठी घट्ट केली.



"हो माझंही मन माझ्या आईसाठी..नाही नको तो विषय." सायली बोलता बोलता थांबली.


"मला हवं तसं प्रेम कधी मिळालं नाही, त्यामुळे प्रेम काय असतं मला कधी कळलंच नाही." तिचे डोळे पाणावले.


"प्रेम ही एक अशी वाऱ्याची झुळूक असते जी प्रत्येकालाच अनुभवता नाही येत. त्यासाठी हृदयात खोलवर कुठेतरी एक जखम सतत भळभळती ठेवण्याचं काळीज लागतं. त्या आठवणींनी त्या जखमेवर सतत खपल्या येतात, पुन्हा पुन्हा आपण रक्तबंबाळ होतो, मात्र तरीही ती जखम जपून ठेवावी लागते. प्रेम हे प्रत्येकाच्याच नशिबी असतं असं नाही. काही हा प्रेमाचा गुलकंद चाखतात तर काही नुसतेच काठावरून हेलकावे घेत अंदाज बांधतात. काही प्रेमाच्या गावात तर येतात, मात्र त्यांच्या हाती येथून परतताना केवळ अनुभवाचं भलं मोठं गाठोडं आणि डोळ्यात आसवं असतात."

"तुम्ही कधी कुणावर प्रेम केलंय."

"हो केलंय ना, जिच्यावर करतोय ती माझ्या डोळ्यासमोर आहे."


"मी माझ्याबद्दल बोलत नाही आहे, मी तुमच्या आयुष्यात येण्याआधी तुमच्या आयुष्यात कुणी होतं का? असं विचारतेय."

तो गप्प झाला.

"अहो तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका. मी सहज विचारते आहे. आणि असेलही तरी मला काहीच फरक पडणार नाही. मला माझ्या वाट्याच प्रेम मिळतंय अजून काय हवंय." ती भावुक झाली.

"आता मला माझ्या नशिबाचा हेवा वाटतोय, मी नशीबवान आहे की तुमच्या सारखा जोडीदार माझ्या आयुष्यात आहे. आता मरण जरी आलं ना तरी हसत हसत स्वीकार करेन मी.

"अग असं काय म्हणतेस. आधीच खूप काही गमावलंय मी, आता तुला गमवायच नाही आहे. आता तू जर माझ्या आयुष्यातून निघून गेलीस ना तर मी जगू शकणार नाही."

त्याच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू गालावर आले, तिने हळूच ते पुसले.


"मी कधीही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. एकट कधीही सोडणार नाही."


"कुणीतरी आपलं हक्काचं सतत आपल्या सोबत असावं, असं वाटतं ग. सुख-दु:खात पाठीशी राहील अशा व्यक्तीच्या शोधात प्रत्येक जण असतोच, फरक एवढाच काही तात्पुरती सोबत शोधतात तर काही सातजन्माची आणि हा शोध येऊन थांबतो तेव्हा प्रत्येकाच्या ओठी एकच सूर असतो, मी प्रेमात आहे. मग काय सगळीकडे फुलांचे मळे, पाखरांचे थवे, ते मखमली झुले आणि निळ्याशार आकाशात उंचच उंच भरारी घेणारे प्रेमपक्षी, सभोवताली पसरलेलं ते गार पाण्याचं तळं, त्या तळ्यात पाय बुडवून दवबिंदू पडलेल्या काठावरच्या गवताच्या पात्यांवर हळूवारपणे हात फिरवीत बसलेला ‘तो’ आणि ‘ती’.

ते प्रेमाचे दिवस किती सुंदर असतात ना, ते दिवस संपूच नये असं वाटत. सतत एकमेकांना भेटणं, गप्पा मारणे, बाईक वरून लॉंग ड्राइव्ह करणे. एकमेकांच्या साथीने भुरडून जाणे. हे सगळं हवंहवस वाटतं.

पाडगावकर म्हणायचे,

"प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आमचं सेम असतं."


काळ बदलला तसं प्रेम ही बदललं. पूर्वी मॉल, कॅफे असलं काही नव्हतं, मग ‘तो’ आणि ‘ती’ भेटणार तरी कुठं, तर शाळेत, देवळात, कॉलेजात, शिकवणीत. कधी दूर तलावाजवळ. वह्यांची देवाणघेवाण व्हायची आणि सुरू व्हायचं त्यांचं प्रेम. एकमेकांच्या हातात हात घालून बसण, ते चोरून पाहणं, ते लाजणं, त्यात खूप प्रेमळ भावना होत्या, आतुरता होती. खूप प्रेमवीरांना तर प्रेम व्यक्त करण्यासाठी मार्गच सापडायचा नाही, मग कुणी गुपचूप ‘तिच्या’ बेंचवर किंवा फळ्यावर तिच्यासाठी काही ओळी लिहिणार, तिच्या यायच्या रस्त्यावर शाळेतून चोरलेल्या खडूने बदामाच्या आकारात तिचं नाव लिहिणार, फारफार तर तिच्या गल्लीत दिवसातून सायकलवर पाचसहा चकरा मारणार."

"तुम्हीही मारायचात चकरा तिच्यासाठी."

"सायली." त्याने तिच्याकडे तिरकस नजरेने एक कटाक्ष टाकला.


"सॉरी.." तिला कळलं नाही पण सॉरी बोलून ती मोकळी झाली आणि हसली.

तो ही हसला.



"आणि तरीही डाळ नाही शिजली तर मग थेट प्रप्रोज करणार."

"तुम्ही पण केलं होतं?"

"सायली मी खोलीच्या बाहेर जातोय. मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. तुला सांगून जावं लागतंय तुला कळणार नाही म्हणून."


काही क्षण शांतता पसरली.