जन्मदात्री एक अडगळ...

म्हातारी झाल्यावर असणारी आईची अडचण.


"काय यार, सकाळी सकाळी काय कटकट आहे. हिला गाडी पाठवतो म्हटलं तरी अडचण, माझ्या पैशाने गाडी पाठवणार होतो ना? तरी आईला आवडत नाही. एक तास झाला वाट पाहतोय, पण हिची बस येण्याचे अजूनतरी काही लक्षणे दिसत नाहीये. ही साधा फोन सुध्दा वापरत नाही, श्याहहह!" शेखर घड्याळ बघत एकटाच स्वतःशी बडबडत होता.


"पप्पू, अरे कधी आलास? तुला फार वाट पहावी लागली का? अरे त्याचं काय झालं, रात्री बस मध्येच रस्त्यात पंक्चर झाली होती, म्हणून इथे पोहाचायला इतका वेळ लागला. बाळ, तू कसा आहेस? तुझा चेहरा किती सुकलाय. वेळेवर जेवत नाहीस का? बरं चल, मीच तुला आता माझ्या हाताने छान तुझ्या आवडीचे बनवून भरवते. चल आपण निघूया का?" आई बस मधून उतरत नाही तर मायारुपी प्रश्नांची सरबराई सुरू झाली.


"आई, मला ऑफिस आहे. आणि तुझं काय गं, दिवसभर तू घरात रिकामी असणार आहेस. मला ऑफिसला जायचं आहे, इथून जाऊन मी तयारी कधी करू? तुझ्या हट्टामुळे माझी सगळी कामे विस्कळीत झालीत. चल आता गाडीत बस लवकर, नाहीतर अजून उशीर होईल." शेखर चिडचिड करत आईचे समान मागच्या सीटवर अक्षरशः फेकत म्हणाला आणि गाडी सुरू केली.


"पप्पू, अरे माझी मी घरी आले असते. तुला माझ्यासाठी इथे थांबण्याची गरज नव्हती. मला पत्ता माहित आहे, मी रिक्षा करून आले असते. आणि त्या रिक्षावाल्याने मला घरी आणून सोडले असते, तेही माझ्यावर चिडचिड न करता." आई डोळ्यात आलेले पाणी पुसत म्हणाली.
खरंतर ती खूप खुशीत आली होती, पण शेखरचं वागणं, हे असं बोलणं बघून मनातून दुखावली होती.


"आई, कृपा करून तुझं ते नेहमीच रडगाणं चालू करू नको, आधीच तुझ्यामुळे माझी सकाळ खराब झाली आहे, आता उरलेला दिवस तरी सुखात जाऊ दे." शेखर चिडत म्हणाला आणि गाडीचा वेग वाढवून घाईतच घरी पोहचला.


"शेखर, अरे किती वेळ? घड्याळ बघतोयस ना, मला ऑफिसला उशीर होतोय. मुलांची शाळेची गडबड आणि आता घरात एक व्यक्ती वाढला, की कामे पण वाढतात. काम वाढले तर पगार पण जास्त द्या, म्हणून ती बाई आताच कुरकुर करून गेली आणि आता सगळे मी एकटीनेच करायचे का? मी आता निघते, तुझे तू बघून घे. दुपारी बाई येऊन जेवण बनवणार नाहीये, काय करायचे असेल ते हाताने करून खाऊन घ्या. रात्री माझी ऑफिस पार्टी आहे, तर मी मुलांना सोबत घेऊन जाणार आहे. तुझे आणि आईचे काय करायचे ते ठरवा." सुषमा, शेखरची बायको ते दोघं घरात आल्या आल्या त्यांच्यावर बरसली आणि पाय आपटत पर्स घेऊन कामाला निघूनही गेली.


"शेखर, अरे आज चार महिन्याने मी परत आलेय, निदान आल्यावर मला पाणी तरी द्यायचे होते? जाऊदेत मी उगीच अपेक्षा करते. मला कळायला पाहिजे, आता माझी या घरात काहीच किंमत नाही. तुझी बायको पैसे कमवते म्हणून तू आता तिच्या ताटाखालचे मांजर झालास." आईची बडबड सुरू होती, शेखर तिच्याकडे दुर्लक्ष करत तयारी करून कामाला निघुन पण गेला.

____________

"आई, आज तुम्ही शांताबाईला काय बोललात? अहो, आधीच कामाला बाई भेटत नाही. तुम्ही तिला एका शर्टला कलर लागला म्हणून किती बोललात. ती उद्या पासून कामाला यायला नाही म्हणतेय, आता तुम्हीच सांगा काय करायचे? घरातील सगळी कामं कोण करणार?" सुषमा.


"अगं, तुला घरात लक्ष द्यायला वेळ नसतो, ती बाई घरातील कामे कमी करते आणि टीव्ही बघणे किंवा मोबाईलवर गप्पा मारणे, तिचे हेच जास्त चालू असते. मुलांकडे तर तिचे थोडेही लक्ष नसते आणि काम तर अगदी मोरीवरचे दोरीवर करायचे. तुम्ही तिला अगदी लाडावून ठेवले आहे, आम्ही बोललो तर वाईट वाटते" सारिका बाई म्हणाल्या.

"आई, आम्ही तुमच्या सारखे फक्त चुल आणि मुल करत बसलो, तर आमच्या शिक्षणाचा काय फायदा? आणि आता तुम्ही महागाई बघताय ना, एकट्याच्या कमाईत घर कसे चालवणार?
कुठेतरी तर कॉम्प्रोमाईज करावेच लागणार ना? तुमचा काळ वेगळा होता, आता तसे चालत नाही." सुषमा समजावणीच्या सुरात म्हणाली.


"आई, तुला किती वेळा सांगितले की,माझे मित्र आले तर असे पाण्याचा ग्लास हातात घेऊन नको येत जाऊस, ट्रे आहे ना आपल्याकडे. तू अजूनही किती खेडवळ आहेस, आणि ती तुझी नऊवारी साडीच नेसतेस, आता शहरात राहतेस तर तुझ्यात थोडीफार तरी सुधारणा व्हायला पाहिजे ना? आणि चहा करताना थोडा तरी बरा करावा गं, इथे माझ्याकडे दूध भरपूर असताना सुद्धा तू त्यात दूध कमी आणि पाणीच जास्त घालते. तुझ्या गावच्या लेकासारखे इथे कसली कमी नाही, पण अजूनही तुझे विचार आणि मन त्या गावातच फिरत असते." शेखर वैतागत म्हणाला.


"पप्पू, अरे लहान असताना तुला हाच चहा किती आवडत होता, यातच दोन दोन पोळ्या गरम करून खाल्ल्याशिवाय तुझी सकाळ होत नव्हती आणि आज तुला त्याचीच लाज वाटते आहे?
आणि हीच साडी आंथरून तुला त्यावर झोपायचं असायचं, त्यासाठी किती हट्ट करायचा, याच साडीच्या पदरा खाली तू अगदी निर्धास्त होऊन झोपत होतास, आता तीच तुला खेडवळ वाटायला लागली का?" आई.


शेखर लहान असताना त्याचे बाबा गेले. आईने दुसऱ्याच्या शेतावर जाऊन रोजंदारीवर काम करून कसेबसे आपली दोन मुले लहानाची मोठी केली. दिवसभर राबून तिने मुलांचे शिक्षण केलं. स्वतः उपाशी राहून मुलांना पोटभर खाऊ घालत होती. शेखरचा लहान भाऊ काही शिकला नाही, पण शेखर शिकून मोठा अभियांत्रिकी झाला होता. शहरात येऊन इथेच स्थायिक झाला. शिकलेली, नोकरी करणारी बायको भेटली, म्हणून त्याची परिस्थिती चांगली सुधारली होती. दोन मुले होती, ती पण चांगल्या मोठ्या शाळेत घातली होती. स्वतःचे घरदार, सर्व आधुनिक सुखसोई, असे छान आयुष्य जगत होता. शेखरने त्याच्या लहान भावासाठी काहीतरी करावे, म्हणून आईची तळमळ चालू होती. पण आईचे हे वागणे शेखरला खटकत होते, स्वतःचा संसार सोडून भावाकडे बघणे, त्याला जमत नव्हते आणि यावरूनच नेहमी सुषमा आणि त्याचे भांडण होत असे.


"प्रीती प्रितेश, आज तुम्हाला मी धपाटे करून देऊ का? रोज रोज डब्ब्यात ते ब्रेड बटर खाऊन बाळांनो तुम्हाला कंटाळा आला असेल ना?" आई म्हणाली, तसे मुलांनी आजीकडे पाहून आनंदाने होकारार्थी माना हलवल्या.

पण तेव्हाच सुषमा थोडी चिडत तिथे आली आणि म्हणाली,"अहो आई, हल्ली शाळेत हे धपाटे, भाकरी असले प्रकार नाही चालत. सगळी मुले नेहमी ब्रेड बटर आणि सँडविच असलेच नेतात. हे धपाटे तुम्ही तुमच्या मुलाला खाऊ घाला. माझ्या मुलांना मी माझ्याच पध्दतीने वाढवेल."

सारिका बाईंना येऊन चार दिवस झाले, पण शेखरला काही त्यांच्याशी बोलायला वेळ मिळाला नाही आणि सुनबाई तर असून पण नसल्या सारख्या होत्या. नातवांना जवळ घेऊन काही बोलावे, सांगावे तर सुषमाला वाटते की आई त्यांना काही तरी शिकवते, त्यामुळे नातावांसोबत मनसोक्त गप्पा सुद्धा मारता येत नव्हत्या की त्यांचे हट्ट, लाड सुद्धा पुरवता येत नव्हते.
घरात फक्त एका पिंजऱ्यात कैद असल्यासारखे सारिका बाईंना वाटत होते. कोणी बोलायला नाही आणि कोणी घरी सुद्धा येत नाही. शेजारी पाजारी बोलावे तर तेही आवडत नाही. इथे हात लावू नकोस, तिथे बसू नकोस, फोनवर हळू आवाजात बोल, प्रत्येक गोष्टीत फक्त रोकटोक होती.

"फक्त एक कैदी म्हणून मला इथे ठेवण्यात आले आहे. ज्याला दोन वेळेचे पोटभर जेवण आणि घरात पडलेली थोडीफार कामे करणे हेच आयुष्य आहे. बाहेर कुठे घेऊन जायला लाज वाटते आणि घरात कोणी आले तर समोर बोलवून ओळख करून देण्यास पण धाक पडतो, कारण आई खेडवळ आहे. अशी आई दाखवताना चार लोकांच्यात आपला अपमान होईल, असे मुलांना वाटते." सारिका बाईंच्या मनात सारखे असेच विचार सुरू होते.


"पप्पा मला पाचशे रुपये द्या ना, माझ्या मित्राचा वाढदिवस आहे तर त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायचे आहे." प्रीतेश म्हणाला. तो बोलल्या बरोबर शेखरने लगेच त्याला पैसे काढून दिले.

"शेखर, मलाही पाचशे रुपये हवे होते, देतोस का?" आईने हळू आवाजात बिचकत बिचकत त्याला विचारले.


"आई, माझ्याकडे आता नाही, मी आत्ताच तुझ्या समोर प्रितेशला दिले ना? आणि त्याला दिलेले पाहून तर तू लगेच मागायला नाही लागलीस ना? आता तू नातवांशी पण बरोबरी करणार आहे का? आई, आमच्या वागण्यावर किती लक्ष देतेस? आणि तुला इतके पैसे कश्याला पाहिजे? उगीच फालतू खर्च करायला माझ्याकडे पैसे वर नाही आले, मी मेहनतीने कमवले आहे." शेखर थोडा चिडून म्हणाला, तसा सारिका बाईंचा चेहरा रडवेला झाला होता. त्या शांतपणे दुसच्या खोलीत निघून गेल्या.

शेखर व त्याच्या आईमधील संवाद प्रितेशने ऐकला होता. सारिका बाई आपल्या रुममध्ये जाऊन शेखरच्या वडिलांच्या फोटोकडे बघून असावे गाळत होती. प्रितेश आपल्या आजीजवळ जाऊन बसला व तो तिचे डोळे पुसत म्हणाला,
"आजी तुला पप्पांनी पैसे दिले नाही, म्हणून तुला वाईट वाटत आहे ना. मी तुला माझ्याकडचे पैसे देतो, पण तु रडू नकोस."

सारिका बाई म्हणाल्या,
"नको बाळा. तुझ्या पप्पाला हे कळलं तर तुला मार बसेल. तु एवढं बोललास,हेच माझ्यासाठी खूप झालं."

दुसऱ्या दिवशी, सारिका बाई सकाळी लवकर उठून बाहेर निघून गेल्या.


"शेखर, अरे आई घरात कुठे दिसत नाहीये, सकाळी सकाळी ह्या कुठे गेल्या असतील? त्यांची इथे कुठे ओळख पण नाही, असे न सांगता त्या कुठे गेल्या असतील? तुझी आई पण ना, नेहमीच काहीना काही तरी गोंधळ घालत असते. आता आपली काम धंदे सोडून त्यांना शोधा.." सुषमा डोक्यावर हात मारत वैतागत म्हणाली.

"इथेच कुठे देवळात गेली असेल, येईल ती. तू ऑफिसला जा, मलाही आज ऑफीसमध्ये भरपूर काम आहेत." शेखर.


रात्री शेखर आणि सुषमा ऑफिस मधून घरी परत आले, तरी सारिका बाईंचा पत्ता नव्हता.

"आई, अजूनही घरी नाही आली? ही कुठे गेली असेल, थांब दादाला फोन करून विचारून बघतो." शेखर बोलत होता, तेवढयात दरवाजा वाजला, सारिका बाई आत आल्या.


"आई, सकाळपासून तू कुठे गेली होतीस? आम्ही तुझ्या विचाराने दिवस कसा काढला ते आम्हाला माहीती. तुला कुठे कुठे शोधले, तुला आम्हांला कोणाला सांगून नाही जाता आले का?"


"शेखर, दोन दिवसांनी तुझ्या वडिलांचे श्राध्द आहे. त्यासाठी मला काही सामान आणायचे होते आणि सकाळी मी त्यासाठीच तुझ्याकडे पैसे मागितले होते. पण राहू देत, तू जरी काही केले तरी ते चांगल्या भावनेने आणि मनापासून नक्कीच केलेलं नसणार, म्हणून ते तुझ्या वडिलांना आवडणार नाही.


"मला स्वयंपाक आणि पोळ्या लाटायचं काम मिळालं होतं, तर आज दिवसभर मी तेच काम करण्यासाठी गेले होते. माझ्या नवऱ्याच्या श्राद्धाच्या विधीला लागतील, एवढे पैसे मी कमावले आहेत. इथून पुढे तुझ्याकडे कधीच काही मागणार नाही आणि हात पसरणार नाही. तुम्ही खुशाल तुमचा संसार करा." आई रागात बोलून आपल्या खोलीत गेली.


शेखरला वाईट वाटले, पण सुषमाने लगेच विषय बदलत त्याला दुसऱ्या विषयात अडकवले. त्यामुळे आईच्या बोलण्याकडे त्याचे दुर्लक्ष झाले. तिला सासूबाई म्हणजे एक अडचण वाटत होती. चार लोकांमध्ये आपल्या सासूबाई किती खेडवळ आहेत हे दाखवायला लाज वाटत होती. त्यांनी कायम गावकडेच राहावे असे तिचे मत होते. पण आजीचे मन आपल्या नातवंड आणि मुलाकडे ओढले जात होते, म्हणून काही दिवस त्या इथे येऊन राहत होत्या.

सकाळी सकाळी फोनच्या रिंग वाजली शेखरने फोन उचलला. समोरचे बोलणे ऐकून तो दोन मिनिट शांत झाला आणि त्यांना धन्यवाद करून फोन ठेवला.

"कोणाचा फोन होता रे? काय झाले तुझा चेहरा का असा पडला?" सुषमाने काळजीने विचारले.

आई काल जिथे स्वयंपाकाचे काम करायला गेली होती, तिथून फोन होता. त्यांना आईचा हातचे जेवण एवढे आवडले की त्यांनी आईला अजून दोन ऑर्डर दिल्या आहेत आणि पैसे पण अगोदर घेऊन जाण्यास सांगितले. आणि फोन कोणाचा होता माहिती? माझ्या बॉसचा, ते आईचे खूप कौतुक करत होते, तू खूप लकी आहे तुला अशी आई भेटली असे सांगत होते." शेखरचे बोलणे ऐकून सुषमाचा चेहरा पडला.

"एवढेच नाही, तर आईने त्यांच्या मुलाचा सुद्धा जीव वाचवला म्हणाले. कार्यक्रमात सगळे आपल्याच तालात होते, मुलाकडे कोणाचंच लक्ष नव्हते, तो खेळता खेळता गाडीच्या खाली येतयेता आईने त्याला वाचवले. त्याचा डोक्याला मार बसला, तर आईने स्वतःची साडी फाडून पट्टी बांधत त्याचे रक्त थांबवण्यासाठी मदत सुद्धा केली. म्हणून साहेब फार खुश आहेत, आईचा आज त्यांच्या घरी असलेल्या कार्यक्रमात आज तिचे उपकार मानत सत्कार करणार आहे." शेखर म्हणाला.

हे सगळं बघून, प्रितेश आणि प्रिया त्यांना जितके समजले, त्यावरून बोलू लागले.

"मम्मा-पप्पा, आजी रोज रात्री आजोबांच्या फोटो पुढे बसून रडत असते आणि कायम बोलते की मला तुमच्याकडे बोलवून घ्या. नवरा गेला की स्त्रीच्या आयुष्याला काहीच किंमत राहत नाही.आदर नाही की मानपान राहत नाही. आता सुखदुःखाचे सगळे दिवस पाहिले आहेत, लवकर डोळे झाकले तर बरे होईल."

"पप्पा, म्हणजे नवरा गेला की बायकोला असे राहावे लागते का? म्हणजे तुम्हाला काही झाले तर मम्मा पण अशीच रडत बसणार काय पप्पा? तुम्ही मम्माला सोडून गेले, की आम्ही पण आमच्या मम्मा बरोबर असेच करायचे का पप्पा? तिलाही घरातच ठेवायचे नाही, पैसे नाही द्यायचे ना? " प्रीतीचे आपले केविलवाणे असे प्रश्न सुरू होते.

मुलांचे ते बोलणे ऐकून शेखर आणि सुषमा यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले होते. "आपण खरचं चुकीचे वागतोय का? आपली आई ज्या वातावरणात, परिस्थितीत वाढली आहे, त्यानुसार तिचे राहणीमान, विचार पण तसेच असणार ना? तिच्याकडून आपण जास्तच अपेक्षा केली होती का? आपण जेव्हा म्हातारे होऊ, तेव्हा आपली मुले अशीच वागली तर आपल्याला कसे वाटेल?" दोघांच्याही डोक्यात विचारांचे काहूर माजले होते.

दोघे ही उठून तडक आई कडे गेले. हात जोडून माफी मागितली. शेखरने तर आईच्या गळ्यात पडून, तिला घट्ट बिलगून, रडून तिची माफी मागितली.

"आई माफ कर इथून पुढे आम्ही असे काही करणार नाही. आमचे डोळे उघडले आहे." शेखरच्या डोळ्यात पच्छताव्याचे अश्रू होते. सुषमा सुध्दा हात जोडून उभी होती.

आईचे मन मोठेच असते, आपले मूल पुढे आल्यावर, ती आपला अहंकार विसरून आपल्या मुलाला मोठ्या मनाने माफ करतेच, तेच आज सारिका बाईंनी केले आणि आपल्या पोराला छातीशी कवटाळले, सुष्माच्या डोक्यावरून सुद्धा मायेने हात फिरवला.

समाप्त


चारुशीला कुलकर्णी (CJ)