जन्मदात्री पित्याची....(एक दुर्गा अशीही)

वडिलांना जीवनदान देणाऱ्या चिमुकलीची गोष्ट....


एक दुर्गा अशीही

               जन्मदात्री पित्याची.......
                                1 फेब्रुवारी 2019 ची संध्याकाळ वार शुक्रवार म्हणजे शिवाजीनगर वस्तीसाठी आनंदाची वेळ. आठवडाभर काम केल्यानंतर मिळणाऱ्या \"पगारातून\" आज मुलांबाळासाठी खाऊ आणण्याचा, त्यांचे लाड पुरविण्याचा दिवस.
                           शिवाजीनगर वस्ती म्हणजे पंचतारांकीत औद्योगिक वसाहती मधील कामगारांची वस्ती. वेगळी भाषा, वेगळ्या प्रांतातून पोट भरण्यासाठी आलेल्या कारागिरांची वस्ती. साहजिकच आठवडी बाजार च्या दिवशी सुट्टी आणि पगार , यामुळे सगळी वस्तीत आनंदाचं वातावरण.
त्या दिवशीही मुले बाजारातून आणलेला खाऊ खाण्यात आणि खेळणी बघण्यात व्यस्त होती. बायका संध्याकाळच्या स्वैपाकाची तयारी करण्यात, हतपंपावरून पाणी भरण्यात मग्न. तर पुरुष मंडळी निवांतपणे टी व्ही बघत होती, शेजाऱ्याशी गप्पा मारत होती.
                               तेवढयात, "धावा, धावा, माझ्या पप्पाला वाचवा....." अशी आर्त किंचाळी ऐकू आली. सर्वजण आवाजाच्या दिशेने पळत गेले. तर रवीदादा जमिनीवर निपचित पडलेले होते. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. आणि बाजूला त्यांची 10 वर्षांची मुलगी प्रगती हातात लाकूड घेऊन उभी होती. तिच्या शेजारी तिचे लहान भाऊ आणि बहीण भेदरून उभे होते.

                      आई बाहेर पाणी आणण्यासाठी गेलेली होती. प्रगती आणि भावंडे पप्पांनी बाजारातून आणलेला खाऊ खात ,मजा करत बसले होते. रवीदादा बाहेरून आले आणि त्यांनी टि व्ही. चालू करण्यासाठी प्लग मध्ये पिन नसलेले वायर घातले त्याक्षणी विजेचा प्रवाह उघड्या वायर मध्ये उतरला आणि काही कळायच्या आत रवीदादा वायर ला चिटकले. प्रसंग खूप बाका होता. 45 सेकंदाच्या आत विजेच्या प्रवाहापासून सोडवले गेले नाही तर जीव जाण्याचा धोका अधिक असतो. आणि घरात फक्त 4 थी वर्गात शिकत असलेली चिमुकली पोर! एकासोबत चार जीव जाण्याचा संभव अधिक होता.
                   पण प्रगती हुशार आणि चुणचुणीत मुलगी होती. शाळेत प्रत्येक उपक्रमात अव्वल होती. तिने पहिले तिच्या पप्पाला विजेचा झटका बसला आहे आणि ते वायरला चिटकले. लहान भाऊ बहीण घाबरून रडू लागले, त्या अवघड क्षणी प्रगतीने स्वतः ला सावरले. वडिलांकडे जाणाऱ्या भावाला दूर ढकलले. आणि स्वतः धावत चुलीजवळ ठेवलेल्या लाकडांकडे गेली.
                      मागच्या आठवड्यात तिच्या शाळेत आपत्ती व्यवस्थापन विषयी प्रात्यक्षिक झाले होते. आणि शीक्षकांनी विजेचा झटका लागल्यानंतर काय करायचे याबाबद्दल माहिती सांगितली होती . या बिकट प्रसंगी जेव्हा मोठी माणस सुद्धा विचलित होऊ शकतात, त्या वेळेला प्रगतीला शाळेत शिकवलेले सर्व आठवले आणि क्षणाचाही वेळ न वाया घालवता ती चुलीकडे गेली.
रचलेल्या लाकडांमधून तिने एक लाकूड घेतले आणि धावत जाऊन वडिलांच्या हातावर प्रहार केला, आणि वडील प्रवाहापासून वेगळे होऊन जमिनीवर कोसळले.
                    प्रगतीचा आवाज ऐकून शेजारी पाजारी धावत आले. बेशुद्ध झालेल्या रवीदादाना कसेबसे शुद्धीवर आणले आणि तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
पंधरा दिवसांच्या उपचारानंतर रवीदादा सुखरूप घरी परतले. पण विजेच्या प्रवाहामुळे त्यांच्या चिटकलेल्या बोटात संसर्ग होऊन बोट मात्र काढावे लागले.
     

                   जीवावर आलेले संकट जीवनदायिनी दुर्गा झालेल्या त्यांच्या चिमुकल्या प्रगतीमुळे बोटावर निभावले गेले.....


( सत्य घटना)

                                           गितांजली सचिन