Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

जन्माची शिदोरी.. सरतही नाही आणि उरतही नाही

Read Later
जन्माची शिदोरी.. सरतही नाही आणि उरतही नाही
*राज्यस्तरीय करंडक कथा मालिका स्पर्धा

शीर्षक-जन्माची शिदोरी....सरतही नाही आणि उरतही नाही

कॅटेगिरी-कौटुंबिक कथा
सब कॅटेगिरी-कथा मालिका
भाग एक


अहो ! या जेवायला.
स्वयंपाक तयार आहे...
वसुधाताईंनी वसंतराव यांना हाक दिली. वसंतराव जेवायला बसले.
का ग! आज मक्याच्या पिठाच्या भाकरी कशा काय केल्या? वसंतराव वसुधा ताईंना म्हणाले.

अहो... आज गव्हाचे पीठ नाही. त्यात गहू संपलेले आहेत. नऊ जणांच्या कुटुंबाला कसा पुरेल एवढंच पीठ?. म्हणून त्या आधीच विवंचनेत होत्या. तरीही त्यांनी कसाबसा स्वयंपाक केला.

वसंतराव आपल्या वाट्याची एक भाकर जेवले आणि उठले.
त्याकाळी १९७३ ला महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ पडलेला होता. सगळीकडे कमी जास्त हीच परिस्थिती होती. गावांमध्ये जमीनदार लोक कामावर असणाऱ्या सर्व मजुरांना धान्य पुरवत होती. खेड्यांमध्ये लोक एकमेकांना मदत करत होती.
पण शहरात राहणाऱ्या सर्वसाधारण कुटुंबाची म्हणजे वसंतरावांच्यासारख्या कुटुंबा चे हाल होत होते.

सरकारने रेशन दुकानातून मका आणि मिलो म्हणजे लाल ज्वारीचे वाटप सुरू केले होते. त्याकाळी कुटुंबाचा विस्तार मोठा असल्यामुळे ते धान्य तुटपुंजे वाटत होते.

वसंतराव एका छोट्या मिल मध्ये रोजंदारीवर काम करायचे. वसुधा ताई सुद्धा शिलाई मशीन घरी नसल्यामुळे दहा किलोमीटर पायी अनवाणी जाऊन दुसरीकडे कपडे शिवून आणायच्या. व संसाराला हातभार लावाय च्या.
या दांपत्याने मुलांच्या शिक्षणात कुठेही कमी पडू दिले नाही.
त्यांना चार मुली आणि दोन मुलं असा त्यांचा कुटुंब विस्तार..

वसुधा ताईंना शिक्षणाची खूप आवड. त्या स्वतः घरच्या वातावरणामुळे शिकू शकल्या नाहीत. पण मुलांना कसेही करून शिकवून मोठे करायचेच. त्यासाठी हाडाची काडे करावी लागली तरी चालेल.... वसंतराव संसार फटका असून सुद्धा नेटका करण्याचा आटोकाट प्रयत्न करायचे.

एकदा भर उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य जणू आग होत होता. वसुधा ताई दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवण वर्गात शिवायला आलेले कपडे शिवायला गेलेल्या....
सर्व भावंड घरीच होते. पण घर टिनाच्या पत्र्याचे असल्यामुळे खूप तापत होते. त्यामुळे घरी असलेले सर्वजण बाहेरच्या मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली आसरा घ्यायचे.

ए सारिका... सारिकाला शेजारच्या एका मुलीने आवाज दिला. काय करतेस? येतेस का खेळायला! सारिका ही भावं,,,,डात मोठी. सारिका त्या मुलीबरोबर खेळायला गेली. खेळता खेळता ती जोरात पडली. तिच्या कपाळाला मोठी जखम झाली. तशीच ती रडत घरी आली. तिन्ही भावंडांनी तिची जखम तात्पुरती पुसली.
खूप वेळाने त्यांच्या आई बाबा घरी आले. मुलीला जवळ घेतलं. सर्व भावंड आईच्या कुशीत शिरून हुंदके देत रडायला लागले.


एकदा असंच एका सणाला लहान मुलगी नीलू म्हणाली, काय ग आई! दररोज मक्याच्या पिठाच्या भाकरी करतेस! गव्हाच्या पिठाच्या चपात्या कर नां!
वसंतरावांनी वसुधाताईंकडे पाहिले. आणि म्हणाले, चला आज आपण गोड काही करू या!

त्याकाळी बाजारात एके ठिकाणी भिकाऱ्यांनी दुकानात विकलेले पीठ गोळा करून ते विकायची पद्धत होती.
आजच्यासारखं तयार आशीर्वाद आटा बाजारात मिळत नसे. वसंतरावांनी गव्हाचे पीठ आणलं. वसुधा ताईंनी खीर बनवली. असं अधून मधून ते मुलांकरिता काही ना काही खिशाला जरी परवडलं नाही तरी मुलांच्या इच्छा पूर्ण करीत.

हे दाम्पत्य पालकत्वाची जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडीत होतं. त्यांचं मुलांवर प्रेम तर होतच! प्रसंगी कठोर होऊन ते त्यांना शिक्षा सुद्धा करीत!
मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्यावर छोटी मोठी जबाबदारी टाकायला ते विसरत नसत.

कारण म्हणतात ना!

पालकत्व हा विषय शाळेतल्या तासिकेप्रमाणे शिकविण्याचा नसून तो स्वतः आचरणात आणायचा असतो.

नीलू आणि तिचा मोठा भाऊ चंदू ज्या शाळेत शिकायला जायचे, ती शाळा घरापासून वीस किलोमीटर अंतरावर होती. त्या शाळेजवळच एक साबणाचा कारखाना होता. दर महिन्याला त्या साबण कारखान्या मधून एका डब्यात एक रुपयाचा साबणाचा चुरा कपडे धुण्यासाठी या दोघांना आणावा लागत असे.
नीलू तो डबा घेऊन शाळेत जायची. आणि आपल्या बसण्याच्या सीट खाली डबा लपवून ठेवायची. कारण तो डबा जर शाळेतल्या मुलांनी लांबविला तर पंचायत व्हायची. नीलू आणि चंदू तसे फार तर दहा-बारा वर्षाचे.
चौथीपर्यंतचे शिक्षण त्यांनी त्या शाळेत घेतलं.

एकदा वडिलांनी दिलेला एक रुपया नीलू आणि चंदू कडून हरविल्या गेला. आता काय करायचे? आपल्याला आता शिक्षा होणार हे दोघांनाही कळून चुकलं .
दोघांनी एक युक्ती केली. आपल्या मित्र-मैत्रिणींकडून दहा पैसे, वीस पैसे, पाच पैसे असे करून पैसे जमवले. आणि त्याचा पूर्ण एक रुपया करून साबणाचा चुरा घेतला...
काही दिवसांनी ते मित्र-मैत्रिणींच्या पैशाची परतफेड करू शकले नाहीत. ते पैसे परत घेण्यासाठी सर्व मित्र नीलू च्या घरी आले. आणि हे पैशाचं भिंग फुटल्या गेलं

एवढा धाक त्याकाळी मुलांना पालकांचा असायचा!
मुलं पालकांना खूपच घाबरत असत.

विषमभुज त्रिकोणाला समभुज करण्याची अफाट शक्ती या दांपत्यामध्ये होती!!!

म्हणूनच मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी जीवाचं रान केलं.
घरातलं वातावरण कितीही चांगलं असलं तरी आजूबाजूचा परिसर, मुलांची मित्रमंडळी याचा मुलांवर फार परिणाम होतो. हे त्या काळात ते जाणून होते.

त्यासाठी त्यांनी आपलं झोपडी वजा घर अतिक्रमणांच्या जागेवर परंतु सुरक्षित ठिकाणी बांधलं होतं; की जिथे आपल्या मुलांना चांगलं वातावरण मिळेल, योग्य संस्कार सुद्धा होईल.

या दाम्पत्याच्या शेजारी एक कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबातील एक मुलगा नरेश अत्यंत हुशार असलेला तो नामांकित महाविद्यालया त बी ए च्या अंतिम वर्षाला होता. त्याला साहित्याची चांगली जाण होती. नीलू आणि चंदू व इतर भावंडांची त्याच्याकडे ये जा असायची....
त्यातूनच निलूला वाचनाचा छंद जडला.
नरेश या भावंडांना वाचनाची गोष्टीची पुस्तकं पुरवायचा.

एकदा तर नरेश ने चंदूला परीक्षेत चांगले मार्क्स पडल्यामुळे एक छानसं पुस्तक भेट म्हणून दिलं होतं
नरेश ला या भावंडांचा चांगला लळा लागला होता.

तो सुद्धा या भावंडांना सामाजिक जाणिवेतून पेन पेन्सिल, वह्या अशा स्वरूपात मदत करायचा.

एकदा तर कॉलेजच्या स्नेहसंमेलनात नरेशने या भावंडांना घेऊन जाण्याचं ठरवलं.
नीलू चंदूला म्हणाली, चंदू दादा चल आपण जाऊया याच्या कॉलेजमध्ये स्नेहसंमेलन कसं असतं ते पाहायला!
दोघांनी आई-बाबांची परवानगी घेतली. ते नरेश सोबत कॉलेजला गेले.

स्नेह संमेलनात वेगवेगळ्या कक्षात वेगवेगळी मांडणी करण्यात आलेली होती.
एक कक्ष फक्त चित्रांचा होता. तर दुसरा मोठमोठ्या फुलांच्या ताटव्यांचा! खूप सुरेख फुलांचे ताटवे त्या कक्षात सजवून ठेवण्यात आलेले होते.
नीलू आणि चंदू ते पाहून मंत्रमुग्ध झाले. त्यांना काय पहावे आणि काय नाही काहीच सुचेना!
सर्व कक्ष पाहून ते दमले! पण एक कक्ष पाहायचाच राहून गेलेला होता.
तो होता विज्ञान कक्ष!

विज्ञान कक्षात वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आकर्षक पद्धतीने रचून ठेवलेले होते.
त्यात एक माणसाच्या हाडांचा म्हणजे कवटी पासून सर्व हाडांचा एक सापळा लटकवलेला होता. व त्यावर रंगीबेरंगी छोटे लाईट्स लावलेले होते. त्या लाइट्सने उघडझाप केल्यामुळे त्या सापळ्याची भीती या दोघांना वाटायला लागली. ते घाबरतच त्या कक्षातून पळाले.

त्यांनी घरी धूम ठोकली.... ते थेट घरी आले ते घाबरतच..
चंदू तर फारच घाबरला. इतका की तो लगेच तापाने फणफणला.......पुढे ही भावंड काय करामत करतात.....पाहूया या कथेच्या दुसऱ्या भागात....


छाया राऊत बर्वे
टीम अमरावती
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Chhaya Raut

//