जन्माची शिदोरी..... सरतही नाही आणि उरतही नाही .. भाग ३ अंतिम

The Story Of The Couple Who Encourage Their Children
राज्यस्तरीय करंडक कथा मालिका स्पर्धा
कथेचे शीर्षक-जन्माची शिदोरी..... "सरतही नाही आणि उरतही नाही"भाग ३ अंतिम
कथेचा विषय-कौटुंबिक कथा
उप विषय-राज्यस्तरीय करंडक कथा मालिका स्पर्धा
टीम -अमरावती

वसुधाताई जरी जास्त शिकलेल्या नव्हत्या तरी त्यांची बुद्धी तल्लख व चिकित्सक होती. प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण त्या करीत असत. त्यांच्यामध्ये खूप जिज्ञासा होती.
स्वयंपाक करताना तर त्यां त्याची चिकित्सक बुद्धी वापरत असत. त्यांनी त्यांच्या मुलींना सुद्धा स्वयंपाकात विज्ञान असते याची जाणीव करून दिली होती.

एकदा नीलू ला तिच्या आईने म्हणजे वसुधाताईंनी विरजणलावायला सांगितलं. कारण गाईचं दूध त्यांच्याकडे भरपूर असायचं. दुधाला विरजण लावलं की त्याचं दही बनतं हे नीलू ला माहीत होतं. पण ते लावण्यातही विज्ञान आहे हे तिला तिच्या आईने समजावून सांगितलं. जसे की हिवाळ्या त दूध थोडे गरम करून व उन्हाळ्यात थोड्या थंड दुधातच विरजण लागते. दूध कोमट केल्यामुळे दही घट्ट बनतं
आजकाल तर विरजण हा शब्दच स्वयंपाकातून बाद झालेला असेल!
स्वयंपाकातल्या छोट्या छोट्या गोष्टी त्या त्यांच्या मुलांना उत्तम तऱ्हेने समजावून सांग त

.
एकदा आई स्वयंपाक करताना राधा म्हणाली, आई! कढईत तेल टाकल्यावर तू मोहरीच का टाकते आधी? आई म्हणाली, अगं तेलात मोहरी तडतडली की ते चांगलं तापलं आहे असं समजावं.
अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी वसुधाताई आपल्या मुलांना समजावून सांगत असत.

वसंतराव रोजंदारीवर काम करीत असताना फावल्या वेळात एका मित्राच्या दुकानात वर्तमानपत्र वाचत बसत असत. त्या मित्राला या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थिती ची पूर्ण जाणीव होती.
एकदा त्याने वसंतरावंना म्हटले की , तुमची ही कुटुंब चालविण्याची ओढाताण मी पाहतोय. तुम्ही असे करा, एक छोटा व्यवसाय सुरू करा....
त्या मित्राने त्या व्यवसायाची कल्पना त्यांना दिली.
तो व्यवसाय होता कारखान्यातून ठोक भावात निंबोळी ढेप विकत घ्यायची. आणि शेतकऱ्यांच्या संत्र्याच्या बागेला त्याची विक्री करायची. त्यातून बऱ्यापैकी मिळकत होणार होती...


वसंतराव स्वातंत्र्य सैनिक होते. त्यामुळे त्यांच्या त संकटाशी सामना करण्याची खमकी ताकद होती.
मन मनगट मेंदूचा वापर ते योग्य तऱ्हेने करीत. त्यांच्यात त्यामुळे च बाणेदारपणा आलेला होता. मोडेल पण वाकणार नाही,हा त्यांचा स्थायीभाव होता.
मोठमोठ्या नेत्यांसोबत त्यांनी त्यांचं पूर्वीचा आयुष्य घालविल्यामुळे त्यांना काही कौशल्य आधीच अवगत झालेली होती.

लग्नानंतरच्या आयुष्यात आर्थिक चणचणीमुळे ते थोडे कोलमडले होते. परंतु वसुधाताई सारख्या पत्नीची दमदार साथ त्यांना मिळाल्यामुळे त्यांचा संसार रथ खाचखळग्यातून हळूहळू बाहेर निघत होता.

शासनाकडून त्यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना वर्षाकाठीची दीडशे रुपये मदत शाळेमार्फत देण्यात येत असे.
हीच रक्कम त्यांच्यासाठी खूप मोठी होती. ही रक्कम त्यांनी या व्यवसायासाठी उपयोगात आणायची ठरवली.
कोणताही व्यवसाय उभा करण्यासाठी त्या व्यवसायातील बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी लागणारे मनुष्यबळही त्यांच्याकडे नव्हतं. एकट्यानेच सर्व काही करणं गरजेचं होतं.
आता त्यांच्या सचोटीचा अग्निबाण हळूहळू आकाशात झेप घ्यायला लागला.
ज्याप्रमाणे ग्रीष्माच्या तापाने भेगाळलेली जमीन असते, त्यासारखं च परिस्थितीच्या तडाख्याने भेगाळलेल्या मनाने नवी उभारी घ्यायला सुरुवात केली. त्यांनी हा व्यवसाय सचोटीने केल्यामुळे या व्यवसायात त्यांना बराच फायदा व्हायला लागला.


वादळ जेव्हा येतात, तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट धरून राहायचं असतं! ती जितक्या वेगाने येतात, तितक्याच वेगाने ती निघूनही जातात.
वादळ महत्वाचे नसते..... प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो याचा... आणि कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर पडतो याचा!

असंच एक मोठं वादळ पुन्हा घोंगावत या दाम्पत्यासमोर उभं राहिलं.
वसंतरावांनी व्यवसायातून पै पै जमा करून एक स्वतंत्र जागा खरेदी केली. ती जागा त्यांच्या राहायच्या झोपडी वजा घराच्या फार दूरही नव्हती. त्यांचं स्वतःचं हक्काचं घर असावं असं त्यांना नेहमी वाटे. सामान्य माणसांच्या जगण्यासाठीच्या ज्या इच्छा असतात, त्यापैकीच ही एक इच्छा त्यांनी पूर्ण करण्याचं ठरवलं होतं.
घराच्या बांधकामासाठी या संपूर्ण कुटुंबाने म्हणजे लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी हातभार लावला. घराच्या भिंती उभ्या झाल्या......... पण एक अघटीत घडलं.

जून महिना होता. मान्सूनला सुरुवात झाली होती. प्रचंड वादळ आणि पावसाच्या तडाख्यात दरवर्षीच हे दांपत्य सापडत होतं. परंतु या वर्षीच वादळ काही वेगळं होतं.
एके दिवशी रात्री नवीन घराच्या भिंतीमध्ये हे वादळ शिरलं. आणि पाहता पाहता घराच्या चारही भिंती कोलमडून खाली पडल्या. नवीन घर पूर्ण जमीनदोस्त झालं.
दुसऱ्या दिवशी पहाटेच एक व्यक्ती ही वार्ता घेऊन त्यांच्या घरी पोहोचला....
आणि या संपूर्ण कुटुंबाचं अवसान गळाल. त्यादिवशी या कुटुंबात कोणीही जेवलं नाही की कुणी कुणाशी बोललं नाही. प्रत्येक जण सुन्न होऊन आता पुढे काय करायचं या विचारात होता.

पण वसंतरावांना शांत बसून चालणार नव्हतं. यातून फिनिक्स पक्षासारखं राखेतून उठून पुन्हा उभारी घेणे आवश्यक होतं. त्यासाठी त्यांच्या पत्नीची वसुधाताईंची साथ त्यांना होतीच.
वसुधा ताईंनी त्यांना धीर दिला. पुन्हा पैशाची जमवा जमव करून घराची उभारणी करण्यास सुरुवात झाली. काही दिवसातच त्यांच्या स्वप्नातलं छोटसं हक्काचं घरटं उभ झालं.

वसंतरावांचे व्यक्तिमत्व तसं खूप साधं होतं. दाराशी आलेल्या कुणालाही ते मदत करण्यास मागे पुढे पाहत नसत.
एकदा भर पावसात एक बहुरूपी त्यांच्या दाराशी आला. तो पूर्ण भिजलेला होता. पाण्याने भिजल्यामुळे त्याच्याकडून धड उभंही राहणं होत नव्हतं. वय झालेलं असल्यामुळे तो बिचारा गयावया करीत भिक्षा मागत होता.
वसंत रावांना त्याची दया आली. त्यांनी त्याला आत घेतलं. मायेनं विचारपूस केली. त्याला प्रेमाने जेवू घातलं. त्याला बिचाऱ्याला खूपच बरं वाटलं.
असे अनेकांचे आशीर्वाद घेत घेत हे कुटुंब पुढे चालत होतं.

एकदा वसंतरावांच्या लहान मुलीने तिच्याबाबांना म्हटले, बाबा! चला ना यात्रेत! आपण जाऊया! मला तिथे छान पाळण्यात बसायचं आहे. मजा करायची आहे!
वसुधाताई म्हणाल्या, चला जाऊया यात्रेत! या संसाराच्या रहाटगाडग्यातून थोडा विरंगुळा मिळेल...….
त्यांनी त्यांच्या मित्राचं कुटुंब सोबत घेतलं. आणि दोन दिवसाच्या यात्रेची तयारी सुरू केली.
,त्याकाळी असे हॉटेल्स वर मुक्काम करणे निम्न मध्यमवर्गीय कुटुंबाला परवडण्यासारखं नव्हतं. त्यासाठी त्यांनी धर्मशाळेत राहण्याचा बेत आखला.
दोन्ही कुटुंब स्वयंपाकाला लागणारे साहित्य, आणखी बरंच सामान घेऊन ते यात्रेसाठी गावी जायला निघाले. सगळी मुलं आनंदात होती. तसंही मुलांना कुठेही बाहेर फिरायला जायची खूपच उत्सुकता असते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो.
ते बस स्टैंड वर पोहोचले. दुपारचे पाच वाजले होते. वसंतराव गाडी शोधायला गेले. दोन्ही कुटुंब बसची वाट पहात बस स्टैंड वर बसून होती. त्याकाळी मुलांना पालकांचा खूप धाक होता. ते कधीच कोणताच हट्ट आई-वडिलांकडे करीत नसत. शेवटी एकदाची बस मिळाली. दोन्ही कुटुंबांनी बसमध्ये आपली आपली जागा घेतली.
राधा खिडकीजवळ बसून आकाशातले तारे चांदण्या निरखू लागली. ती आनंदाने ओरडली... आई हे बघ! आकाशातला चंद्र कसा आपल्या सोबत धावतोय!
तिला खूप मजा यायला लागली. हळूहळू मुलं झोपेने पेंगायला लागली.
बस यात्रेच्या ठिकाणी येऊन पोहोचली. मुलांना झोपेतून उठवून वसंतरावांनी बसच्या खाली उतरवलं.
एका धर्मशाळेत सर्वांनी आसरा घेतला.
दुसऱ्या दिवशी सर्वांनी आंघोळी वगैरे उरकवून देवाच्या दर्शनाला सर्वांनी सोबतच जायचं ठरवलं.
आईच्या मागे मागे ही मुलं म्हणजे, चंदू, नीलू, राधा, सारिका आणि मित्राच्या कुटुंबातली तीन मुलं असा परिवार देवाच्या दर्शनाला निघाला. देवदर्शन उरकलं.
,परंतु त्याचवेळी चंदू सगळी दुकानं न्याहाळत , हळूहळू मागे पडला..... आणि वाट चुकला.

वसंतरावांनी मागे पाहिलं, चंदू कुठे दिसत नाही... त्यांनी आधी एकट्यानेच त्याला शोधलं. पण तो यात्रेतल्या गर्दीत कुठे हरवला कळलच नाही.
ही गोष्ट वसुधा ताईंना कळली. त्या मटकन खालीच बसल्या! राधा तर रडायलाच लागली.
मित्राच्या मदतीने वसंतराव यांनी चंदूला खूप शोधले. पण तो गर्दीत कुठेतरी हरवला होता. त्यांनी तिथल्या पोलीस चौकीत चंदू हरविल्याची तक्रार दिली. इकडे चंदू गर्दीत खूपच रडायला लागला. एका सुज्ञ व्यक्तीने चंदू ची मदत केली म्हणून बरं झालं...
त्याला त्याचं नाव गाव पत्ता विचारून पोलिसांच्या स्वाधीन केलं.
संपूर्ण कुटुंबाची यामुळे जी तारांबळ उडाली होती ती थांबली.
चंदू रडतच आईला बिलगला..
या कुटुंबावरचं एक संकट पुन्हा टळलं.


वसुधा ताई आणि वसंतराव यांनी आपल्या पाल्यांचे भविष्य चांगलं असावं यासाठी अपार कष्ट घेतले. आपल्या मुलांनी शिकून मोठं व्हावं, ही त्यांची तीव्र इच्छा होती. स्वतःसाठी वसुधाताईंनी कधी नवीन साडी घेतली नाही.
त्यांची शिकवण होती की, "आज मेहनत कराल तर आयुष्यभर सुखात राहाल"आणि "आज आराम कराल तर आयुष्यभर त्रासात राहाल".

यासाठी इथे विंदा करंदीकर यांच्या चार ओळी सहज आठवतात......

असे जगावे दुनियेमध्ये
आव्हानांचे लावून अत्तर!!, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये!
आयुष्याला द्यावे उत्तर!!
असे दांडगी इच्छा ज्यांची!
मार्ग तयाला मिळती सत्तर!!

छाया राऊत बर्वे

टीम-अमरावती

🎭 Series Post

View all