जन्माची शिदोरी... सरतही नाही आणि उरतही नाही भाग 2

The Story Of The Couple Who Encourage Their Children


राज्यस्तरीय करंडक कथा मालिका स्पर्धा

शीर्षक-जन्माची शिदोरी.…... सरतही नाही आणि उरतही नाही.
कॅटेगिरी-कौटुंबिक कथा
सब कॅटेगिरी-भाग 2


नीलू आणि चंदू या भावंडांच्या वया त फारसं अंतर नव्हतं. साधारण दोन वर्षाचं अंतर असेल.
त्यावेळी चंदू असेल तिसरीत तर नीलू असेल पहिलीत..
त्यांची शाळा त्यांच्या घरात पासून फारच दूर होती. जाण्या येण्याचा रस्ता होता स्मशानातून.
दुपारी तर त्या रस्त्यावर चिटपाखरूही नसायचं!

असंच एकदा भर दुपारी ही दोघं लवकर शाळा सुटल्यामुळे घराकडे निघाली.
त्याचवेळी दोन व्यक्ती स्मशानाच्या दिशेने जाताना या दोघांना दिसल्या. त्या दोन व्यक्ती पैकी एका पुरुषाच्या हातात सुटकेस व दुसऱ्याच्या हातात लहान बाळ लाल कापडात गुंडाळून घेतलेलं या दोघांनी पाहिलं.

हे दोघं त्याच रस्त्याने घरी जायला निघालेले होते. ते दोन पुरुष यांच्या दिशेने येऊन दुसरीकडे वळले. ह्या दोघांनी ते दृश्य पाहिलं....
चंदूची तर घाबरगुंडी उडाली. ती दोघं जीवाच्या आकांताने घराकडे पळत सुटले. चंदू तर घाबरल्यामुळे घरी येऊन खाली पडला.

आईने चंदूला व नीलू ला विचारले, का रे असं घाबरायला काय झालं? आणि हे काय? केवढा घाम आहे याच्या कपाळावर!!!!!
आईने या दोघांनाही पाणी प्यायला दिलं. त्याला थोडं बरं वाटलं. मग नीलू ने घडलेली सर्व हकीगत आईला सांगितली.

दोन दिवस चंदू शाळेत गेलाच नाही. कारण तो सतत झोपेत बरळत होता. हळूहळू त्याचा ताप कमी व्हायला लागला.
आई वसंतरावंना म्हणाली, आपण उगाच लांबच्या शाळेत या लेकरांना टाकलं. बिचाऱ्यांना स्मशानाच्या रस्त्यातून जावं लागतं.
नीलू मध्येच आईला थांबवत म्हणाली, आई! कसे का असेना! ती शाळा खूप चांगली आहे ग! आमच्या बाई आम्हाला छान शिकवितात. राहू दे! जाऊ आम्ही कसेही!

त्याकाळी लहान मुलांना एकटं पाठवायला काहीच गैर वाटत नव्हते. आता या काळात तर लहान मुलांना एकटं कुठे पाठवायची सोयच उरली नाही. त्याकाळी वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळांमध्ये मुलं सहज पायी जायची. आताच्या सारखी स्कूल बस किंवा गाडीवरून पोहोचवून देणे या सोयी नव्हत्या.

या दाम्पत्याने आपल्या अपत्यांना शुद्ध बोलण्याचे सुद्धा संस्कार दिलेत. स्वतः दोघेही लहानपणी गाव खेड्यात राहून सुद्धा त्यांनी आपल्या आपत्यांवर आपल्या बोली भाषेचा प्रभाव पडू दिला नाही.

असं म्हणतात, की वाणीतून व्यक्तीचे आचार, विचार, संस्कार, ज्ञानाची सखोलता, बुद्धिमत्तेचे तेज झळकते. म्हणूनच लहानपणापासून व्यवस्थित बोलण्या चालण्याचा संस्कारावर विशेष भर दिला जातो.

या दांपत्याने मुलांच्या तोंडात एकही शिवी असणार नाही, घाणेरडे बोलणे असणार नाही याची काळजी पुरेपूर घेतली.
त्यामुळेच तर त्यांच्या मुलांच्या जीवनाची होडी कुठेही भरकटली नाही. जीवनाचा प्रवास करीत असताना, ही होडी मध्येच वादळात सापडून कधी हेलकावे घ्यायची............

स्वतःसह कुटुंबाला घडविण्याची खमकी ताकद वसंतरावांमध्ये होती. या साऱ्यात मात्र त्यांचे काही निवांत क्षण हरवले........ जगण्याचं मऊ अस्तर विरत गेलं....... कधी फाटलं.... तर कधी पुरतं निघूनही गेलं...........

असं असलं तरी कधी चांदण्या रात्री कुटुंबासमवेत निवांत बसून सुखाचे चार क्षण ते जगून घेत.......


त्यांचं झोपडी वजा घर अतिक्रमणाच्या जागेवर होतं. ती जागा एका बड्या व्यापाराच्या मालकीची होती. त्या जागेचे भाडं होतं फक्त तीन रुपये.
त्याकाळी तीन रुपये हे सुद्धा आजच्या तीनशे रुपये एवढे असतील. वसंतराव यांची घर खर्चासाठीचीच आवक तुटपुंजी होती. त्यामुळे त्या जागेच भाड देणं थांबलं होतं. त्यामुळे ती रक्कम वाढत गेली. अखेर त्या जागेच्या मालकाने त्यांच्या घरावर कोर्टामार्फत जप्ती आणली.
घरावरची टीन पत्रे काढून टाकण्यात आली. घरातलं सामान सुद्धा बाहेर फेकण्यात आलं.
हे कुटुंब पूर्ण उघड्यावर आलं. घरात चार लहान भावंड, सगळी आई-बाबांना बिलगली..
आता काय करायचं? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला.

वसंतराव आणि वसुधा ताईंनी पुन्हा मार्ग शोधला. कारण मार्ग शोधून पिलांसाठी घरटं बांधणं आवश्यक होतं.
त्यांनी पुन्हा आपलं घरटं सरकारी अतिक्रमणाच्या जागेवर बांधलं. सगळी टिन पत्रे, भांडीकुंडी जमा करण्यास त्यांच्या लहान पिलांनी त्यांना मदत केली. पुन्हा छोटसं व छानसं घरटं बांधण्यात आलं.

वसुधाताई प्रत्येक कठीण प्रसंगात वसंतरावांच्या पाठीशी उभ्या असायच्या.

म्हणतात ना! संकटं कधी एकटी येत नसतात. ती एकमेकांची हात धरूनच येत असतात.

असं आणखी एक संकट या कुटुंबावर ओढवलं. वसंतरावांनी घरी दुधासाठी एक गाय पाळली होती. त्या दोघांनाही गाई पाळण्याची आवड होती. कारण घरच्या दुधावर कुटुंबाचे भरण पोषण होत असतं हे ते जाणून होते. त्यांच्या झोपडी वजा घराच्याच बाजूला त्यांनी एक छोटा गोठा गाईसाठी बांधला होता.

एकदा ती गाय खूप दूर चरायला गेल्यामुळे भरकटली. ती गाय शोधायला सर्व भावंड निघाली. पण गाय काही हाती लागेना! नीलू ची लहान बहीण राधा हिला ती गाय दूरवर दिसली. ही जोरात तिच्या मागे पळाली. आणि एका खड्ड्यात जाऊन पडली.
सगळीकडे शोधाशोध झाली. राधा कुठे सापडेना! चंदू सुद्धा दूरपर्यंत राधाला शोधायला गेला. तेव्हा एका खड्ड्यात राधा खूप जोर जोरात रडताना त्याला दिसली. त्याने त्याच्या वडिलांना बोलावून आणून राधाला त्या खड्ड्यातून बाहेर काढलं. तिचा पाय मोडला. तिला दवाखान्यात न्यावं लागलं. या सर्व गदारोळात गाय वासराच्या मायेनं मुकाटपणे घरी येऊन उभी राहिली. तिचं वासरू जोरजोराने हंबरत होतं. गाय दिसल्यामुळे ते शांत झालं.......
जशा वसुधाताई आपली छोटी मुलगी दिसल्यामुळे रडून रडून शांत झाल्या.....

जीवनात अशी अनेक संकटे येतात आणि जातात. पण त्या संकटावर मात करीत संकटाशी दोन हात करीत जीवनाची नौका पार करणे सहज सोपं नसतं.... त्यासाठी डोळ्यापुढे एक ध्येय निश्चित करून पुढे पुढे जावं लागतं......
वसंतरावांनी मुलांवर योग्य संस्कार करीत त्यांना जीवनाची नैतिक मूल्य शिकवीत आपली नाव जीवनाच्या अथांग समुद्रात भरकटू दिली नाही.......


हे दाम्पत्य अनेक संकटातून मार्ग काढीत जीवनाचे पाठ आपल्या पाल्यांना कसे शिकवतात पाहूया या कथेच्या तिसऱ्या भागात

छाया राऊत बर्वे
टीम अमरावती


कथा आवडल्यास लाईक व कमेंट जरूर करा.

🎭 Series Post

View all