Login

जन्म बाईचा भाग २२

कथा मालतीच्या जीवनाची
आजोबा बोलू लागले.

"वृंदा शेवटच्या वर्षात होती. त्या दिवशी तिची परीक्षा होती. तिच्यासाठी तो खूप खास दिवस होता; कारण त्यादिवशीच तिचा वाढदिवस होता. रात्री आम्ही बरोबर बाराच्या ठोक्याला केक कापून वाढदिवस साजरा केला होता. खूप खुश होती ती. मला म्हणाली होती  कॉलेजवरून आले की आपण सगळे बाहेर जेवायला जाऊया. सकाळी खूप छान तयार झाली होती. आमच्या दोघांच्या पाया पडली आणि  कॉलेजला गेली. तिच्यासाठी गिफ्ट घ्यायला आम्ही दुकानात गेलो तेव्हा मला पोलिसांच्या फोन आला आणि ते म्हणाले तुमच्या मुलीचा अपघात झाला आहे. हे ऐकून आम्ही ताबडतोब पोलिसांनी जो पत्ता सांगितला तिथे गेलो; पाहतो तर काय आमची वृंदा देवाघरी गेली होती. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने तिला उडवलं. तिचा जागच्या जागी  मृत्यू झाला होता. लक्ष्मी तर चक्कर येऊन पडली. अंगातून त्राण निघून गेला. तो आमच्यासाठी खऱ्या अर्थाने काळा दिवस होता."

हे सांगत असतांना आजोबांचे डोळे देखील पाणावले.

लक्ष्मी आजी रडू लागली.
सगळं जसच्या तसं डोळ्यासमोर घडत आहे की, काय असं वाटत होतं.
हे ऐकून मालती आणि प्रिया दोघींच्या अंगावर काटा आला.


"लक्ष्मी, शांत हो."
आजोबा.


"ज्या दिवशी माझ्या वृंदाचा वाढदिवस होता त्याच दिवशी आम्हाला कायमचं सोडून गेली. वाटलं देखील नव्हतं असं काही होईल." आजीचा कंठ दाटून आला.

त्या पुढे बोलू लागल्या.

"प्रिया, आई म्हणून मी समजू शकते तुझ्या वेदना; पण आपण काय करणार सांग? एक वेळ येते आणि सांगून जाते आपल्या हातात काही नाही. जे नियतीने समोर मांडले आहे ते स्वीकारावे लागते. जे झालं आहे त्याचा स्वीकार करूनच पुढे जावं लागतं बाळा. तू त्याच्यात बदल करू शकत नाही. आपल्या माणसाला गमावण्याचे दुःख कधीच कमी होत नाही हे ही तितकंच खरं. प्रिया, तुझं वय इतकं नाही. थोड्या दिवसाने बाळासाठी प्रयत्न कर. अशी उदास होऊ नको. पुढे सगळं व्यवस्थित होईल. तू आईपण नक्कीच अनुभवशील. तुला संधी आहे; पण  काही लोकांना ती संधी देखील नसते."

आजीने फोटोचा अल्बम दोघीं समोर ठेवला.

वृंदाचे असंख्य फोटो होते.


तिच्या बारश्याचे,वाढदिवसाचे,शाळेतले. गोल चेहरा, मोठे डोळे, गुबगुबीत गाल, गोरीपान होती वृंदा. आजी देखील अगदी चित्रपटातल्या नटीला लाजवेल इतकी सुंदर दिसत होती.


"वृंदा गेल्यापासून एकही दिवस असा गेला नाही की,
ह्या वस्तू पाहिल्या नाही.
ही माझ्या वृंदाच्या काजळाची डबी, तीच्या डोळ्यात हे काजळ घातलं की खूप गोड दिसायची. हे पैंजण तिच्या पहिल्या वाढदिवसाला केलं होतं. ह्या घराचा कानाकोपरा माझ्या वृंदाच्या पैजणाच्या आवाजाचा साक्षी आहे. हे माझ्या वृंदाचे कपडे. परी राणी होती माझी वृंदा. किती वेदना झाल्या असतील तिला. देवाने माझ्या मुलीला घेऊन जाण्यापेक्षा  मला का नेलं नाही असाही विचार येतो. मी माझं आयुष्य जगले होते, वृंदा इतक्या लहान वयात हे जग सोडून गेली.  का हे सगळं झालं? हे दुःख सहन होत नाही. फार त्रास होतो. देवाला रोज प्रश्न विचारते हे सुख हिरावून घ्यायचे होते तर दिलेच का? मला माहित आहे मी माझ्या वृंदाला कधीच विसरू शकत नाही. काही दुःख वेळेनुसार  वाढत जातात, हे असंच एक दुःख आहे.
एक दिवस विचार आला. मी वृंदाला असं सहजा सहजी जाऊ देणार नाही. तिला मोगरा आवडायचा ना? तिच्या आठवणीत मी आपल्या सोसायटीत मोगऱ्याचे झाड लावले आहे. खरं सांगू का त्या झाडापाशी गेले ना की असं वाटतं माझी वृंदा मला बघत आहे.  मला तिचा भास होतो."

मालतीला आज कळलं होतं आजी झाडावर इतकं प्रेम का करत होती.

आजीचं दुःख इतकं होतं की, प्रियाला काही क्षणासाठी स्वतःच्या दुःखाचा विसर पडला.

"आजी, हे सगळं ऐकून फार वाईट वाटलं." मालती म्हणाली.


"हो आजी खरंच फार वाईट वाटलं." प्रिया.


"थोड्याफार फरकाने सर्वांचं आयुष्य असंच असतं. पूर्णपणे सुखी असा कोणताही माणूस नाही. काही ना काही त्रास हा असतोच. आयुष्य एक सारखं नसतं. सतत बदल हा होत राहतो. खरं सांगू का वृंदाच्या जाण्याने मी पूर्णपणे खचून गेले होते. ह्यांनी मला साथ दिली नसती तर माझं काय झालं असतं देव जाणे. झोपेतून रोज दचकून जागी व्हायचे, सतत रडत  राहायचे, जेवण करायची ईच्छा होत नव्हती, कशातच रस नव्हता. ती गेल्यावर देखील  वाटत राहायचं, ती आसपास कुठेतरी आहे. ती गेली आहे हा स्वीकारच करू वाटत नव्हता.  मला स्वतःला कळत नव्हतं हे सगळं काय होतंय; पण माझ्या मिस्टरांनी मला जी साथ दिली, त्यामुळेच मी त्या परिस्थितून बाहेर पडले. सावरू लागले. एक दिवस मला म्हणाले
लक्ष्मी तुला काही झालं तर मी कसा जगणार? पत्नी म्हणून मी कमजोर पडू शकत नव्हते. ठरवलं आता एकमेकांसाठी जगायचं. हळूहळू स्वतःमध्ये बदल केला. आता आम्हीच एकमेकांचे सोबती."

हे सर्व ऐकून प्रियाचंही मन हलकं झालं.
आजी आजोबांच्या हास्यापाठी किती वेदना दडल्या होत्या हे मालतीला समजले होते.

क्रमशः
अश्विनी ओगले.
सदर कथेचे लिखाण सुरु आहे. कथेचे भाग पेजवर येत जातील, पेजला जरूर फॉलो करा.
कथेचा वापर यु ट्यूब किंवा इतर ठिकाणी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.

अष्टपैलु स्पर्धा २०२५
दीर्घकथा लेखन