Login

जन्म बाईचा भाग २१

कथा मालतीच्या जीवनाची
जन्म बाईचा भाग २१

प्रिया चेहरा पाडूनच आली होती.
रडून रडून तिचे डोळे सुजले होते. नेहमीच प्रसन्न आणि हसरी राहणारी प्रिया तिलाही पाहवत नव्हती.

"काय झालं प्रिया? का रडतेय सांग मला." मालतीने काळजीपोटी विचारले.

"मालती, माझं बाळ गेलं." प्रिया तिच्या गळ्यात पडून  हुंदके देत रडू लागली.

मालतीला तर विश्वासच बसत नव्हता.

"प्रिया, काय बोलतेय ? अगं सगळं व्यवस्थित होतं ना? असं अचानक कसं काय झालं?"

"माहीत नाही मालती, सकाळी उठले पाहते तर अचानक रक्तस्त्राव  सुरू झाला. ताबडतोब डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली, सोनोग्राफी केली, तर कळलं की मिसकॅरेज झालं. मालती सारं संपलं."
असं बोलून ती रडू लागली.

हे सर्व ऐकून मालतीला प्रियासाठी फार वाईट वाटलं.

काही दिवसांपूर्वी किती खुश होती प्रिया आणि असं झालं.
"प्रिया, शांत हो बरं."  तिचे डोळे पुसत म्हणाली.

तिचा हात पकडून तिला सोफ्यावर बसवलं. धीर दिला.
एक ग्लास पाणी दिलं.

तिला प्रियाचा चेहरा बघवत नव्हता.

"मालती, मनाला खूप त्रास होतोय गं. हे सगळं माझ्यासोबत का घडलं?
आणि राहून राहून स्वतःविषयी खूप  रागही येतोय.  "


"राग येतोय?"

"जेव्हा ही बातमी समजली तेव्हा मी दुविधेत होते. इतक्या लवकर बाळ नको होतं. बाळाने हे ऐकलं असेल का? म्हणून हे झालं का? सतत हेच डोक्यात येतंय."

"प्रिया, असं काही नाही. तू असा  काहीही विचार करू नको. हे बाळ तुझ्या नशिबी नव्हतं म्हणून गेलं. स्वतःला अजिबात दोष देऊ नको. तुझी हयात काही चूक नाही. तू तर स्वतःला किती जपत होती. काळजी घेत होती, हे सर्व बाळासाठीच  करत  होती ना? "

ती प्रियाला समजावत म्हणाली.

प्रियाचे अश्रू थांबता थांबत नव्हते.

बेल वाजली.

कोण आलं असेल ह्यावेळेस?

प्रियाने डोळे पुसले.

मालतीने दार उघडलं पाहते तर लक्ष्मी आजी होत्या.

"मालती, येऊ का गं?"


"हो या ना आजी."

लक्ष्मी आजी आल्या.


हातात लोणच्याची  बरणी होती.


"मालती, हे आवळ्याचे लोणचं केलं आहे. तुला द्यावं म्हंटलं." बरणी मालतीच्या हातात देत म्हणाल्या.

त्यांचं लक्ष प्रियाकडे गेलं.

"प्रिया, तू पण आहेस का? तुझ्याही घरी येणारच होते."


प्रियाचे डोळे सुजले होते.

आजी तिला निरखुन पाहत होती.

"आजी, बसा ना." मालती.

आजी प्रियाकडे गेल्या.


"प्रिया, काय गं काय झालं? अश्या अवस्थेत रडू नये पोरी." आजी तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवत म्हणाली आणि तिच्या बाजूला बसली.


तसं विचारल्यावर तर प्रियाला अजूनच रडू आलं. ती आजीच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली.

आजीला काही कळेना.

डोळ्यानेच ईशारा करत आजीने मालतीला विचारले.


"आजी, तिचं मिसकॅरेज झालं आहे."


"अरे देवा! फार वाईट झालं."


"आजी, ती आल्यापासून खूप रडतेय. शांतच बसत नाहीये."

ती प्रियाच्या  बाजूला बसत म्हणाली.


"मालती, रडू दे गं तिला. करू दे मन मोकळं. आता जर भावना दाबल्या, तर तिला पुढे त्रास होईल." हे बोलत असतांना आजीचा आवाज जड झाला.


दहा मिनिटं सगळेच शांत बसले होते.


प्रियाही थोड्या वेळाने शांत झाली.


"प्रिया, मालती,  माझ्या घरी येता का? एक काम आहे."

"होय आजी." मालती


प्रिया आणि मालती लक्ष्मी आजीच्या घरी गेल्या.

"दोन मिनिटं बसा हं, आलेच मी." असं म्हणत बेडरूममध्ये गेल्या.


थोड्या वेळाने आल्या.


एका हातात एक बॉक्स होता, त्यात बरंच सामान होतं. एक फोटोचा अल्बम होता.


नारायण आजोबा देखील तिथेच होते.


"लक्ष्मी कशाला हे सर्व आणलं?" नाराजीच्या सुरातच ते म्हणाले.


"थोडं काम आहे."


सर्वात आधी बॉक्स एका टॅबलवर ठेवला.


मालती आणि प्रिया कुतूहलाने पाहू लागल्या.

आजीने एक एक वस्तू काढायला सुरवात केली.

एका पाकिटात लहान पैंजण,वाळे होते. काजळाची डबी, दुपटी, लंगोट, लहान मुलीचे कपडे, चित्रकलेची वही, पेन्सिल, खोडरबर, एका वहीत मोगऱ्याची फुलं. असं बरंच समान होतं.


प्रत्येक वस्तू अलगद जपून बाहेर काढत होत्या.


दोघीही बघत होत्या.

तो बॉक्स बाजूला ठेवला.


"तुम्ही दोघी हाच विचार करत असाल ना? ह्या सर्व वस्तू कोणाच्या आहेत?" आजी.


"हो आजी. ह्या सर्व वस्तू कोणाच्या आहेत?" मालतीने प्रश्न विचारला.


"मालती, ह्या सर्व वस्तू माझ्या लेकीच्या आहेत वृंदाच्या. जी आता ह्या जगात नाही." आजीचे डोळे भरून आले.

हे ऐकून मालती आणि प्रियाला धक्का बसला.
आजीने ह्या आधी कधीच वृंदाबद्दल सांगितलं नव्हतं.


"लक्ष्मी, आपलं ठरलं आहे ना वृंदाच्या आठवणीत रडायचं नाही" आजोबा आजीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले.


"माहीत आहे हो; पण आज एका आईला स्वतःच्या बाळासाठी रडताना पाहिलं आणि ती खपली पुन्हा निघाली."


"आजी, तुम्हाला मुलगी होती?" प्रिया.


"हो."


"काय झालं वृंदाला?" मालती.

क्रमशः
अश्विनी ओगले.
सदर कथेचे लिखाण सुरु आहे. कथेचे भाग पेजवर येत जातील, पेजला जरूर फॉलो करा.
कथेचा वापर यु ट्यूब किंवा इतर ठिकाणी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.

अष्टपैलु स्पर्धा २०२५
दीर्घकथा लेखन