जन्म बाईचा भाग २०
"आई, ताई आली." कमल मालतीला बघून भलतीच खुश झाली.
विमल आणि कांता देखील लगेच बाहेर आल्या.
कमल आणि विमलने येऊन मालतीला घट्ट मिठी मारली. मालती दोघींच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागली.
इतक्या महिन्याने मालतीला बघून कांताचे अश्रू अनावर झाले.
"मालू, कशी आहेस?" कांता म्हणाली.
"आई, मी बरी आहे. तू बरी आहेस ना?"
"हो बरी आहे."
मालतीला खूप आनंद झाला होता.
कमल आणि विमल तर तिला अजीबात सोडत नव्हत्या.
"ताई, तुझी साडी किती छान आहे गं." कमल मालतीच्या पदरावर हात फिरवत म्हणाली.
"कमल, आपली ताईच सुंदर आहे त्यामुळे साडीची शोभा वाढली." विमल म्हणाली.
"पुरे हं कौतुक. आधी मला सांगा अभ्यास कसा चालला आहे?"
"एकदम छान." दोघीही एका सुरात म्हणाल्या.
"कमल." आईने आवाज दिला.
"ताई तू जा. मला मालती ताईकडे बसायचे आहे." कमल म्हणाली.
"मी नाही हं. आईने तुला आवाज दिला आहे, तूच जा." विमल.
दोघींना मालतीकडे बसायचे होते.
"तुम्ही दोघीही नका जाऊ. मीच जाते."
मालती लगेच कांताकडे गेली.
मालती लगेच कांताकडे गेली.
तिच्या पाठोपाठ विमल आणि कमल देखील गेल्या.
"आई, काही मदत हवी आहे का?"
"तू बस मालू. स्वयंपाकच करत होते, मदतीसाठी कमलला आवाज दिला."
"आई मी करते मदत. सांग काय करायचं आहे?"
"ताई, तू फक्त आमच्याशी गप्पा मार. आम्ही दोघीही आईला मदत करतो." विमल म्हणाली.
दोघी आईला मदत करू लागल्या.
"मालू, सासरी सगळं ठीक आहे ना?"
"हो आई."
"मुंबईला करमतं ना?"
"हो आई. आधी करमत नव्हतं; पण हळूहळू सर्वांच्या ओळखी झाल्या. शेजारी प्रिया आहे तिची आणि माझी छान मैत्री झाली आहे. आता छान वाटतं."
"ताई, तिथे मोठे मोठे मॉल आहेत तिथे गेली का गं तू?" कमलने कुतूहलाने विचारले.
"हो खूप मोठे मॉल आहेत. अधूनमधून प्रियासोबत जाते. तिला शॉपिंगची खूप हौस आहे. महिन्यातून एकदा,दोनदा हमखास चक्कर होते."
"वा! किती मस्त गं ताई. आई आपण देखील जाऊया हं ताईकडे. मस्त राहूया,फिरुया. मला मॉल बघायचा आहे." कमल म्हणाली.
"कमल, ताईचं लग्न झालं आहे. बरं वाटतं का तिच्याकडे जाऊन राहायला. तिचाही संसार आहे."
"आई, तू खूप जुने विचार करते. आता असं काही नसतं." कमल.
"आजीबाई, पुरण वाटून झालं असेल तर दे." कांता म्हणाली.
विमल जोरजोरात हसू लागली.
"ताई, बघ ना ही हसतेय." कमल मालतीला म्हणाली.
"विमल, गप्प बस बरं. हसू नको." मालती.
"ताई, तुझं लग्न झाल्यापासून विमल ताई मला सारखी ओरडत असते."
"कमल, काय हे किती दिवसाने आली आहे मालू. तर हे काय सांगत बसली आहे." कांता.
"असू दे गं आई. मला नाही सांगणार तर कोणाला सांगणार?"
"माझी गोड ताई." कमल तिला मिठी मारत म्हणाली.
"आई, कशाला पुरणपोळीचा घाट घातला? साधं जेवण केलं असतं तरी चाललं असतं."
"का साधं? तुझ्यासाठी आणि जावईबापूंसाठी इतकं तर करूच शकते ना?"
"ताई, तुझी सासू वागते का गं नीट?"
कमलने विचारले.
कमलने विचारले.
"कमल, काहीही काय विचारतेय तिला?" कांता जरा रागातच म्हणाली.
कमल शांत बसली.
"असं का विचारलं तू?" मालती.
"काही नाही गं मालू. तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. तुला माहीत आहे ना काहीही बोलते." कांता.
मालती पुढे काही बोलली नाही; पण कमलचा हा प्रश्न तिला अस्वस्थ करून गेला.
'असं का बोलली ती? रात्री झोपतांना विचारते. आता आईसमोर ती काही बोलणार नाही.'
"ताई, दाजी एकटे बसून कंटाळतील ना? मी त्यांना आपल्या लहानपणीचे फोटो दाखवू का?" कमल.
"हम्म जा दाखव."
"कमल, जावईबापुसमोर जास्त बडबड करू नको. मोजकं बोल." आईने सूचना दिली.
"हो आई." ती गेली.
कपाटातून फोटोचा अल्बम काढला आणि श्रीकांतला दिला.
तितक्यात कुल्फीवाल्याची गाडी आली.
कमल लगेच पळत आली.
"ताई, कुल्फीवाला आला आहे. तुझी आवडती मलाई कुल्फी घेऊ ना?" तिने मालतीला विचारले.
"थांब मीच येते." मालती लगबगीने गेली.
मालती आणि तिच्यापाठी विमल गेली.
"काय काका कसे आहात?" मालतीने कुल्फीवाल्याला विचारले.
तो तिच्या ओळखीचा होता.
"मालती बेटा कशी आहेस? किती दिवसाने आली."
"मी बरी आहे काका."
तिघी बहिणी मनसोक्त कुल्फी खाण्यात दंग झाल्या.
किती दिवसाने बहिणीसोबत कुल्फी खात होती. तिला खूप छान वाटत होतं.
हे सगळं श्रीकांत खिडकीतून पाहत होता.
मालतीच्या चेहऱ्यावर आनंद पाहून त्यालाही खूप बरं वाटलं.
मालती आणि श्रीकांतची नजरानजर झाली.
'अरे देवा! ह्यांना तर कुल्फी दिलीच नाही.'
"काका, अजून एक कुल्फी द्या."
तिने जाऊन श्रीकांतला कुल्फी दिली.
"आज माझी बायको मला पूर्णपणे विसरूनच गेली आहे." श्रीकांत तिच्या कानात म्हणाला.
"सॉरी."
"गंमत केली गं. जा कमल आणि विमल वाट बघत आहेत."
"ताई, शर्यत?" कमल.
"हो चालेल." मालती.
सर्वात आधी कोण कुल्फी संपवणार ही
शर्यत लावायच्या.
नेहमीप्रमाणे मालती जिंकली.
तिघीही खळखळून हसत होत्या.
तो दिवस कधी निघून गेला समजलंच नाही.
रात्री कमल आणि विमल दोघींच्यामध्ये मालती झोपली होती.
"ताई, आज आली आणि उद्या लगेच चालली. अजून दोन दिवस तरी थांब ना?" विमल म्हणाली.
"थांबले असते गं;पण तुझ्या दाजींना सुट्टी नाही ना."
"पुन्हा केव्हा येणार?" विमल.
"येईल लवकरच." मालती तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली.
मालतीला कधी डोळा लागला कळलंच नाही.
दुसऱ्या दिवशी जाग आली. पाहते तर आठ वाजले होते. इतक्या उशीरापर्यंत ती कधीच झोपत नाही.
"झाली का झोप?" कांता तीच्या उशापाशीच बसली होती.
"अगं आई मला उठवायचं ना?" डोळे चोळत म्हणाली.
"ठीक आहे गं. माहेरी आली आहेस. हा आराम हक्काचा असतो."
"ह्या दोघी कुठे गेल्या?"
"अर्धा तास झाला आहे. कुठे गेल्या काय माहित? काही सांगीतले नाही."
"आलो आम्ही." कमल पायातील चप्पल सरकवत म्हणाली.
दोघींच्या हातात एक एक पिशवी होती.
"दोघी न सांगता कुठे गेला होता?" मालतीने विचारले.
"ताई, हे घे तुला आवडतात म्हणून चिंच आणली आहेत." कमलने तिच्या हातात पिशवी दिली.
"आणि ही मोगऱ्याची फुलं." विमलने मोगऱ्याची पिशवी दिली.
"थँक यु." मालतीने स्मितहास्य केलं.
"आमच्या बाजूला ना लक्ष्मी आजी राहतात. त्यांनी मला त्या दिवशी मोगऱ्याची फुलं आणून दिली होती. मला तेव्हा तुम्हा दोघींची खूप आठवण आली होती."
"ताई, आम्हालाही तुझी खूप आठवण येते." विमलच्या डोळ्यात पाणी आले.
कमल देखील मालतीला घट्ट बिलगली.
"नका गं तिला रडवू." कांता.
"आई, हे तू बोलतेय. मालती ताईंच्या आठवणीत तू पण तर रडत राहते."
तितक्यात श्रीकांत आला.
कांता किचनमध्ये गेली.
"दाजी, दोन दिवस राहा ना अजून. मी तर ताईंशी जास्त बोलली देखील नाही." कमल.
"थांबलो असतो; पण उद्या काहीही करून कामाला जावं लागणार. बरं पुढच्या महिन्यात तुमच्या दोघींची परीक्षा संपतेय ना?"
"हो."
"तुम्ही सगळे या मुंबईला राहायला."
हे ऐकून कमल भलतीच खुश झाली.
आता दाजींना बोलावलं म्हणजे विचारायला नको. तिचा आनंद गगनात मावेना.
ती लगेच सश्यासारख्या उड्या मारत कांताकडे गेली आणि म्हणाली,
"बघ दाजींना आपल्याला राहायला बोलावलं आहे."
"मग काय लगेच जायचं का?"
"आई, काय हे. तू तर तयारच होत नाही. ताई काय परकी आहे का? मला माहित नाही. मी तर ताईकडे राहायला जाणारच."
असं बोलून ती निघून गेली.
असं बोलून ती निघून गेली.
'ह्या पोरीला कधी अक्कल येणार देवाला ठाऊक.'
मालतीने छान गजरे बनवले.
कमल,विमल खूप खुश झाल्या.
नाश्ता केला आणि मालती सामानाची बांधाबांध करू लागली.
कांताने मालतीला घरी केलेलं लोणचं, कुरडई,पापड, सांडगे, अनारसे असं बरंच सामान दिलं होतं.
"आई, इतकं सामान? कशाला?"
"मालू असू दे गं. तुला आवडतं ना म्हणून दिलं आहे."
"मालती, निघुया?" श्रीकांतने तिला विचारले.
निघतांना सर्वांचे डोळे भरून आले.
"काळजी घे मालू." कांता तिच्या गालावरून हात फिरवत म्हणाली.
"तू पण काळजी घे आई." मालती भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली.
कमल,विमल देखील तिला घट्ट बिलगून रडत होत्या. सर्वांना रडताना पाहून श्रीकांतलाही वाईट वाटत होतं.
तिने बाबांच्या फोटोला नमस्कार केला.
"ताई, हे घे भेळ आहे. तुला आवडते ना? रस्त्यात खा." विमलने तीच्या हातात भेळ दिली.
बाबाच जणू पाठी उभे आहेत असा भास झाला.
निघतांना पाऊलं जड झाली होती. अश्रु टिपतच ती घराबाहेर पडली.
तिघी नजरेच्या आड होईपर्यंत ती त्यांना बघत होती.
श्रीकांत तिच्या पाठीवरून हात फिरवत होता.
कन्या सासुर्यासि जाये ।
मागें परतोनी पाहे |
मागें परतोनी पाहे |
अशीच तिची अवस्था झाली होती.
येतांना किती खुश होती आणि जातांना तितकीच दुःखी.
श्रीकांत आणि मालती दोघेही घरी आले.
"मालती, बरं वाटलं ना सर्वांना भेटून." तो सोफ्यावर बसत म्हणाला.
"हम्म."
"काय झालं? आईची आठवण येतेय?"
ती शांतच होती.
"मालती, शर्मिला बाहेरगावी जाणार म्हणून मी नाराज होतो तर काल तूच मला समजवत होती ना? आणि आता स्वतःच तोंड पाडून बसली आहे."
"निघतांना वाईट वाटत होतं." ती म्हणाली.
"मालती, पुढच्या महिन्यात मी नक्की सुट्टी घेईन. पुन्हा भेटायला जाऊया. चल हसून दाखव बरं."
ती किंचित हसली.
आईने दिलेली शिदोरी काढली.
सर्वकाही व्यवस्थित डब्यात भरुन ठेवलं.
सांध्याकाळी प्रिया आणि लक्ष्मी आजी दोघींना थोडं थोडं देऊया हा विचार केला.
प्रवासाने मरगळ आली होती. रुममध्ये जाऊन आराम केला.
दुसऱ्या दिवशी लक्ष्मी आजी आणि प्रियाला थोडं सामान दिलं. दोघीही खुश झाल्या.
"मालती, तिथे सर्वांना भेटून बरं वाटलं असेल ना?" प्रिया.
"हो गं. खूप छान वाटलं. माझा तर पाय निघत नव्हता." मालती.
"ह्या सर्व वस्तूसाठी थँक्स."
"अगं थँक्स वैगेरे नको हं. आणि तू दोन जीवांची आहेस. आता असंच चांगलं आणि पौष्टिक खायचं आहे."
"तू तर अगदी माझ्या आईसारखं बोलतेय."
दोघीही हसू लागल्या.
इथे आल्यावर मालतीचं रूटीन सुरू झालं होतं.
एक दिवस मालती कामं आवरून बसली होती तितक्यात बेल वाजली. पाहते तर काय प्रिया आली होती. तिचा चेहरा उतरला होता.
"प्रिया,काय झालं? तुझा चेहरा का उतरला आहे?"
क्रमश:
अश्विनी ओगले.
सदर कथेचे लिखाण सुरु आहे. कथेचे भाग पेजवर येत जातील, पेजला जरूर फॉलो करा.
कथेचा वापर यु ट्यूब किंवा इतर ठिकाणी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.
अश्विनी ओगले.
सदर कथेचे लिखाण सुरु आहे. कथेचे भाग पेजवर येत जातील, पेजला जरूर फॉलो करा.
कथेचा वापर यु ट्यूब किंवा इतर ठिकाणी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.
अष्टपैलु स्पर्धा २०२५
दीर्घकथा लेखन
दीर्घकथा लेखन