जन्म बाईचा भाग १७
"मालती ह्या महिन्याच्या शेवटी चार दिवस मी सुट्टी घेतली आहे. आपण आई बाबांकडे जाऊया. आल्यापासून आपण गेलोच नाही. हो आणि मी ठरवलं आहे आई बाबांना अजिबात सांगायचं नाही, त्यांना सरप्राईज द्यायचं. कशी वाटली आयडिया?" श्रीकांत आई बाबांना भेटायला जाण्याच्या विचाराने खूप खुश झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं.
तिथे जायचा विचार केला तरी मालतीला दडपण आलं. मनातून तर नको नको वाटत होतं, मात्र श्रीकांतला जर नाही बोलले तर त्याला नक्की वाईट वाटणार. त्याच्या मनाचा विचार करून ती तयार झाली. तिथे गेलं की, आता सुमन काही ना काही बोलणार ही तिला पक्की खात्री होती; पण श्रीपंतरावांची ओढ तिलाही होती.
'निघतांना मामाजीना किती वाईट वाटत होतं. त्यांनाही आठवण येतेच की, म्हणून तर बरोबर फोन करून विचारपूरस करतात. मुलाला,सुनेला बघायची त्यांना ईच्छा होतच असणार.
असाही चार दिवसाचा प्रश्न आहे.
पुन्हा परत यायचं आहेच.
"काय झालं मालती? इतका काय विचार करतेय? मी काय बोललो ते ऐकलंस की नाही?"
श्रीकांत म्हणाला.
"हो ऐकलं ना. आपण नक्की जाऊया. मामाजी किती खुश होतील ना? त्यांना किती महिन्याने भेटणार आहोत. खरंतर सगळेच खुश होतील. शर्मिला ताईंना पण बोलावूया. सर्वांची भेट होईल. जमलं तर आई,कमल, विमल ह्यांची देखील भेट घेऊया. त्यांनाही बरं वाटेल."
मालती म्हणाली.
"जमलं तर म्हणजे. नक्की भेट घेऊया. तुझी माहेरी चार दिवस जायची ईच्छा होतीच आणि तेव्हाच आपलं इथं येण्याचं फिक्स झालं. खरं सांगू का मालती आई,बाबा,दादा पासून दूर झालो तेव्हा कळलं की लग्न झालेल्या मुलीला माहेरची ओढ का लागते? खरंच स्वतःच्या माणसापासून दूर राहणं सोप्प नाही. आपल्या मागे अनेक गोष्टी सुटतात. पावलोपावली आठवण येते. मनाचा एक कोपरा त्यांच्यासाठी हळवाच असतो. इथे आल्यावर किती तरी दिवस मला करमत नव्हतं. सर्वांची खूप आठवण यायची. खरंच फार कठीण असतं आपल्या जवळच्या माणसापासून दूर राहणं. नक्की जाऊया." हे सारं तो मनापासून बोलत होता.
"तुम्ही तर अगदी माझ्या मनातलं बोलला. खरंच मला आई आणि बहिणींची खूप आठवण येत होती; पण तुम्हाला सुट्टी मिळणं मुश्किल झालं, म्हणून मी देखील काहीच बोलले नाही. खरंच जाऊया हं. आई,कमल,विमल तिघीही मला बघून खुश होतील."
"नक्की जाऊया मालती. बरं आता एक कप चहा देशील."
"हो लगेच आणते."
आई आणि बहिणींना भेटायला मिळणार हा विचार करून ती खूप सुखावली.
दुसऱ्या दिवशी श्रीकांत कामाला गेला.
प्रिया आली. मालती खूप खुश दिसत होती.
"काय मालती आज काय स्पेशल आहे का?" ती सोफ्यावर बसत म्हणाली.
"नाही गं असं काही स्पेशल नाही."
"स्पेशल नाही मग इतकी खुश? डोळ्यात वेगळीच चमक आहे."
"आम्ही ह्या महिन्यात सर्वांना भेटायला जाणार आहोत. मामाजी,आत्याबाई, माझी आई, बहिणी सर्वांची भेट घेणार आहोत."
"अरे वा! छान छान. आपल्या माणसांना खूप दिवसाने भेटण्याचा आनंद काही वेगळाच असतो. बरं ऐक आज आपल्या सोसायटीच्या बायका एकत्र जमणार आहेत. सर्व बायका मिळून पिकनिक काढणार आहेत, त्याविषयी चर्चा करणार आहेत. संध्याकाळी ठीक सहा वाजता क्लब हाऊसमध्ये भेटायचं ठरलं आहे. नक्की ये. तेच सांगायला आले होते."
"हो येईन."
प्रिया निघून गेली.
दिवस कसा निघून गेला समजलंच नाही.
प्रियाने ठीक सहा वाजता यायला सांगितलं होतं.
मालती तयार झाली आणि गेली.
मालती तयार झाली आणि गेली.
प्रिया आलीच नव्हती.
तिला वाटलं उशिरा येईन; पण ती आलीच नाही. तिला फोन केला तर उचलला नाही. मालतीला जरा शंका आली. असं ती कधीच करत नाही. काय झालं असेल?
मीटिंग अर्धवट सोडून ती प्रियाकडे गेली.
मीटिंग अर्धवट सोडून ती प्रियाकडे गेली.
बेल वाजवली.
प्रियानेच दार उघडलं.
तिचा चेहरा उतरला होता.
"प्रिया, बरं वाटत नाही का?" तिच्या कपाळाला हात लावत विचारलं.
"ठीक आहे मी."
"अगं तुझा चेहरा वेगळंच सांगतोय? सांग मला काय झालं? फोन केला तर फोनही उचलला नाही." तिच्या काळजीपोटी विचारले.
"मालती, प्रतीक आणि माझं लग्न होऊन वर्षही झालं नाही आणि..."
असं बोलून ती थांबली.
"आणि काय प्रिया?"
"मालती, मी प्रेग्नेंट आहे."
"काय? अगं ही तर आनंदाची बातमी आहे." तिने प्रियाला घट्ट मिठी मारली.
"मालती, पण मला हे बाळ नको आहे." प्रिया म्हणाली.
"पण का? सगळं व्यवस्थित आहे ना?"
"हो गं पण इतक्या लवकर ही जबाबदारी मी घेऊ शकेल का? फार भीती वाटतेय मला. मी विचार केला आहे प्रतिकला सांगणार आहे ही जबाबदारी नको. तो माझं ऐकेल."
मालतीच्या लक्षात आलं.
"प्रिया, शेवटी हे तुझं शरीर आहे. सर्वस्वी तुझा निर्णय आहे; पण जर मी तुझ्या ठिकाणी असते तर नक्कीच हा चान्स घेतला असता. आपलं ह्या विषयावर कधी बोलणं झालं नाही,पण आई होण्यासाठी मी खूप तरसते आहे गं. हे सुख असं सहजासहजी प्रत्येकीच्या नशिबी नसतं. तू असा पटकन निर्णय घेऊ नको असं मला वाटतं. विचार कर." हे बोलत असतांना मालतीचे डोळे पाणावले. तिला पुढे बोलवत नव्हतं.
मालती निघून गेली.
प्रिया मालतीच्या बोलण्याचा विचार करू लागली.
'तसं मालती देखील बरोबर बोलतेय. आई होण्यासाठी किती प्रॉब्लम होतात. बघू प्रतीक आल्यावर त्याच्याशी बोलते.'
मालतीची जुनी खपली नव्याने निघाली होती.
तिच्या डोक्यात पुन्हा विचार फेर धरू लागले.
"का असं माझ्याच बाबतीत? कधी होणार मी आई? काही कमी आहे का माझ्यात?"
बेल वाजली. श्रीकांत आला होता.
मालती उदास दिसत होती.
"मालती, काय झालं? सकाळी तर खुश होती?"
"मन अस्वस्थ झालंय."
"का?"
"मी आई कधी होणार?"
"पुन्हा तेच. मी तुला म्हणालो आहे ना कधी कधी अश्या गोष्टींना वेळ लागतो."
"हे आपल्याच बाबतीत का? प्रिया प्रेग्नेंन्ट आहे. मी तिच्यासाठी खुश आहे; पण मग मी..."
"मालती, शांत हो. जास्त विचार करू नको."
"विचार ठरवून करतो का? कितीजरी विचार केला विचार न करण्याचा, तरी डोक्यात विचार येतातच."
"माहितीये मला मालती. बरं माझ्या मित्राच्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, आपण तिथे जाऊया? खूप लोकांना गुण येतो."
"खरंच जाऊया?" तिला अंधारात कवडसा दिसला.
"नक्की जाऊया. आता डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे. आतातरी जास्त विचार करू नको."
रात्री जेवत असतांना प्रिया आणि प्रतीक आले.
"मालती, तू जे ही म्हणाली त्याचा मी विचार केला. तुझं म्हणणं पटलं मला."
"खरंच प्रिया?"
"हो गं आम्ही दोघेही तयार आहोत."
मालतीने प्रियाला मिठी मारली.
"अभिनंदन प्रतीक." श्रीकांत म्हणाला.
द्विधा मनस्थितीत असलेल्या प्रियाला मालतीने रस्ता दाखवला होता.
जे स्वतःकडे नसतं त्याची किंमत अमूल्य असते. नाही का?
क्रमशः
अश्विनी ओगले.
अश्विनी ओगले.
आजचा भाग कसा वाटला कंमेंटमध्ये जरूर सांगा. एक लाईक जरूर द्या.
सदर कथेचे लिखाण सुरु आहे. कथेचे भाग पेजवर येत जातील, पेजला जरूर फॉलो करा.
कथेचा वापर यु ट्यूब किंवा इतर ठिकाणी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.
सदर कथेचे लिखाण सुरु आहे. कथेचे भाग पेजवर येत जातील, पेजला जरूर फॉलो करा.
कथेचा वापर यु ट्यूब किंवा इतर ठिकाणी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.
अष्टपैलु स्पर्धा २०२५
दीर्घकथा लेखन
दीर्घकथा लेखन