Login

जन्म बाईचा भाग १५

कथा मालतीच्या जीवनाची

जन्म बाईचा भाग १५

श्रीकांत कामाला गेला. मालतीने घरातली कामं आवरली. दोन माणसांची कामं इतका काही वेळ लागलाच नाही. एका तासात सगळीच कामं झाली.

इतक्या वर्षात हे पहिल्यांदा झालं होतं. असा मोकळा वेळ कधीच मिळाला नव्हता.

ती तशीच बसून राहिली.

तिच्या विचारात हरवली.

तितक्यात लक्ष्मी आजी आल्या.


"येऊ का गं मालती?"


"हो या ना आजी." मालतीने हसतमुखाने स्वागत केलं.


"श्रीकांत गेला ना ऑफिसला?"

"हो आजी."

"बरं ही घे मोगऱ्याची फुलं." हातातील पिशवी पुढे करत म्हणाल्या.


त्या मोगऱ्याचा सुगंध घरभर पसरला.

"धन्यवाद आजी."

तिनेही लगेच सुगंध घेतला. तिला मोगरा खूप आवडायचा. ती प्रसन्न मुद्रेने त्या फुलांकडे पाहत होती.


"तुला आवडतो का गं मोगरा?"

"हो आजी, खूप आवडतो. माझ्या लहान बहिणी माझ्यासाठी मोगऱ्याची फुलं गोळा करून आणायच्या, मग मी त्यांना गजरा करून द्यायचे."

जुन्या आठवणींनी तिचे डोळे भरून आले.

"आजी, पण ही फुलं कुठून आणली?"


"आपल्या बिल्डींगखाली गार्डनमध्ये आहे की झाड. सकाळी खाली गेले की, जाऊन आणते."


"बरं."


"मालती, मी देखील रोज गजरा बनवायचे; पण हल्ली हात खूप थरथरतात त्यामुळे नाही बनवत. एक गजरा मलाही बनवून देशील का?"

"हो आजी."


"अगं मी गम्मत केली, मी म्हातारी ह्या वयात कुठं गजरा माळून मिरवणार? आणि माझ्या पांढऱ्या केसात मोगरा गुडूप होईल. तुलाच छान असा गजरा बनव, तुझ्या सुंदर केसात खूप खुलून दिसेल. श्रीकांतही तुला बघत बसेल." असं म्हणत त्या खळखळून हसू लागल्या.


मालती लाजली.

ती इथे आल्यापासून आजी आजोबांच्या घरात कोणालाही पाहिलं नव्हतं.

"आजी, घरात तुम्ही आणि आजोबा असतात का? अजून कोण?"


"मी,आजोबा आणि ही मोगऱ्याची असंख्य फुलं. बरं चल निघते मी, नाहीतर हे येतील मला शोधत."

आजी निघून गेल्या.


'त्या अश्या का बोलल्या बरं? बहुतेक वयोमानानानुसार त्यांना बोलायचं कळत नसेल; पण खरंच मनाने खूप छान आहेत. माझ्यासाठी आठवणीने फुलं आणली. धन्यवाद आजी.'

तिने पुन्हा मोगऱ्याचा मनसोक्त सुगंध घेतला.

मोगऱ्याचा सुंदर गजरा बनवला एक स्वतःसाठी आणि एक आजीसाठी. आजी नको म्हंटल्या होत्या; पण काही केल्या तिचं मन मानत नव्हतं.


ती आजीला गजरा द्यायला गेली.


"शांता, कितीवेळा सांगीतले आहे लवकर येत जा म्हणून." दरवाजा उघडतच आजी म्हणाल्या.

मालतीला पाहिले.

"अगं, तू आहेस होय . सॉरी हं. मला वाटलं शांता आली."


"आजी, हा घ्या तुमच्यासाठीही गजरा बनवला." असं म्हणत तिने आजीच्या हातात गजरा दिला.


"कशाला गं मालती? त्रास करून घेतला."


"काही त्रास नाही आजी. अश्या वस्तू करायला मला फार आवडतात."

"दारात काय उभी आहेस. ये आत ये."


"मी नंतर कधी तरी येईन."


"आता आली आहेस तर ये गं."


मालती आजीच्या घरात गेली.


"ये मालती,बस." नारायण आजोबा सोफ्यावर बसले होते.


मालती जाऊन बसली.


"श्रीकांत गेला का कामाला?" आजोबा.


"हो आजोबा."

तितक्यात शांता आली.


"काय गं शांता, किती उशीर ?" आजी.


"आजी, त्या कदम ताई आहेत ना त्यांच्या घरी उशीर झाला." किचनमध्ये जात ती म्हणाली.


"बरं ठीक आहे. आधी चहा ठेव तुला आणि मालतीला मग ती काय कामं कर."


"आजी मला नको चहा." मालती.


"अगं घे गं. पहिल्यांदाच आली आहेस,अशी चहा न घेता जाणार का?"


आजीने खूप सुंदर घर सजवलं होतं.

मालतीची नजर भिंतीवर लावलेल्या फोटोकडे गेली.

ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता. नवरा बायको होते. गळ्यात फुलांची माळ होती. बहुतेक लग्नातील फोटो होता. किती सुंदर, रेखीव दिसत होते दोघे.


मालती त्या फोटोला निरखुन पाहत होती.


"मालती, तो आमच्या लग्नातला फोटो आहे. माझं वय सोळा होतं आणि ह्यांचं वय वीस वर्षे."


"खूप सुंदर दिसत होता तुम्ही. अगदी चित्रपटातील नट आणि नटी."


"थँक यू."


तितक्यात शांता आली.


मालतीच्या हातात चहाचा कप दिला.


"आजी, ह्या कोण?" शांताने विचारलं.


"अगं ही मालती, बाजूलाच राहायला आली आहे. मालती, ही शांता माझ्या इथे जेवण,भांडी,लादी सगळं करते. आम्ही म्हातारा म्हातारीचं पान हिच्याशिवाय हलत नाही."

आजीने शांताची ओळख करून दिली.

"नमस्कार ताई, तुम्हालाही घरकाम करायला बाई हवी असेल तर जरूर सांगा."

"आता तशी गरज नाही, पण लागली तर सांगेन."

"ठीक आहे ताई."

शांता किचनमध्ये निघून गेली.


"बरं आजी मी निघते. थोडीफार कामं आहेत."


"येत जा गं गप्पा मारायला, बरं वाटतं."


"हो आजी."

मालती निघून आली.


खूप दिवसाने मालतीला खूप प्रसन्न वाटत होतं आणि किती तरी दिवसाने कोणीतरी मालतीचा विचार केला होता.


तिथे होती तर गजरा तर दूर; पण धड केस बांधायला देखील वेळ नव्हता. सतत आपलं हे काम ते काम. निवांतपणा नव्हता.


आजी आजोबांचा किती सुंदर फोटो होता.

तसाच श्रीकांत आणि स्वतः चा फोटो लावायचा तिने विचार केला.


थोडीफार कामं आवरली.

कपड्यांच्या घड्या घातल्या.


तिच्या नजरेस आईने दिलेली साडी पडली.


फिकट गुलाबी रंगाची आणि त्यावर लाल रंगांची प्राजक्ताची फुलं असलेली साडी आईने किती हौसेने घेतली होती.


खूप दिवस झालं ती साडी नेसली नव्हती.

तिने ती साडी नेसली. केसात गजरा माळला. डोळयात काजळ लावलं. स्वतः ला आरशात बहितले. खूप सुंदर दिसत होती.

असं टापटीप राहायचं ती जणू विसरली होती.

पण आज ती तयार झाली.

श्रीकांत तिला बघून खुश होईल. हाच विचार करत होती.

कधी एकदाचा श्रीकांत येतोय असं झालं होतं.


वेडाबाई लाजत होती.

मनाला हुरहूर लावणारे ते दिवस.

बाल्कनीत बसून श्रीकांतची वाट बघत होती.

आईने दिलेल्या साडीत आईच्या प्रेमाचा भास होत होता. खूप छान वाटत होतं. असं पहिल्यांदाच वाटत होतं.

श्रीकांत आल्यावर काय प्रतिक्रिया देईल बरं. हाच विचार करून गालातल्या गालात हसत होती.


क्रमशः
अश्विनी ओगले.
आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा. भाग आवडल्यास एक लाईक जरूर द्या.

मला माहित आहे मालतीच्या आनंदात तुम्हा वाचकांचा आनंद आहे. ही मालती आपल्यातीलच एक वाटतेय ना. बघू आता पुढे काय काय घडतंय.

सदर कथेचे लिखाण सुरु आहे. कथेचे भाग पेजवर येत जातील, पेजला जरूर फॉलो करा.
कथेचा वापर यु ट्यूब किंवा इतर ठिकाणी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.

अष्टपैलु स्पर्धा २०२५
दीर्घकथा लेखन