जन्म बाईचा.. जन्म आईचा!!

A Short Story About Parenting..!

जन्म बाईचा.. जन्म आईचा!



केबिनच्या काचेतून माझं बाहेर लक्ष गेलं. ती पेशंटच्या बाकावर बसली होती. चेहऱ्यावर नुसती घालमेल. ती म्हणजे सुलभा, माझी नेहमीची पेशंट.

एव्हाना आपला नंबर येईपर्यंत शांत बसणारी ती आज काहीशी अस्वस्थ वाटत होती. इतर पेशंट होतेच पण तिची तगमग बघून मी तिला आधी आत पाठवण्यास सांगितले.


"काय झालंय ताई? आज जरा अस्वस्थ दिसतेस?"

मी प्रश्न विचारायचा अवकाश की तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागले. तिला मोकळे होण्याची गरज होती, मग मी दोन-तीन मिनिटे गप्प राहिले.

ती शांत झाल्यावर म्हटलं, " हं बोल आता, काय प्रॉब्लेम आहे?"

"मॅडम मला काहीच झालं नाही, मी माझ्या मुली संदर्भात आली आहे."

"पण ती तर सोबत दिसत नाही ना?"  मी.

"हो, मलाच बोलायचं होतं."  ती.

"हं, सांग."

"माझी मुलगी मृणाल, अवघ्या दहा वर्षाची आहे. आणि तिला पाळी सुरू झाली हो."
सांगताना तिच्या डोळ्यात अजुनही अश्रू होते.

"मी पहिल्यांदा पाळीला झाले तेव्हा पंधरा वर्षाची होते आणि माझी मुलगी केवळ दहा वर्षांची असतानाच?"
तिला पुन्हा भरून आलं.


"अरे, एवढ्या कारणासाठी रडतेस तू? अगं हे नॉर्मल आहे. आजकाल मुलींना लवकर पाळी सुरू होते. काही काही अपवाद तर सात-आठ किंवा त्याहून कमी वयाच्या मुलीला देखील पाळी आलेली आहे. आजुबाजूचे वातावरण, टीव्ही आणि इतरही कारणे ह्यामुळे हार्मोन्स मध्ये झालेला बदल यामुळे आताच्या मुलींना हल्ली लवकर पाळी येते."   मी म्हणाले.


" हो मला माहिती आहे हे. तिच्या शरीरातील, वागण्यातील बदल मला जाणवायला लागला होता. वर्षभरात तिला पाळी सुरू होईल असा माझा अंदाज होता, पण हे यावर्षी झालं आणि मी अस्वस्थ झाले."   ती.

" पण तू एवढी का अस्वस्थ?"  मी.

"मॅडम, पाळी म्हणजे काय हे कळायच्या आधीच माझी लेक त्याच्या सामोरे गेली त्याचं मला वाईट वाटतंय, का ते माहीत नाही. पण जास्त वाईट याचं वाटतं की तिने मला हे स्वतःहून सांगितलं नाही. रक्ताने भरलेले कपडे कुठेतरी ठेवून दिले. मला अचानक दिसले आणि मी खोदून खोदून विचारल्यावर तिने सांगितलं. रक्तस्त्राव बघून ती घाबरून गेली होती. काय झालं हे तिलाही कळलं नव्हतं."
तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळले.


"मग? "  माझा प्रश्न.


" मला खूप अपराधीपणाची भावना आली मॅडम, काही दिवसांपूर्वी शाळेतल्या सर्व गमतीजमती माझ्याशी शेअर करणारी मुलगी एवढी मोठी गोष्ट मला सांगू शकली नाही याचे खूप वाईट वाटले.
ती स्वतः घाबरली पण ती मलाही घाबरली. आपल्या आईला तिने घाबरावे, ही गोष्ट लपवून ठेवावी, याचे फार वाईट वाटतेय मला."
डोळे पुसत ती.


"ओह! मग काय केलस तू?"  मी.


"मी तिला हे काय आहे, पाळी म्हणजे काय हे समजावून सांगितले. युट्युब वरून काही व्हिडिओ पण दाखवले.
पण मला खूप रडायला आले. एक आई म्हणून मी अपयशी झाले असं राहून राहून वाटतं. माझ्या आणि तिच्या नात्यात एक दरी निर्माण झाली असेल का? खेळण्या-बागडण्याच्या वयात, त्या चार दिवसात कशी राहील ती? कुठे कधी अवेळी पाळी आली तर तशी सामोरी जाईल? या सगळ्या विचाराने नुसते थैमान घातलंय डोक्यात. राहून राहून मला रडायला येतं. माझी कोवळी लेक एकदम मोठी झाली, माझ्यापासून गोष्टी लपवायला लागली असं वाटतं."

तिचे मुसमूसने चालूच होते.


"ॲक्च्युअली सुलभाताई, प्रॉब्लेम ती तुझ्याशी बोलली नाही यापेक्षा तिच्या शरीरातील बदल तू एक्सेप्ट करू शकत नाहीस हा आहे.
तू आठवून बघ, तिच्या वयाची असताना तू कशी होतीस? तू कधीच काही लपवायची नाहीस का? की कधी खोटं बोलले नाहीस?"

मी तिच्यावर पलटवार केला.


"हो, लहानपणी मी देखील खोटं बोललेय हो, कधीकधी काही गोष्टी लपवल्यात देखील. पण म्हणून माझ्या मुलीनेही तसेच वागू नये ह्यासाठी तर माझा खटाटोप चालू होता ना, पण सपशेल हरलेय मॅडम मी."
तिचा हुंदका पुन्हा दाटून आला.



"तुझे सर्व प्रश्न चुकीचे आहेत असं नाहीये गं. आजकालच्या आपण नोकरदार बायका, त्यात बरेचदा नवराबायको आणि मुलं अशा चौकोनी कुटुंबाचा अट्टहास करणारे. टीव्ही, मोबाईल आता सर्रास मुलांच्या हाती असते. त्यावर काय पाहायचं काय नाही हे आपण ठरवून सांगितलं तरी त्यांच्या मनात उत्सुकतेपोटी कधी काही भलतं पाहिलं जात असेल हे आपल्या गावीही नसते. मनात एक विश्वास तेवढा असतो की माझे लेकरू असे काही करणारं नाही पण जीव अडकला असतोच ना?"

माझे बोलणे ती ऐकत होती.

"मला सांग, जेव्हा तुला कळले तू आई होणार आहेस तेव्हा काय वाटलं होतं तुला? "
तिच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले.


" मॅडम, एक वेगळीच फीलिंग होती मनात. आपण आई होतोय ही भावनाच खूप मस्त होती. आनंद, आश्चर्य, एक हुरहूर..! खूप काही. एक जीव आपल्या पोटात वाढतोय ही कल्पनाच किती भारी ना?"
माझ्याकडे बघत ती उत्तरली. चेहऱ्यावर तेज आले होते, तिच्या प्रेगन्सीच्या काळात ती परत गेली होती.

"आणि आई झालीस तेव्हा? तेव्हा काय वाटले?"  मी स्मित करत पुढचा प्रश्न केला.


" तो आनंद तर अवर्णनीय होता."  तिचा चेहरा पुन्हा आनंदाने फुलला.

"एवढ्या वेदना सहन करून त्या जीवाला जन्म दिला, तिला पाहिल्याबरोबर सगळ्या वेदनांचा विसर पडला. जणू काही माझी इवलुशी प्रतिकृतीच माझ्यासमोर होती."
सांगताना तिच्या डोळ्यातून एक टिपूस गालावर आला, आनंदाचा!


"आणि त्यानंतर?"  माझा प्रश्न.


"त्यानंतर बाळाचे करण्यात दिवस कसे सरले, कळलेच नाही. पुढली दोन तीन वर्ष तिचे खाणे -पिणे, शी -सू ह्यातच गेले. ती शाळेत जायला लागली तेव्हाही जीवाला नुसता घोर लागून राहायचा. शाळेत रडेल का? टिफिन खाईल का? किती प्रश्न! ती घरी येईपर्यंत कशात मन लागायचं नाही."  ती.

"पुढे?"

"ती लगेच शाळेत रूळली. तिच्या काळजीतून बाहेर पडायला मला मात्र वेळ लागला. काही दिवसांनी गरज म्हणून नोकरीला लागले, पण अर्धा जीव घरातच. आताही तेच घडतेय. ती जेवली असेल का, अभ्यास करतेय ना, टीव्हीमध्येच गुंतली असेल का.. एक ना बारा! डोक्यात नुसता प्रश्नांचा भडीमार!" तिच्या चेहऱ्यावर परत खिन्नत्ता येऊ लागली होती.

मी हसले, हलकेच.

"ह्याचा अर्थ कळतोय तुला? सुलभाताई तू अजूनही तिथेच अडकली आहेस, तुझ्या पहिल्या आईपणात. बाळाच्या पहिल्या रडण्याचा जेवढा त्रास तुला झाला असेल, तेवढाच आत्ताही होतोय. पण तू हे विसरतेस की तुझे बाळ आता बाळ नाही राहिलेय. ती मोठी होतेय. तुलाही तिच्यासोबत मोठे व्हावे लागेल ना?"

मी काय बोलले हे तिला कळले नाही हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. मग मीच पुढे बोलले.

"एक आई म्हणून तूला वाटणारी काळजी रास्त आहे अगं. पण आईपणाच्या साच्यातून जरा बाहेर पडून बघ मग तूला पटेल."

"म्हणजे? " ती.

" म्हणजे, तू बाळाला जन्म दिले, सुरुवातीच्या काळात तिचे शी, सू, जेवण.. सगळे बघितलेस. पण ती जशीजशी मोठी होतेय, तिच्या गरजा बदलायला लागल्या. ती आपली कामे आपण करायला लागली. जेव्हा जन्माला आली, तेव्हाही भूक लागली तर रडून सांगितलेच की तिने. आत्ताही भूक लागली की कधी स्वतः किंवा कधी आजीकडे जेवण मागते. तेव्हाही ती उपाशी राहत नव्हती नी आत्ताही राहत नाही.

सुलभा, अगं बाळ एकदाच जन्माला येतो, पण आई एकदाच जन्मत नसते. बाळाच्या वाढीच्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये तिला दरवेळी वेगळा वेगळा जन्म घ्यावा लागतो. कधी एक प्रेमळ आई, कधी सोबत खेळणारी संवगडी, कधी तिची अखंड बडबड ऐकणारा कान तर कधी विश्वासाने पाठीवरचा हात! अनेक भूमिकेतून आपल्याला सामोरे जायचे असते.

ती सध्या ह्या वेळी ज्या फेजमधून जातेय ना, त्या सिच्युएशन मध्ये तिला आईपेक्षा एक मैत्रीण हवी आहे, एक मैत्रीण म्हणून तिच्याशी डील कर आणि मग बघ तुझ्या मनातील अपराधीपणाचे ओझे आपोआप कमी होते की नाही ते. आई म्हणून काळजी असतेच आपल्या मनात पण मुलांना त्याचे दडपण नको ना यायला.

कळतेय ना मला काय सांगायचे आहे ते?"

मी शेवटचा प्रश्न केला नी तिने हसून मान हलवली.

तिच्या मनावरचा ताण कमी झाल्यासारखा वाटत होता, कारण चेहऱ्यावर प्रसन्नता पसरली होती.

"थँक यू! मॅडम." म्हणून ती निघून गेली. मीही इतर पेशंट मध्ये व्यस्त झाले.


जवळपास मी ही केस विसरले होते, पण पुन्हा मला हे नव्याने आठवले. कारण दोन महिन्यानंतर ती आज पुन्हा क्लिनिकमध्ये हजर. ह्या वेळी सोबत तिची लेक.


आज मात्र तिचा नंबर आल्यावर ती आत आली.


"बोला काय म्हणताय?"  नेहमीप्रमाणे मी.

"आज मी नाही, हिला घेऊन आलेय. सांग गं मृणाल."  ती.

"डॉक्टर, मला ना पिंपल आलाय. बघा ना किती मोठ्ठा आहे!"
आपल्या नाकावरच्या पिटुकल्या दाण्याला दाखवत ती म्हणाली.


"बघू."  म्हणून मी तिला चेक करायला घेतले.

"तुला पाळी येते का गं?"   तिचे पिंपल बघता बघता मी सहज विचारले.


"हो, दोन महिन्यापासून येतेय. मला वाटते डॉक्टर पिंपल्सदेखील तेव्हापासूनच येत आहेत."  मृणाल.


"तुला माहितीय  का गं, पाळी म्हणजे काय असते ते?" औषध तयार करता करता मी मुद्दामच विचारले.


"सुरुवातीला नव्हते माहिती.  जाम घाबरले होते मी. पण मम्माने सगळे व्यवस्थित सांगितले आणि मग कळले मला." ती खुलून बोलायला लागली.


"अरे वा! हुशार आहे गं तुझी मम्मा!"  मी.


" हो, आहेच मुळी. यू नो डॉक्टर? माय मम्मा इज बेस्ट मम्मा अँड माय बेस्ट फ्रेंड टू!" बोलता बोलता मृणाल बोलून गेली.

मी चमकून सुलभाकडे पाहिले. तिच्या ओठांवर हसू होते.
तिच्यातील आईपणाने मैत्रिणीची जागा घेतली होती.


औषध घेऊन दोघी बाहेर पडल्या. त्यांच्यातील ते नाते बघून माझेही ओठ आपसूकच रुंदावले..!



              ******समाप्त ******


ह्या दोन वर्षांच्या लॉकडाउनच्या काळात दहा अकरा वर्षांच्या मुलींना पाळी यायला लागल्याचे मी अनुभवलेय. पूर्वीही यायची, पण या काळात जरा जास्त केसेस माझ्या बघण्यात आल्या. मुलीला इतक्यात पाळी का आली म्हणून रडणाऱ्या तसेच मुलीने मला सांगितले नाही म्हणून रडणाऱ्या अशा दोन्ही कॅटेगरीमधल्या आया माझ्याकडे आल्या. वरची कथा ही सुद्धा माझ्याकडे येऊन रडणाऱ्या एका आईचीच!

बाईचा जन्म म्हटले की मग ओघाने तिची पाळी आलीच. एकदा का स्त्रीला पाळी आली की मग पुढे तिचे शरीर आई बनायला तयार. आणि आई झाली की आयुष्यभर आईपणात स्वतःला सिद्ध करत राहायचं. मुलांची लंगोट बदलण्यापासून त्यांच्या खाणे -पिणे, इतर गोष्टी यातच गुंतून जाते. लहान असतांना सतत आईच्या मागेमागे करणारे मूल थोडे मोठे झाले की इतर गोष्टीत मनं रमवायला लागते. वाढत्या वयात मुलांना सततची मागे लागणारी आई, काळजी करणारी आई नको असते. मूल दुरावले की ती बिचारी आई हिरमुसते, आपले काय चुकले यात पुन्हा स्वतःला गुरफूटवते.

हे सगळे बदलले तर किती बरे होईल ना? मुलांच्या वाढत्या वयाबरोबर पालकांनी आपल्या भूमिका बदलायला हव्यात. पालक म्हणून नेहमी आपणच योग्य असतो, हे सोडून द्यायला हवे. कधी मुलांचे मित्र मैत्रीण बनायला हवे. कधी त्यांच्याशी खेळून स्वतः मुद्दाम हरून त्यांना जिंकण्याचा आनंद घेऊ द्यावा तर कधी खरंखुरं जिंकून त्यांना हरण्याची चव देखील चाखू द्यावी.

तुम्हाला काय वाटते? आपल्या वयात येणाऱ्या मुलांशी कसे वागावे याबद्दल तुम्हाला काही सुचवायचे असल्यास नक्की सांगा. सोबत हा लेख कसा वाटला तेही कळवा.
कमेंट करा, लाईक करा सोबतच फेसबुक पेजवर देखील लाईक आणि कमेंट करून लेख कसा वाटला ते कळवा.
माझे इतर लेख वाचण्यासाठी मला फॉलो करा.

*******


साहित्यचोरी हा गुन्हा आहे.सदर लेख लेखिकेच्या मर्जीशिवाय कुठेही शेअर करू नये. शेअर करायचा झाल्यास फेसबुक पेजची लिंक शेअर करावी.
धन्यवाद!