Login

कथा -जाणीव भाग १

Story About Backward Boy
कथा -जाणीव भाग 1


हाये का? जाते पाटे टाकवायचे हो माय! भागाने हाळी दिली. गल्ली बोळातून चालत असताना तिच्या अनवाणी पायांना भेगा पडल्या होत्या. त्या भेगां ची सवय आता भागी ला झाली होती. वडारांची च लेक ती! सतत दगडाच्या सानिध्यात राहाणाऱ्यां चं मन, शरीर ,आत्मा सारं काही दगडच असतं.....

वडारांच्या गावकुसाबाहेर च्या वस्तीवर राहणारी भागा, आपला दहा वर्षाचा मुलगा 'खंड्या' म्हणजे खंडू व सुदाम्या नवऱ्यासोबत पालावर राहत होती." काय आणलं व माय खायले?" 'भूक लागली'. 'खंड्या, थांब जरा! सबुरीनं घे'. 'ते आत्ताच आली'. असं तिचा नवरा म्हणला.
तो काळ दुष्काळाचा होता.
संपूर्ण भारतात त्याकाळी दुष्काळ पडला होता. बोटावर मोजण्याइतके जमीनदार तालुक्याच्या ठिकाणी होते. त्यांची सुद्धा जमीन सुखून तडकली होती. पिके वाळली. गुरे ढोरे हडकली होती. संपूर्ण महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ पडला होता. सर्व जनता या दुष्काळाने हतबल झालेली होती.

सुदाम्याने तिच्यासाठी पाणी आणायला खंड्याला धाडले. खड्यानं बुड लागलेल्या माठातलं वरचं पाणी आईसाठी आणलं.' घेवं माय पानी' भागीने पाण्याचा घोट घेतला. खायला दोन घास कुठून आणणार? तरी तिने ओच्यातल्या पिशवीतून दोन आणे काढले.' जाय, त्या दुकानातून दाय घेऊन ये!'

तिनं डब्यातल्या उरलेल्या पिठाच्या भाकऱ्या थापल्या. तिघांची सांज भागली. पण पुढच्या दिवसाचं काय?
भागीचा नवरा एका पायाने अधू होता. दगड फोडण्याच्या कामावर छन्नी ने दगड फोडता फोडता त्याच्या पायावर मोठा दगड पडला. त्याचा पाय कायमचा निकामी झाला. अशी दुखापत झाल्यामुळे वेदनेने तडफडत तो पालावर राहत होता.

वडार जमात, छावणीवर दगड फोडायच्या कामावर जात. आता खंडूलाही भागीनं त्या कामावर पाठवायचं ठरवलं. दहा वर्षाचं पोर ते! परंतु पोटातल्या निरागस भुकेला कुठलं आलं वयाचं भान... त्याला ते काम स्वीकारावं लागलं.

त्याकाळी सरकारचे हे सूत्र होते की, लोकांची सरकारी मदतीवर अवलंबून राहण्याची वृत्ती निर्माण होऊ नये. त्यांनी अन्नासाठी खंदक खणणे, दगड फोडणे अशी ढोर मेहनतीची कामे करावी अशी अपेक्षा होती.


छावण्यांमध्ये फक्त सार्वजनिक कामाच्या प्रकल्पावर ढोर मेहनत करू शकतील, अशा धट्या कट्ट्या माणसांनाच घेत. त्यामुळे पालावर राहणाऱ्या, इतर कमकुवत बायका पोरांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला.
अन्नांनं दशेने सर्व लोकांची उपासमार होऊ लागली. त्यांचे हाड, बरगड्या बाहेर आलेल्या, कातडी अंगाला चिकटून लोंबकळलेली, शरीराच्या सापळ्यात सगळ्या संवेदना नष्ट झाल्या होत्या. अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या गाव खेड्यातल्या निम्नस्तरातील सर्व लोकांची झाली होती.


भागीच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलं.... पाहूया पुढचा भाग 2


छाया राऊत अमरावती