जाणीव -चुकलेल्या निर्णयाची भाग -2

Gosht Punha Ektra Yenyachi


पण बाहेर पडताच राजन तिच्यासमोर उभा होता. त्याला पाहून न पाहिल्यासारखे करत मिथिला तिथून पुढे आली.


"मिथिला, थांब. प्लीज थोड ऐकून घे माझं." राजन तिच्या मागे येऊ लागला. तशी ती भराभरा पुढे जाऊ लागली.


"मिथ्या प्लीज यार..ऐक ना! अगं किती आणि कुठे कुठे शोधलं मी तुला. हजार वेळा तुझ्या माहेरच्या घरी जाऊन आलो. तिथल्या शेजारच्या काकू म्हणाल्या, 'मिथिला आणि तिची आई दुसरीकडे कुठेतरी राहायला गेल्या आहेत.' 

दर आठवड्याला जायचो मी तिथे आणि दर वेळी त्या काकू हेच उत्तर द्यायच्या. मी विचारुन थकलो नाही आणि त्या उत्तर देऊन. एक दिवस त्याच म्हणाल्या, 'आता का मागे लागला आहेस तिच्या? इतका त्रास देऊन पोट भरलं नाही का?'

मी काही न बोलता तिथून परत आलो आणि पुन्हा तिकडे फिरकलो नाही. चुकलो मी मिथिला. खरंच चुकलो." राजन खाली बसत म्हणाला.


"लोकं पाहत आहेत राजन. काय करतोस हे?" मिथिला रागाने म्हणाली.


"माफी मागतो आहे तुझी. कुणी पाहायला नको असेल तर आपण गाडीत बसून बोलू." राजनने तिला ओढत गाडी जवळ आणले.


"माफी तू मागायला हवीच. एक नाही तर हजार वेळा. कारण तू..ऋषी आणि माझ्यावर संशय घेतलास आणि म्हणून आपण वेगळे झालो. पण आता तो तुझ्यासोबत कसा?" मिथिला आवाज चढवत म्हणाली.


"आपण वेगळे झालो आणि काही दिवसांनी माझा राग थोडा शांत झाल्यानंतर आईने ऋषीला घरी बोलावून घेतले. 'आता खरं सांग ऋषी. राजन म्हणतो तसे तुम्हा दोघांत काहीच नव्हते!'

तसा ऋषी आईचा हात हातात घेऊन म्हणाला, 'आई, राजन आणि माझी मैत्री लहानपणापासूनची. त्याचा हक्काचा जोडीदार त्याच्या आयुष्यात आला आणि मी मिथिलापुढे तोच मैत्रीचा हात पुढे केला. एका स्त्री आणि पुरुषात निखळ मैत्रीचं नातं कधीच नसतं हे समाजाने ठरवून टाकले आहे. त्याच विचाराने राजनने आमच्यावर संशय घेतला. मी तुमची शपथ घेऊन सांगतो आई, माझ्यात आणि मिथिलामध्ये केवळ मैत्रीचं नातं होतं.' इतकं बोलून ऋषी शांत बसला. 

का कुणास ठाऊक? पण मला त्याच्या डोळ्यात खरेपणा दिसला. मी पुढे होऊन त्याला गच्च मिठी मारली आणि तोही त्या मिठीत सामावला. जणू माझ्यापेक्षा त्यालाच भावनिक आधाराची जास्त गरज होती. मग आई कितीतरी वेळ आम्हा दोघांना जवळ घेऊन रडत राहिली. त्या दिवसा नंतर आई आणि ऋषी एकमेकांच्या आणखी जवळ आले. 

ऋषी लहानपणापासून आईविना वाढला. माझ्या आईने त्याला ते प्रेम दिलं. पण आता ते प्रेम आणखी वाढलं आहे. पुढे सहा महिन्यांनी आईने त्याच्यासाठी एक छानशी मुलगी पहिली आणि त्यांचं लग्न झालं. आपल्या घरापासून अगदी लांबवर घर घेतलं आहे त्याने. मला म्हणतो, 'तुझ्या संशयाचं भूत माझ्या घरात नको.'

आई मला रोज समजावते गं, मिथिलाला पुन्हा घरी घेऊन ये म्हणून." राजनने आपले डोळे पुसले.


"मी तुला खूप शोधल मिथिला. तुझ्या नातेवाईकांच्या घरी जाऊन आलो. पण कोणीच तुझा पत्ता सांगितला नाही." राजन मिथिलाच्या डोळ्यात पाहत म्हणाला.


"राजन, नातं जोडणं सोप आहे. पण ते निभावणं खूप अवघड आहे. तू आपल्या बायकोवर संशय घेऊन वेगळं होण्याचा निर्णय घेतलास. मला काय वाटलं असेल याचा जराही विचार तुझ्या मनात आला नाही काय? 'वेगळं' होणं एका स्त्रीसाठी खूप वेदनादायी गोष्ट आहे आणि पुरुषासाठी एक मार्ग! बरोबर ना? आणि सारे क्षण हातातून निसटून गेल्यानंतर चूक कळून काय उपयोग? राजन, वेळ निघून गेली ती. पुन्हा एकत्र येण्याची माझी इच्छा नाही." आता मिथिलाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. "तुझं माझ्यावर अजूनही प्रेम आहे राजन?" 

"हो. मी रागाने, संशयाने आंधळा झालो होतो. शांत बसून गोष्टी सॉर्ट आऊट करायच्या सोडून मी रागाच्या भरात नसता निर्णय घेऊन बसलो. पण तू का वेगळं झालीस मिथिला? मला एकदा मिठीत घेऊन मी फक्त तुझीच आहे, असे का म्हणाली नाहीस? "


"तू माझ्यावर संशय घेतलास तिथेच साऱ्या गोष्टी संपल्या. माझ्यावर नाही, निदान ऋषीवर तरी तुझा विश्वास हवा होता राजन."


क्रमशः

🎭 Series Post

View all