जन्म बाईचा

व्यथा बाईच्या पण जरा वेगळ्या


जन्म बाईचा..

"मेला हा जन्मच बाईचा असा.. कितीही करा कोणाला कौतुकच नाही.. मी म्हणते बाकी कोणी नाही नवर्‍याने तरी करावे? पण तो कौतुक करणार? अजिबात नाही. उलट बायकोला टोमणे मारण्यात त्याला कसला आनंद होतो त्यालाच माहित. आता तुम्ही म्हणाल काय ही असंबद्ध बोलते आहे.. असंबद्ध नाही हो. म्हणतात ना झाकली मूठ सव्वा लाखाची. तशातली गत माझी.. आता अगदीच रहावत नाही म्हणून बोलते हो.. नाहीतर मला ना अजिबात अवांतर बोलायला आवडत नाही.. आता हा नवरा बघा हं.. एवढे वय झालंय. माझे नाही त्याचे.. म्हणजे आता स्वतःच्या डोक्यावरचे छप्पर उडालेले दिसत नाही पण माझे उशीवर गळालेले केस दिसतात.. स्वतःचे सुटलेले पोट दिसत नाही पण माझे वर आलेले गाल दिसतात. आता दिसतात असं आपलं म्हणतात म्हणून म्हणायचं.. नाहीतरी त्याला चष्म्याशिवाय दिसते कुठे? तसे बघायला गेले तर चष्म्याशिवायच का, चष्मा लावून सुद्धा समोरच्या गोष्टी दिसत नाही. पण मी काही बोलते का? मेलं माझं नशीबच फुटके, एवढे सगळे करूनही हा ऐकवतोच.. काय ऐकवतो म्हणताय? तसेही ना मला जास्त बोलायची सवय नाही, पण आता तुम्ही एवढे विचारता म्हणून सांगते हो.. आता रोज सकाळी वाढलेल्या वयाची जाणीव करून द्यायची असते का? पण नाही.. हा न चुकता म्हणणार, अग तुझ्या डोक्यात चांदी चमकते आहे का? आता याच्या तोंडात सोन्याचे दात बसवले आहेत , मी बापडी कधी तरी म्हणते का तुझ्या दातांच्या ऐवजी माझे कानातले झाले असते. मनच मोठे हो माझे. असो.. तर आजही असेच झाले.. म्हणजे बघा हं.. आता तुमचेही होत असेलच ना. वाटतं आपल्याला पण काहीतरी विसरावेसे.. किती म्हणून गोष्टी या डोक्यात ठेवायच्या? एकतर त्या सिरियलमध्ये ती खलनायिका नायिकेला जाळ्यात अडकवणार होती. मी काही या सिरियल्स जास्त नाही बघत. पण उगाच आपले.. तर मी होते त्या टेन्शन मध्ये. त्यात त्याने मला पोहे करायला सांगितले मी आपला केला शिरा.. ते बघूनच त्याचे तोंड झाले वाकडे. आता मी म्हणते काय हरकत आहे एक दिवस खायला? पण नाही. एक घास खाल्ला आणि तोंड फुगवून बसला.. तुम्हाला म्हणून सांगते स्वतःची मुले परवडतात पण ही सासूची? रामा शिवा गोविंदा.. असे म्हणतेय खरी पण माझी मुलेही तशीच.. बापाला सामील.. दोघेही नाही तर नाही खायला तयार. म्हणे तू खाऊन पहा. आता झाले होते काय.. हसू नका हं. होते असे कधीतरी घाईगडबडीत.. डोक्यात होते पोहे, केला शिरा. त्यात साखरेऐवजी टाकले मीठ.. तर म्हणे वय झाले तुझे.. स्वयंपाकाला बाई ठेव वाटल्यास.. पण हे असे काहीतरी खायला नको घालूस.. असे का बोलायचे?
डोळ्यातून पाणी आले हो माझ्या. ते पाहून हे तीन पाषाणहृदयी खी खी हसले. हसण्याचे वाईट नाही वाटले हो पण ते वय झाले? लागले हो माझ्या मनाला.. तुम्हाला म्हणून सांगते इतके दिवस तुमची मुलगी ना तुमची धाकटी बहीण वाटते असे म्हणायचे लोक.. मुलासोबत चालायला लागले की दादासोबत चाललीस का? असे विचारायचे. हसताय काय? खरेच.. आणि हेच खिदळत आहेत. अस्सा राग आला म्हणून सांगते. तशीच चिडून आत गेले. आरशासमोर उभी राहिले. आता एक बट दिसत होती पांढरी.. थोडा तजेला पण गेला होता चेहर्‍याचा.. पण म्हणून वय झाले आहे? मनाशी निश्चय केला. पर्स घेतली, न विसरता क्रेडिट कार्ड घेतले.. तशीच तरातरा पार्लरमध्ये गेले.. तुम्हाला सांगते, मला ना हे प्रकार अजिबात आवडत नाहीत. काही काही बायका पार्लरमध्ये जाऊन काय काय करतात. मी नाही हो असे काही करत.. महिन्याचे महिन्याला फेशियल, मेनिक्युर, पेडिक्युर केले की चालते मला.. जाऊन बसले खुर्चीवर. तर आज नवीन मुलगी.. विचारते कशी, काकू काय करायचे आहे? मला ना असे वाटते या मुलींना प्रशिक्षणाची गरज आहे. गिर्‍हाईकांना काकू म्हणतात? मॅम वगैरे, किती बरं वाटतं ऐकायला. जाऊ दे.. पार्लरमध्ये सगळे करून घेतले. कार्ड थोडे रिकामे झाले. असू देत. मला कुठे बिल भरायचे होते? कार्ड नवऱ्याचे होते.. तशी मी फार हुशार आहे. बाहेरच माझी कुजकी शेजारीण भेटली.. बघून म्हणते कशी, आजकाल ना वयाचा विचार न करता काहिही करतात या बायका.. केस काय रंगवतील, नखे काय रंगवतील. मी पण हो ला हो केले. आणि वरती राहणाऱ्या एका बाईला मनसोक्त नावे ठेवून घेतली. निघताना म्हणाली हो ती ही.. तुझा चेहरा बघ कसा फुललेला, टवटवीत असतो नाहीतर ती. मारकी म्हैस नुसती. तिने असे प्रेमाने म्हटल्यावर मी मनात तिला कुजकी म्हटल्याबद्दल तिची माफी मागितली. मग तिनेच माझे दोनचार चांगले फोटो काढून दिले. आता ते माझ्या स्वभावाकडे बघून की मी तिला दिलेल्या कॅडबरीला जागून तिलाच माहीत. तुम्हाला तर कळलेच असेल माझे मन किती मोठे आहे ते. मी नाही हो असा कुत्सित विचार करत. असो.. तर हे फ्रेश रिज्युविनेट झालेले फोटो मी लगेच स्टेटसला, फेसबुकवर टाकले.. म्हणतात ना आनंद लोकांना वाटल्याने वाढतो. मला नाही हो स्वतःचे कौतुक करून घ्यायची आवड. पण तेवढीच आनंदाची देवाणघेवाण.. आता तुम्ही खूप जवळचे वाटता म्हणून फक्त सांगते हो. कोणाला सांगू नका. फेसबुकवर मुलीच्या मैत्रिणीने कमेंट केली.. काकू छान.. तर लगेच बाकीच्यांनी सुद्धा तेच कॉपी पेस्ट करावे? लहान मुलांचे सोडा पण मोठ्यांनीही काकू म्हणून जीव नकोसा केला. पोस्ट अगदी डिलीट करावीशी वाटली.. पण.. मोठे मन.. सगळ्यांनाच थॅंक यू म्हणत बसले.
ऑफिसमधून येताना नवरा कधी नव्हे ते समोसे आणि रसमलाई घेऊन आला.. मला पाहून चकीतच झाला. मुले घरी नाहीत हे पाहून रोमँटिक झाला. पुढचे सगळे सेन्सॉर बरं का.. पण तो काय बोलला ते सांगते हो तुम्हाला..
तो म्हणाला, ए मेरी जोहरांजबीं तुझे मालूम नहीं, तू अभी तक हैं हसीं और मैं जवां..
मग मी पण म्हटले.. टेढा है पर मेरा है.. आपण मराठीत म्हणतो ना.. पदरी पडले आणि पवित्र झाले.. तसेच हो.. आपण बायका ना आपले तरूणपण विसरून या वय झालेल्या नवर्‍यांना पदरात घेतो.. शेवटी आपले मनच मोठे.. अजून काय.."


हे स्वगत गंमत म्हणून लिहिले आहे.. काल्पनिक आहे. तुम्हाला जर आवडले तर नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई