जना

कथा जनाची आणि वारीची

जना.. " विठ्ठल विठ्ठल.. विठ्ठल विठ्ठल.."

" झाली का सुरुवात टाळ कुटायला?" आजोबांनी वैतागून विचारले..

" आजोबा टाळ कुटायला म्हणजे?" छोट्या जनाने विचारले..

" तेच जे तुझी आजी करते आहे.. चार वाजले कि झाली सुरुवात.."

" चहाच हवा आहे ना? हे घ्या आणि आता अर्धा तास तरी माझे मला जगू द्या.." आजी आजोबांसमोर चहाचा कप ठेवत म्हणाली..

"आजी मी पण येऊ तुझ्यासोबत?" छोट्या जनाने प्रेमाने विचारले..

" कुठे ग बाळा?"

" टाळ कुटायला.." हे ऐकताच आजीने रागाने आजोबांकडे पाहिले.. आजोबांनी लगेच मान खाली घातली..

" त्याला टाळ कुटणे नाही म्हणत ग.. त्याला भजन म्हणतात.. तेवढाच संसारातून परमार्थ साधता येतो.. जाऊ दे.. कोणाला कळणार.. चल तू.."

      जान्हवी.. आईबाबाविना वाढलेले पोर.. जान्हवीला तिच्या आजीआजोबांसोबत ठेवून तिचे आईबाबा एका समारंभासाठी बाहेर चालले होते आणि झालेल्या अपघातात दोघेही जागच्या जागी गेले. तेव्हापासून आजोबांनी देवाशी उभा दावा मांडला होता.. पण आजीसाठी तोच आसरा होता.. दोघांसाठी जान्हवी हाच एकमेव आधार उरला होता.. आजीचा लाडका देव विठ्ठल. त्याची लाडकी जनाबाई.. म्हणून प्रेमाने आजी जान्हवीला जना अशीच हाक मारायची.. आजीसोबत राहून जनासुद्धा विठ्ठलाची भक्ती करायला लागली होती.. ती जसजशी मोठी व्हायला लागली तसतशी आजीची सखी व्हायला लागली.. मनातले अनेक सल आजी तिच्याशी बोलू लागली. त्यातलाच एक होता. "वारीचा".. आजी जनाला सांगू लागली.. 

" काय सांगू तुला.. आमचे माळकरी घराणे.. दरवर्षी कोणी ना कोणी वारीला जाणार म्हणजे जाणारच.. त्या नकळत्या वयात जी काही वारी केली असेल ना तर तेवढीच.. लग्न झाल्यापासून काय ती वारी पाहिली नाही बघ जना.." आजीने डोळे टिपले.

" मग आता जा ना.." जना म्हणाली.

" मग तुझ्या आजोबांकडे कोण बघेल? त्यांना तर सगळे हातात लागते.." 

" आजी मी पण मोठी झाले आहे आता.. आणि तसाही फक्त पंधरा दिवसांचाच तर प्रश्न आहे. तू ये जाऊन.. आजोबांना मी मनवते.."

खरेच जनाने आजोबांना काय सांगितले ते तिलाच माहित.. पण धुसफुसत का होईना त्यांनी आजीला वारीला जाण्याची परवानगी दिली.. आजीही प्रेमाने चालत वारीला गेली.. पंधरा दिवसांनी ती आली तेच चेहर्‍यावर समाधान घेऊन.. वारीच्या गोष्टी सांगताना तिचे तोंड थकत नव्हते..

" आजी वारी एवढी मस्त असते का ग?"

" हो ग पोरी.. जगण्याच्या संकटातून तरण्याचे सामर्थ्य मिळते बघ. तिथे ना कोणी लहान ना कोणी मोठा.. प्रत्येकाला विवंचना असतातच.. पण वारीला आल्यावर फक्त एकच ध्यास पांडुरंगाचा.. तोच पिता.. आणि तीच माऊली.." आजीचे ते बोल ऐकून जनालाही वाटले आपणही एकदातरी वारी करावी.. पण मग कॉलेज लाईफ, लग्न संसार या सगळ्यात वारी मागेच पडली.. आजोबा गेल्यावर आजीचाच माहेरचा आधार होता जनाला.. पण आजीही गेल्यानंतर जनाला खूप एकटे वाटायला लागले.. त्यातच टीव्हीवर वारीची दृश्ये दाखवायला लागले.. तिच्या मनानेही ओढ घेतली.. तिने नवर्‍याला मनातले सांगितले.. सुदैवाने तो ही समजूतदार होता.. तो हि हिच्यासोबत वारीला जायला तयार झाला.. मुलांना सासूसासर्यांकडे सोडून जना निघाली वारीला.. चालताना तिचा एकटेपणा, पोरकेपणा गळून पडत होता.. जमलेल्या सगळ्यांमध्ये तिला तिचे आजी आजोबा दिसत होते.. कळत नकळत तिच्या डोळ्यातून पाणी वहात होते.. यांची दिंडी पंढरपूरला पोचली.. विठ्ठलाचे दर्शन झाल्याशिवाय घरी जायचे नाही हे दोघांनीही ठरवलेच होते.. त्यामुळे दोघेही दर्शनाला रांगेत उभे राहिले.. गाभार्‍यात त्या विठ्ठलाला बघून जनाला भरून आले.. ती मनातल्यामनात त्याला विचारत होती का माझ्या जवळच्या सगळ्यांनाच माझ्यापासून हिरावून घेतलेस? आधी आईबाबा आणि मग आजी आजोबा.. कोणाचाच मायेचा हात ठेवला नाहीस रे माझ्या डोक्यावर.. एवढ्या गर्दीतही तिचा त्याच्याशी मूकसंवाद सुरू होता. दोघेही नवराबायको जोडीने विठ्ठलाच्या पायाशी वाकले.. तोच तिच्या नवर्‍याच्या अंगावर तिकडच्या गुरवाने देवाचे वस्त्र ठेवले..

" आशीर्वाद आहे देवाचा.." आश्चर्यचकित दोघेही तसेच रुक्मिणीच्या दर्शनाला गेले.. जनाच्या नवर्‍याच्या अंगावरचे वस्त्र बघून तिकडच्या पुजार्‍याने देवीची साडी जनाच्या ओटीत टाकली.. ती साडी अगदी तिच्या आजीच्या साडीसारखी होती. जनाने वर पाहिले.. रुक्मिणी जणू तिला सांगत होती..

" वेडे आम्ही असताना कशाला रडतेस? हेच तुझे हक्काचे माहेर समज.. आणि आम्ही मायबाप.. डोळे पुस आणि हस बघू आता.."

जनाने ती साडी अंगावर ओढून घेतली आणि आजीचा स्पर्श आठवत ती हसतमुखाने तिथून निघाली.. आपलं हरवलेले माहेर सोबत घेऊन..


कथा कशी वाटली ते सांगायला विसरू नका..

सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई