जाळे

स्त्रीला उद्ध्वस्त करणारे जाळे


कथेचे नाव : जाळे..
विषय : काळ आला होता पण वेळ नाही..
स्पर्धा : राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा..


" विनय, माझ्या ऑफिसने जे व्हि. आर. एस. घेऊ इच्छितात अशांची लिस्ट मागवली आहे."
"बरे आहे बाबा तुमच्या ऑफिसमध्ये. आमच्या इथे तर जास्तीत जास्त कसे राबवून घेता येते ते बघतात."
" ऐक ना.. मी पण माझे नाव द्यायचा विचार करते आहे.." सुमेधा घुटमळत म्हणाली.
" काय?" विनय जवळ जवळ किंचाळलाच..
"ओरडतोस केवढ्यांदा. घाबरले ना मी. मी काय तुला मी परत आई होणार आहे असे नाही बोलले.."
" सुमेधा दोन्ही बातम्या माझ्यासाठी तेवढ्याच धक्कादायक आहेत. पण तू हा असा निर्णय का घेते आहेस अचानक? आत्ताशी चाळीशी चालू आहे तुझी."
" म्हणून तर. ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या मला जॉब मिळाला. तेव्हापासून नुसती कामंच करते आहे. घरातले करा, बाहेरचे करा. माझे आयुष्य असेच चालले आहे. त्यात काहीही थ्रील नाही. प्रिशाही आता मोठी झाली आहे. तिचे स्वतंत्र आयुष्य सुरू झाले आहे. मग मी ही गधा मेहनत अजून किती वर्ष करू? तसेही तुला आता भरपूर पगार आहे. माझे सेव्हिंग आहे. मला आता स्वतःसाठी जगावेसे वाटते आहे.."
" करा जे करायचे आहे ते. मी काय बोलणार बिचारा. नवरा राबतोय , घ्या राबवून.. " जाता जाता विनयने टोमणा मारलाच.. पण सुमेधा आता कोणतेही टोमणे ऐकायच्या पलिकडे गेली होती. तिने आणि तिच्या ग्रुपने ठरवून व्हीआरएस घेतली. दिवसभर कामात बुडालेल्या सुमेधाला सुरूवातीला खूप बरे वाटले. पण नंतर नंतर दुपारचा वेळ तिला खायला लागला. कपाट आवरणे, घर लावणे यात काही दिवस गेले. परत उद्या काय? हा प्रश्न तिला भेडसावू लागला. त्यात लेकीचे कॉलेजमध्ये सुरू असणारे वेगवेगळे कार्यक्रम आणि नवर्‍याचे वार्षिक काम एकाचवेळेस सुरू झाले. मग काय? दोघेही सकाळी लवकर जायचे पण येण्याची वेळ नक्की नसायची.. अशावेळेस धावून आला मोबाईल.. आधीपासूनच सुमेधाला नवीन नवीन रेसिपीज बनवायची आवड होती. एकदोनदा तिने ते फोटो पण फेसबुकवर टाकले होते. तिथे तिला छान प्रतिसाद मिळाला होता. तेच तिने करायचे ठरवले. तसेही त्यानिमित्ताने तिने अनेक ग्रुप जॉईन केले होते. आता ती रोज नवीन नवीन पदार्थ बनवून फेसबुकवर टाकायला लागली. तिचे हळूहळू नाव व्हायला लागले. अनेक फ्रेंड रिक्वेस्ट यायला लागल्या.
आपण केलेल्या गोष्टींचे लोकांकडून कौतुक होते आहे, आपल्याला एवढ्याजणांच्या फ्रेंड रिक्वेस्ट येत आहेत याची सुमेधाला मजा वाटू लागली. उत्साहाच्या भरात तिने त्या सगळ्या स्वीकारायला सुरुवात केली.. त्यातच सुरू झाला एक खेळ.. सुमेधाला एक अनोळखी रिक्वेस्ट आली. फोटोमध्ये तो पंचवीशीच्या आसपासचा तरूण वाटत होता. दिसायलाही हँडसम होता त्यामुळेच अनोळखी असूनही ती स्वीकारायचा तिला मोह झाला. सुमेधाने रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. लगेच मॅसेंजरवर मॅसेज आला..
" हाय.."
यावर रिप्लाय द्यायचा की नाही सुमेधा विचार करत होती. तोच परत मॅसेज आला.
" खूप सुंदर आहात तुम्ही."
खूप दिवसांनी एखादा तरूण सुमेधाला सुंदर दिसता असे बोलला होता. त्यामुळे तिच्या नकळतच तिने मॅसेज केला..
" थॅंक यू." तोच बेल वाजली म्हणून तिला जायला लागले. तिची लेक आली होती. आज पहिल्यांदाच तिला बघून सुमेधाला आनंद झाला नव्हता. आज प्रिशा खूप खुश होती. तिला आईला भरभरून काहीतरी सांगायचे होते. तिथे मोबाईल बराच वेळ ब्लिंक होत होता.. नंतर सुमेधाला फोनकडे बघायला वेळही मिळाला नाही.. सतत मॅसेज येत होते. नंतर बंद झाले.
दुसर्‍या दिवशी सगळे घराबाहेर पडल्या पडल्या सुमेधाने मोबाईल हातात घेतला. त्याचे खूप मॅसेज आले होते मेसेंजरवर. तिने पहिला मॅसेज केला..
" सुप्रभात.."
" मी नाही बोलणार?"
" का?"
" काल मी एवढे मॅसेज केले एकही रिप्लाय नाही."
" अच्छा.. पण हे तर तुम्ही बोलता आहात की?"
" अरे. चुकलोच.. " त्याने डोक्यावर हात मारण्याचा इमोजी पाठवला. तो बघून सुमेधाने हसण्याचा इमोजी पाठवला.
" तुम्ही छान हसता.."
" थॅंक यू.."
" तुमच्या डिशेस खूप छान असतात. एवढ्या लहान वयात हे सगळे? ग्रेट. "
" लहान? माझी मुलगी कॉलेजला आहे. ओह्ह तुमच्या फोटोवरून अजिबात वाटत नाही.." त्याने सुमेधाभोवती जाळे टाकायला सुरुवात केली होती. सुमेधा हळूहळू त्या जाळ्यात अडकत चालली होती.
दिवसभर हातात मोबाईल घेऊन सुमेधा त्याच्याशी चॅटिंग करत असायची. आजकाल तिने नवीन पदार्थ फेसबुकवर टाकणेही बंद केले होते. मैत्रिणींशी बोलणे, घरातले बोलणे सगळेच बंद झाले होते. तिचे बदललेले रूप विनय आणि प्रिशाला जाणवत होते. पण त्याचे कारण समजत नव्हते. कधी नव्हे ते तिच्या मोबाईलला पासवर्ड आला होता. भरतीनंतर जशी ओहोटी येते तशीच आधी मोबाईल बाबत खूप उत्साही असणारी सुमेधा आता मोबाईल बघून घाबरत होती. आधी दिवसभर मोबाईल हातात धरून बसणारी ती आता मोबाईलकडे बघतही नव्हती. मोबाईल वाजला की दचकत होती. विनय किंवा प्रिशा बाहेर जायला लागले की रडवेली होत होती.
" विनय, आज तुला जायलाच हवे का?"
"सुमेधा, माझी महत्वाची मिटिंग आहे. तुझे काही काम आहे का? मी मग थांबतो." विनयने असे विचारल्यावर सुमेधाकडे काही शब्दही नव्हते. तिने मनाशी काहीतरी निश्चय केल्यासारखे वाटले.
" जा तू. मी बघते काय करायचे ते." खूपच महत्वाचे काम होते म्हणून विनय पटकन निघाला. प्रिशा आधीच गेली होती. विनय जाताच सुमेधाने दरवाजा लावला. मोबाईल मध्ये एक मॅसेज टाईप केला. आतमध्ये जाऊन कीटकनाशक घेतले. ते ती तोंडाला लावणार इतक्यात प्रिशाने तिला ढकलले. ती बाटली खाली पडली. प्रिशाने लगेच विनयला बोलावून घेतले. अर्ध्या रस्त्यात पोहोचलेला तो पटकन वळला. तो घरी आला तेव्हा सुमेधा रडत होती आणि प्रिशा तिला कुशीत घेऊन थोपटत होती.
" काय झाले, कळेल का मला?" तो अस्वस्थ होत होता.
" सुमेधा? प्रिशा.."
" बाबा.." प्रिशाने बोलायला सुरुवात केली.
" थांब. माझी चूक मीच सांगते. विनय मी फेसबुकवर आल्यावर माझी अनेकजणांशी ऑनलाईन मैत्री झाली. त्यातल्याच एकाने मला पर्सनल मॅसेज पाठवायला सुरुवात केली. मी ही वहावत गेले. मला माझ्या आयुष्यात थ्रील हवे होते. ते मिळाल्यासारखे वाटले मला. तो खूप छान बोलायचा. नंतर त्याने चावट मॅसेज पाठवायला सुरुवात केली. मी वैतागल्यावर सॉरी म्हणत मला मस्का मारला. हे कधी ना वाचलेले जोक वाचून मी मनात खुश झाले होते. ते बहुतेक त्याला जाणवले. त्याने हळूहळू अजून अश्लील मॅसेज पाठवले. नंतर त्याने एकदा व्हिडिओ कॉल केला. मी उचलला नाहीतर त्याने मला इमोशनली ब्लॅकमेल केले. मी फोन उचलला तर समोर एक विवस्त्र व्यक्ती घाणेरडे हातवारे करत होता. मी फोन बंद केला तर त्याचे नकोनको ते मॅसेज आले. त्याचे म्हणणे होते की त्याने आता माझी क्लिप बनवली आहे. त्याने माझ्याकडे पैसे मागायला सुरुवात केली. आज शेवटचा दिवस होता पैसे द्यायचा. नाहीतर तो ती व्हायरल करणार होता. मला मी मेहनतीने कमावलेले पैसे कोणाच्याही हातात पडू द्यायचे नव्हते म्हणून मी जीव देत होते." सुमेधा परत रडायला लागली.
" तुला जीव देणे सोपे वाटले पण आमच्याशी बोलणे नाही?" प्रिशाने विचारले. सुमेधाने प्रिशाकडे पाहिले.
" मला लाज वाटली."
"हेच ओळखलेस तू आम्हाला." सुमेधाकडे बोलायला शब्द नव्हते.
" आता मी सांगते. त्या दिवशी मी आले तेव्हा तुझा चेहरा उतरला. मला ही गोष्ट खटकली. तू आत चहा करायला गेलीस तेव्हा तुला मेसेजेस येत होते. मी ते बघितले. का कुणास ठाऊक तो डीपी मला फेक वाटला. मी ते नाव लिहून घेतले. त्याची चौकशी मला करायची होतीच. कॉलेजचे फंक्शन सुरू होते त्यात ते पाठी राहिले. पण तुझे बदललेले वागणे बघून मी माझ्या एक्स्पर्ट मित्रांकडून त्या अकाउंटची माहिती काढली. तेच रिपोर्ट आणायला गेले होते मी आता. मध्येच आईचा तो मॅसेज वाचला आणि तशीच पळत आले घरी.." हे सर्व ऐकून विनय डोके धरून बसला होता.
" हे एवढे सगळे होत होते आणि तुम्हा दोघींनाही मला सांगावेसे वाटले नाही."
" बाबा.. सॉरी. मला जोपर्यंत हँडल करता येत होते तोपर्यंत मी करणार होते. आज बोलणारच होते मी."
" मी तो जो कोण आहे त्याला सोडणार नाही."
" बाबा बरोबर आहे तुमचे. आज आईच्या बाबतीत मी वेळेवर पोहोचले म्हणून तिचे काही बरेवाईट झाले नाही. ते आजी म्हणते तसे काळ आला होता पण वेळ नाही. त्या माणसाने असे किती जणींना फसवले असेल कुणास ठाऊक.."
" प्रिशा, तुझ्यात जो समजूतदारपणा आहे तो माझ्यात का नाही ग.. मी पण तेव्हाच तुम्हाला सांगितले असते तर ही वेळच आली नसती. पण आता आपण नक्की पोलीस तक्रार करू. वर्तमानपत्रात बातमी देऊ. म्हणजे परत ही वेळ कोणत्याच सुमेधावर येणार नाही.."

कथा कशी वाटली ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई