गैरसमज भाग ३

ही कथा आहे मृत्यूनंतरही..मुलांबद्दल असलेली असोशी दाखवणारी..थोडीशी विनोदी,थोडीशी अंतर्मुख करणारी..
गैरसमज
भाग ३

©® सौ.हेमा पाटील.

या कथेचे पहिले दोन भाग तुम्ही वाचले असतील तर ते भाग तुम्हांला नक्कीच या अंतिम भागापर्यंत खेचून आणणारच याची खात्री आहे.
तर या भागापर्यंत आपण पाहिले आहे की, आदुने आपल्या आईवडिलांसाठी नैवैद्याचे पान घरावर आणून ठेवले आहे व प्रार्थना करुन तो दूर जाऊन उभा राहिला आहे.
आता पुढे..

ती दोघे आदुने ठेवलेल्या नैवेद्याच्या दिशेने चालू लागली.मनात असंख्य आठवणी फेर घालत होत्या.त्या आठवणींच्या भाराची जाणीव होऊन कावळे ही हळूहळू पाय उचलत होते. ते दोघे नैवेद्यासाठी पोहोचले तेव्हा बरेचसे सावरले होते.
तिची कळी खुलावी म्हणून तो म्हणाला,
" हे बघ. घोशाळ्याची भजी केलेत सुनबाई ने"!
ठेवलेल्या नैवेद्याकडे तृप्त नजरेने ती पहात होती.
"अगं तुझी आवडती काजू कतली पण आहे बघ".
आईला काजू कतली आवडायची हे इतक्या वर्षांनी ही मुलाच्या लक्षात आहे हे पाहून तिला खूप बरे वाटले.

दूर उभा राहून लेक पहात होता.त्यांनी नैवेद्य उष्टावला हे पाहून त्याने नमस्कार करण्यासाठी हात जोडले.दोघेही तृप्त झाले...

"अहो मी काय म्हणतेय"?

"बोल.. तुझे ऐकण्याशिवाय आयुष्यात दुसरे काय केलेय मी"?

"आदुकडे दरवर्षी येतो आपण. यंदा मानवकडे पण जाऊयात ना"?

"अमेरिकेत? तुला माहीत आहे माझा मानववर राग आहे ते! तरीही विचारतेसच ना दरवर्षी "!

"अहो, तो ही आपलाच मुलगा आहे".

"तेव्हा आठवण नव्हती का त्याला आपल्या कर्तव्याची"?

"जरा राग दूर सारा ना.. माझ्यासाठी तरी" !

"त्याने केलेली चूक फार मोठी आहे हे तू विसरतेस".


"जाऊया ना एकदातरी..त्याला आदुसारखीच आपली आठवण येते का पाहूया ना"...

"बरं.. मलाच आता दरवर्षी तुला नाही म्हणायचा कंटाळा आला आहे.जाऊयात... पण या कावळ्यांना मनसोक्त खाऊदेत.त्यांना परत भूक लागली तर वाटेत अडचण नको.तसे पण चित्रगुप्ताकडे आपल्या दोन्ही मुलांचे पत्ते आहेत.त्यामुळे त्यांची परवानगी मागायची गरज लागणार नाही ".

कावळ्यांना आपल्याला अमेरिकेला जायचे आहे असे सांगितल्यावर ते का कू करु लागले. पण चित्रगुप्ताकडे नोंद आहे हे ऐकल्यावर निमूटपणे तयार झाले.पण त्यांनी शंका काढली.
आपण तिथे पोहोचेपर्यंत सप्तमीची तिथी संपणार नाही का"?
यावर तो म्हणाला,
"आपण चित्रगुप्ताकडे जाऊयात.मग पुढचे ठरवू".

या दोघांना पाठीवर बसवून कावळे चित्रगुप्ताकडे घेऊन आले.तेथे या दोघांनी सांगितले की, "आमच्या अमेरिकेत असलेल्या मुलाकडे आम्हांला जायचे आहे ".
चित्रगुप्ताने आपली चोपडी उघडली, आणि तपासून पाहिले.यांच्या अमेरिकेतील मुलाचे नाव आणि पत्ता तिथे लिहिलेला होता.
चित्रगुप्ताने एक फोन केला आणि कावळ्यांना सुचना देऊन या दोघांना पाठीवर घेऊन एअरपोर्टकडे जाण्यास सांगितले.

कावळ्यांची सप्तमी संपेल का ही शंका दूर झाली.कारण आता विमानाने ते लवकर पोचणार होते.

"अरे वा! आपण विमानाने जाणार आहे". असे ती म्हणाली.
आता प्रवासाचा फारसा त्रास होणार नाही असे तिला वाटले.
आपल्यासाठी खास विमानाने सोडण्याची चित्रगुप्ताने व्यवस्था केली म्हणजे आपण खूपच पवित्र आत्मा आहोत असे त्याला वाटले.
काॅलर ताठ करण्याचा त्याने प्रयत्न केला पण काॅलरच काय शर्टही नव्हता...तो विसरलाच होता की, या योनीत कपड्यांची आवश्यकता उरत नाही.
ते विमानापाशी पोहोचले आणि तेथील गर्दी पाहून त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यांच्यासारखेच खूप पवित्र आत्मे त्यांच्या मुलांकडे निघाले होते.त्या सर्वांसाठी चित्रगुप्ताने विमानाची सोय केली होती.अर्थातच विमानात ही कावळ्यांच्या पाठीवरच सगळ्यांनी बसणे बंधनकारक होते.

अमेरिकेत उतरल्यावर कावळे त्यांना घेऊन मानवच्या घराकडे निघाले तसे दोघांच्याही मनावर ताण आला.तिथे काय पहावे लागेल याची चिंता लागून राहिली होती.

ते घराजवळ पोहोचले आणि अगरबत्तीचा मंद सुवास दरवळला.घरात फक्त दोघेच दिसत होते.पण विनी किचनकट्ट्यापाशी काहीतरी करत होती.मानवही तिथेच होता.हे दोघे खिडकीतून पहात होते पण आत काय चाललंय याचा अंदाज येत नव्हता.

काही वेळाने मानवने ताट भरुन आणले. ते पाहून त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले. मानवने बाहेरच्या पोर्चमध्ये ताट ठेवले व नैवेद्य दाखवून तो इकडे तिकडे पाहू लागला. तो आपली वाट पहातोय हे लक्षात आल्यावर त्यांनी कावळ्यांना खुणावले व दोघे नैवेद्याच्या जवळ पोहोचले.दूर उभा असलेला मानव त्यांना पाहून भारावून गेला.लेकाकडे भरल्या डोळ्यांनी पाहत तिने नैवेद्याच्या पानाकडे पाहिले.अगदी सांग्रसंगीत जेवणाचे पान वाढले होते.त्यात कढी होती,वडी होती.भाज्या होत्या,खीरही होती.पुरणपोळी, वरणभात वर तुपाची धार ही होती.

कावळ्यांनी नैवेद्य उष्टावला हे पाहून मानवने विनीला हाक मारली.ती बाहेर आल्यावर त्याने सांगितले,
"दरवर्षी आपण नैवेद्याचे पान ठेवतो.पण यावर्षी तो नैवेद्य आईबाबांनी मानून घेतला बघ. म्हणजे बाबांचा राग गेलेला दिसतोय.Thank you Baba..Aai "!
असे म्हणत त्याने धाय मोकलून रडायला सुरुवात केली.विनी त्याला खूप वेळ समजावत होती. बाबा गेले त्यावेळी अचानक येणे त्याला शक्य झाले नव्हते, कारण विनीचे ॲबाॅर्शन झाले होते.त्या परमुलुखात तिची काळजी घेणारे दुसरे कुणीच नव्हते.चार पाच दिवसांनंतर ती एकटी राहू शकते असे डॉक्टरांनी सांगितले. तेव्हा मित्राच्या बायकोला तिच्याकडे एखादी चक्कर मारायला सांगून त्याने भारतात येण्याचे तिकीट काढले होते. तो पोचला तेव्हा आठवडा झाला होता. याविषयी सगळेच अनभिज्ञ होते.त्यामुळे सर्वांचाच त्याच्याविषयी गैरसमज झाला होता.

आज मात्र हे ऐकून त्या दोघांना ही कृतकृत्य वाटले. आपल्या मरणाची बातमी ऐकून मानव मृतदेहाला अग्नी देण्यासाठी आला नाही .त्याने विधी उरकून घ्या असे सांगितले. त्यानंतर आठवड्याने तो आला म्हणून त्यांचा मानववर खूप राग होता.पण आज तो उशिरा का आला याचे खरे कारण दोघांना समजले.

खरंतर आईचे काळीज किती दुखवायचे म्हणून तिच्या इच्छेसाठी तो बायकोसोबत आला होता. पण इथे आल्यावर मानवचे धाय मोकलून रडणे पाहून त्याचा गैरसमज दूर झाला होता.रडणाऱ्या मुलाच्या डोक्यावरुन मायेने हात फिरवावा असे दोघांनाही खूप वाटत होते,पण ते शक्य नव्हते.

विनीने समजावले आणि मानव शांत झाला.दोघांनी मिळून आईबाबांना मनापासून नमस्कार केला.तो पाहून ती दोघे अधिकच खुश झाली.

"काय मग, अमेरिकेतील लेकाने काय काय पदार्थ ठेवलेत पानात? मज्जा आहे बुवा एका माणसाची".

असे म्हणताच ती म्हणाली,
"हो तर..पाच वर्षांचे एकदम जेवायचेय मला. आता शांतपणे जेवूद्यात.आणि तुम्ही ही जेवा.ते बघा.मसालापान पण ठेवलेय.मानव विसरला नाही तुम्हांला जेवणानंतर मसाला पान लागायचे ते"!

" विमानात ठराविक वजन लागते, माहीत आहे ना? तेव्हा जरा बेतानेच खा. आता दरवर्षी येणारच आहोत आपण".
हे ऐकल्यावर तिला स्वर्ग दोन बोटे उरला.तसेही आता मानववरचा राग दूर झाल्यामुळे आपली या योनीतून सुटका करावी अशी विनंती ती चित्रगुप्ताकडे करणार होतीच! समाप्त
©® सौ.हेमा पाटील.
दिनांक २४/९/२०२४

🎭 Series Post

View all