गैरसमज भाग १

ही कथा आहे आईवडील आणि मुलांच्या भोवती फिरणारीथोडीशी विनोदी, थोडी अंतर्मुख करणारी....आपल्या नंतरही मुले आपणांस स्मरतात का याचा आढावा घेणारी कथा..
गुंता नात्यांचा
भाग १

©® सौ.हेमा पाटील.

"अग उठ की ! उठलीस का"?

"अहो, आता तरी झोपू द्या. आता काय तुमचा डबा करायचा आहे, की मुलांचे डबे द्यायचेत? पण अंगात सवय भिनली आहे ना, ती कशी जाणार ! जरा पडलेलं बघवतच नाही".
"जरा ? अहो मॅडम, रात्रभर अगदी ताणून दिली होती तुम्ही!
आणि काहीतरीच असतं हं तुझं ! आताही सुधारली नाहीसच.
तूच सांग मग तेव्हा तू डबा करणार नव्हतीस तर कोण उठून करणार होते"?
"हो बरं , मीच करणार होते! माझ्याशिवाय कोण होतं ! तेव्हा किंमत होती का पण माझ्या राबण्याची? कधीतरी चुकून तोंडातून यायचे का, आज डब्यातली भाजी खूप सुंदर होती म्हणून"!
"भाजी कधी सुंदर असते का ? सुंदर ललना असतात. भाजीची चव छान असते .अशी कशी ग तू! अजूनही आहे तशीच आहेस".
" तुम्ही सुधारला आहात का इतक्या वर्षांत ? मग मी कशी सुधरेन बरं ! एवढी वर्ष झाली संसाराच्या चक्रातून बाहेर पडून. तरीही आज अजून उजाडले नाही तरी उठवलेतच ना मला"?

"अगं , सकाळी लवकर उठणे आरोग्यासाठी चांगले असते".

"आता आरोग्याचा आणि आपला काही संबंध तरी उरला आहे का?आपण मेलो तेव्हा आपल्या नजरेसमोर आपल्या नश्वर देहाला अग्नी दिला होता. का विसरता पुन्हा पुन्हा"?

" मी कुठे विसरलोय? त्याचीच आठवण करून देण्यासाठी तर उठवत होतो. का उठवले हे तरी विचार मला".
" तर तर! मला माहिती आहे ना काय महत्त्वाचे काम असेल ते !
त्या शेजारच्या पिंपळावरच्या हऱ्या आणि नाऱ्या यांच्याबद्दल कागाळ्या करायच्या असतील. नाहीतर त्या नवीन आलेल्या हडळी बद्दल कौतुकपर काही सांगायचे असेल. तेव्हा तरी आणि आता तरी माझ्याशिवाय कोण ऐकून घेणारं होतं तुमचं " !
"असं का! कोण कोणाचे ऐकून घेत होते? तू माझे ऐकून घेणार? तोंड बघा ऐकून घेणाराचे !
बरं , वादच घालणार आहेस, की ऐकणार आहेस मी का उठवले ते"?

"बरं बोला".

" आटप लवकर. आपल्याला आज जायचे नाही का तिकडे ? तू आजची तिथी विसरलीस ना? आज आपल्याला लेकाच्या घरी जेवायला जायचे आहे.आज आमंत्रण असते ना आपल्याला! पंचपक्वान्नांचे ताट आज आपली वाट बघत असते".

" अरे ,आज सप्तमी का? विसरलेच की मी! ते रात्री आपण जरा त्या खिडकीत बसून कदमांच्या टिव्हीवर छम्मा छम्मा गाणं ऐकलं ना आणि त्या ट्रेनची सफर करताना विसरूनच गेले. पण कदम पण तो डान्स पाहून काय रंगात आले होते ना? मुलेही नव्हती त्यांची घरी. पण त्या नादात ते खिडकी लावून घ्यायचे विसरले. आणि त्या दोघांचेही छम्मा छम्मा आपल्या नजरेस पडले. किती रोमॅंटिक आहेत ना ते ! मला तर बाई आपले लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस आठवले".

रात्री कदमांच्या टिव्हीवर पाहिलेल्या छैय्या छैय्याच्या गोड आठवणीत दोघांनाही आपले तरुणपण आठवले होते.
तो तिला म्हणाला,
" तू तेव्हा किती सुंदर दिसायचीस ना ! चवळीची शेंग होतीस".

" तेव्हा? मी आजही तशीच सुंदर दिसते म्हंटले" !

"हो. फरक एवढाच पडला होता की चवळीच्या शेंगेचे रुपांतर नंतर भोपळ्यात झाले होते".

"भोपळा? तो तर तुमच्या पोटाचा झाला होता.
दुधी भोपळा म्हणा मला फार तर..पण भोपळा असो वा दुधी भोपळा! मुळचे सौंदर्य काय लोप पावते का"?

"नाही नाही.मुळीच नाही.फक्त ते कलेकलेने वाढत गेल्यामुळे बाळसेदार होते, एवढेच"!
"तुमची पुरुषांची जात ! भूतांच्या जगात सुद्धा सुधारणार नाही".

"आज आपल्याला रंगरुपाशी काय करायचे आहे?तो विषय जरा बाजूला ठेवूया का? आता आटपशील का"?

त्यावर ती म्हणाली,
" आता काय आटपायचे आहे डोंबल! जेव्हा छान तयार व्हायचे दिवस होते तेव्हा कधी सांगितले नाही तयार व्हायला. नेले नाहीत कुठे फिरायला. सारखं आपलं घर घर आणि घर! आणि आता मारे आटपायला सांगताय! तेव्हा थोडा उशीर झाला तरी रागे भरायचात. तुम्हां बायकांचे कधी वेळेत आटपतच नाही म्हणून खडे फोडायचात. तरी मी बरोबर सातव्या मिनिटाला बाहेर पडायचे हो"!
"हो का? सातवे मिनिट म्हणजे एक तासानंतरचे सातवे मिनिट असायचे ते "!

यावर विषय बदलत ती म्हणाली , "तुम्ही म्हणताय की जायचे, पण त्यांच्या लक्षात असेल ना? की गेल्या वर्षी तिथीच विसरले होते, तसे यंदाही विसरायचे नाहीत ना "?
क्रमशः
©® सौ.हेमा पाटील.
वरील भाग वाचून ते दोघे कोण आहेत हे तुमच्यासारख्या चाणाक्ष वाचकांना सांगण्याची आवश्यकता नाही.बरोबर ना?
ते दोघे लेकाच्या घरी जेवायला जातात की नाही ? यंदा तरी जेवण मिळते की उपवास घडतो हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचा.

🎭 Series Post

View all