जागतिक कन्या दिनाच्या निमित्ताने

Importance of parent daughter's relationship in our life

जागतिक कन्या दिनाच्या निमित्ताने… 

आज सकाळी उठल्या उठल्या नेहमीप्रमाणेच सईने शर्वरीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. शर्वरी म्हणजे सई आणि अनयची पाच वर्षाची लाडकी लेक. 

अनायासे रविवार असल्याने ऑफिस नव्हते त्यामुळे डब्बा ही नव्हता, म्हणून मग सईने मोबाईल फोन उघडून सोशल मीडियाची चाळणी सुरू केली. 

पाहते तर जागतिक कन्या दिनाचे ढीगभर मेसेज होते. अनयनेही शर्वरीचे बरेचसे फोटो शेअर केले होते. 'अरेच्चा आपण कसे काय विसरलो' असे मनात म्हणत तिने पटापट शर्वरीचे फोटो स्टेटसला अपलोड केले. 

आता ती आज कन्या दिन साजरा करण्याचे प्लान आखू लागली. लॉकडाऊन मुळे बाहेरून काही आणणे शक्य नव्हते, मग तिने शर्वरीच्या आवडीचे पदार्थ बनवायचे ठरवले. घरीच केक बनवू, शर्वरी अगदी खुश होऊन जाईल. 

थोड्यावेळ सई अंथरुणावर लोळत राहिली आणि नंतर कामाला सुरुवात केली. आन्हिक उरकून चहाचं आधण चढवले आणि कपाटातून शर्वरीसाठी तिच्या आवडीचा ड्रेस टेबलावर काढून ठेवला. पाठोपाठ अनय आणि शर्वरीही झोपून उठले. 

सईने शर्वरीला न्हाऊ- माखू घालून तिला छानपैकी तयार केले. आवडीचा ड्रेस पाहून शर्वरी खुश झाली. तस सईने तिच्या पुढ्यात पास्ता आणून ठेवला. जंक फूड म्हणून कधीतरी पास्ता देणारी मम्मी आज स्वतः तो देतेय हे पाहून शर्वरीच्या चेहर्‍यावर उमटलेले प्रश्न सईने वाचले आणि तिने पुढे होऊन शर्वरीला "हॅप्पी डॉटर्स डे माय स्वीटहार्ट" म्हणत कवेत घेतलं आणि तिचे मुके घेऊ लागली. तेवढ्यात अनयने लाडक्या लेकीचे ते आनंदी क्षण फोनच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले. मग तोही त्या दोघींना सामील झाला. 

सर्वांचा नाश्ता उरकून झाल्यावर आता सई दुपारच्या जेवणाला लागली. जेवण झाल्यावर दुपारी निवांत केक करायला घेऊ असं तिने ठरवले. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिच्या आईचा फोन आला होता. फोनवर ती आईला शर्वरीसाठी काय काय बेत केलाय हे सांगत होती. त्यांच बोलणं झाल्यावर आजीला नाती बरोबर बोलायचं होतं म्हणून साईने फोनचा स्पीकर सुरू केला. "हॅप्पी डॉटर्स डे बेटा" आजी शर्वरीला उद्देशून म्हणते. "थँक्यू आज्जी" शर्वरी म्हणाली. "मज्जा आहे बुवा आज तुझी मम्मी केक पण बनणार आहे छकुली साठी हो ना".. आजी 

"होss.. शर्वरीने मोठ्याने हो म्हंटलं. 

"आज्जी मम्मी पण तुझी डॉटर आहे ना, मग तू तिच्या साठी काय काय बनवलाय".. निरागस शर्वरी पटकन विचारून गेली. 

शर्वरीच्या भाबड्या प्रश्नावर सई आणि आई दोघी निःशब्द झाल्या. 

"सई, हॅप्पी डॉटर्स डे बाळा" आईच्या बोलण्याने सई भानावर आली. 

"थँक्स आई".. करोना आणि लॉकडाऊनमुळे एकाच शहरात राहून आठ महिने माहेर न पाहिलेल्या सईला भरून आले होते. 

'खरंच आपण शर्वरीसाठी सगळ केलंच पण आपणही कन्या आहोत हे विसरूनच गेलो होतो.' सई मनाशी म्हणाली. 

"आई तुला पण कन्या दिनाच्या खूप शुभेच्छा" सई आईला म्हणाली. 

"काय ग, तुझ्यासाठी काही करता ही येत नाही मला आता".. आई 

"आई, फिकीर नॉट, तुमच्या मुलीसाठी मी केक बनवतो" इतका वेळ तिघींच संभाषणा ऐकणारा अनय म्हणाला. आणि सगळे पुढच्या तयारीला लागले. 

खरेतर जन्माला आल्यापासून नव्हे आईच्या गर्भात रुजल्यापासून' हे नात आपण जगतो. तेच आपलं पहिलं नातं आहे. बहीण, आत्या, मैत्रीण, बायको, सून ही नात्यांची विशेषण काळाच्या ओघात नंतर येत असतात आपल्या आयुष्यात, पण जन्माला आल्यावर आपण पहिले कन्याच असतो. आपल्या या पहिल्या नात्याचा विसर पडता कामा नये. त्याचा मान सन्मान आपणच करायला नको का? 

लहान-मोठ्या सर्व कन्याकांना जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा… 

✍️©स्नेहा किरण नवाळे (पाटील)