जगतोय कर्तव्याला.. पाळतोय वेळेला..

A Story Of A Doctor's Life


जगतोय कर्तव्याला... पाळतोय वेळेला..




"डॉक्टर, हाउज त्रिवा?" सागरने हॉस्पिटलमध्ये पळत येत विचारले आणि तेवढयात त्याचा फोन वाजला. डॉक्टरकडे बघतच त्याने फोन उचलला," तयारी करा, पोहोचतोय." एवढे बोलून तो मागे फिरला. 

"तुझी लेक इथे बेडवर पडली आहे, तरीही तू जाणार ना?" सायली (सागरची बायको) त्याला थांबवत म्हणाली. 

        तिच्या डोळ्यात पाणी तर होतेच, पण सागरप्रति राग सुद्धा दिसत होता. सागरने एकदा त्रिवाकडे बघितले आणि तो जायला परत वळला. 

"तुला काहीच कसं वाटत नाही रे?तुला वेळेचे, परिस्थितीचे काहीच महत्त्व नाही का? असा कसा रे तू पाषाणहृदयी?" सायली रडतच मागून ओरडली. 

   "पाषाणहृदयी" शब्द ऐकून त्याचा हृदयात खूप दुखले. पण परत मागे न बघता तो अक्षरशः तिथून पळतच बाहेर पडत खूप स्पीडने कार चालवत होता.

"कुठे आहेत तुमचे डॉक्टर? अजून पोहचले कसे नाही?" तो चिडत म्हणाला.

"डॉक्टर येतीलच एवढयात.." नर्स म्हणाली. 

"एवढयात म्हणजे कधी? अर्धा तास होऊन गेला आहे. तुम्हाला आणखी हार्ट स्पेशालिस्ट ठेवता येत नाही का? एवढे मेडिकल कॉलेजेस आहेत, वर्षाला लाखो विद्यार्थी डॉक्टर बनून बाहेर पडतात.. अन् स्पेशालिस्ट काय तर हा एकच डॉक्टर?" तो रागात बोलत होता. 

"सांगा रे डॉक्टरांना वेळेचे महत्त्व.." त्याने सोबत असलेल्या काही धडधाकट लोकांना आदेश दिला.

"ऑपरेशनची तयारी झाली?" सागर हॉस्पिटलच्या दाराजवळ कार पार्क करत, कारची चाबी द्वारपालाकडे फेकत आतमध्ये जात सहकारी डॉक्टरांना म्हणाला. 

"हो सर, पण.." सहकारी डॉक्टर.

"पण काय?" 

"पेशंट एका मंत्र्याचा मुलगा आहे." 

  "हम्म."  म्हणत सागर आतमध्ये आला. बघतो तर रिसेप्शन एरियाची चांगलीच तोडफोड झाली होती. बरेच नुकसान झालेले होते. सागरने दुर्लक्ष केले आणि तो पळत ऑपरेशन थिएटरकडे जाऊ लागला.

"वेळेचे आणि कुणाच्या आयुष्याचे महत्त्व आहे की नाही तुम्हाला? डॉक्टर झाल्यावर शपथ घेता ना?" तो मंत्री अगदी चिडत सागरची कॉलर पकडत बोलत होता.  

"नर्स.." म्हणत सागर मंत्रीकडे दुर्लक्ष करत, तशाच कॉलर पकडलेल्या अवस्थेत तिथे असलेल्या त्याचा टीमला पटापट काही सूचना देत होता. 

"डॉक्टर, माझ्या मुलाला काही झाले तर तुम्हाला सोडणार नाही." तो मंत्री म्हणाला.

"सर, आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करू." अगदी शांततेने म्हणत, त्याचा कॉलरवर असलेले त्या मंत्रीचे हात सागरने बाजूला केले आणि OTमध्ये गेला. सात ते आठ तास ती हार्ट सर्जरी सुरू होती. पेशंटची सर्जरी यशस्वीरीत्या पार पडली होती.     

"डॉक्टर, तुमचे खूप खूप आभार. आमचा एकुलता एक मुलगा आहे बघा. वेळेवर ट्रीटमेंट मिळाली नसती तर आमचं पोर आमच्या हातातून गेले असते. म्हणून रागाच्या भरात हे सगळं घडलं. पण तुम्ही काळजी नका करू, उद्याचा सूर्य निघायचा आधीच आम्ही हे सगळं ठीक करून ठेवतो." सागर बाहेर आला तेव्हा मंत्री त्याचापुढे हात जोडत म्हणाला. किंचितसे हसून बघत तो परत पळतच बाहेर पडला आणि निश्चित स्थळी पोहचला. 

"ये चल. तुझी लेक तुझीच वाट बघत आहे." सागरचे बाबा त्याचा पाठीवरून हात फिरवत म्हणाले. आता मात्र त्याचा डोळ्यात अश्रूंचा पुर आला होता. हृदय भरून आले होते. कंठ दाटून आला होता. त्याने भरल्या नजरेने एकदा आपली पत्नी सायलीकडे बघितले आणि पुढे गेला. गुरुजींनी त्याचा हातात एक जळते लाकूड दिले. तो ते घेऊन मुलीच्या रचलेल्या चीतेजवळ गेला. तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला आणि तिच्या चीतेला अग्नी दिली आणि थोडा मागे होत बघत उभा होता. 

     सायलीने त्याचाजवळ जात एकच हंबरडा फोडला. 

"तू गेला तेव्हाच डॉक्टरांनी तिला ब्रेनडेड घोषित केले. मी तुझ्या परीचे अवयव दान केले, तुझीच शिकवण होती म्हणून.." सायली रडतच म्हणाली. 

      होकारार्थी मान हलवत त्याने तिला आपल्या छातीशी कवटाळून धरले आणि आपल्या एकुलत्या एक मुलीला दूर जातांना बघत होता. 

      त्रिवा सागर सायालीची सोळा वर्षीय शाळकरी मुलगी. संध्याकाळी सायकलने कोचिंग क्लासेस वरून घरी येताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तोल जाऊन खाली पडणार तोच तिच्या पाठीमागून येणाऱ्या एका चारचाकीची तिला धडक लागली होती आणि ती अक्षरशः हवेत उडून बाजुला डोक्याचा भारावर पडली होती. तिला हॉस्पिटलमध्ये पोहचवायला उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला ब्रेनडेड घोषित केले होते. 

        जर रस्त्यांवर खड्डे नसते, जर चारचाकीवाल्याने रस्त्याचे नियम पाळले असते, जर बाजूला जमलेल्या लोकांनी सामाजिक भान राखून तिला वेळेत हॉस्पिटलमध्ये आणले असते, जर प्रत्येकाने आपापले काम प्रामाणिकपणे पार पाडले असते, तर…… 


*******

समाप्त