Mar 03, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

जागर

Read Later
जागर

# जागर

# आभास- गोष्ट छोटी डोंगराएवढी

©® आर्या पाटील

 

" गणपती बाप्पा मोरया.." म्हणत त्या पाच जणांचा ग्रूप प्रवासाला निघाला. गजबजलेल्या शहरातील रोजच्या धकाधकीचं जीवन मागे सारत त्यांनी पालघरच्या दुर्गम भागात वसलेल्या नाण्याचा रस्ता धरला. निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलेला, हिरव्या वनराईने नटलेल्या या दुर्लक्षित भागाला सध्या नव्याने महत्त्व येऊ लागलं होतं.

यामागचं गगनभेदी कारण होतं ते म्हणजे या गावावर सावली सारखा पसरलेला कोहोज किल्ला.

काही आख्यायिकांनुसार सुरतेच्या लुटी दरम्यान या किल्ल्यावर शिवरायांनी वास्तव्य केले होते. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आता मोठ्या प्रमाणात ट्रेकर्सचे आकर्षण ठरू लागली होती.गर्दीच्या दिवशी नको म्हणून या पाच मित्रांनी वर्किंग डेजमधून सुट्टी घेत आपला प्लॅन आखला होता. पालघरच्या हिरवळीत प्रवेश करताच त्यांनी गाडीचा सनरुफ उघडला.स्वच्छ सूर्यप्रकाशात न्हाहून निघत प्रदूषण विरहीत हवा श्वासांत भरून घेतली.

 

" किती उत्साही वाटतं ना या वातावरणात. कधी एकदा किल्ल्यावर पोहचतो असे झाले आहे.." एकजण म्हणाला.

 

" या उत्साहात भर घालण्याची तयारी केली आहे ना व्यवस्थित नाही तर किल्ल्यावर चढून जायचं आणि ज्या कामासाठी चाललो आहे तेच राहायचं.." दुसरा हसत म्हणाला.

 

" काही काळजी नको करूस पूर्ण स्टॉक रेडी आहे.." उत्तर ऐकताच गाडीत चांगलाच हशा पिकला.

 

आज खूप दिवसांनी ते सगळे असे एकत्र निघाले होते त्यामुळे उत्साह ही भलत्याच शिगेला पोहचला होता.

 

दुरुनच कोहोजचं भव्य रूप दिसलं आणि त्यांचे डोळे विस्फारले.

" काय रे किल्ला भलताच उंच दिसतोय..?" डोळ्यावरील चष्मा काढत एकाने दीर्घ श्वास घेत म्हटले.

 

" आपल्याकडे असलेल्या औषधाने सहज सर होईल हा. तु नको काळजी करूस.." म्हणत मागे बसलेल्या मित्राने मद्याची बाटली काढली आणि गाडीतच कार्यक्रम सुरु केला.

 

" अरे, आपल्याला अजून वर चढायचं आहे आणि तुम्ही एवढ्यातच.." एकाने शंका उपस्थित केली.

 

" एवढी घेतल्याने काही होत नाही उलट हत्तीचं बळ येईल अंगात.." म्हणत त्यांनी त्याला गप्प केले.

 

कार्यक्रम आटोपता आटोपता ते किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहचले. गाडीतून उतरत एकाने हातातली मद्याची रिकामी बाटली तिथेच काचेवर फोडली.

गाडीतून सामान काढत त्यांनी तिथेच एका छोटेखानी टपरीजवळ गाडी पार्क करून ठेवली. रात्रीचा मुक्काम गडावरच करणार असल्याने त्यांनी पैसे देऊन गाडीच्या देखभालीविषयी त्या दुकानदाराला सांगितले आणि चढाईला सुरवात केली. दुपार उलटून गेली होती. रात्रीचा मुक्काम तिथेच असल्याने काही घाईही नव्हती. थांबा घेत घेत ते सारे किल्ला चढत होते.

 

मध्यावर पोहचल्यावर जो सगळ्यात शेवटी चालत होता त्या मित्राला आपल्यामागे कोणी येत असल्याचा भास झाला. त्याने मागे वळून पाहिले पण कोणीच नव्हते. पुन्हा एकदा तो पुढे चालू लागला. थोडा वेळ जातो न जातो तोच पुन्हा तिच पानांची सळसळ, तोच कोणी मागे चालत असल्याचा भास झाला. त्याने पुन्हा मागे पाहिले या वेळेस त्याला समोरून अस्पष्टशी आकृती सरकतांना दिसली.

 

" भ.. भ.. भूत."म्हणत तो तसाच उभ्या जागी शहारला.

 

पुढे चालणारे त्याचे मित्रही त्याच्या आवाजाने मागे वळले.

 

" काय रे ? काय झालं ?" एकाने विचारले.

 

" कोणी तरी पाठलाग करतो आहे आपला. मी पाहिलं त्याला." म्हणतांना त्याची बोबडी वळली.

 

" दिवसा कोण पाठलाग करेल ? तुला भास झाला असेल." त्याने समजावले.

 

" काही भास आभास नाही याला प्यायलेली झेपली नाही म्हणून ही अवस्था.." दुसऱ्याने असे म्हणताच सगळे त्याच्यावर हसू लागले.

 

" काय रे तु मर्द गडी? इतक्यात घायाळ झालास. अजून तर मेन पार्टी बाकी आहे. चल पाहू तु पुढे मी बघतो कोण आहे मागे." म्हणत त्याने घाबरलेल्या मित्राने पुढे ठेवले आणि तो मागून चालू लागला.

 

घाबरलेला तो मित्र मात्र पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होता. दोन ते तीन तासांत ते वर पोहचले. किल्ल्यावर

जणू आभाळ उतरल्याचा भास होत होता.तंबू बांधून त्यांनी निवाऱ्याची सोय केली. किल्ल्यावर ते सोडले तर कोणीच नव्हते. हळूहळू संध्याकाळ होऊ लागला.परतीच्या सूर्याने आपल्या सोनेरी प्रकाशाने किल्ल्याला चरणस्पर्श केला. हिवाळ्याचे दिवस असल्याने लवकरच अंधार पडला. त्या उंचसखल पठारावरून चांदण्यांच विलोभनीय दृश्य पाहतांना ते मित्र हरवून गेले.

 

" मग आता वाट कसली पाहता करायची का सुरवात ?" म्हणत एकाने त्यांना भानावर आणले.

 

" त्याचसाठी तर आलोय इथे. जगापासून दूर चांदण्यांच्या जगात पार्टी करण्याची वेगळीच मजा आहे." म्हणत लागलीच दुसऱ्याने मद्याच्या बाटल्या आणि आवश्यक ते सगळच सामान बाहेर काढलं.

 

" आपण नको पिऊयात. मला काहीतरी गडबड वाटते इथे." मघासचा तो घाबरलेला मित्र पुन्हा एकदा कानोसा घेत म्हणाला.

 

" तु दोन पॅग मार म्हणजे तुझ्या डोक्यात जी गडबड सुरु आहे ती शांत होईल.." म्हणत दुसऱ्याने बाटली उघडली.

 

तोच सभोवताली कसल्याश्या हालचाली जाणवू लागल्या. घोड्यांच्या टापांचे आवाज दणदणू लागले. मशालींच्या उजेडात सभोवताल उजळून निघाला.

 

" मी म्हणालो ना काहीतरी गडबड आहे इथे. तुम्ही ऐकत नाहीत. देवा वाचव आम्हांला.." म्हणत तो जागेवर उठून उभा राहिला.

बाकीचेही सावध झाले. काही कळायच्या आत. रक्ताने माखलेले अनेक मावळे त्यांना त्यांच्या दिशेने मशाली घेऊन येतांना दिसली. त्या प्रकाशात त्यांचे डोळे दिपून गेले.

 

" महाराज, या गनिमांना आम्ही जितं सोडणार नाहीत. आमच्या राजांच्या गडावर असा दारुचा खेळ खेळायला लाज नाही वाटत. याचसाठी का आम्ही बलिदान केले आणि गड राखले ..?" चवताळत एक मावळ्याने जळती मशाल त्यांच्या अंगावर भिरकावली.

 

त्या बोचऱ्या थंडीतही त्यांना दरदरून घाम फुटला.

प्रत्यक्ष मावळ्यांची भूतं आपल्यावर आक्रमण करत आहेत हे पाहून त्यांची बोबडी वळली.

 

" मी म्हणत होतो कोणातरी आहे आपल्या मागावर पण तुम्ही ऐकलं नाही. तो माझा भास नव्हता तर ते मावळे होते. गडावर दारू आणून आपण खूप मोठी चूक केली आहे आता हे मावळे आपल्याला जिवंत सोडणार नाहीत. चला पळा.." म्हणत त्याने सगळ्यांना सावध केले. जो तो रस्ता मिळाला तेथून पळत सुटला. एवढ्या अंधारातही त्यांनी गड उतरायला सुरवात केली. काट्याकुट्यांतून, दगड धोड्यांतून शरिरावर अनेक जखमा झेलत अथक परिश्रमाने ते सगळे खाली उतरले.

जिथे गाडी पार्क केली होती त्या दुकानातील दुकानदार त्यांच्या हालचालींचा कानोसा घेत बाहेर आला.

 

 

" काय झालं साहेब एवढ्या रात्री गड उतरून कसे काय आले तुम्ही ? तुमच्यात मावळे बिवळे संचारले काय ?" त्याने असे म्हणताच त्यांची नजर त्याच्यावर पडली. त्यालाही मावळ्याच्या वेशात पाहून उरलं सुरलं अवसानही गळून पडलं. जेमतेम गाडीत बसत त्यांनी गाडी सुरु केली आणि गावाच्या बाहेर धूम ठोकली.

 

मावळ्याच्या वेशातील त्या दुकानदाराने लागलीच खिशातून मोबाईल काढत फोन लावला.

 

"मोहिम फत्ते झाली. गनिम जीव मुठीत घेऊन पळून गेले. पुन्हा गडावर काय कुठेच दारू पिण्याची हिमंत करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय.." म्हणत त्याने फोन ठेवला.

 

इकडे किल्ल्यावर मावळ्यांच रुप घेतलेल्या त्याच गावातील तरुणमंडळीनी शिवरायांचा जयजयकार करत विजयाचा जल्लोष साजरा केला.

 

 महाराजांचे किल्ले म्हणजे आपलं देवस्थान. त्याला पार्टीचं ठिकाण समजून आणि दारू पिऊन या वारश्याचं पावित्र्य नष्ट करणाऱ्यांना,ट्रेकिंगच्या नावाखाली येणाऱ्या या अश्या तरुणांना चांगलाच धडा शिकवण्यासाठी गावातील तरुणांनी सुरु केलेला स्वामीनिष्ठेचा आणि छत्रपतींचा मावळा म्हणून असलेल्या कर्तव्याचा जागर होता हा. आजही त्यांनी मावळ्यांची जिवंत भूतं उभी करून हा जागर पार पाडला.

 

पार्टी करायला आलेले ते पाच मित्र आयुष्यभराचा धडा शिकून गेले. मावळ्याचं भूत उभ्या आयुष्यात त्यांच्या मानगुटीवरून उतरलं नाही आणि पुन्हा किल्ल्यावर पार्टीसाठी ते फिरकले नाहीत.

 

धन्यवाद.

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Aarya Amol Patil

Teacher

निसर्ग सौंदर्याला लेखणीत उतरवायला आवडतं

//