Jan 22, 2022
नारीवादी

जागर स्त्री शक्तीचा

Read Later
जागर स्त्री शक्तीचा

जागर स्त्री शक्तीचा 
सिद्धी भुरके ©®

आर्या कॅलेंडर चाळत होती,  "अरे बापरे.. या महिन्यात नवरात्र आहेत तेव्हाच नेमकी माझी पाळीची तारीख आहे.. "
मागे काम करत असणाऱ्या सासूबाई तिची कुजबुज ऐकून बोलतात, "काय गं.. काय बघत आहेस कॅलेंडरमध्ये? काय झालं?? "
"अहो आई नवरात्रीच्या दरम्यान माझी पाळी येईल.. लग्नानंतरची पहिली नवरात्र.. काय करू समजत नाहीये.. पाळी पुढे ढकलायच्या गोळ्या घेऊ का?? " आर्या विचारते.
"हो.. म्हणजे काय?? घेतल्याच पाहिजे तू गोळ्या.. नाहीतर त्या चार दिवसात तुला वेगळं रहावं लागेल.. तुझी भांडी कपडे तुझे तुलाच सगळं काम करावं लागेल.. " सासूबाई म्हणाल्या.
"नाही नाही ठीक आहे.. मी घेते गोळ्या.. विशालला फोन करून मेडिकलमधून आणायला सांगते.. "आर्या बोलते.

    आर्याची पहिलीच वेळ असते गोळ्या घ्यायची. माहेरी असताना तिने कधी घेतल्या नव्हत्या. पण आता सासरी सणावाराची तिच्यावर जबाबदारी असल्याने गोळ्या घ्यायची तिच्यावर वेळ आली होती.

     इथे दुपारी सासूबाई म्हणजेच ताराबाई जरा निवांत होत्या. पुस्तक वाचता वाचता त्यांना सकाळी आर्यासोबत झालेले संभाषण आठवते आणि त्यांना त्यांच्या वेळेचा काळ आठवतो. अवघ्या अठराव्या वर्षी त्या लग्न होऊन या घरात आल्या होत्या. सासू, सासरे, नवरा आणि ताराबाई असं चौकोनी कुटुंब. पण सणवार आले कि हमखास ताराबाईंना त्यांची सासू पाळी पुढे ढकलायच्या गोळ्या घ्यायला लावत असे. अशी नैसर्गिक  प्रकिया गोळ्या घेऊन पुढे ढकल्याने नंतर ताराबाईंना खूप त्रास होत असे. पण त्या चार दिवसात  त्यांना फारसा आराम मिळत नसे. फक्त स्वयंपाक करायला सुट्टी असे. पण घरातील धुणं भांडी सगळं करावं लागे. या चार दिवसात फार अशक्तपणा जाणवे त्यांना.. पाय, कंबर तर जाम दुखत असे. पण करणार काय?? कोणाला सांगणार?? त्या चार दिवसात गादीवर झोपणं नाही.. एका कोपऱ्यात बसावं लागे. घरात कशाला शिवा शिव करायची नाही. कोणाशी बोलणार हे सगळं?? त्या काळात नवरा अशा बायकांच्या विषयामध्ये लक्ष घालत नसे. जुन्या गोष्टी आठवून ताराबाईंच्या अंगावर पुस्तक वाचता वाचता काटा आला.तितक्यात आर्या त्यांच्या खोलीत येते.. आणि विचारते,
"आई.. चहा प्यायला येताय ना?? "
"हो हो आलेच.. चल.. "म्हणत ताराबाई खोलीतून बाहेर येतात.

     आर्या जरा हिंमत करून त्यांना विचारते, "आई तुम्हाला कधी सणावाराच्या वेळेस पाळी आली तर तुम्ही काय करायचा??  अशा गोळ्या घ्यायच्या का??  आणि ते चार दिवसपण असंच तुम्ही पाळायचा का? "
"हो.. प्रत्येक वेळेस मी गोळ्या घेऊन पाळी पुढे ढकलली आहे.. आणि आमच्या सासूबाई याला विटाळ म्हणायच्या.. सगळं त्या सांगतील तसं पाळलं आहे मी."
सासूबाईंचं उत्तर ऐकून आर्याला चांगलंच समजलं कि आपल्याला सुद्धा यातून जावं लागणार आहे.

        थोड्या वेळाने विशाल ऑफिसमधून घरी येतो. त्याचं चहा पाणी झाल्यावर सासूबाई आर्याला आणि त्याला हॉल मधे बोलावतात.
"आर्या.. विशाल बाहेर या.. मला तुमच्याशी बोलायचं आहे.. " सासूबाई म्हणतात.
तसे दोघे लगबगीने बाहेर येतात..

"या.. बसा इथे.. " सासूबाई म्हणतात.

"आई अगं काय झालं?? बरं नाही वाटत तुला?? " विशाल विचारतो.

"आहे मी बरी.. बरं मला सांग आणल्या का आर्यासाठी गोळ्या?? "सासूबाई विचारतात.

"हो अगं.. घेऊन आलो.. तिने सकाळीच फोन करून सांगितलं होतं मला.. "विशाल बोलतो.

"मग आर्या.. घेणार ना गोळ्या?? पाळी पुढे ढकलणार ना?? "सासूबाई आर्याला विचारतात.

"हो.. आई. घेईन ना.. आपल्याकडे असं काही चालत नाही ना.. "आर्या बोलते.

"वा.. किती गुणी बाळं आहात ना तुम्ही दोघे.. मी आर्याला पाळी पुढे ढकलायच्या गोळ्या घ्यायला सांगितल्या आणि तुम्हा दोघांपैकी कोणी मला विरोध सुद्धा केला नाही?? म्हणजे इतके वर्ष जे चाललं आहे ते चालूदे तसंच.. हो ना?? " सासूबाईंचं बोलणं ऐकून दोघे आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे बघू लागले.

"अरे असे काय बघताय.. आर्या मला तू सांग.. तुला सुद्धा वाटलं नाही कि मला येऊन सांगावं अशा गोळ्या घेणं चांगलं नसतं.. मी नाही घेणार म्हणून.. तुला तुझ्या तब्येतीची काळजी आहे कि नाही??? "सासूबाई विचारतात.

"अहो आई.. पण मी तुम्हाला कसा विरोध दर्शवणार??"
आर्या बोलते.

"इतर सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही मुली अगदी मॉडर्न विचारांच्या असता.. आणि इथे पाळीशी संबंधित काही आलं कि गोळ्या घ्यायला तयार.. का नाही विरोध दर्शवला?? पाळी आणि स्त्री या एकमेकांशी असं जोडल्या गेल्या आहेत कि पाळी नसेल तर त्या स्त्री जन्माला काही अर्थ नाही.. तुझ्यासारखाच मी विचार करून कधी गोळ्या घ्यायला विरोध केला नाही.. सणवार आले  कि झालं.. या ताराने घेतली गोळी.. आणि नंतर त्या चार दिवसात आराम म्हणून नाही.. या गोळ्या घेऊन घेऊन शेवटी माझ्या गर्भाशयाच्या पिशवीला जाळी निर्माण झाली होती.. आणि माझी पिशवी काढावी लागली.. आणि पिशवी काढल्यानंतर हे वजन वाढले.. थायरॉईडचा त्रास आणि हाय बी. पी. सुद्धा.. किती काय त्रास सुरु झाले मला.. गोळ्या घेऊन घेऊन माझी पाळी अनियमित झाली होती त्यामुळे मला मूल व्हायला पण खूप त्रास झाला..
      अगं माझा काळ वेगळा होता.. माझ्यात हिंमत नव्हती.. इतका त्रास सहन करून सुद्धा सासूबाईंना एकदाही 'नाही घेणार ' बोलले नाही मी.. आणि ही काय अभिमानाने सांगायची गोष्ट नाहीये.. आपण स्त्रिया ना अनेक दुखणी अंगावर काढतो.. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही.. नेहमी जगाचा विचार आधी करतो..आणि शेवटी स्वतःला प्राधान्य देतो.. किती चुकीचं आहे हे.. पाळी येणं म्हणजे आई होण्याची खात्री.. किती छान गोष्ट आहे ती..त्या बद्दल न्यूनगंड का बाळगायचा?? "सासूबाई म्हणाल्या.

"आई..खरं आहे तुमचं म्हणणं.. आपल्या आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे.. पण मग तुम्ही मला आधीच का बोलला नाही कि गोळया घेऊ नकोस?? " आर्या विचारते.

"अगं मला बघायचं होतं कि तुला स्वतःच्या आरोग्याची किती काळजी आहे.. तू विरोध करतीयेस का नाही मला बघायचं होतं.. आणि विशाल तू पण या गोळ्या घेऊन आलास?? तुला सुद्धा काही वाटलं नाही???" सासूबाई विशालला विचारतात.

"अगं आई मी काय बोलणार तुम्हा बायकांच्या गोष्टीत? "
विशाल बोलतो.

"अरे काय हे.. मी काय बोलणार हे काय उत्तर झालं?? तुझी बायको दर महिना चार दिवस कोणत्या त्रासातून जाते याची तुला जरा सुद्धा जाणीव नाहीये का?? तिची या दिवसात होणारी चिडचिड.. तिच्यातला अशक्तपणा तुला कधी जाणवला नाहीये?? "सासूबाई विशालला विचारतात पण तो मान खाली घालतो.

"नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर.. म्हणून या नवरात्रापासून मी काही बदल घडवणार आहे आपल्या घरात.. मी एक स्त्री या चार दिवसांमध्ये दुसऱ्या स्त्रीला समजून घेणार.. मी जे भोगलं ते आर्याला कधीच सहन करावं लागू नये म्हणून मी पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांचा पूर्ण पणे विरोध करते.. आणि विशाल तू सुद्धा आज जश्या या गोळ्या आणल्या ना.. तसं दर महिना तिला सॅनिटरी पॅड आणून द्यायचे.. कोणतीही लाज शरम बाळगायची नाही. चार दिवस आर्याला समजून घ्यायचं... तिची चिडचिड झाली तरी शांत राहायचं.. तिला काय हवय नकोय सगळं बघायचं.. तिला आराम करू द्यायचा.. नवरा म्हणून हे तुझं कर्तव्य आहे.. समजलं??" सासूबाईंच्या बोलण्याने विशाल आणि आर्यचे डोळे पाणावतात...

आर्या त्यांना जाऊन मिठी मारते आणि म्हणते, "आई अजून काही दिवसांवर नवरात्र आहेत.. पण आज तुमच्या मुखातून जणू ती आई जगदंबा बोलली.. या स्त्रीत्वाचा आदर करायला शिकवून गेली.. खरंच स्त्री शक्तीचा आदर करायला शिकवणारे या वर्षीचे आगळे वेगळे नवरात्र असणारे आपल्याकडे.. "

    सासूबाई पण डोळे पुसत दोघांना जवळ घेतात. आपल्यासोबत जे घडलं ते आपण आर्या सोबत कधी होऊ देणार नाही याचं त्यांना समाधान वाटत असतं. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेणार नाही तर मग अजून कोण घेणार??

वाचकहो कथा कशी वाटली ते मला नक्की सांगा. तुमचे विचार सुद्धा मांडा. कथा आवडली तर like आणि कंमेंट नक्की करा. धन्यवाद.

सिद्धी भुरके ©®

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Siddhi Gautam Bhurke

Interior designer

Hello everyone.. My self Mrs.siddhi Bhurke. I'm an interior designer and a co owner at studio intelize. I'm a trained bharatnatyam dancer. And a proud mommy of two years old daughter.. Recently I've started writing blogs..