जगा वेगळं सासर भाग - 3

दोन वेगवेगळ्या धर्माच्या पण एक जीव झालेल्या जोडप्याची प्रेम कथा जी आपल्या प्रेमाने अक्ख जग जिंकते...



ती रात्र ही दोघ न झोपताच काढतात.
परत सकाळी तेच. मंदार उठतो आणि हॉलमध्ये जाऊन बसतो. आई पेपर वाचत बसल्या असतात. . दोघांची नजरानजर होते.

मंदार आता बोलणारच तेवढ्यात आई म्हणतात , " मंदार तुझ्याशी बोलायचं होतं. "
"आई मलाही तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे".

"बोल मग."
तो आईच्या जवळ जाऊन बसतो. शब्द जणू कंठातच आळतात. तो बोलण्याचा प्रयत्न करतो पण शब्द फुटत नाहीत. तो लांब श्वास घेतो.. हाताची मुठ घट्ट करतो आणि चटकण बोलून टाकतो..

"आई माझं एका मुलीवर मनापासून प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायच आहे", तो इतक्या जलद गतीने बोलतो की आईला तो काय बोलतो आहे अर्ध कळतंच नाही...

"काय काय कायssssय... बाळा जरा दमाने बोल."

" आईsssss माझं एका मुलीवर प्रेम आहे", अगदीच आईच्या डोळ्यात डोळे घालून तो म्हणतो..

"हे काय बोलतो आहेस तू? काही वाटतं काय तुला बोलायला? जोशी काकांच्या मुलीचा निरोप आलाय तुझ्यासाठी, आता मी तुझ्याशी तेच बोलणार होते".
"आई मला एका साउथ इंडियन मुलीशी लग्न करायच आहे " तो अडखळत म्हणतो .
"मंदार हा काय प्रकार आहे" आई खूप रागात डोळे मोठे करून म्हणतात .

" आई मला खूप दिवसापासून तुला हे सांगायचं होतं. आज तिला बघायला दुसरा मुलगा येणार आहे. ते होताना मी बघू शकत नाही. तुला आमच्या लग्नाला होकार द्यावा लागेल", बोलता बोलता तो चक्क घामाने भिजून जातो .

"मंदार ती कोणत्या गोत्रातील आहे? तिचं घराणं कसं? कुटुंब कसं? तुला काहीतरी माहिती आहे का? आणि
दक्षिणी संस्कृतीची मुलगी? लाज वाटते काय काही? खूप गर्वाने सांगायचे मी तुझ्याबद्दल आणि तू काय केलं नाक कापलस
आमचं."

" आई मी लहान नाही आपली पसंती सांगणं गुन्हा आहे काय? तुला सांगतो मी फक्त्त आणि फक्त्त तिच्याशीच लग्न करणार.
उद्याच काय ते ठरवा आणि चला तिच्या घरी आणि हो... तिच्याबद्दल मला एवढं माहिती आहे की ती खूप चांगल्या घराण्याची आहे आणि माझं तिच्यावर आणि तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे".

" अरे फक्त प्रेम पाहून लग्न होत नाही. आधी घराणं बघाव लागतं आणि तुला चांगलं माहिती आहे मी दुसऱ्या जातीची मुलगी सून म्हणून स्वीकारणार नाही ही तर दुसऱ्या धर्माची सुद्धा आहे".

"आई जात आणि धर्म वेगळा असल्या कारणाने तू जर या लग्नाला नकार देत असशील तर मी आजच तिचा धर्म स्वीकारतो. मग तर नसणार न अंतर आमच्या दोघात."
आई चक्क धक्याने सोफ्यावर दणकण बसतात..

" अरे अरे दोघेही जरा शांत व्हा. अश्या गोष्टी बसून शांततेत विचार विमर्श करून करायच्या असतात", दोघांच्या वादाला विराम बसावं म्हणून बाबा मध्येच बोलतात.

"वाटेल ते नको बोलू मंदार. हा दिवस बघायला मी तुला लहानाच मोठ्ठ नाही केलं", आवंढा गिळत आई म्हणतात.

" आता बस्स... आई तुला ती सून म्हणून पटत नसेल तर आज पासून मला तुझा मुलगा सुद्धा म्हणू नको. बाबा यावर विचार विमार्श करा आणि मला कळवा. माझ्याकडे आजचाच वेळ आहे", एवढं बोलून तू घराबाहेर निघून जातो.
मंदारची आई ढसाढसा रडू लागते...
"देवा ईश्वरा हा दिवस दाखवायसाठी मी याला लहानाच मोठं केलं".
"जरा शांत हो कावेरी. अश्या गोष्टींचा निष्कर्ष वादाने कधीच निघत नसतो. तू धीर धर मी बोलावतो आज सगळ्यांना."
"कुणालाच बोलवायची गरज नाही कुटुंबाचा मान वेशीवर घालायला", त्या अगदीच लाल झालेल्या डोळ्यांनी आक्रोशात बोलतात.

"अगं ऐ बये, तुझ्या असल्या हट्टी स्वभावामुळे पोरगा हातून गेला ना मग आयुष्यभर पश्चाताप करण्याशिवाय अजून काहीच उरणारं नाही तुझ्याकडे", एवढं बोलून ते ही बाहेर पडतात.
त्या मात्र अजूनही सोफ्यावरच बसल्या असतात डोळे मिटून.
बाबा मात्र लागलीच कुटुंबातील मंडळींना फोन करून दुपारच्या वेळेला बैठक बोलावतात. बाबा, काका, दादा, आत्याबाई, तात्या, मावशी सगळे ठरलेल्या वेळेला घरी जमतात.
मंदार सगळ्यांना पूर्णाबद्दल सांगतो. तिचं शिक्षण, घराण्याची माहिती, आई - वडिलांचा व्यवसाय सगळं सविस्तर बोलतो.
पूर्णाच्या घराण्यातही सगळे डॉक्टरी व्यवसायाचे असतात. त्यामुळे इतर सदस्यांना मंदारने सांगिल्याप्रमाणे काहीच चुकीचं वाटतं नाही. उलट शिकली सवरली मुलगी घरात यावी असंच वाटतं. पण आई मात्र ठाम असतात.
सगळे आईला समजवतात. तरुण रक्त आहे काही उलट सुलट करायच्या आधी आपणच त्याला पसंत असलेल्या मुलीशी भेटून पुढंच काय ते ठरवावं. त्याने शोधली म्हणजे काहीतरी विशेषच असेल तिच्यात. त्याच्या बाबांना त्याच्या पसंतीवर पूर्ण विश्वास असतो शिवाय बाकीचेही आपला विश्वास दाखवतात.
शेवटी सगळ्यांच्या समजवण्यावरून त्या पूर्णाच्या घरी जायला तयार होतात.
मंदारचे बाबा पूर्णाच्या बाबांना फोन करून दुसऱ्याच दिवशीची बैठक ठरवतात.
सगळे वेळेवर पोचतात. त्यांच घरी मोठ्ठ वाड्यासारखं असतं. जिकडे तिकडे चक्का चौन्ध असते. म्हणजे घर बघून त्यांच्या श्रीमंतीचा अंदाज बांधता येईल अगदी असं. हळूहळू बोलणी सुरु होते. सहमताने सगळं ठरू लागतं. आई मात्र शांतच असतात. अजूनही मनातून त्या या नात्याला त्यांची कबुली नसते.
थोड्यावेळेने पूर्णा पोहे घेऊन येते..
अगदीच नाजूक... मन मोहक आणि साधी. काठाची पिवळी साडी, मराठा कुटुंब येणार म्हणून पहिल्यांदाच कपाळावरची लावलेली चंद्राची टिकली, तिचा तो अबोलीचा गजरा, ओठांवरच लाजत लाजत हसणं...
अगदी पहिल्या नजरेत सगळ्यांच मन मोहून घेते ती . आई मात्र चष्म्यातून डोळेवर करून एक नजर बघतात आणि तोंड मुरगाळून पोहे खायला सुरवात करतात.
हळूहळू लग्नाची बोलणी सुरु झाली. सगळं ठरलं. लग्नाची तारीख ठरली. दोन्ही पद्धतीने अगदी साध घरच्या घरी लग्न सोहळा पार पडला . जितक्या कमी लोकांना माहिती होईल तितकं चांगल म्हणून मंदारच्या आईने कोणालाच निमंत्रण दिले नाही . जवळ जवळचे नातेवाईक बोलावून लग्नाचा घाट घातला घेतला.
शेवटी घरच्यांच्या तीव्र विरोधाला मात देवून दोघे रेशीम गाठीत अडकतात . .
बर दोघे उपरणाच्या मंगल बंधनात अडकले ते अडकलेच पण मंदारची आई आणि पूर्णा दोघांचे उपरणं एक होणं शक्य नव्हतं. दोघांमध्ये ३६ चा आकडा होता म्हणजे एक पॉसिटीव्ह तार तर दुसरी निगेटिव्ह. कायम वेगवेगळी वाट असणाऱ्या कधी न जुळणाऱ्या सतत करंट मारणाऱ्या तारा.
सुरवातीला त्यांना तिचा चेहरा बघावला जातं नसे. तिला जे आवडतं त्याचा त्या तिरस्कार करायच्या.
म्हणजे सासूबाईंना घरात हिंदी बोललेलं अजिबात आवडतं नसे. घरात हिंदी सिरीयल सुद्धा लावली जायची नाही तर मग हिंदी चित्रपट तर लांबचीच गोष्ट होती . अगदी टिपिकल मराठी वातावरणच त्यांना आवडायचं.
बाकीचे नियम तर मग विचारूच नका म्हणजे स्वयंपाक घरात आंघोळीवीणा नो एन्ट्री, देवघरात कायमचीच नो एन्ट्री आणि सोहळ्यात तर घरातच नो एन्ट्री. अतिशय नियमबद्ध आणि कमी बोलणारे लोक संस्कार आणि जुन्या रुढी परंपरा पाळणारे...
दोन वेगळ्या दिशा जमायचं तरी कस...? त्यात पोरगी अति हौशी... कत्थक, भरतनाट्यम आणि कुचीपुडी मध्ये विशारद... गाणं लागल की तिचा जीव कासावीसायचा... पण त्यांच्या लग्नाला नुकतेच सहा महीने झालेली आणि चुलत नंदेच्या दिराच्या लग्नातील हा पहिलाच क़ौटुंबिक प्रसंग होता.. दक्षिणी सून आणून आधीच त्यांच्या घराण्याचं नाव डंक्यावर होत त्यात बयाबाई चार चौघात नाचली.
अजून सासरच्या लोकांच्या मनात कोरडी जागा ही निर्माण झाली नव्हती त्यात घडलेला हा प्रकार... जे झालं ते अतिशय वाईट होतं आणि आता सामनाही तिलाच करायचा होता...
तिचा जस्ट डोळा लागलाच होता अन् अलार्म वाजला. आज कोणालाच तिला बोलायची संधी द्यायची नव्हती ती लागलीच उठली. सगळं वेळेत करून सासूबाईंचा राग कमी करायचा
तिचा प्लान होता पण बघते तर काय तिला पाळी आली होती.....

क्रमशः
शेवटी हट्टाला पेटून दोघे विवाह बंधनात अडकतात पण सासूबाईंच्या तत्वांना जुळवून घेणं पूर्णासाठी सोपं नसणार आहे.
पूर्णासारख्या अजूनही कित्येक सुनांना पाळीच्या वेळेला वाईट वागणूक दिली जाते... पण ते खरंच आपल्या हातात असतं काय? बिचाऱ्या पूर्णाचं ही तसंच झालं करायचं काय होतं नाही झालं काय...
पुढच्या भाग आपल्या भेटीला लवकरच.....
--------------------------------------------------------------------------------
©️®️ सौ. अश्विनी रोशन दुरगकर.

🎭 Series Post

View all