जग भास आभासाच्या पलीकडले.

भास आभासा पलीकडची एक गोष्ट



आभास हा.....
छळतो तुला....
छळतो मला...
आभास हा.....
"अमेय तो मोबाईल कोकलतोय तो उचल आधी,आजोबा ओरडले."
अमेय धावत जाईपर्यंत फोन कट झाला होता.इतक्यात परत रिंगटोन वाजू लागली.अमेय पटकन मोबाईल घेऊन आत गेला.आजोबांना हे गाणे भुताटकीचे वाटत असे.अमेय मात्र त्यातून तरुणाईची भावना अनुभवत असे.

तितक्यात आजोबा ओरडले,"सुषमा,ये सुषमा.किती वेळा हाक मारतोय मी?"

अमेयची आई म्हणजे सुषमाताई धावत आल्या,"काय झाले दादा?काही हवे आहे का?"

आता गंगाधर पंत चिडले,"मला काही धाड भरली नाहीय. चिरंजीव बघा कसे वागत आहेत?"

सुषमाबाई काही बोलणार इतक्यात आजी बाहेर आली,"सुषमा,तू जा आवर तुझे.पंत अहो ह्या आजकालच्या मुलांना नाही पटत हे.शिवाय ते गाणं लिहिणाऱ्याने वेगळ्या भावनेने लिहिले आहे."

पंत हसले,"कावेरीबाई आम्ही सगळे अनुभवले आहे.आपल्या अवतभोवती असणाऱ्या सुप्त काळया शक्ती अशा प्रकारे आपल्याकडे खेचल्या जातात."अमेय मात्र आजोबांचे आपले काहीतरीच असे बोलून खांदे उडवत निघून जातो.


कावेरीबाई पंतांना समजावतात,"अहो,ह्या नवीन पिढीची विचार करायची पद्धत वेगळी.त्यांना कोणतीही गोष्ट अनुभव आल्याशिवाय पटत नाही.तुम्ही चिडत जाऊ नका सारखे."

ही अशी आजोबा - नातू जुगलबंदी रोज कशावरून तरी होत असे. सुषमा ऑफिसला जायला निघाली.अमेय आणि वर्षा कॉलेजला गेले.गंगाधरपंत गॅलरीत विचार करत बसले होते.संध्याकाळी अमेय उत्साहाने बडबडत घरी आला.

कावेरीबाईंना हाक मारली,"आजी,ये आजी लवकर बाहेर ये.\"

कावेरीबाई बाहेर आल्या,"अमेय अरे काय झालं?एवढे कशाला नाचतोय?"

अमेय पुन्हा आनंदाने सांगू लागला,"आमची ट्रीप जातेय कोकणात देवगड, रत्नागिरीला."

हे ऐकताच कावेरीबाई शांत झाल्या.येणाऱ्या वादळाची त्यांना कल्पना आलीच.पंत बाहेर आले,"अमेय,काहीही झाले तरी मी तुला जाऊ देणार नाही म्हणजे नाही."

आता मात्र अमेय हट्टाला पेटला,"माझे सगळे मित्र जाणार आहेत.का जायचे नाही ह्याच कारण सांगा नाहीतर मला जाऊ द्या?"

गंगाधरपंत गप्प झाले आणि कावेरीबाईंकडे पाहू लागले.अमेय परत म्हणाला,"आजोबा,आजी मला कारण सांगा नाहीतर जायला परवानगी द्या."


पंतांनी डोळे पुसले,"अमेय,आज ती वेळ आलीय.तुला सगळे सांगायला हवे.आपले घराणे कोकणातील नामांकित घराणे.आपल्याकडे काही विद्या अशा होत्या ज्यामुळे अनिष्ट शक्तींना थांबवता येत होते."

अमेय म्हणाला,"काय?आपण कोकणातील आहोत?"

पंत पुढे सांगू लागले,"हो,तर अशा अनिष्ट शक्तींना थांबविण्यासाठी असलेली विद्या परंपरेने घरातील ज्येष्ठ मुलाला दिली जाई.तुझा बाबा तुझ्यासारखा नेहमी प्रश्न विचारत असे.एक दिवस मात्र घात झाला आणि श्रीरंग कायमचा गेला. तेव्हापसून मी कोकण सोडले आणि ठरवले की ही विद्या माझ्याबरोबर संपेल."


एवढे बोलून पंत गप्प झाले.कावेरीबाई पुढे म्हणाल्या,"अमेय भास - आभास माहित नाही पण आम्ही ते दुःख अनुभवले आहे.आता परत ते नको."

अमेय शांत झाला,"आजोबा तुमच्या अनुभवाचा आदर करतो पण प्लीज माझे काही क्षण त्यामुळे हातातून जातात."

आता पंत शांत झाले,"ठीक आहे,तू जा.पण मी काही सूचना देईल त्या पाळायच्या असे वचन दे."

अमेयने आजोबांना होकार दिला.कावेरीबाई मात्र चिडल्या,"तुम्ही का परवानगी दिली त्याला?"पंत म्हणाले,"कावेरी काही संकेत आहेत.आपण त्याला टाळू शकत नाही."


ह्यावेळी सुषमा सुद्धा अमेयला पाठवायला खुश नव्हती.अमेय मात्र आनंदात होता.जायची सगळी तयारी केली.आजोबांनी त्याला हाक मारली,"अमेय,मी तुझे ऐकले आता माझ ऐकशील?"


अमेयने मान डोलावली.आजोबांनी अमेयच्या हातावर धागा बांधला.त्याचा हातात लाल कपड्यात गुंडाळलेली एक वस्तू दिली,"ज्यावेळी तुला माझी सर्वाधिक गरज वाटेल त्याच वेळी खोल."


अमेयने काहीही प्रश्न न विचारता ती वस्तू बॅगेत ठेवली.सुषमा आणि कावेरीबाई सतत अमेयला सांगत होत्या,"एकटा कुठे बाहेर पडू नकोस.मित्रांबरोबर रहा."

अमेय सगळ्यांचा निरोप घेऊन निघाला.शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणून पंधरा ते वीस जणांचा गट चालला होता.सगळेजण गाणी म्हणत,चेष्टा मस्करी करत प्रवास करत होते.खाली कोकणात उतरायला दुपार टळून गेली होती.सगळेजण सुस्तावले होते.गाडी संथ लयीत चालली होती.अचानक धक्का लागून गाडी थांबली.मोठा आवाज झाल्याने सगळेजण जागे झाले.



अमेय कानात ईअर पॉड टाकून गाणी ऐकत होता.नेमके आवडते गाणे सुरू झाले.आभास हा....आणि गाडी बंद पडली.अमेय जरा नाराज झाला.सरांनी ड्रायव्हरला विचारले,"काय झालेय?"

ड्रायव्हर म्हणाला,"पाटा तुटलाय,दुरुस्ती करावी लागेल."

चौकशीअंती मेकॅनिक आणायला किमान पंचवीस किमी जावे लागणार होते.शिवाय दुरुस्ती मोठी होती.शेवटी आज मुक्काम ह्या कोकणातील गावात करायचा असे ठरले.एवढ्या लोकांची सोय होईल असे एकच ठिकाण होते.ते म्हणजे गावातील गणपती मंदिर.गावकऱ्यांनी मुलांची सोय केली.तिथे शेजारीच एक वाडा होता.

अमेयने वाडा पाहून सहज विचारले,"हा वाडा कोणाचा आहे?कोणी रहात नाही का इथे?"तेवढ्यात एक म्हातारी म्हणाल,". झिला तुका काय करूका हाय ,कित्यात जास्त चौकश्या करतला तू. आन रात्री मंदिरातच रवा.बाहेर येऊ नका."


सगळ्या पोरांनी म्हातारीची टिंगल केली.जेवण होऊन गाव नऊ वाजता गुडूप झोपी गेला.


इकडे मंदिरात सगळे मस्त गप्पा मारत होते.तेवढ्यात मनोज म्हणाला,"सर,जरा बाहेर चांदण्यात बसू.मस्त जुनी गाणी म्हणू या."

सगळेजण तयार झाले.तेवढ्यात दिव्या म्हणाली,"अरे पण गावातील लोक म्हणाली ना की बाहेर जाऊ नका."


तसे सगळेजण हसायला लागले.सगळ्यांनी बाहेर ओट्यावर आपापल्या जागा पकडल्या.मस्त जुनी मराठी गाणी सुरू झाली.संजनाचा आवाज छान होता.तिने गाणे सुरू केले,"सजणा का धरिला परदेस."


सगळे तल्लीन होऊन ऐकत होते.इतक्यात अमेयला कोणीतरी कानात कुजबुजत आहे असे वाटले,"श्रीरंग, आलास तू.किती वाट पाहिली."


अमेय दचकून इकडे तिकडे पाहू लागला.इतक्यात समीर दुसरे गाणे म्हणू लागला,"हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी."

अचानक वाड्यातील झाडांची पाने सळसळ करू लागली.तितक्यात एकजण म्हणाला,"हा वाडा किती सुंदर आहे.पाहूया का रे?"दुसरा म्हणाला,"नको,अनोळखी ठिकाणी कशाला जायचे."

इतक्यात एकजण ओट्यावरून उतरून वाड्याकडे चालू लागला.पाठोपाठ आणखी चारपाच जन गेले. दहा पंधरा मिनिटे झाली तरी ते परत येईनात.तेव्हा सगळेजण वाड्याच्या कुंपणाजवळ आले.अमेय म्हणाला,"सम्या चेष्टा बस.या लवकर."

समीर स्तबध उभा होता.समोर एकटक पहात.इतक्यात पुन्हा आवाज आला,"ह्यावेळी नाही हा श्रीरंग.मागील वेळी पंतांची पुण्याई कामी आली."

अमेयला कळेना हा भास आहे की सत्य.एवढ्यात मनोज ओरडला,"वाचवा,इकडे बघा."

कोणाला काहीच दिसत नव्हते.आत गेलेले पाच जण जणू त्या वाड्यात कैद झाले होते.सरांनी आत जायचा निर्णय घेतला.अमेय म्हणाला,"सर थांबा.मीसुद्धा येतो."


अमेयने बॅग बरोबर घेतली.सर आणि आणखी चारजण आत आले.समोरचे दृश्य पाहून सर जागेवर थांबले.समोरच्या झोपाळ्यावर ती बसली होती.अंगात चंद्रकळा,केसांचा खोप,अप्रतिम सौंदर्य.फक्त तिचे डोळे.....सरांच्या तोंडून फक्त "अमेय ती!"

एवढेच बाहेर पडले.अमेय मात्र पूर्ण भानावर होता.इतक्यात.अमेयला आजोबांची आठवण झाली.
एवढ्यात ती अतिशय मधाळ आवाजात गाऊ लागली.
आभास हा....छळतो तुला....छळतो मला......


समीर ओरडला,"सर,श्वास कोंडतोय वाचवा."


अमेयने बॅग उघडली.लाल कपड्यात बांधलेली वस्तू बाहेर काढली.ती एक छोटीशी पोथी होती.इतक्यात ती अमेयसमोर उभी राहिली.अमेय मनातून घाबरला.इतक्यात अमेयच्या कानात आवाज आला,"घाबरू नको बाळा.वीस वर्षांपर्वी आप्पांनी सांगितलेले मी ऐकले नाही.तुझ्याजवळ ते कवच आहे."


अमेयने पोथी उघडली.त्यात काही मंत्र दिले होते.ती खदाखदा हसू लागली,"मंत्र म्हणालास तर ह्या सर्वांना मारून टाकेल. हातात असलेला धागा सोड."


तेवढ्यात परत आवाज आला,"अमेय,धागा सोडू नकोस.मंत्र म्हणायला सुरुवात कर."



अमेयने तिच्याकडे पाहिले आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली.तिने फास आवळला.मनोज ओरडला,"मेलो,मेलो.वाचवा."


एवढ्यात अमेयला तो आवाज सांगत होता,"काहीही होऊ दे.थांबू नकोस."



अमेय जोरात पोथी वाचू लागला.जसजसे मंत्र घुमू लागले ती एका जागी स्थिर बांधली गेली.हळूहळू तिचा अचेतन देह जळू लागला.पोथी पूर्ण होताच.एक प्रचंड किंकाळी घुमली.अमेय थांबला.


त्याच्यासमोर एक आकृती साकार झाली,"अमेय,आज तू आपल्या घराण्याची लढाई जिंकलीस.कित्येक शतके ह्या चेटकीनीला हवा होता सिद्ध घराण्यातील पुरुष.तिचा अघोरी वंश वाढायला.तुझ्यासारखा मीही तारुण्यात चूक करून बसलो.इथे आल्यावर चूक कळली.सुटकेचा मार्ग नव्हता.तिला यशस्वी होऊ द्यायचे नव्हते.मी स्वतः ला संपवून तिला तसेच अतृप्त ठेवले.तिने माझा आत्मा कैद केला."


हळूहळू ती आकृती धूसर होत गेली.अमेयने पटकन पोथी बॅगेत ठेवली.


समीर पहिल्यांदा भानावर आला,"अम्या,इथे...."


तेवढ्यात सर म्हणाले,"अमेय,इथे ती होती."


अमेय हसला,"सर ह्या कोकणातील गूढ वातावरणामुळे आणि गावकरी तसे म्हणल्याने तुम्हाला भास झाला असेल.इथे काहीच नाही."


सगळेजण वाड्याबाहेर पडत होते.त्याचवेळी पंतांचा फोन आला.अमेय फक्त एवढेच म्हणाला,"आजोबा,भास आणि आभासाच्या पलीकडे बरेच काही असते."


अमेयने फोन ठेवला.इकडे दिव्या गाणे म्हणत होती,"आभास हा.....छळतो तुला....छळतो मला...आभास हा....आभास हा..."अमेय मंद हसला आणि त्याने रिंगटोन बदलून गायत्री मंत्र असे सेटिंग केले.शांतपणे अमेय वाड्यातून बाहेर पडला.