"महाराणी उठल्याच नाही वाटतं अजून. हिच्या आईने हिला काही शिकवलं की नाही देवच जाणे?" चहाचं पातेलं किचन ओट्यावर आपटत सकाळी सकाळी मीना ताईंची बडबड सुरू झाली.
"आपले चिरंजीव उठले का गं मीना?" तितक्यात केशवरावांनी प्रश्न केला.
"एवढ्या सकाळी त्याला उठून कुठं पाठवायचंय? त्याच्या वेळात उठेल तो." रागातच मीना ताईंनी प्रतिप्रश्न केला.
"याचा अर्थ तूही तुझ्या लाडक्या लेकाला काही शिकवलेलं दिसत नाहीये." केशवरावांनी बायकोला बरोबर टोमणा मारला.
"काही शिकवलं नाही म्हणजे? नेमकं म्हणायचंय तरी काय तुम्हाला?"
"मला काय म्हणायचंय ते तुला बरोबर समजलंय. कारण तितकी हुशार तू नक्कीच आहेस."
केशवरावांच्या अशा उलट बोलण्याने मीना ताईंचा संताप होत होता.
'माझ्या अशा बोलण्याने मीनाला ती करत असलेल्या चुकीची जाणीव तरी होईल आणि आपल्या घरात सुख, समाधान शांती नांदेल.' असे मनोमन केशवरावांना वाटत होते.
"मी तुम्हाला आजच क्लिअर करते हा, आतापासूनच सुनेला डोक्यावर घेऊ नका."
"मी काय चुकीचं बोललो गं? अपेक्षा ह्या फक्त सूनेकडूनच ठेवायच्या का? 'आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कारटं,' असं कशाला वागायचं मी म्हणतो."
"मी असं काहीही वागलेले नाही आ. पुढे जाऊन मिरे वाटेल ती आपल्या डोक्यावर. तसे होवू नये म्हणून आधीच शहाणं झालेलं बरं."
"मग सुमित सुद्घा अजून उठला नाही हे नाही दिसत तुला पण समिधा उठली नाही हे कसं पटकन् लक्षात आलं तुझ्या."
"अहो एका सुनेचे कर्तव्यच असते ते. नको सासूच्या आधी उठू देत, पण सासू किचनमध्ये यायच्या आधी सुनेने ॲटलिस्ट बेडरूम मधून बाहेर तरी यावं. ही एका सासूची अपेक्षा असूच शकते ना आणि तसंही मुलीला सासरी पाठवताना तिच्या आईने तिला इतकी समज तर द्यायला हवीच ना."
"अगं पण नवीन जोडपं आहे ते. हे त्यांचे गुलाबी दिवस आहेत. रात्री त्यांना झोपायला उशीर झालेला असू शकतो, इतकं सासूनेही समजून घ्यायला हवंच ना मीना आणि तसंच जर असेल तर मुलगा मुलगी एक समान म्हणणारे आपण सून आणि मुलामध्ये तरी का भेदभाव करावा? सून देखील कोणाची तरी मुलगीच असते ना, याची जाणीव असायला हवी आणि नसेलच हे पटत तर दोघांनीही सोबतच उठून बाहेर यायला हवं ना. पण गेल्या काही दिवसांत मी बघतोय आपले चिरंजीव आठच्या ठोक्यालाच बाहेर येतात आणि साडे नऊच्या ठोक्याला घराबाहेर पडतात. हे छान आहे आ. मग तूच बघ आता कोणाच्या आईने कोणाला किती वळण लावलंय ते."
"हो का...पुरे करा आता. उगीच असं बोलून माझं डोकं फिरवू नका आणखी. मी जेव्हा सून बनून ह्या घरात आले तेव्हा कुठे होते, तुमचे हे विचार? तुमची आई मला जेव्हा टोमणे मारायची तेव्हा कुठे गेला होता हा समजूतदारपणा? तेव्हा नाही का जाणीव झाली तुम्हाला तुमच्या आईच्या चुकीची." मीना ताईंनी रागातच केशव रावांवर प्रश्नांचा भडीमार सुरु केला.
"अच्छा...आता येतंय माझ्या लक्षात. म्हणजे माझी आई तुला टोमणे मारायची, या गोष्टीचा बदला घेत आहेस तर तू. तेही तुझ्या सूनेकरवी."
"हो घेत आहे मी बदला. तुम्हाला काही प्रॉब्लेम?"रागातच मीना ताई बोलल्या.
"जेमतेम दिड महिनाच झालाय गं घरात सून येवून. तिला रुळायला थोडा वेळ तरी दे अगं."
"रुळण्यासाठी मॅडमने घरात तर असायला हवं ना. आधी लग्न मग नंतर हनिमून टूर आणि आता काय तर तिचं ऑफिस. कधी आणि कसा वेळ देवू तिला रुळायला? हे तुम्हीच सांगा आता मला." पुन्हा एकदा मीना ताईंचा स्वर उंच झाला.
तेवढ्यात समिधा म्हणजेच केशवराव आणि मीना ताईंची एकुलती एक सून तिथे आली.
" गुड मॉर्निंग बाबा... गुड मॉर्निंग आई."
"गुड मॉर्निंग बेटा. हॅव अ गुड डे."
असे केशवरावांनी बोलताच मीना ताईंनी त्यांच्यावर एक रागीट कटाक्ष टाकला.
"आई...तुम्हालाही गुड मॉर्निंग म्हटलं."
मीना ताई मात्र काहीही न बोलता हातातील काम करत राहिल्या. समिधाच्या हे लक्षात आले.
"काय करताय आई? सॉरी हा मला थोडा उशीरच झाला उठायला. ते रात्री ना उशिरापर्यंत काम करत बसले होते त्यामुळे जरा उशीरच झाला. पण तुम्ही काळजी करू नका मी पटकन् आवरून येते आणि तुम्हाला मदत करू लागते." असे बोलून समिधा निघून गेली.
'सासू चिडलेली असताना आपण चुकूनही प्रतिउत्तर द्यायचं नाही. चुकून काही गोष्टी कानावर पडल्याच तर एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायला शिकायचं. पण आपलं चुकत असेल तिथे दुरुस्तीची तयारीही ठेवायची. जुन्या गोष्टी बदलून नव्या रुजवताना मोठ्यांची परवानगी घेऊनच काय ते करायचे, कारण त्यांनी आखलेल्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी उद्देश हा असतोच. असं सहजासहजी त्यात बदल कोणालाही अपेक्षित नसतो.'
सासरी येताना संजीवनी ताईंनी लेकीला अशा काही गोष्टी सांगितल्या होत्या त्याचेच ती पालन करत होती.
सासरी येताना संजीवनी ताईंनी लेकीला अशा काही गोष्टी सांगितल्या होत्या त्याचेच ती पालन करत होती.
"अहो सौभाग्यवती...काही आठवतंय का? तुम्ही लग्न करून जेव्हा या घरात आला होतात, माझी आई जेव्हा तुम्हाला टोमणे मारत होती तेव्हा तुम्हीही बदल्यात तिचा राग राग करत होत्या. त्यामुळे दोघींचे सुर जुळण्याआधीच बिघडले हो. पण समिधाचं तसं नाही बरं का. खूप लाघवी मुलगी आहे ती."
"गप्प बसा हो...मला जितका तिचा राग आलाय ना त्यापेक्षा जास्त राग तुमचा येत आहे. प्लीज जा बरं तुम्ही इथून. उगीच कारण नसतानाही भांडण व्हायचं आपल्यात आणि मला ते नकोय."
"नकोय ना...म्हणूनच मी म्हणतोय, थोडं सबुरीने घे. उगीच आतातायीपणा करू नकोस. थोडा आणखी वेळ दे समिधाला. उगीच आल्या आल्या तिच्या पायात सासुरवासाच्या बेड्या अडकवू नकोस. छान मुलगी आहे ती. तिच्या फक्त चुका शोधण्यापेक्षा चांगल्या गोष्टी शोध तिच्यात. आपल्या घराच्या शांतीसाठी आणि प्रगतीसाठी तेच गरजेचे आहे सध्या. येतंय का लक्षात? नसेल लक्षात येत तर थोडा शांत डोक्याने विचार कर. आणि हो...चहा उकळलाय बघ तो, नाहीतर उतू गेला तर त्याचा राग पुन्हा सुनेवर नाहीतर माझ्यावर काढशील."
बायकोला समजूतदारीच्या चार गोष्टी सांगून केशवराव बाहेर निघून गेले. आता मीना ताईंना जाणीव होईल का, त्या कुठे चुकत आहेत याची? पाहुयात पुढील भागात.
क्रमशः
(जलद लेखन - सप्टेंबर २४
विषय - जाणीव)
विषय - जाणीव)
©®कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा