Login

इवला स्पर्श

इवला स्पर्श


इवल्या बोटांचा स्पर्श
मन माझे हेलावते
प्रतिबिंब त्याचवेळी
नेत्री तुझ्या तरंगते

इवल्या हातांचा स्पर्श
अंतरीचें आक्रंदन
कळे तुझ्या अंतराला
भेटतांच कणकण

इवल्या श्वासाचा स्पर्श
माझ्या हृदींचे स्पंदन
साथ कसे करी त्याला
मुकपणे माझे मन

इवल्या ओठांचा स्पर्श
फुले मोहोर आनंदी
करि वृष्टि चित्त तुझें
मधुमादक सुगंधी

इवल्या डोळ्यांचा भाव
न बोलता तुला कळे
तुझ्या माझ्या मिठीतूंन
तुझें गुज मला मिळे

इवल्या हातांचा विळखा
अमृतधारां ह्या जिव्हेसी
हासे भविष्य हे नेत्री
मन मोहरे सुवासी

इवल्या बोलाच लडिवाळ
जणू मधू पखरण
मधानें न्हाऊन रे बाळा
प्रसन्न होई उन्मन

इवल्या पावलांचा पदरव
जणू सडा प्राजक्ताचा
बाळ खेळ कल्पनेचा
आस्वाद गंधर्व गायनाचा

इवल्या मूर्तींत सांठवि
खेळ आग - पाण्याचा
आभाळाची माया, धरेची काया,
पवनी खेळ मांगल्याचा
(पंचमहाभूते प्रत्येक व्यक्तीत अगदी जन्मतः वास करतात.)