कोसळणारा पाऊस.. तुझ्या-माझ्या मनातला

Its Raining
सुवर्णाचा स्वभाव तापट आहे म्हणे! नवरा-मुलं बिच्चारी! इतक्या धाकात ठेवलीत तिनं !
एकदा कानफाट्या नाव पडलं की पडलंच! तिच्या रागीटपणाच्या दंतकथा नातेवाईकांमध्ये प्रसिद्ध आहेत!

तिच्या अन् सतीशच्या लग्नाच्या पंचवीसाव्या  वाढदिवसानिमित्त सगळे नातेवाईक जमलेत. सगळ्यांसमोर सतीशनं आपलं मनोगत व्यक्त केलं. सुवर्णानं खंबीर भूमिका घेतली म्हणून त्याच्या उधळपट्टीला आळा बसला अन् तो थोडीफार आर्थिक बचत करू शकला. तिच्या शिस्तीमुळंच त्यांच्या मुलाला लागलेली वाईट संगत सुटली अन् तो योग्य मार्गाला लागला. तिनं वेळेवर कठोर भूमिका घेतली नसती तर मुलीचं कोवळ्या वयातलं प्रेमप्रकरण तिच्यासहित कुटुंबाला उध्वस्त करून गेलं असतं.

सगळ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात सुवर्णाच्या खंबीर स्वभावाला दाद दिली अन् इतकी वर्षे दाबून ठेवलेला हुंदक्यांचा पाऊस अश्रूच्या रूपात कोसळू लागला!

*************************

रात्रीचे आठ वाजलेत.सुनीताबाईंच्या सतत येरझाऱ्या सुरु होत्या. कोविडमुळे श्वसनंयंत्रणा निकामी झाल्याने अत्यवस्थ झालेला त्यांचा एकुलता एक मुलगा अभय गेले दोन महिने रुग्णालयात उपचार घेत होता. आज त्याला घरी जाण्याची परवानगी मिळाली.

तब्बल दोन महिन्यानंतर त्याच्या घरी येण्याची सुनीताबाई आणि त्याची नववधू माधवी दोघीही आतुरतेने वाट पहात होत्या.


इतक्यात घरासमोर कार थांबली.त्यातून अभयला बाहेर पडताना माधवीनी पाहिलं आणि धो-धो कोसळणाऱ्या पावसाची फिकीर न करता ती त्याच्या स्वागतासाठी अंगणात धावली.

"अगं अगं भिजशील पावसात ...." खिडकीतून माधवीला हाक मारताना फाटकाचे दार उघडून अंगणात आलेल्या अभयकडे पाहिले मात्र...
बाहेरचा पाऊस दोघींच्या डोळ्यातून आनंदाश्रू बनून बरसू लागला !!

*************************

लग्नानंतर सहा महिन्यातच एका पावसाळी रात्री तिला तिच्या नवऱ्यानं दारूच्या नशेत क्षुल्लक कारणावरून घराबाहेर काढलं. ती रडली-भेकली तेव्हा तिला त्यानं घरात घेतलं पण तेव्हापासून तिच्या मनात पावसाळी रात्रीची भीती बसली ती बसलीच. रात्री पाऊस पडत असला की ती अजूनही भेदरून जाते.

आता मात्र काळ पालटला होता. चाळीस वर्षांपूर्वीचा तिचा विक्षिप्त, दारुडा नवरा आता गलितगात्र वृद्ध झाला होता. परावलंबी आयुष्य जगत असताना त्याला पदोपदी त्याच्या चुकांची आठवण येई अन् तो सतत तिची क्षमा मागत राही.

त्याच्यावरच्या प्रेमामुळे म्हणा किंवा दुसरा पर्याय नाही म्हणून म्हणा तिनं त्याला मनापासून माफ केलं अन् स्वतः हताशपणे खिडकीतून कोसळणाऱ्या पाऊसधारांमध्ये स्वतःचं हरवलेलं तारुण्य शोधण्याचा प्रयत्न करू लागली !

*************************