वादा रहा सनम ( भाग ११)

वादा रहा सनम, होंगे जुदा न हम
वादा रहा सनम ( भाग ११)


निहार डॉ. भेटून आल्यावर खूप निराश दिसत होता. त्याला किरणने धीर दिला. पण ज्याच्यावर वेळ येते त्याच्या वेदना कमी होत नाहीत. मिहीरापण आता रडायची थांबत नव्हती. तिला बाळाला जवळ घेऊन आपल्या छातीशी कवटाळायचे होते. पण ते करता येत नव्हते. नुसते शेजारी झोपवून कुशीत घेऊन समाधान मानावे लागते होते. तिची आईच बाळाचे सगळे करत होती. मिहीराची अवस्था पाहून त्यांच्याही डोळ्यात पाणी येत होते. तर बाबांच्या मनाची चलबिचल होत होती. डोळे पुस्तक किरणने निहारचा निरोप घेतला. निहारचे बाबा मिहीरासाठी जप, पूजा वगैरे करून रोज तिच्यासाठी अंगारा घेऊन येत होते. निहार ऑर्थोपेडीक डॉ. च्या मागे मिहीराला बरे करण्यासाठी धावत होता. मिहीरामध्ये काहीही फरक नव्हता. आता तिला घरी नेणे आवश्यक होते.
" आई, मिहीराला आता घरी न्यायला हवे असे मला वाटते. मी मिहीराला आमच्या घरी नेतो. तिथे चोवीस तास नर्सची सोय करतो. आणि मी आहेच काही झाले तर शिवाय बाबा ही आहेत. " निहार म्हणाला.
" अहो, निहार तुम्ही आहात,नर्सची सोय कराल. सगळे बरोबर आहे. पण बाळाचे काय? इतक्या छोट्या बाळाला सांभाळणे सोपे नाही. तिला आमच्याकडे घेऊन जाऊ. तुम्ही आणि बाबा ही आमच्याकडे या. म्हणजे मी बाळाकडेही बघू शकेन आणि मिहीरा कडेही माझे लक्ष राहिल. " मिहीराच्या आईने असे सांगितल्यावर मिहीरा नेही तिला दुजोरा दिला. सतरा दिवसांनी निहारने मिहीरा आणि बाळाला तिच्या आईकडे नेऊन सोडले.

आईच्या घरी मिहीरा सुरक्षीत होती. तिला थोडे उठून बसता येत होते पण मांडी घालतात येत नव्हती अन्न जात नव्हते. त्यामुळे फार अशक्तपणा होता. बाळाला वाटी चमच्यातून दूध पाजणे, त्याची अंघोळ शू शी सार काही मिहीराची आई करत होती. हे सगळं करून त्या दमून जात होत्या, पण बाळाला दुसरे कुणी सांभाळणे त्यांना पटत नव्हते. मिहीराची आईची दमछाक सुद्धा बघवत नव्हती. तिने दोन्ही वेळेच्या स्वयंपाकासाठी बाई लावली.
दोन अडीच महिने बरे गेले. मिहीराचे औषध उपचार चालू होते पण काही फरक नव्हता. एक दिवस मिहीराला जास्त त्रास होऊ लागला. अशक्तपणा वाढला. तिला दवाखान्यात एडमिट करावे लागले. पुन्हा त्या ऑर्थोपेडीकला दाखवले. यावेळी त्यांना जरा निराळी शंका आली. त्यांनी निरनिराळ्या टेस्ट करायला सांगितल्या. आणि त्याची शंका ठरली. मिहीराच्या हिप जाॅइंटमधे टी. बी. चे इन्फेक्शन होते. डिलीवरी नंतर जवळपास तीन महिन्यांनी योग्य डायग्नोसीस झाले. पण हे का, कशामुळे हे मात्र कुणाला सांगता आले नाही. मिहीरला टी. बी. चे इन्फेक्शन झाले आहे हे ऐकून सारे हादरले, पण डॉ. त्यांची समजूत घातली. "एक वर्षाच्या औषध उपचारानंतर ती व्यवस्थित पूर्ण बरी होईल. टी. बी. हा काही आता असाध्य रोग राहिलेला नाही. तो निश्चित पूर्णपणे बरा होऊ शकतो. नको काळजी करून निहार. " डॉ. च्या बोलण्याने सगळ्यांचा मनातल टेन्शन उतरले. आठवडाभर मिहीराला दवाखान्यात ठेवून तिच्यावर योग्य ट्रीटमेंट सुरू झाली. आणि तिला औषधोपचार सुट झाल्या नंतर पूर्ण सुचना देऊन तिला घरी पाठवण्यात आले. तिला औषध सूट झाली होती पण त्या औषधांमुळे खूप पित्त होई, आणि मग तिला उलट्या होऊन तिचा सारा दिवस वाया जाई. तिला मनासारखे बाळाशी खेळता येत नव्हते, त्याला जवळ घेता येत नव्हते. कधीकधी तर तिला याचे इतके वाईट वाटे की तिला तिचे रडू आवरत नसे. नुसत रडून रडून ती स्वतःला त्रास करून घेई.
बघता बघता बाळ पाच महिन्याचा झाला. मिहीराची आई आणि निहारची आत्या दोघींनी मिळून घरातल्या घरात बाळाचे बारसे करायचे ठरवले. तोपर्यंत सोन्या, मन्या, गोलू, पिल्लू जो तो मनात येईल त्या नावाने हाक मारत होता. एक चांगला दिवस बघून त्याला पाळण्यात घालण्याचे ठरवले. प्रज्ञा आणि किरणने सगळी तयारी केली. छोटा हाॅल बघून जवळच्या नातेवाईकांच्या बोलावून बारशाचा कार्यक्रम झाला. बाळाचे नाव " निमोह" ठेवण्यात आले. मिहीरा कार्यक्रमात उपस्थित होती पण बिचारी काहीच करू शकत नव्हती. तिला व्हीलचेअर वर बसवून कार्यक्रम करून घेतला. प्रज्ञा सतत मिहीराच्या बरोबर होती.

अधूनमधून किरण आणि प्रज्ञा मिहीराला आणि बाळाला भेटायला येत होते. त्यांचा मिहीरा आणि निहारला खूप मोठा आधार होता. निहार रोज मिहीराला आणि बाळ निमोहला भेटायला येतच होता. पण आता तो त्याच्या बिझनेस बरोबर मिहिराचा " निमोह" वर्कशॉप पण बघत होता. मिहीराच्या आजारपण आणि बाळंतपणाच्या काळात त्याकडे दुर्लक्ष होत होते. सकाळी स्वतःचा बिझनेस आणि दुपारी निमोह अशी दुहेरी जबाबदारी तो सांभाळत होता. त्यामुळे त्याला कधीकधी त्याला मिहीराला भेटायला यायचे जमायचे नाही. शिवाय रोज रोज येणे ही त्याला थोडे ऑकवर्ड वाटत होते. त्यामुळे त्याचे येणे कमी होऊ लागले होते. कधी एकदिवसा आड तरी चार दिवसांत एकदा तो येत होता. मिहीराला त्याचे रोज न येणे मात्र आवडत नव्हते. त्यांचे रोज फोनवर बोलणे होई, पण तो घरी आला नाही की तिला राग येई. तो नक्की का येत नाही अशी शंका तिच्या मनात उत्पन्न होई. " निहारला आपण आवडत नाही का? त्याच्या आयुष्यात दुसरे कोणी आलंय का? " असे विचार तिच्या मनात येत. ती घाबरून जाई. आणि मग आणखीन बेसबरीने त्याची त्याच्या फोनची वाट पहात राही. तिने फोन केला की त्याची नेहमीची ट्यून वाजत राही. " वादा रहा सनम, होंगे जुदा न हम" ती ऐकली की तिला थोडे बरं वाटत असे पण. बराचवेळ टोन वाजूनही फोन उचलला नाही, की तिचा संताप होई. आणि मग तो सगळा राग निहारवर निघत असे. मग त्यांच्यामध्ये भांडण होई. त्यातही प्रज्ञा तिची समजूत घालत असे. पण त्याचा थोडाफार परिणाम तब्येतीवर होत असे. आता तिला वाॅकर घेऊन थोडे थोडे चालता यायला लागले होते. ती घरातल्या घरात थोडी फिरत होती. टी. बी. ची ट्रिटमेंट सुरू होऊन सहा महिने झाले होते. ट्रिटमेंट व्यवस्थित सुरू होती. पण अन्न कमी जात असल्यामुळे चेहरा पांढरा पडला होता. तेज दिसत नव्हते. परत तिला निहारने डॉ. कडे नेऊन आणले. डॉ. नी परत फिजिओथेरपी करायला सांगितली होती. त्याप्रमाणे ती सगळे करत होती.

निमोह आता नऊ महिन्यांच्या झाला होता. घरभर रांगत होता. थोडे थोडे सगळ्यांना ओळखत होता. जी दिसेल ती वस्तू उचलत होता. निहार आला त्याला चिकटायचा, त्याला बाहेर फिरवून आणायला लावायचा. निहारचे बाबा ही अधूनमधून येत होते. त्यांनाही निमोह व्यवस्थित ओळखत होता. त्यांना उचलून घेता येत नव्हते पण तो त्यांच्या बरोबर छान खेळायचा. मिहीराचे आईबाबांना तर चांगलेच ओळखत होता. बाबा त्याला निरनिराळे उपाय करून बसवायचे. मिहीराची आई म्हणजे त्याची सबकुछ झाली होती. जरा वेळ दिसली नाही की लगेच रडायला सुरुवात करायचा. त्याला ही चालता येण्यासाठी आता "वाॅकर" आणला होता. मिहीरा त्याच्याशी भरपूर बोलायची. तो ही आता " ताता बाबा दादा आया" अशी बडबड करायला शिकवा होता. त्याच्या असण्यामुळे मिहीरा आणि इतरांचा दिवस अगदी छान जात होता.


क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all