वादा रहा सनम (भाग ८)

वादा रहा सनम, होंगे जुदा न हम


वादा रहा सनम ( भाग ८)


आईबाबा आणि मिहीरा ठरल्याप्रमाणे निहारच्या बाबांना भेटायला गेले. तेव्हा निहार ची आत्या देखील आली होती. सर्वांनी मिहीरा व तिच्या आईवडिलांचे उत्तम स्वागत केले. आत्याने सगळी चोख तयारी केली होती.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मुख्य विषय काढून मिहीरा चे बाबा म्हणाले, " आम्ही व्यवस्थित लग्न करून देऊ. चार सोन्याच्या बांगड्या घालू, कानातले घेऊ. पण त्याहून जास्त जमेल असे वाटत नाही. मी साधा मध्यम वर्गीय माणूस आहे. "
" आम्हांला कोणतीच अपेक्षा नाही बाबा, तुम्ही नुसती नारळ मुलगी द्या. आम्ही पैशासाठी सोन्यासाठी हपापलेली माणसे नाही, आम्हाला सोन्यासारखी माणसे हवी आहेत. आणि तुमची मुलगी अगदी सोन्यासारखी आहे. तिने माझ्या निहार ला जपावे, सांभाळून घ्यावे एवढीच माझी इच्छा आहे. " पटकन निहारचे बाबा म्हणाले. "फक्त मला एवढेच वाटते की आम्ही घरातल्या घरात छोटासा साखरपुडा करतो. म्हणजे या दोघांना बाहेर फिरायला मोकळीक मिळेल. " एवढे निहारचे बाबा बोलताच आत्या आतून सगळी तयारी घेऊन आली. त्यांनी मिहीरा निहारच्या अंगठी सकट सगळी तयारी केली होती. मिहीराचे आईबाबा अवघडले. निहारचे बाबा लगेच म्हणाले, " फार काही नाही हो. फक्त दोघे अंगठी घालतील एकमेकाला, हार घालतील आणि पेढे. "
" पण मुलाची अंगठी, तुमचे मानपान आमच्याकडे असते ना. " मिहीराचे बाबा.
" अंगठी चे तेवढे द्या नंतर. एवढे काय त्यात. आणि आमचे कसले मानपान. जसे तुम्ही तसेच आम्ही. " निहारचे बाबा म्हणाले.
निहार आणि मिहीरा सोफ्यावर बसले. आत्याने मिहीराला हळदीकुंकू लावून तिची पाच फळांनी ओटी भरली. आणि तिला साडी दिली. अतिशय सुंदर अशी सोनकेशरी रंगाची, गुलबक्षी काठाची पैठणी. आत्या लगेच तिला साडी बदलण्यासाठी आत घेऊन गेली. साडी बदलून मिहीरा आली तेव्हा निहार तिच्याकडे पाहतच राहिला. साडी मिहीराला छान दिसते आहे की मिहीरामुळे साडी उठून दिसते हे कळत नव्हते. त्याचा जीव धडधडायला लागला.
मिहीरा येऊन सोफ्यावर बसली. निहारने तिच्या बोटात अंगठी घातली. मिहीरानेही निहारच्या बोटात अंगठी घातली. पेढा एकमेकांना भरवताना दोघांचा एकमेकाला झालेला स्पर्श दोघांचेही भान हरपून टाकत होता. दोघेही एकमेकांना डोळ्यांनीच काही म्हणत होते आणि मिहीरा च्या गालावर गुलाब फुलले होते. नाही म्हंटले तरी निहारच्या आत्यानी मिहीराच्या ओटी भरली, त्यांना साडी दिली. निहारच्या बाबांनी मिहीराच्या बाबांचा मान केला. एवढ्या सगळ्या प्रकाराने मिहीराचे आईवडील खजील झाले. निहारच्या वडीलांनी "पुढच्याच आठवड्यात तुमच्याकडे येऊ. " असा शब्द दिल्यावर त्यांना थोडे बरे वाटले. निहारची आत्या ही थोडे दिवस राहून त्यांच्याकडे येते म्हणाला.

थोड्यावेळाने दोघे सगळ्यांच्या परवानगी घेऊन बाहेर फिरायला गेले. कारमध्ये बसल्या पासून दोघांच्या गप्पा सुरू होत्या. निहार खूप भरभरून बोलत होता. " लग्नानंतर कुठे जायचे फिरायला? " निहारने विचारले.
" जाऊ आपण, पण बाबांचे काय? ते एकटे रहाणार का घरी? " मिहीरा.
" हो तो प्रश्न आहेच. पण आता मी त्यांना कुठे पाठवणार नाही. या वयात अजून दुःख नाही द्यायचे मला त्यांना. " निहार.
" हो. बरोबर आहे. मी एक आयडिया सांगू का? पैसे थोडे जास्त खर्च होतील, पण मीही साठवले आहेतच. " मिहीरा.
" पैशाचा काही प्राॅब्लेम नाही ग. तू सांग तरी. आपण बाबा आणि माझे आईबाबा सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ म्हणजे आपण फिरायला गेलो तरी आईबाबा बाबांच्या सोबत असतील. तसही माझे आईबाबा ही कधी कुठे फिरायला जात नाहीत. " मिहीरा.
" आपण हनिमूनला जाणार आहोत ना पण, तुला आवडेल इतरांची लुडबुड मधेमधे? " निहार.
" लुडबुड कुठे? फिरायला तर आपण दोघेच जाणार आणि रात्री आपली रूम वेगळीच असणारे ना! " निहारने तिच्याकडे पाहिल्यावर तिच्या आपण काय बोलून गेले हे तिच्या लक्षात आले आणि ती लाजली आणि दोन्ही हाताने चेहरा झाकून घेतला.
" आहाहा, क्या बात है! घायाळ केले मला. बघू बघू तरी ते गालावरचे गुलाब. " निहार तिचे हात काढत म्हणाला.
"ईशश ऽऽऽऽऽ, नको ना. मला कसतरी वाटते. " मिहीरा.
निहारने एका हाॅटेलपाशी गाडी थांबवली. दोघे आत जाऊन केबिनमध्ये जाऊन बसले. मिहीरा त्याच्या समोर बसल्यावर तो पटकन उठून तिच्या शेजारी बसला. तिचे हात हातात घेऊन म्हणाला, " माझ्या आयुष्यात आल्याबद्दल खूप खूप thanks. तुझी भेट झाली आणि माझे आयुष्य बदलून गेले. सुखाच्या सरी आता मलाही भिजवतील असा विश्वास आता मला वाटतो आहे. " आणि त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिने त्याच्या हातावर ओठ टेकवले. दोघांच्या हृदयाची गाडी एक्सप्रेस सारखी धाऊ लागली.
" वादा रहा सनम, अगदी आवडते आहे का? " मिहीरा.
" आहे आवडते पण तुझ्यासाठी. गाणी आवडतात ऐकायला. तुला नाही आवडत? " निहार.
" आवडतात. पण तुझ्यासारखे छान म्हणता नाही येत. " मिहीरा.
" आईबाबा खूश आहेत ना आता. " निहार.
" हो खूप. आता सारख निहार निहार चालू असते. माझ्यापेक्षा जास्त लाडका होणार आहेस तू बाबांचा. " मिहीरा.
" आणि तुझा. तुझा नाही का लाडका? " निहार.
मिहीरा गालातल्या गालात हसली. तिच्या लाजर्या गालावर निहारने आपल्या ओठांची मोहर उमटवली.
वेटर नाटक करून ऑर्डर घ्यायला. निहारने दोन काॅफीची ऑर्डर दिली. " मला कोल्ड काॅफी" मिहीरा म्हणाली.
"ओके, एक कोल्ड काॅफी, एक फिल्टर काॅफी. " निहारने वेटरला पाठवले. आणि परत मिहीराकडे चेहरा वळवला. मिहीराच्या काही लक्षात आले नाही. निहारने आपल्या गालावर बोट ठेवून तिला खूण केली. मिहीरा मानाने नाही म्हणाली आणि लाजून हासली. निहारने परत तिच्या गालावर ओठ टेकवले आणि तो समोर जाऊन बसला.

" रागवलास? " मिहीराने विचारले.
" नाही ग. वेटर येईल ना म्हणून इकडे बसलो. " निहार.
" लग्नाची खरेदी कुठे करणार आहेस? " मिहीरा.
" काय मी काही फार नाही करणार. बघू. " निहार.
" नाही हं. सगळे ड्रेस आपले मॅचिंग असणार आहेत. माझ्या बरोबर तूही करायची आहे शाॅपिंग. ए पुण्यात जाऊन करूया? " मिहीराचे ऐकून निहार हसू लागला.
" काय झाले हसायला? आवडले नाही. " मिहीरा.
" किती उत्साहाने बोलतीयेस. एवढी कशी energetic असतेस तू नेहमी. " निहार.
" हं. आणि खरेदी म्हंटले की जास्तच. " मिहीरा.
काॅफी घेऊन दोघे घरी निघाले. निहारने मिहीराला तिच्या घरी सोडले आणि तो घरी आला. रोज त्याचे फोनवर बोलणे होतच होते. रात्री मेसेज वर बोलणे व्हायचे. आता लग्नाची तारीख काढणे बाकी होते.

ठरल्याप्रमाणे निहार, त्याचे बाबा आणि आत्या मिहीराच्या घरी गेले. त्यांचे मिहीराच्या घरी खूप चांगले स्वागत झाले. मिहीराच्या आईने अतिशय चविष्ट असे बासुंदी पुरीचे जेवण केले होते आणि छान पंगत करून जेवायला वाढले होते. ताटाभोवती सुंदर फुलांच्या रांगोळ्या काढल्या होत्या. निहारच्या बाबांना आणि आम्हाला ते खूप आवडले. मिहीराच्या आईने इत्यादी साडी देऊन ओटी भरली. निहारच्या बाबांना आणि निहारला सुटींग शर्टींग देऊन त्यांचा मान केला. आणि आठवणीने निहारच्या अंगठी चे म्हणून पैसे निहारच्या बाबांना दिले. "अहो ह्याची गरज नव्हती. " निहारचे बाबा म्हणाले. नंतर बोलणी झाली आणि लग्नाची तारीख ठरली. बरोबर एक महिन्यानी लग्नाची तारीख होती. आणि आपले प्रेमवीर सुखस्वप्ने बघण्यात रमले होते.

क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all