वादा रहा सनम (भाग ४)

वादा रहा सनम, होंगे जुदा न हम
वादा रहा सनम ( भाग ४)


तो आई बाबांशी काही बोलू शकला नाही. कारण सतत त्यांच्या समोर निलम असायचीच आणि आईबाबाना शाॅक बसून काहीतरी अधिक उणे होईल अशी भीतीही निहारला वाटत होती. लग्नानंतर महिन्याच्या अंतराने लगेच निलमने आपल्याला दिवस राहिल्याचे डिक्लेअर केले. आईने आश्चर्याने निहार आणि निलमकडे बघितले. निहार मान खाली घालून निघून गेला. निहारच्या बाबांना मात्र राहवले नाही. ते तडक निहारच्या पाठोपाठ ऑफिस मध्ये जाऊन दाखल झाले. सुरवातीला निहारने उडवाउडवीची उत्तर देऊन टाळण्याचा प्रयत्न केला. पण एका क्षणी तो खूप असह्य होऊन बाबांच्या गळ्यात पडून रडला. आणि घडलेली सगळी हकीकत त्याने बाबांना सांगितली. बाबांना खूप धक्का बसला पण त्यानी स्वतः ला सावरले. आणि "आपण कोर्टात जाऊन लढू "असे सांगितले. पण निहार म्हणाला, " बाबा मी सगळी चौकशी करून बसलो आहे. आपण आत्ता काही करू शकत नाही. आणि त्यांच्याशी लढण्यासाठी अर्थिक ताकद देखील माझ्याकडे नाही आणि शारीरिक ही नाही. मला तुम्ही दोघे कायम माझ्या बरोबर हवे आहात. आईला यातील काही सांगू नका. तिला काही झाले तर मला सहन होणार नाही. " निहारने कशीबशी बाबांची समजूत घातली. बाबा निराश मनाने घरी आले. घरी आले तर निलम आणि तिची आई व बहीण हसत खिदळत होत्या तर निहारची आई पाहुण्यांसाठी चहा नाष्टा करत होती.

निहारच्या आईने कर्तव्य म्हणून निलमचे सगळे व्यवस्थित केले. निलम ही त्याच्या आई बाबांशी नीट वागत होती. पण एकंदरीत तिचा कौल मौजमजा करण्याकडे होता. घरातल्या कामात तिला अजिबात रस नव्हता. तिचे डोहाळजेवण झाले आणि लगेच आठ दिवसात तिची डिलिव्हरी झाली. मुलगा झाला. आईला फार आनंद झाला. पण मुलगा बघितल्यावर हा निहारच्या आईसाठी अजून एक धक्का होता. सातव्या महिन्यात होऊनही बाळ चांगले वजनदार होते. तब्येतीने अगदीच छान होते. " त्याचे डोळे पूर्ण घारे होते" त्याची आई पटकन म्हणाली, " कोणासारखे झाले बाई याचे डोळे? तू आणि निहार दोघांचेही डोळे घारे नाहीत"

निलम पटकन म्हणाली, " पप्पा, आमच्या पप्पांचे डोळे घारे आहेत. " निलम ला बाळाला बघितल्यावर "आकाशची" आठवण झाली. बाळ अगदी तंतोतंत आकाशसारखे दिसत होते. तिच्या डोळ्यात पाणी आले पण क्षणभरच नंतर तिने बाळाला निहारच्या आईकडे दिले आणि ती झोपून गेली. दवाखान्यातून आल्यावर आईंनी आपली शंका बोलून दाखवली. निहारचे बाबा काही न बोलता बाहेर निघाले होते पण आईने त्यांना आडवले आणि विचारले, " तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? कुठल्या काळजाचे आहात तुम्ही? आपली सून बाळंतीण झालीय, तिला मुलगा झाला तरी तुम्ही आणि निहार त्याला बघायला आला नाहीत आणि इतके दिवस आपला मुलगा आपल्यापासून काहीतरी लपवतो आहे, तरी सुद्धा तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? तुम्ही गप्प कसे राहू शकता? " आईचे हे प्रश्न ऐकून निहारचे बाबांच्या गळ्यात हुंदका दाटून आला. एक आवंढा गिळून त्यांनी आईना हात धरून खाली बसवले आणि स्वतःही बसले. आणि आईंना सर्व काही सांगितले आणि म्हणाले, "आपल्याला आणि आपल्या मुलाला पुर्णपणे फसवले आणि अडकवले आहे त्या लोकांनी. आपण काहीच करू शकत नाही. तिलाही कोणत्याही तर्हेने जाब विचारू शकत नाही. कारण तसे झाले तर ते डोमेस्टिक व्हायोलन्स ची केस करतील आपल्यावर अशी धमकी दिलीय त्यांनी. " हे सगळे ऐकून निहारच्या आईचे हातपाय गळून गेले. कसेतरी स्वतःला सावरुन त्यांनी जेवणे आवरली आणि खोलीत जाऊन पडल्या. त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रू धारा वाहात होत्या. संध्याकाळी देवाशी दिवा लावताना, त्याच्यापाशी प्रार्थना करताना त्यांना एकदम उचंबळून आले आणि त्या आडव्या झाल्या. दवाखान्यात नेऊन ट्रिटमेंट सुरू झाली. बी. पी. वाढले आणि हार्ट अटॅक आल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या होत्या. बाबा आणि निहारला आता त्यांच्या तब्येतीची काळजी वाटू लागली. पण इकडे निलम, तिच्या घरचे कुणीही त्यांना बघायला आले नाही. दोघीही शेजारच्याच दवाखान्यात होत्या. तीन दिवसांनी निहारच्या आईला शुद्ध आली. तेव्हा त्या फक्त निहारच्या चेहर्याकडे बघत होत्या. राहून राहून त्यांना आपल्या लेकाबद्दल वाईट वाटत होते. दहा दिवसांनी त्या घरी आल्या. आणि नेहमीप्रमाणे घरात वावरू लागल्या. निलम बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. ती घरी नाही तोपर्यंत ह्या सगळ्यावर नीट विचार करून एखाद्या वकीलांचे मार्गदर्शन घेऊन काहीतरी मार्ग काढायचा असे तिघांनी मिळून ठरवले. तिघेही आता थोडे शांतपणे विचार करू लागले. पण हेही त्यांच्या नशीबात नव्हते. पंधरा दिवस होत नाहीत तोपर्यंत निलमचे आईवडील घरी आले, त्यांना बारशाचे निमंत्रण द्यायला.
" तुमच्या मुलाचे बारसे ठरवले आहे. उगीच आमच्याकडून काही कमी नको व्हायला. " निलमचे पप्पा मुद्दामहून मोठ्या आवाजात बोलत होते. " निलम बाळंतीण झाल्यावर देखील तुम्ही आला नाही बाळ बघायला. "
निहार हसला आणि रागाने त्यांच्याकडे बघितले. ते शांतपणे हळू आवाजात म्हणाले, " मी काय करू शकतो हे माहीत नाही तुम्हाला अजून. मुकाट्याने बारशाला यायचे आणि येताना निलमला घरी घेऊन यायचे, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. "
" आणि नाही आणले तर" निहार म्हणाला.
" तर तुझ्या या म्हातारा म्हातारीला जिवंतपणी मरण यातना देईन आणि तुला तुझ्या पायावर उभे राहून देणार नाही. " निलमचे पप्पा. हे ऐकून निहारचे आई बाबा जागच्या जागी थिजून गेले. निहारने एका वकीलांचे मार्गदर्शन घेतले होते. पण त्यांनाही पप्पांना ह्यातून अंग काढून घ्यायला लावले. आता कोणताच उपाय सापडत नव्हता.
बारसे झाले. बाळ अनय आणि निलमला घेऊन सगळे घरी आले. त्यांच्या बरोबर एक बाॅडीगार्ड कम सेविका त्यांनी निलम बरोबर पाठवली होती. घरी आल्यावर निलमचे वागणे एकदमच बदलले होते. दिवसभर ती तिच्या खोलीत बसून राहात होती. घरातील सगळे काम आईला करावे लागत होते. शिवाय आई जरा दुपारी आडवी झाली की निलम अनयला आणून आईजवळ ठेवत असे व स्वतः जाऊन झोपत असे. त्या बाॅडीगार्डचे घारी सारखे सगळ्यावर लक्ष असे. निलम रोज आईला आर्डर सोडून तिला हवे तसे करून घेत असे. आणि जरा काही झाले की आईला मनाला येईल ते बोलत असे. बाहेरच्या समोर मात्र सगळ्यांशी अगदी गोड वागत असे. एक दिवस हे सगळे पाहून निहारचा संयम सुटला, तो निलमला म्हणाला, " ंकोणत्या जातकुळीतले आहात तुम्ही? आपल्या आईसमान सासूशी असे वागतात का तुमच्याकडे? माणसे नाही नरभक्षक आहात तुम्ही. " निहारचे बोलून व्हायच्या आत त्याच्या एक सणसणीत कानाखाली बसली आणि तो हेलपाटत जाऊन पडला. त्या बाॅडीगार्ड चा हात त्याच्या अंगावर पडला होता. त्याला पडताना बघून निलम हसत सुटली. त्याच्यासमोर बोट नाचवत म्हणाली, " हे शेवटच, पुन्हा जर माझ्यासमोर आवाज चढवला तर कातडी सोलून काढायला लावेन हिला. " निहार धडपडत उठला आणि बाहेर निघून गेला. झाल्या प्रकाराची आईबाबांनी मात्र चांगलीच दहशत घेतली. त्या दिवसापासून आतापर्यंत निहार बाहेर हाॅलमधे सोफ्यावर येऊन झोपत होता.

क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all