वादा रहा सनम (भाग ३)

वादा रहा सनम, न होंगे जुदा न हम
वादा रहा सनम ( भाग ३)

किरण निहारच्या ऑफिसमध्ये गेला. तेव्हा तो दुसऱ्या क्लाएंट सोबत मिटींग मध्ये होता. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. असे तीन चार दिवस झाले. शेवटी काही झाले तरी भेट घ्यायची असे ठरवून किरण ऑफिसमध्ये गेला त्यादिवशी निहार टूर वर गेल्याचे त्याला समजले. न राहवून किरणने रात्री निहारला फोन लावला. दोन तीनवेळा लावल्यावर निहार ने फोन घेतला.
" निहार तुला बोलायचे नाहीये का? " किरणने थोडे नाराजीनेच विचारले.
" नाही यार, तुझ्याशी का नाही बोलणार. मी तुला मित्र मानतो. त्यादिवशी पहिल्यांदा मी माझे मन तुझ्यासमोर मोकळे केले. तुझ्याशी कसे नाही बोलणार. " निहार.
" तू माझ्या बहिणीशी सुद्धा असे नको वागू. मी बहीण मानलयं मिहीराला. तिच्या डोळ्यात पाणी आले तुझ्यासाठी." किरण

" पण हे बरोबर नाहीये ना. मी परत अडकेन तिच्यात. खूप प्रेम करतो मी तिच्यावर, मनापासून. पण तिच्या चांगल्यासाठी तिच्या पासून लांब जातोय मी. " हे बोलताना देखील निहारची आवाज गहिवरला होता.
" बरोबर आहे निहार, पण. मला वाटते तू एकदा स्पष्टपणे बोल तिच्याशी. मग तुम्ही ठरवा काय ते. " किरण

रात्री मिहीराच्या फोनवर निहारचा मेसेज आला. " मी टूर वर आहे. दोन दिवसांनी परत आलो की बोलतो. " निहारचा मेसेज पाहून मिहीरा सुखावली आणि जवळजवळ आठदहा दिवसांनी तिला शांत झोप लागली. निहार परत आल्यावर किरण सोबत मिहीराला भेटायला आला. निहारला बघूनच मिहीराची कळी खुली होती. आता तिला पाय टेकवून थोडे चालता येत होते. पण मिहीराचे बाबा सतत समोर होते त्यामुळे त्यांना काही बोलता आले नाही. रात्री मिहीराने निहारला मेसेज केला. " कसे आहात? झोपलात का? " मिहीरा

" छान आहे. नाही झोपलो अजून " निहार.
" अजून काय चालले? एवढेच बोलायचे का? " मिहीराने निराश स्मायली टाकून विचारले. निहारला हसू आले.
" काय बोलणार? मला फार बोलता येत नाही. " निहार
" पण मला तुमच्याशी बोलायचे आहे. इतके दिवस तुम्ही माझ्या मागावर होता. आता मी तुमची वाट पाहते आहे. " मिहीराने टाकलेल्या मेसेज ला काहीच उत्तर नाही.
" तुमची इच्छा नसेल तर राहू देत. पण मी नाही राहू शकत तुमच्या शिवाय. नकळत मीही गुंतत गेले तुमच्यामध्ये. आवडलात तुम्ही मला. " मिहीरा.
" माझी इच्छा खूप आहे. पण ते शक्य नाही. माझे लग्न झाले आहे. मी वयाने मोठा आहे तुझ्यापेक्षा. तुझे आईवडील कधीच मान्य करणार नाहीत. " निहार.

" ते माझे आई बाबा आहेत. माझ्या सुखासाठी ते मान्य करतील. प्रश्न तुमचा आहे. तुम्हांला देखील माझ्यामध्ये खरचं इंटरेस्ट आहे का? तुम्ही त्यांना घटस्फोट देऊन माझ्याशी लग्न करायला तयार आहात का? मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमची वाट बघायला तयार आहे. " मिहीरा.

" आमच्यात कुठलेच नाते नाही. आमचे लग्न म्हणजे घोर फसवणूक आहे. मी कोणत्याही क्षणी तिला घटस्फोट द्यायला तयार आहे. पण ते शक्य नाही. ती माणसे फार वाईट आहेत. ती तुला पण त्रास दिल्याशिवाय रहाणार नाहीत. त्यांच्यामुळे मी माझी आई गमावली आहे. आता कुणाला गमावले तर मला सहन होणार नाही. ……..पण खरचं तू माझी होशील. मी फुलासारखे जपेन तुला. I love you sweetheart. " निहार.

" I love you Nihar. ". मिहीरा.
" आता फक्त पुढे काय करायचे ह्याचा विचार करा. आणि… " मिहीरा.
" आणि काय? "निहार.
" काही नाही. " मिहीरा गालात हसत.
" मला मिठीत घ्या असेच ना? " निहार
" गालावर गुलाब फुलले लज्जेने. आहा काय सुंदर दिसतायेत. इथूनही दिसतायेत मला खाऊन टाकावे वाटतायेत. " निहार.
" इंशश् काय हे? झोपा बरं आता. गुड नाईट. " मिहीरा.
" इतक्यातच. अजून मी गुलाब घेतले देखील नाहीत. " निहार
" अहो बास ना. चला मी झोपते आता. बाय" मिहीरा
" वादा रहा सनम, होंगे जुदा न हम. हसणारा स्मायली आणि गुड नाईट. " निहार खूप खुश होऊन हसत हसत झोपायला गेला. हाॅलमधे येऊन अंग झोकून देऊन तो सोफ्यावर पडून राहिला. आज त्याच्या आयुष्यातील सगळ्यात सुखाचा दिवस होता. लगेच झोप लागणे तर शक्यच नव्हते. निलम समोर टिव्ही बघत बसलेली असूनही तो हसत होता. निलम जितकी कुजकट होती तितक्याच कुजकटपणे म्हणाली. " आज काय आकाश गवसले वाटते? ". निहारने तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. त्याच्या आयुष्यात निलम आल्यापासून एकेक घटना त्याला आठवू लागल्या.

फ्लॅशबॅक

निलम आणि निहारचा दाखवण्याचा कार्यक्रम होता. फोटो वरून निहारला निलम आवडली होती. तो ती समोर येण्याची वाट बघत होता. निलम चहाचा ट्रे घेऊन आली. तो बघून हसला. ती हसलीच नाही. सगळ्यामध्ये बसून ती जांभया देत होती. चेहर्यावर वैतागलेले भाव होते. तिच्या वडीलांनी तिला निहारला घर दाखवायला सांगितले म्हणून ती उठली. निहारने गच्चीवर जाताच विचारले, " तुमच्या मनाविरुद्ध होतोय का हा कार्यक्रम? "
" नाही. पण मला असले तमाशे आवडत नाहीत. आणि झोप नाही झाली रात्री त्यामुळे खूप झोप येतीय." निलम पुन्हा जांभयी देत म्हणाली. निहारला खरे वाटले. दोघांची पसंती आली आणि लग्न झाले. लग्नाआधी ही दोघांची एकदाच भेट झाली तेव्हा, "माझे वडील खूप कडक आहेत. त्यांना असे भेटलेले आवडत नाही. " असे सांगितले. लग्नाच्या पहिल्या रात्री निलम अगदी तलम गाऊन मध्ये बसली होती. निहार जवळ येताच तिने हाताने तिला थांबण्याचा इशारा केला.
"मला बोलायचे आहे. " निलम.

" मी… … … माझे एका मुलावर प्रेम आहे. मी प्रेग्नंट आहे. त्याच्या मुलाची आई होणार आहे. " निलम.
" मग हे आधी का नाही सांगितले. मला का फसवले? " निहार रागाने लालबुंद झाला होता.
" मला वडीलांनी शपथ घातली आहे. " निलम.
" मी त्या मुलाशी तुझे लग्न लावून दिले असते. अजूनही देतो. सांग त्याचा नाव पत्ता. " निहार.
" पण मी असा राहू शकत नाही. मी आत्ता जाऊन बाहेर सांगतो. " निहार.
" थांबा, बाहेर तुमचे पाहुणे आहेत. उगाच सगळ्याची चर्चा होईल. " निलम.
निहार थांबला. मनातून फार जास्त नर्व्हस झाला. नाही म्हंटले तरी तो इतके दिवस निलमचा विचार करत होता. तिच्यात गुंतला होता. त्याने परत तिला त्या मुलाचा पत्ता विचारला.
" तो नोकरीसाठी मसकतला गेला आहे. दोन वर्षे तरी येणार नाही. " निलम खोटे मुसमुसत म्हणाली.
"म्हणजे? " निहारने डोक्यावर हात मारून घेतला. उशी पांघरूण घेतले आणि सोफ्यावर जाऊन पडला.
रात्रभर निहारला झोप लागली नाही. सकाळी उठून घरातली पूजा वगैरे आटपल्यावर तो सासरी म्हणजे निलमच्या घरी गेला. निलमच्या बाबांना जाब विचारायला. निलमच्या बाबांनी त्याच्यासमोर कागद टाकले आणि म्हणाले, " हे कागद नीट वाचा. लग्नाच्या आधी मी तुमच्या बिझनेस मध्ये काही रक्कम गुंतवली ती उगाच नाही. त्या कागदांच्या खाली हे अॅग्रीमेंटचे कागद आहेत, ज्यावर तुमच्या सह्या आहेत. आणि ह्याप्रमाणे तुम्ही निलमची आणि तिच्या होणाऱ्या बाळाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. आता तुम्ही काही करू शकत नाही. " निलमचे वडील आणि तिचा भाऊ एकमेकांकडे बघून हसत होते.
" तुम्ही फसवलयं मला. मी असा सोडणार नाही तुम्हांला. " निहारने त्यांना प्रत्युत्तर दिले आणि तो तिथून निघून आला. आपण पुरते फसवले गेलो आहोत या जाणिवेने तो पूर्णपणे खचून गेला. घरी येतच होता की घराच्या पायर्या चढता चढता जोरात चक्कर येऊन पडला. सगळे गोळा झाले. आईबाबांना लेकांची काळजी वाटू लागली. एकदम काय झाले त्यांना काही कळेना. कुणीतरी डाॅक्टरांना बोलावले. डाॅ. ना समजले होते की कसल्यातरी टेन्शन मुळे बी. पी. थोडे वाढले आहे. पण ते निहारच्या आईवडिलांना ओळखत होते. त्यांची तब्येत खराब होईल म्हणून त्यांनी फक्त उन्हामुळे चक्कर आली सांगितले. आणि इंजेक्शन दिले व झोपायला सांगितले निहारला. जाताना उद्या क्लिनीकला येऊन दाखवून जा सांगायला ते विसरले नाहीत. घरी आल्यावर निहार आई बाबांच्या खोलीत जाऊन झोपून राहिला. त्याला झोप लागली म्हणून आईबाबांनी उठवले नाही, पण आईच ती, काहीतरी चुकीचे घडले आहे हे तिने लगेच ओळखले.


क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all