ईती टी.व्ही.पुराण ( भाग तिसरा )

त्या काळात टी.व्ही. म्हणजे एक चैन होती. पण त्या टी.व्ही.मुळे घरात अजून मनोरंजक मालिका तयार होतं.

ईती टी.व्ही. पुराण ( भाग तिसरा )

संध्याकाळी ऑफिस मधून घरी आलो तर हॉल मध्ये टीव्हीच्या समोर प्रत्येक फुटावर वाट्या, चमचे, पोळपाट, घडी केलेल्या पँटी, बनियान, पाट्या, पुस्तकं अशा अनेक वस्तू घरभर शिस्तीत मांडून ठेवलेल्या होत्या. कुठंही रिकामी जागा राहिलेली नव्हती. पलंगावर, खुर्चीवर पण वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या होत्या. ज्यांच्या हातच्या पुरणपोळ्या सगळ्या चाळीत प्रसिद्ध होत्या त्या भीमाकाकूंचा पुरण वाटायचा पाटा आणि वरवंटा देखील भिंतीला टेकवून उभा करून ठेवलेला होता.

हा काय प्रकार आहे, असं मी विचारताच बायकोने समजावून सांगितलं की मी ऑफिस मध्ये असतांना चाळीच्या शांतता समन्वय कमिटीची बैठक झाली आणि त्यात रामायण मालिकेच्या वेळी बसण्याच्या जागेवरून  गडबड गोंधळ होऊ नये म्हणून प्रत्येकाने आपापली जागा निश्चित करून, त्या जागी दुसरं कोणी बसू नये म्हणून या आपापल्या वस्तू आणून ठेवल्या आहेत. नळावर नाही का लोकं बादल्या ठेऊन नंबर लावून ठेवतात तसं.

अरे, देवा आणि तू काहीच बोलली नाही यावर. सगळ्या घरभर या वस्तू कशा दिसताहेत.

अहो, अशी काय चिडचिड करताहात. एरवी कोण यायला बसलंय आपल्या घरी. जाऊ दया ना.

रामायण सुरु व्हायच्या आधी एकेक जण शिस्तीत आपापल्या जागी येवून बसलं. तरी काही बायकांच्या ताट वाट्यांची अदलाबदल झाल्याने थोडी हमारा तुमरी झाली. पण त्या ताटावर, वाटीवर लिहिलेलं नाव उजेडात वाचून शांतता समन्वय कमिटीने तो प्रश्न सोडवला तरी त्या बायका एकमेकींकडे चवताळून पाहात होत्या.

मी आपला पलंगावर उक्कड बसून रामायण पाहात होतो.कारण जागाच नव्हती. खिडकीमध्येही अनेक जणं उभे होते.

कैकयीने रामाला वनवासात पाठवायची आज्ञा देताच भीमाबाई चवताळल्याच, अग मेले तुझं पूर्ण वाटोळं होईल बघ.

त्यांच्या बाजूला एक बाई रामायण गुंग होऊन पाहात  बसली होती. तिला वाटलं की त्या तिलाच म्हणताहेत, मग ती काय मागे राहणार. माझं काय होईल ते होऊ दे, तू तुझं तोंड आवर आधी, नाहीतर तो पाटाचं डोक्यात घालते की नाही बघ.

ए ट्वळे तुला कोण बोललं ग. भीमाकाकूंचा आवाज प्रचंड मोठा होता.

ए गप्प बसारे.
त्या दोघीनाही बाहेर काढा.
ए मंथरे, आता तरी तोंड बंद ठेव ना.

सगळ्या बाजूने गलका सुरु झाला. भीमाकाकू संतापाने उठल्या त्या बरोबर त्यांच्या वरवंटा घरंगळत एका बाईच्या पायाला लागला. तिचा वेगळाच थयथयाट सुरु झाला.

मध्येच टीव्ही वर ऍडव्हटाईज सुरु झाली, कॅडबरी चॉकलेट आणि बोर्नव्हिटाची, काही लहान मुलांनी चॉकलेट पाहिजे म्हणून  एकदम भोकांडच पसरलं. त्यांना दुसरा काहीतरी खाऊ देऊन गप्प करावं लागलं.

त्या नंतर टीव्ही च्या कार्यक्रमाचा वेळ जसजसा वाढायला लागला तसंतसा लोकांचा मुक्कामही आमच्या घरात जास्त वेळ वाढू लागला. म्हणजे आजूबाजूचे शेजारी आता येतांना आपला नाश्ता, जेवण, खायचे पदार्थ पण सोबत आणून ठेवायला लागले. म्हणजे उगाचच येण्याजाण्यात वेळ नको जायला.

गल्लीभर चपला पसरतात म्हणून चाळ कमिटीने मला चपलांचं एक रॅक बनवून घ्या असा सल्ला दिला.

जेंव्हा पाहावं तेंव्हा आमच्या घरात माणसंच माणसं असतं. आमचं खाजगी आयुष्य पूर्ण नष्ट झालं. घरात राहून पण वनवास कसा असतो हे आम्हाला जाणवलं.

पण राम वनवासात जायला निघाले. आम्ही सगळे श्वास रोखून दुःखी अंतकरणाने हा प्रसंग पाहात होतो. तेव्हढ्यात कुठंतरी मोठ्ठा स्पार्क झाला. सगळे दिवे अचानक जास्त प्रकाशमान झाले. टीव्हीतून वेगवेगळे आवाज आले आणि सगळी कडे पडदाभर प्रकाशाचे  कणकण दिसायला लागले. थोडावेळाने ते कण कमी होतं होतं पडदा पूर्ण काळा झाला.

आता चाळ शांतता कमिटीने मला लवकरात लवकर टीव्ही दुरुस्त करून संस्कृतीवर्धापनाला हातभार लावावा अशी एक नोटीस दिली आहे. तूर्त घर आणि चाळ या दोन्ही आघाडीवर मी एक टीव्ही राम एकटाच लढतो आहे.

(इति टीव्ही अध्याय संपूर्ण )

🎭 Series Post

View all