Login

इथे भूतकाळ अजून जिवंत आहे:- भाग दोन

This Is A Story Of Four Friends Who Accidentally Reach To Location In A Jungle
इथे भूतकाळ अजून जिवंत आहे:- भाग दोन

एक सुनसान घर..जिथे अफाट शांतता होती!
विकी तिथे चालला होता आणि त्याच्या मागोमाग बाकी तिघे जण चालले होते.
काय घडते आहे हे कळत नव्हते आणि त्या कळण्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा ते नव्हते.
भुरळ पडल्या प्रमाणे ते फक्त त्या दिशेला ओढले जात होते. आपण किती चालत आहोत? आपली बाईक कुठे उभी आहे याचा विचारही कोणाच्या मनाला शिवला नाही. त्यांचे पाय त्यांना त्या घराच्या दिशेला ओढत नेत होते.
हे सगळेजण त्या घराच्या लोखंडी दरवाजा जवळ जात होते.

विकी सगळ्यात समोर होता तर त्याच्या खांद्याला धरून जितू पुढे जात होता. या दोघांच्या पाठोपाठ लक्ष्य आणि जय !
दरवाज्याला भलेमोठे लोखंडी कुलूप नजरेस दिसत होते तरीही लोखंडी दरवाजा उघडण्यासाठी विकी ने हात लावला आणि की कर्ररर आवाज करत ते दार आपोआप उघडले गेले. अचानक धुळीचा एक लोट गोल चक्राकार फिरून जोऱ्याच्या वाऱ्या सोबत त्यांच्यासमोरून नाहीसा झाला.
ते आत शिरले आणि मागचा दरवाजा अचानक बंद झाला. तसे कोणीतरी हसत दात विचकवल्यासारखा आवाज जितूला जाणवला आणि त्याची तंद्री भंगली.

ह्याला कळले की ते चौघेही त्या ओसाड किर्रर जंगलातील अनोळखी घराच्या वेशीत आले होते. त्याच्या हातपायला आता घाम सुटला होता. त्याने विकी चा खांदा खेचत त्याला जोरात मागे ओढले तेव्हा त्याचीही तंद्री भंगली.
त्या धक्क्याने जय आणि लक्ष्य सद्य परिस्थितीत आले.

एव्हाना हे आत आल्यावर दरवाजा आपोआप बंद झाला होता आणि त्यावर कुलुपही दिसत होते. हातपाय बधीर झाल्यासारखे वाटत होते इतकी भीती त्या तिघांना वाटत होती, त्याला अपवाद फक्त विकी चा होता!

"काय घाबरट आहात रे तुम्ही? कोणाला भेटल्याशिवाय मदत मिळेल का? चला व्हा पुढे" असे म्हणत त्याने घराच्या पायरीवर पाय ठेवला तसे पुन्हा काजव्यांसारखे काहीतरी चमकले आणि कोणीतरी हसल्याचा गूढ आवाज तिथे निर्माण झाला. पण त्यांना त्याची फारशी जाणीव झाली नाही. जयला मात्र आता इथे काहीतरी वेगळे जाणवायला लागले होते.

दरवाजा फक्त लोटलाच होता जो पटकन उघडला गेला. चौघेही आत आले, घरात कोणीही दिसत नव्हते. तिथे भलामोठा सोफा दिसला तसे जितू ने धडकन त्यावर अंग टाकले.
सोफ्याच्या उजव्या हातला टीपॉय होता ज्यावर एक फळांनी भरलेली वेताची बास्केट विकीला दिसली. भूक तर लागली होती, त्याने पटकन त्यातून एक केळ उचलले आणि खायला घेतले तसे जय ने त्याला अडवले.

"तुला नको असेल तर तू बस तसाच, मला भूक लागली आहे मी खाणार" असे म्हणत विकी ने ते केळे सोलून तोंडातही टाकले. खूप वेगळीच मधुर चव त्याला जाणवली आणि नकळत समाधान त्याच्या चेहऱ्यावर विलसले.
त्याचे बघून लक्ष्य आणि जितुही पुढे झाले पण जय मात्र घरात चालत थोडा पुढे गेला. त्या बाहेरच्या खोलीला लागून आत मध्ये एक रूम होती जिथे भले मोठे डायनिंग टेबल मांडलेले होते. त्या टेबल वर चार थाळ्या मांडल्या होत्या त्यात गुलाबजाम, मसाले भात, दही, पनीरची भाजी, कोफ्ता करी, चटणी, कोशिंबीर,पापड, आळूवडी, पोळ्या असे बरेच काही वाढलेले होते. इतके सगळे बघताच त्याच्याही तोंडाला पाणी सुटले आणि तो जोरात ओरडला " अरे, पटकन इकडे या"

तसे सगळेच लगबगीने त्याच्याजवळ आले आणि समोरील दृश्य बघताच प्रत्येकाचे डोळे मोठे झाले.
त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि प्रत्येकाची नजर एकमेकांना सांगून गेली की हे अन्न आपल्यासाठीच आहे. क्षणाचाही विलंब न लावता ते सगळेजण त्या अन्नावर आधाशासारखे तुटून पडले.
ते जे अन्न खात होते ते अत्यंत चविष्ट असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी खायला सुरुवात केली आणि प्रत्येकाच्या खाण्याचा स्पीड पण छान होता. ते खात तर होते पण ताटातले अन्न काही कमी होत नव्हते, जणू काही कोणीतरी ते सतत वाढत होते.

त्या खाण्याच्या नादात असताना अचानक जितूच्या खांद्यावर कोणाचा तरी स्पर्श झाला. तो हात अत्यंत थंडगार होता आणि त्यात वेगळीच पकड त्याला जाणवली तसे तो दचकून उभा राहिला आणि मागे वळून पाहिले तर तो एकदम ओरडला.

त्याच्या मागे एक सुरकुतलेला चेहरा असलेली जख्ख म्हातारी स्त्री होती.
अंगावर जीर्ण झालेली साडी, पांढरे शुभ्र केस, दात थोडेसे विचित्र आणि तरीही ती हसत होती.

तिला पाहताच जितू ने विचारले "तुम्ही कोण?"
"अरे पोरा, हे माझेच घर आहे" ती म्हणाली. तिचा आवाज कसा दमदार होता.

"इथे एकट्या या जंगलातल्या सुनसान घरात?" जितू ला प्रश्न पडला होता.
"अरे घर आहे तर, कोणीतरी घरात असणारच... तुला काय वाटले घरात कोणीच नसेल... मग हे सगळं अन्न कोण तयार करणार?" म्हातारी हसत म्हणाली.

तसे त्याच्या लक्षात आले आणि एकदम तो म्हणाला, "माफ करा पण तुम्हाला न विचारता आम्ही तुमच्या घरात असलेले हे अन्न खाल्ले"

"असू देत! हे मी तुमच्या साठीच मांडले होते . मला माहित होते की तुम्ही येणार आहात" ती म्हणाली.

तसे जितू , आणि लक्ष्य दचकले...
"तुम्हाला कसे माहित आम्ही येणार?" जय च्या चेहऱ्यावर सुद्धा चकित भाव होते.

" हे माझे जंगल आहे. इथे गेल्या अनेक वर्षांपासून मी राहते आणि इथले पक्षी, प्राणी माझ्याशी बोलतात. त्यांनीच मला सांगितले"

हे जयला अशक्यप्राय वाटत होते. पण तो शांत राहिला तर विकी पुन्हा जेवणात व्यस्त झाला.

©®डॉ अमित मेढेकर

जय तिचे निरीक्षण करत होता. ती विलक्षण गूढपणे विकी कडे बघत होती. तिच्या ओठांवरील हसू भेदक तर होतेच पण त्यात काहीतरी खूनशी भाव त्याला जाणवले.
तिच्या डोळ्यातील चमक त्याला मगाशी झाडामागे जे चमकणारे डोळे बघितले तेच आणि तसेच आहे हे जाणवले. इथे काहीतरी चुकतंय याची प्रकर्षाने जाणीव झाली पण क्षणात त्या म्हातारीने त्याच्याकडे बघितले तसा तोही परत तंद्रीमध्ये गेला.

🎭 Series Post

View all