Login

इथे भूतकाळ अजून जिवंत आहे:- भाग चार

It Is A Story Of Four Friends Who Accidentally Enters Into House Where They Find So Many Mysterious Things
इथे भूतकाळ अजून जिवंत आहे:- भाग चार
©®डॉ अमित मेढेकर

त्याला काय स्पर्शून गेले हे कळले नाही, पण एक नक्की की काहीतरी अनोळखी आवाज तिथे जाणवत होते. त्या आवाजामध्येच एक ओढ वाटत होती आणि तेवढ्यात म्हातारी तिथे परत आली. तोच भेसूर हसरा चेहरा आणि भयंकर वाटणारे डोळे.
ते डोळे सगळ्यांचा ठाव घेत होते. तिचे डोळे जणू आत खोल खोल कुठे तरी डोकावणारे, ओढ लावणारे, पण त्या ओढीमागे एक धोक्याचा इशारा स्पष्ट जाणवत होता. जय क्षणभर तिच्या डोळ्यांमध्ये बघत राहिला… त्याला जाणवलं की तिचं हास्य केवळ बाहेरचं आहे—त्यामागे काहीतरी भयानक लपलं आहे.

तेवढ्यात, जितूच्या तोंडून एकदम कसलातरी विचित्र आवाज निघाला. त्याने दोन्ही हातानी आपले कान झाकले आणि जोरात किंचाळला.

" माझ्या डोक्यात काहीतरी घुसतंय… आवाज… आवाज… तोच आवाज... थांबवा त्याला!"

जय पटकन त्याच्याकडे धावत गेला. "जितू! काय झालं रे? शांत हो! बोल ना…!"

पण जितू काहीच बोलत नव्हता. त्याचा चेहरा पांढराफटक झालेला होता, डोळे विस्फारले होते. त्याने एकाच दिशेने बघणं सुरू ठेवलं होतं—ती दिशा होती त्या म्हातारीकडे बघण्याची.

"आता अती झालं," जय म्हणाला, "मला हे सगळं आवडत नाही आहे. आपण इथे फार वेळ थांबलो आहोत. इथून निघायला हवं."

विकी चिडून म्हणाला, "जय! तुझं डोकं ठिकाणावर आहे का? इतक्या वेळेने जेवायला मिळालंय, छान विश्रांती मिळतीये, आणि तुला एवढ्या रात्री निघायचंय?"

जय त्याला बाजूला ओढत म्हणाला, "विकी, लक्ष दे... आपल्याला वाट दिसली नव्हती, बाईक चालत नव्हती, आणि आपण चालत चालत इथे आलो. हे सगळं कसं शक्य आहे? आणि इतक्या अंधारात? हे घर अचानक कसं समोर आलं?"

विकी अजून काही बोलणार इतक्यात, जितू अचानक मागे सरकला आणि म्हणाला, "माझ्या पायाला काहीतरी लिपटलंय!"

तो खाली बघतो तर त्याच्या पायाभोवती काळसर, चिवट जळवासारखं काहीतरी लपेटलेलं होतं आणि ते हळूहळू वर सरकत होतं. त्याच्या आवाजाने जय आणि विकी दोघंही त्याच्याकडे धावले. जयने पटकन पायातून ते ओढून काढण्याचा प्रयत्न केला पण ते अधिक घट्ट होतं चाललं होतं.

तेवढ्यात त्या म्हातारीचा आवाज पुन्हा झाला – या वेळी मात्र तो सौम्य नव्हता, तो खर्जातला होता – "जसं मी बोलावलं, तसं तुम्ही आलात… आता इथून परत जायचं नाही."

आता मात्र जयला सगळं स्पष्ट झालं – ती कोणतीही सामान्य म्हातारी नव्हती. तिचं रूप, तिचं घर, त्या थाळ्यांतील वाढत जाणारं अन्न, हे सगळं काही भूतकाळातलं होतं – जणू एखाद्या शापित जगात ते अडकले होते.

…आता प्रश्न होता – त्यातून बाहेर कसा पडायचे
... तिच्या डोळ्यातील चमक त्याला अस्वस्थ करत होती. ती चमक साधी नव्हती—जणू काही त्या डोळ्यांत काळोखाचा दरवाजा होता. जय ला तो दरवाजा तोडायचा होता.

"तुम्ही म्हणता हे घर तुमचं आहे, पण तुम्हाला कसं माहित की आम्ही इथे येणार आहोत ?" लक्ष्य ने घाबरत का होईना पण विचारलं.

"म्हटलं ना... हे जंगल माझं आहे. मी प्रत्येक सावली ओळखते, प्रत्येक साद ऐकते," ती हसत म्हणाली. तिच्या हसण्यात एक गूढ कंपन होतं, जणू कोणी तरी त्या आवाजाच्या मागे दडलेलं होतं.

तेवढ्यात घरातला उजेड मंद व्हायला लागला. खिडक्यांवर काळसर सावल्या फिरू लागल्या. दारे खट खट वाजू लागली. जितूच्या जखमेतून पुन्हा रक्त वाहायला लागलं. जय च्या मनात आता एकच विचार घोळायला लागला—"आपण काहीतरी विचित्र गोष्टीत अडकलोय."

"खाल्लं ना अन्न? आता मुकाट पणे इथेच आराम करा. तुमचा पुढचा प्रवास थांबला आहे... कायमचा!" ती म्हातारी एकदम ओरडली आणि तिचं हसणं अचानक झणझणीत पोकळ आवाजात बदललं. तिचा चेहरा काळसर होऊ लागला, डोळे लालसर चमकू लागले.

इथे विकीच्या डोळ्यांत काहीतरी वेगळं होतं—तो आपल्या शुद्धीत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर जणू एक सावली उतरली होती, जी त्याला दुसरं रूप देत होती.

जय ने लगेच लक्ष्यचा हात धरला आणि ओरडला, "पळा! हा सापळा आहे!"

विकीला जितू ने धरले आणि ते चौघे धावत दरवाजाकडे गेले, पण दरवाजा आता बंद होता... आणि कुलूप स्वतःहून मोठं होतं चाललं होतं—जणू कोणीतरी आतमध्ये असणारे दार कधीच उघडू नये असं त्या कुलूपाने ठरवलं होतं.

तेव्हाच खिडक्यांमधून अनेक डोळ्यांची झलक दिसू लागली—सावल्यांनी घेरलेलं घर, त्या म्हातारीचं भयानक रूप, आणि बेशुद्ध होत चाललेला लक्ष्य.

जय ने डोळे बंद केले आणि मनात एकच प्रार्थना केली—"देवा, हे खरं नको असूदे...!"

पण त्या घरात, त्या रात्री, अमावस्येच्या त्या काळोख्या जंगलात... खरं आणि भास यातला फरक नाहीसा झाला होता.

क्रमशः
©®डॉ अमित मेढेकर.

🎭 Series Post

View all