ते एक स्वप्न

It was a dream

#ते_एक_स्वप्न

दुपारी जरा डोळा लागला. घरात कोणीच नसतं आतासं मी माझी एकटीच. मुलगी तिच्या सासरी,मुलगा त्याच्या सासरी. हो दुसरं घर म्हणजे त्याचंही सासरच ते. वर्षातून चारेक दिवसांसाठी येऊन जातात झालं. हे ऑफिसला. सकाळचा डबा,इतर कामं करण्यात वेळ गेला. आताशी कामं होत नाहीत हो झटपट. सगळं आवरताआवरता घड्याळाचा काटा दोनावर गेला तेंव्हा लवंडले खरी.

आता म्हंटलं उठावं. लाडवासाठी चण्याची डाळ भाजून चक्कीवर द्यायची आठवण झाली आणि कुशीने वळले पण हे काय अशी हलकी हलकी कशी वाटतेय मी आणि ही माझ्या बाजूला..????अय्यो..हे काय..मीच की ही मग मी मी कोण म्हणजे मी आत्मा आणि हा समोर माझा निष्प्राण देह. अगं बाई..हे कधी झालं..कसं झालं..खरंच की,माणसाचा काही एक भरवसा राहिला नाही ओ.

        आता ती चण्याची डाळ राहिली तशीच भाजायची. लाडू तरी कोण वळणार म्हणा? हे आल्याशिवाय माझा हा निष्प्राण देह असाच पडून रहाणार. शी बाई! यांना फोन करु का..ओ माय गॉड..मला मोबाईल उचलता येत नाहीए. आता मी फेसबुकवरच्या पोस्ट कशा वाचणार? कमेंट्सही करु शकत नाही..इतकंच काय साधे इमोजीही टाकू शकत नाही. हाऊ बोअरींग! नाही तरी हे कालच बोलले होते,तुझा मोबाईल न्हेणार नि कळव्याच्या खाडीत फेकून देणार.

यांचाना माझ्या मोबाईलवर जास्तच राग. आपण भक्तीगीतं,प्रवचन लावून बसतील, युट्युबवर एखादं विनोदी नाटक बघत खोखो करत यड्यासारखे हसतील पण मी जरा भांडी घासून येऊन मोबाईल हाती घेतला की लगेच 'बसली' म्हणणार. बरं मी कामं करताना दिसत नै यांना फक्त मोबाईलवर काहीबाही पोस्ट वाचतानाच दिसते. असा राग येतो म्हणून सांगू.

चार वाजले. कॉफी प्यावीसी वाटतेय. दूध काढते फ्रीजातलं. हे काय!फ्रिजमधून आरपार हात जातोय माझा,त्या हॉरर मुव्हीसारखं वाटतय अगदी. हां तो दुधाचा टोप..अरे पण त्यातूनही आरपार जातोय हात. शी बाई..कॉफी राहिलीच प्यायची. इतकी आवडते मला कॉफी..अरे हो..फ्रीझरमधे पार्टी पेक आहे ब्लेक करंटचा,कालच आणला होता मी. मला आवडतं असं मधुनच चमचा चमचा आइस्क्रीम खायला पण आता तेही शक्य नाही.

कपडे अगदी खडखडीत वाळलेत. एक टॉवेल पडला खाली. आता आणू तरी कशी. ती टेंभे वहिनी फिरायला निघाली वाटतं. भारी कजाग बाई. जरा जवळा भाजला तर विचारायला येते घाण कुठून येतेय म्हणून. आता मला सांगा,जवळा भाजला की घरात किती छान सुगंध पसरतो नाही! मला तर बाई दोन घास जास्तच जातात जवळ्याच्या वासाने.

मी नं त्या टेंभेच्या कानात भो केला. कसली घाबरली ती. इकडेतिकडे पाहू लागली. जाम टरकली तिची.

हा इस्त्रीवाला,माझी साडी हरवली म्हणतोय. त्याला चांगलं धारेवर धरणार होते पण यांच्यापुढे काहीच बोलता येत नाही. अरे ही काय घडी माझ्या साडीची,रेशमी काठाची इरकल..यांनी गेल्यावर्षी सरप्राईज गीफ्ट म्हणून दिलेली. आता या इस्त्रीवाल्याला सांगावसं वाटतय की माझी साडी मला दे पण त्याला ऐकू थोडीच येणार!

वा आवळे घेऊन बसलेय. काल आले तर नव्हती बसली. वर्षभराचे आवळे घेऊन ठेवायचे होते. अगं ए बेबी कसे दिलेस आवळे? ए भवाने बघ की गं माझ्याकडे. अरे वा अळूची पानंपण छान पसरट आणलेस आणि हो करांदे,अळकुडी..आता पहिल्या अंघोळीदिवशी लागतील न्. कारेटही आणलेत. अगं बेबी बघ की गं माझ्याकडे. अरे हो विसरलेच मी..मी दिसत नाही तिला पण तिला जाणीव होतेय हो माझी. बघा कवी भेदरल्यासारखी बघतेय.

जाते बाई घरी,माझा देह पडला असेल एकटाच तिकडे. हे काही इतक्यात यायचे नाहीत. जिने चढायची गरज नाही. हे बरंय हेलिकॉप्टरसारखं. कपडे काय आत घ्यायला मिळाले नाहीत. कॉफीही राहिली.

असो,कपाट बघून घेते एकदा. तसा मला मोक्षच मिळणार हो..अगदी कॉन्फिडन्ट आहे मी त्याबद्द्ल पण त्या मोक्षानंतर कपाटातली माझी वस्त्रं, आभुषणं बघता यायची नाहीत हो. हा बघा दागिन्यांचा डबा..ही नथ माझी. मोती बघा कसे पाणेरी आहेत नं,नि खालचे ते लालहिरवे मोती..खूप आवडते मला नथ पण कसं ते नाकच बुजलं नि नथ डब्यातच विसावली. या बांगड्या..ही बारीक वेलबुट्टीची नक्षी मी स्वतः निवडलेली..किती वेळ घेतलेला निवडण्यासाठी..एकापेक्षा एक डिझाइन असतात,माझ्यासारखीला सगळ्याच हव्याशा वाटतात. हल्ली नं हात थोडे जाड झालेत,म्हणजे मी बारीकच आहे हो पण हातच जरा सुद्रुढ झालेत न् बांगडी काही आत शिरत नाही. असो, हे पहा मंगळसुत्र,त्यावेळी मधे चेनवालं घेतलेलं पण बाई भीतीच वाटते बाहेर घालून जाण्याची सोयच उरली नाही.

आमच्या खालची मोहिनी,भारी हौस तिला झाकपाक करत जायची. सगळे दागिने अंगावर मिरवायची. दोन महिने झाले,अशीच कुठे मैत्रिणीकडे जात होती. गळ्यात साडेचार तोळ्याचं मंगळसुत्र. स्वतःच्या हाताने तिने गळ्यातलं काढून कोणा त्रयस्थाला दिलं. मोहिनी का काय म्हणतात तसला प्रकार. म्हणजे बघा असूनसुद्धा या चोरांच्या भीतीपाई आपण आपले दागिने घालून हिंडू शकत नाही.

आणि हो हा मोरपिसी कुरता नि मोती कलरचा पलाझो,दिड हजाराला घेतला दिवाळीला घालणार म्हणून. तोही राहिलाच की घालायचा. एकदा तरी घालून फोटू काढायचा होता. गेले दिड हजार पाण्यात! आता कोणाच्या वाटणीला येतेय ही श्रीमंती देव जाणे. माहिती असतं तर मुलीला नि सुनेला वाटूनवाटून दिलं असतं. सुनेने एकटीनच सगळं घेतलं तर.. माझी मुन्नुपण अशी आहे ना. कोणी दिलं नाही तर एका शब्दाने कोणाला काही बोलणार नाही. सुनेचीच आपली उचलली जीभ न् लावली टाळ्याला.

अरे हो सकाळी फोन आलेला सुनेचा,चकलीची रेसिपी विचारत होती. मी नेमकी घाईत होते बाहेर जायच्या. आल्यावर देते म्हंटलं नि विसरुनच गेले. दिली असती लगेच तर माझ्या लेकाला माझ्या रेसिपीने चकली खाऊ घातली असती तिने. छे,चुकलंच ते. पोर किती दिवस झाले बोलवतेय तिकडे पण मीच काहीतरी कारणं काढून जाणं लांबवलं. हल्ली न् घर सोडून कुठे जावसं वाटत नाही नि सुनेच्या घरी गेलं की सुनेच्या मर्जीनुसार रहावं लागेल अशी भीतीही वाटते मनात पण आता भीती वाटून तरी काय उपयोग म्हणा. तेवढं नातवंडाचं तोंड बघायचं राहून गेलं. या मुलांनी काय ते फेमिली प्लेनिंग केलं ना नाहीतर एवढ्यात दोन वर्षाचं नातवंड असलं असतं माझं. लेकीचा मुलगा आहेच की. आता केजीत जाईल. गुलामाला माझ्या हातची दाबेली आवडते. दिवाळीनंतर चार दिवस रहायलाच येणार होती लेक पण कसचं काय.

अय्या,सहा वाजत आले. ही बाजूची टेंभीण बघा. एरवी मी झोपली की दोनदा तरी बेल वाजवते पण आज कुणीच फिरकलं नाही बेलकडे. एखादा फेरीवाला तरी यायला हवा होता. तशी आता कुठे पन्नाशी पार केली मी. म्हणजे अजून बरंच जगायचं आहे हो मला. मुलांच्या शाळाकॉलेजाच्या भानगडीत कुठे जास्त भ्रमंतीही करता नाही आली. आयकर,मेंटेनन्स,वीजबीलं,मुलांची फिज भरण्यासाठी पैसे साठवण्यातच आयुष्य गेलं. ते फिरणं राहूनच गेलं. एखादा विमानप्रवासतरी करायला हवा होता. वर्षातून एकदा फायस्टार हॉटेलमधे जायला हवं होतं. हो आणि ते बोटींगही राहिलच की. इथे ना नदी ना समुद्र आणि यांना हौस कसली ती नाहीच.

आता मी नसले की काय करणार देव जाणे म्हणजे तसं आमटीभात बनवता येतो यांना पण डब्याला पोळ्याच लागतात. इतक्यांदा पाठी लागले,अहो एकदा शिकून घ्या. शेवटची एक पोळी तरी लाटा पण ऐकतय कोण माझं!

बरं आठवलं ते मेंटेनन्सची पावती घ्यायची राहिलीय सावंतांकडून. नाईकांना आमसुलं आणि काजूसाठी पैसे देऊन ठेवलेत. ते गोव्याला जायचेत ना. त्यांच्या घरी जाऊन आणायला हवी भेट. थोडे किडुकमिडुक पैसे साठवून साडीत ठेवलेत खरं. यांना मिळतील का देव जाणे तरी बरं डायरी वगैरे काही प्रकरण नाही माझं. काय असेल ते समोरासमोर. काही लपवलेलं असतं तर ती रुखरुख राहिली असती मागे.

तशा इच्छा जास्त मोठ्या नव्हत्याच माझ्या. आताही एक्झिट घेतली की मुलीचं,मुलाचं विशेष काही अडणार नाही पण हे. यांना माझ्याच हातचा चहा लागतो. बरचसं बनवता येतं यांना तरीही.. कालच बघा चकल्या केल्या. चकल्या गाळून हात दुखले खरे पण  यांनी ऑफिसातून आल्यावर दोन चकल्या खाल्ल्या आणि कौतुक केलं. खांद्यातत उमटणारी कळ कुठच्या कुठे पळून गेली. बाईला काय ओ, दोन शब्द कौतुकाचे हवे असतात फक्त,ती भरुन पावते.

अय्या,सात वाजले की.हे  यायला झाले आणि माझं हे असं. बघते तरी देहात घुसून प्रवेश मिळतो का ते.

"जयू..अगं ए..जयू"

"जयू,कसले हातवारे करतेस नि हे कुठे घुसायचं बोलतेस. कोणाच्या घरात शिरतैस की काय?"

"अं..अं"

"अगं बाहेरची बेल बंद करुन ठेवली होतीस. बाजूच्या वहिनी दोनदा येऊन गेल्या म्हणे. मी चारदा कडी वाजवली शेवटी बेगेतल्या चावीने दार उघडलं."

"म्हणजे? मी जीवंत आहे?"

"तरी तुला सांगत होतो,जास्त फराळाचं करत राहू नकोस.तू ऐकणारैस थोडीच! चकल्या काय करंज्या काय अनारसे न् शंकरपाळ्या काय..आणि मग जातेस कोमात. तळण झेपत नाही तुला पण हौस भारी. बाकी चकल्या झाल्यात खुसखुशीत आणि अनारसे तर लाजवाब."

"थांबा चहा आणते."

"अं हं,बस अशीच टेकून. मी कॉफी आणतो तुझ्यासाठी खास आणि आज पिठलंभातही मीच करणार. तू निवांत मोबाईल घेऊन बस."

"बाई,कसलं अजब स्वप्न पडलं!"

"कसलं गं. काय तरी बघत बसतेस स्लप्नात. नशीब स्वप्नात कुठे चालत नाही गेलीस."

"अं हो.."

---------सौ.गीता गजानन गरुड.