इश्श ❤️... तुझ्याविना करमेना

तुझं माझं जमेना... तुझ्याविना करमेना

इश्श!!... तुझ्याविना करमेना 

"शी बाई आज उठायला फारच उशीर झाला. किटूचा डब्बा, सगळ्यांचा नाश्ता, यांचा टिफीन…. बापरे सगळंच वेळेत उरकायला हवे. किटूची सातची बस नको सुटायला."... ती स्वतःशीच बोलत पटपट कामं करत होती. 

          तिने पटपट आपल्या चार वर्ष मुलाला शाळेत जाण्यासाठी त्याची तयारी करायला घेतली. ब्रश, अंघोळ, शी सू सगळं करताना नेमकी ज्या दिवशी घाई असायची त्याच दिवशी किटू आपला वेगळा त्रास द्यायचा, अजिबात लवकर तयार नव्हता होत. तिने किटूला शाळेसाठी तयार केले. त्याचा दूध ब्रेकफास्ट आटोपला. टिफीन पॅक करून त्याचा लंचबॅगमध्ये नीट ठेवला आणि शाळेची बस यायच्या आत वेळेत किटूला घेऊन बसस्टॉपवर पोहचली. 

 "हुश्श !! चला बाबा एक काम तर वेळेत झाले. आता यांना उठवायला लागेल. किटूला बाय करायला रोज तर लवकर उठतात, आजकाल कामं पण वाढलीत ना यांची, आळस करतात उठायला".... स्वत:शीच बोलत किटूला बसमध्ये बसवून भराभरा घरी आली. घरी आल्यावर झोपलेल्या नवऱ्याला प्रेमाने आवाज देत उठवून परत आपल्या कामाला जुंपली. 

        त्याने उठून घड्याळ बघितले, आणि तो चिडतच उठला. लवकर उठवता नाही येत का म्हणून बायकोच्या नावाने त्याची कुरकुर सुरू झाली. 

"किटूला बसला पोहचवायच्या आधीच आवाज दिला, तुम्हाला ऐकू जातंय काय? रात्रीचं कामावरून स्वतः उशिरा येणार, सगळं आटोपायला उशीर व्हायचा, आपण उशिरा झोपायचं आणि रात्रभर ढारढुर घोरत आम्हाला जागवायचं. परत उशीर झाला तर माझ्याच नावाने ओरडायचं.".... काम करताकरता तिची स्वत:शीच बडबड सुरु होती. 

"चहाला आणखी किती वेळ?"....दुसऱ्या रूम मधून सासूबाईंचा आवाज आला. 

"टाकतेय"... आवाज देत तिने गॅसवर एकीकडे चहाचं आदन ठेवले दुसरीकडे नाश्त्यासाठी उपमा करायला घेतला. 

        तो फ्रेश होऊन हॉलमध्ये येत हातात पेपर घेत वाचत बसला. तिने पटापट कपांमध्ये अद्रकचा मस्तपैकी वाफाळलेला चहा ओतला, दोन प्लेट घेतल्या, त्यात उपमा घेतला, त्यावर थोडी बारीक शेव, हिरवा कंच बारीक चिरलेला कोथिंबीर आणि बारीक खोवलेले खोबरे पसरवले. एका ट्रेमध्ये चहाची कप आणि उपमाच्या प्लेट ठेवल्या आणि एक सासूबाईंना तर एक त्याचा हातात दिले. 

"किती उशीर? आधीच उशीर झालाय त्यात परत उशीर करतेय".... त्याची मात्र उठल्यापासून कुरकुर सुरूच होती. 

"हे काय परत उपमा?"...तो 

         तिने त्याच्याकडे बघितले आणि परत किचनमध्ये निघून गेली. 

"एकतर याला हे नाही आवडत, त्याला ते नाही चालत… तिघांचे तीन वेगवेगळे फर्मान असतात… ब्रेकफास्ट वेगळं, डब्ब्यात वेगळं. या भाजीत खोबरं नको, त्या भाजीत दाण्याचं कूट टाकतात, ही आंबटगोडच का केली तर त्यात साखर का नाही घातली? "...परत बडबड करत तिचं आपलं काम सुरू होते. "किती खारट?"....त्याने परत तोंड वाकडं केले.

"पाच वर्ष झालीत, पण काय हाताला चव म्हणून नाही आली हिच्या. देवजाणे चांगला स्वयंपाक करायला कधी शिकणार आहे. लवकर उठायचं नाही, मग हे असे मीठ, तेल जास्त टाकून ठेवायचे. थोडं लवकर उठायला काय जाते? आम्ही आमच्या वेळेस पहाटे चारला उठत होतो.".... आतून सासूबाईंची कुरकुर सुरू झाली. सासूबाई टाँट मारायचा एकही चान्स सोडत नव्हत्या आणि मुलासमोर स्वतःच कौतुक करायला विसरत नव्हत्या. 

        झालं सासूबाईंचे शब्द तिच्या कानी पडले, त्यात त्याने तिच्या उपम्याचे केलेलं कौतुक, तिच्या भारी जीवावर आले. पण तरीही शांत राहत ती आपले कामं करत होती. त्याने नाश्ता आटोपला आणि ऑफिसच्या तयारीला लागला.

"एक प्रेस केलेला शर्ट नाही."....तो कपाटात सगळे कपडे हुसकत थोडा जोऱ्यानेच बोलला होता. 

"हिला काय वाटते, माझं हिच्यावाचून अडतय की काय?".... बडबड करत त्याला एक शर्ट सापडला. त्याने तो घेतला आणि प्रेस करू लागला. पण शर्टवरच्या वळ्या काही केल्या लवकर जात नव्हत्या. ते बघून तो आणखीच वैतागला.        ती बेडरूममध्ये आली. तिने कपाट उघडले आणि एका कापडी पिशवीत प्रेस करून ठेवलेले सहा सात शर्ट होते ते काढले आणि त्याचा पुढे ठेवले. त्याने एकदा तिच्याकडे बघितले आणि चुपचाप एक शर्ट घेतला.

"हे असे पिशवीत भरून का ठेवले? असे सापडायचे तरी काय?"...तो शर्ट घालत बोलत होता. 

"एक शर्ट घेतांना बाकी सगळ्यांची प्रेस खराब होते म्हणून तसे ठेवले "... ती बोलत किचनमध्ये निघून आली. 

"शी बाई, आज सगळं यांच्या नावडीचेच झाले. टिफीनमध्ये पत्ताकोबीची भाजी बघून परत चिडतील."...तिने टिफीन पॅक करून त्याच्या ऑफिस बॅगजवळ ठेवला.  

"दुपारी झोपायला पाहिजे नुसतं, काही कामधाम करायला नको. माहिती आहे त्याला रोज ऑफिससाठी लागतो, शर्ट प्रेस करून ठेवायला काय जातेय?". …. आतून परत सासूबाईचा आवाज आला, त्यांची आपली वेगळीच बडबड सुरु होती. आता तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. 

        ती रूममध्ये आली. तो ऑफिससाठी तयारी करत होता. ती त्याला रुमाल, घड्याळ, पर्स त्याचा हाताहातात देत त्याचा मागेमागे करत होती. तो चिडला, भडकला होता, आता मात्र तिची मनिमाऊ झाली होती. तिच्या डोळ्यातले पाणी त्याने बघितले होते, ते बघून त्याला वाईट वाटले. न बोलता तो चुपचाप आपलं आवरू लागला.               त्याने आपली तयारी केली, बॅग उचलली आणि बाय न करताच ऑफिससाठी बाहेर पडला. तो बाहेर जात होता तशी ती पण त्याच्या पाठोपाठ आली, तो बाहेर पडला बघून तिने दार बंद केले. तिने पदराने डोळे पुसले आणि आतमध्ये गेली. 

            आतमध्ये जात नाही तोच दाराची बेल वाजली. तिने दार उघडले तर दारात तो उभा. तो आतमध्ये आला आणि आपला मोबाईल घेऊन काही न बोलता बाहेर निघून गेला. ती हिरमुसली. 

"कोण आहे ग?"...आतून आवाज आला.

"हे होते, मोबाईल विसरला होता, तर घ्यायला आले होते."...म्हणत ती परत दार लावणार तोच, तो परत आला. त्याने एकदा तिच्याकडे बघितले, आतमध्ये आला, मान खाली घालून काहीच न बोलता, की हूक्सला अडकवलेली गाडीची चावी घेऊन गेला. आता मात्र तिला राग आला, रागारागातच तिने दरवाजा लावला आणि आवरायला म्हणून आतमध्ये जायला लागली. 

' टिंग टॉन्ग ' ….. परत दाराची बेल वाजली. तिने झरझर येत दार उघडले तर परत दारात तो उभा होता. 

"आता काय राहिले?" … ती जरा रागातच म्हणाली. 

"Shhhh!!...हळू बोल!".... तो आतमध्ये येत तिच्याकडे बघत मागच्या मागे दार लावत हळूच म्हणाला. 

ती डोळे मोठे करत त्याचाकडे बघत होती. 

"बाय करायचे राहिले."... म्हणत त्याने एक हात तिच्या कंबरेतून घालत तिला आपल्याकडे ओढत आपल्या मिठीत घेतले. तिला आपल्या नजरेत कैद करत, एका हाताने तिला आपल्या जवळ घट्ट पकडून ठेवत, दुसऱ्या हाताची बोटं तिचा पोटावर चालवत कंबरेमध्ये खोचलेला तिच्या साडीचा पदर, आणि काम करतांना साडीच्या निऱ्या थोड्या वर घेऊन खोचलेल्या होत्या त्या काढून मोकळ्या केला. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर गोड शहारे आले, आणि आनंदाने हृदयात फुलपाखरू उडू लागले. "फ्रीजमध्ये तुझ्या आवडीचा रंगबिरंगी अबोलीची फुलं, कुंदाची फुलं आणि हिरव्या पानांचा गजरा ठेवला आहे, द्यायला विसरलो होतो "... तो तिच्याजवळ झुकत हळूच तिच्या कानाजवळ जात म्हणाला. 

ती गोड हसली. 

"पण मी नाही विसलरले घ्यायला!"...ती आपली मान वळवत त्याला आपल्या केसात माळलेला गजरा दाखवत हसतच म्हणाली. तिचे ते गोड हसू त्याला घायाळ करून गेले. 

"तिला पण घेऊन जा ऑफिसला, तसेही तुझं मन काही लागणार नाही."... आतून सासूबाईंचा आवाज आला.  

"चावी विसरली होती, ती घ्यायला आलो होतो."... तो आईला आवाज जाईल असा ओरडला. 

"खोटारडा!"...आईचा हसरा आवाज आला. 

       ती त्याच्या मिठीत होती. आईचे शब्द ऐकून तिचे गाल लाजेने लाल झालेत. तो पण तिच्याकडे बघत खट्याळपणे हसला. तिने लाजातच आपलं डोकं त्याचा छातीवर शर्टमध्ये लपवले. 

"खरंच, मन नाही लागणार आज. जाऊया कुठे बाहेर?"....तो तिच्याभोवती असलेल्या आपल्या हातांचा वेढा अधिक घट्ट करत म्हणाला. 

"इश्श !! ".... ती त्याचा कुशीतच त्याला आणखीच बिलगली. 

       त्याने तिच्या हनुवटीला पकडत तिचा चेहरा वर केला. तो तिला किस करणार तेवढयात तिने त्याला ढकलले.  

"उशीर होतोय ना?" 

     तिचा खट्याळपणा बघून त्याच्या ओठांवर गोड हसू उमटले.

"आई, येतो ग !".... ओरडतच त्याने तिला फ्लाईंग किस देत बाय केले. तिने सुद्धा हसत बाय केले.  

        थोड्याशा प्रेमळ परिश्रमाने रुसलेली, रागावलेली सकाळ गोड झाली...!! ******समाप्त 

******