स्त्रियांना समजून घेणं खरच अवघड आहे ना ग?

प्रस्तुत कथेमध्ये मी स्त्रियांच्या विविध स्वभावांबद्दल भाष्य केले आहे.
      
       संध्या म्हणजे सुरेखाची प्रिय मैत्रीण.आज संध्या च्या मुलीचं म्हणजे प्रेरणाचं लग्न होतं.आपल्या प्रिय मैत्रिणीसाठी ( संध्या)आणि प्रेरणासाठी सुरेखा ने खास गिफ्ट आणलेलं होत. ती साधारण ११ वाजता कार्यालयात पोचली.

             मस्त डिझायनर पैठणी,त्यावर नथ, ठूशी,चंद्रकोर टिकली ,नाजूक सिंदुर,सुंदर पैंजण, डिझायनर बांगड्या, नाजूक मंगळसूत्र,केसांचा स्टायलिश अंबाडा असा भरगच्च साज चढवून सुरेखा अगदी दिमाखात ,आपल्या प्रिय मैत्रिणीला म्हणजेच संध्याला शोधत होती.ऑलरेडी पन्नाशीचा उंबरठा पार केल्यानंतर शरीराने जरी ती बऱ्यापैकी स्थूल होती तरीही विविध फॅशन ट्रेंडस आपलेसे करण्यात ती मास्टर होती.ती लगबगीने बायकांच्या प्रचंड गर्दीत संध्याला शोधू लागली आणि तिथे उपस्थित बायका तिच्याकडे वरखाली निरखून बघू लागल्या.

      त्यातील एक बाई दुसरीला ऐकू येईल अशा आवाजात म्हणाली,
"वाव! काय सुंदर साडी आहे ना यांची! एकदम मस्त.पण यावर यांनी ठुशी कशी घातली बिलकुल शोभत नाहीये." 

सुरेखाला त्यांचे बोलणे अगदी स्पष्ट ऐकू आले.तिने दुर्लक्ष केले.

     ती थोडे पुढे गेली , संध्याला शोधू लागली आणि आणखी थोडी कुजबुज सुरेखाच्या कानावर पडली,

" अग बाई,ही बाई बघ. एवढी गोलमटोल आहे तरी अशी नववार नेसली? बिलकुल शोभत नाहीये तिला.त्यापेक्षा साधी पैठणी घातली असती तर बर झालं असत."

      सुरेखा मात्र आता चांगलीच शरमली.तिला वाटले खरच आपला फॅशन सेन्स आता चांगला राहिलेला नाही.पण तिच्या पुढेच बसलेल्या दुसऱ्या बायका म्हणाल्या,

" काकू तुम्ही एकदम सुंदर दिसताय.कुठून घेतली हो ही डिझायनर पैठणी? आणि त्यावर या दागिन्यांचे पेय रिंग फारच सुंदर दिसतय. तुमचा फॅशन सेन्स खरच ग्रेट आहे "

आता मात्र सुरेखा गोंधळली.मी खरच सुंदर दिसतेय की वाईट? असा विचार ती करू लागली.

तेवढ्यात मागून आवाज आला,

" ओ हो,सुरेखा,कधी आलीस ? मस्त दिसतेय बर तू. बर ऐक ना तू जेवण करून जाशील आणि जाताना मला भेटशील. ठीक आहे."

" हो संध्या..पण प्रेरणा कुठे आहे?"

" अग ती तयार होतेय.आता मी जरा घाईत आहे. नवरदेव आता मंदिरात दर्शन घेऊन येईलच."

" हो हो.पण हे गिफ्ट तर घे.खास माझ्या प्रिय मैत्रिणीसाठी आणि तिच्या लेकीसाठी."

"थँक्यू डियर."

असे म्हणून संध्या तिथून निघून गेली.

       तेवढ्यात पुन्हा एक वेगळी कुजबुज सुरेखाच्या कानावर आली.

    " आता आपण एवढे लांबून आलो तरी कार्यालयात जागोजागी पाण्याची व्यवस्था नाही .खूप लांब म्हणजे बाहेर जाऊन पाणी प्यावे लागते.तरी मी नवरदेवाच्या आईला सांगत होते,या भागातील पोरगी करू नको.किती कंजूस असतात इथले लोक.त्यात आता ही नवरी म्हणे जॉब करते.मग वाटायचीच आहे सर्वांच्या डोक्यावर मिरे! अहो शहरातील मुली किती मॉडर्न असतात.त्यांना हवा असतो एकटा दुकटा मुलगा,सासू सासरे म्हणजे त्यांना ओझे वाटतात." 

   सुरेखा पुन्हा असे विक्षिप्त बोलणे ऐकून उदास झाली. ती विचार करू लागली,अरे मला पण सासू सासरे होते .मीही जॉब करत होते,पण घरातील सारी जबाबदारी सांभाळत,आपले संस्कार जपत मी आज इथवर पोचले,तरीही ही बाई अशी का म्हणते?

  तेवढ्यात सुरेखाला एक बाई विचारते,
" अहो ताई,तुम्ही सुरेखा का? आमच्या विहीनबाईच्या खास मैत्रीण?"

" हो मीच. सुरेखा."

" अहो मी नवरदेवाची काकू. तुम्हाला ना विहीनबाई बोलवत आहे.त्या स्वतःच येत होत्या तुम्हाला बोलवायला पण मी त्यांना म्हंटले की मीच बोलवते म्हणून. कशा आहात तुम्ही? "

" हो हो मजेत."

" खरच बाई आमची विहीनबाई.. किती ठेप ठेवली आमची आल्यापासून.तशीच त्यांची लेक म्हणजे आमची सून प्रेरणा.खूप सुसंस्कारीत. साऱ्यांना आता पासूनच विचारतेय.काय हवे काय नको ते.खरच शहरातील,जॉब करणारी मुलगी असूनही तिला काहीच गर्व नाही."

         सुरेखा परत गोंधळली. अरेच्चा मघाशी नवरदेवाकडील एक बाई किती वेगळं बोलत होती,आणि आता या ताई किती वेगळं बोलत आहेत..
थोड्या वेळात लग्न लागले.सर्व विधी पार पडले आणि सुरेखा जेवण करून घरी गेली.

        खर तर सुरेखा इतके दिवस कधीही अशा मोठ्या लग्न समारंभाला गेलेली नव्हती.त्यामुळे हे सर्व ती प्रथमच अनुभवत होती.

      काही दिवसांनी सुरेखा आणि संध्या एकमेकांना सकाळी वॉक करताना भेटल्या.

" चल सुरेखा आपण बरोबर वॉक करू!"
" हो चालेल ना संध्या."
" बर कशी आहेस? "
" मी मजेत."
" काय म्हणते ? काय नवे जुने!"
" अग संध्या तुला माहित आहे ना मी इतके दिवस अमेरिकेत होते.पण तुझ्या मुलीचे लग्न ठरले आणि मला भारतात यायला जमले. अग मला ना तुझ्याशी थोड बोलायचय."
 " अग सुरेखा बोल की मग!"

मग सुरेखाने प्रेरणाच्या लग्नात तिच्यासोबत घडलेले सारे प्रसंग संध्यासमोर मांडले.ती म्हणाली,

" अग संध्या,मी सुद्धा भारतातील एक महाराष्ट्रीयन स्त्री आहे,पण बायकांच्या बोलण्यातील एवढे वैविध्य ऐकून थक्क तसेच गोंधळून गेले आहे.खरच या अशा प्रकारच्या विविध स्त्रियांना समजून घेणं खरच अवघड आहे ना ग?"

" अग वेडाबाई. पण तू कशाला त्या बायकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतेय? उलट अशाने तुझे डोके दुखेल.हे बघ व्यक्ती तितक्या प्रकृती! त्यामुळे विविध बायकांचे विविध विचार असतात.त्यातून आपल्याला जे पटत ते घ्यायचं आणि बाकीचं द्यायचं सोडून. अग बायका घडीत चांगल घडीत वाईट म्हणतात. म्हणून त्यांच्याकडे जास्त लक्ष न देता,केवळ चांगले विचार घेऊन आपल्याला हवे तसे सकारात्मक विचार सरणी ठेऊन वागायचे. आलं का माझ्या साध्या भोळ्या राणीला लक्षात?"

" हो हो बाई संध्या. आताशी मला जरा ही माझी ही 
 वैचारिक गुंतागुंत सुटल्यासारखी वाटतेय."

" हो ना,मग शांत हो,आणि मग सुरू करू वॉक!"
 थोड्या वेळाने दोघीही आपापल्या घरी गेल्या.

        आता मला सांगा वाचकहो, खरच बायकांना समजून घेणं अवघडच असत ना हो? सांगा तुमचेही असे भन्नाट अनुभव! तुमच्या उत्तरांची वाट बघतेय मी कमेंट्स मध्ये. कथा आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा.परत भेटूया एका नवीन विषयासह! तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद!

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
# फोटो: साभार गूगल 
राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
कॅटेगरी - लघुकथा
सब कॅटेगरी - स्त्रीला समजून घेणं खरच अवघड असत का हो?