अनुकंपा - एक विरंगुळा!

A fun narrative about how some people's extra sympathy can get burdensome for the other person. काही काही बायकांना कधी कधी अनुकंपेचा अगदी फारच कनवाळा येत?

सकाळी साडेआठ वाजता घाई घाईने छोट्याला खाली घेऊन आली. पण school van काही अजून आली नव्हती. "हुश्श" करत ती बाजूच्या कठड्यावर टेकली.शेजारची सविता पण सोहमला घेऊन तिकडे पोहोचली.

 "आज थोडा लेट हो गया लगता है?"

"चलो अच्छा है मुझे लगा आज छूट जायेगी."

तिचं लक्ष पलीकडून पोळ्यांच्या मावशी येतायत का त्यावर होत. 

"क्या रे?"

 "वो मौसी आयेगी अभी"

" चपाती के लिये क्यू लगानेका बाई? तू घरपे ही तो है! तुम तीनो को कितना लगेगा. यूं फटाफट बन जाती है द्स पंधरा मिनिट मे|" सविताची ट्रेन काही थांबेना. 

आता तिची लागोपाठची दोघं, वय वर्ष चार आणि सहा. नवऱ्याचा एक पाय परदेशात. त्यात छोट्याचा बाळ दमा त्यामुळे सकाळी त्याचे वाफारे, गरम पाण्याच्या गुळण्या, चाटण, औषधे, दोघांचे डबे, आंघोळी, कपडे, अंथरूण-पांघरूण आवरणे, मोठ्याचा (थोडाफार ) अभ्यास सगळं तिलाच बघावं लागे. सासूबाईनी एक कानमंत्र दिला होता "काही झालं तरी पोळ्यांची बाई सोडू नकोस, नोकरी कर किंवा नको करुस. पोळ्या एक ठेपी तयार असतील तर बाकी स्वयंपाक जाता येता होतो." आता हे सगळं ह्या सविताला काय सांगणार? पण तरी  "अरे नही जमता है रे, बहुत प्रेशर रेहता है morning मे. एक बार चपाती हो गया तो बाकी ठीक है" तिने समजावण्याचा (निष्फळ) प्रयत्न केला.

" तू खाली फुकट टेन्शन लेती है| तू करके देख ना! मेरा सून तू निकाल दे, खाली फुकट पैसा क्यू देने का.

यू मिनिटों मे बनती है चपाती| " सविता आपलच रेटत राहिली. 

आता मात्र हद्द झाली. " इतक्या फटाफट बनत असतील तर तूच माझ्या पण पोळ्या करत जा. आणि माझे पैसेच वाचवायची तुला इतकी चिंता असेल तर तू त्यांचे पैसे दे, नाहीतर कृपा कर आणि गप्प बस" वैतागून तिचं स्वगत सुरु झालं. पण तेवढ्यात Van ही आली आणि  madam ला एवढा वेळ का लागला आज ते बघायला सविताकडची मुलांना सांभाळायला/ वरकामाला ठेवलेली ताई ही आली. तशी ताईला दिवसभराच्या सूचना देत सविता निघाली आणि तिनेही दीर्घ निःश्वास सोडला. 

***

संध्याकाळी सहा वाजता आलेले. तिनं पटापट डेस्क आवरायला घेतलं. मेल आधीच ड्राफ्ट करुन ठेवलेलं. ते send करून ती निघाली, पळालीच म्हणा ना! "सासूबाई खोळंबल्या असतील, सूमीला पण घाई असते संध्याकाळी घरी जायची. कंपनीच्या गेट मध्येच शेअर रिक्षा मिळाली तर बरं होईल. तसे chances कमीच.. नाहीतर मेन रोड पर्यंत चालावं लागेल , म्हणजे परत १० मिनिट जास्त जातील.." पायांबरोबर डोक्यातली चक्रही जोरात चालू होती. तेव्हढ्यात हाक ऐकून ती क्षणभर थबकली. त्यांच्याच फ्लोअर वरची मीना. गप्पा सुरू.

"रिक्षा मेन रोडलाच मिळेल आता."

" तू ठाण्याला राहतेस ना? पण मग घरी कशी जातेस?" मीनाचा प्रश्न.

"कळवा नाक्याला शेअर रिक्षा सोडते. आणि दूसरी रिक्षा पकडते." 

"रोज??"

"हो"

"पण बस आहे ना. बस का नाही घेत?"

"अगं घरून रिक्षा करून बस स्टॉपला जायचं, मग बसची वाट बघायची. परत बसला वेळ लागतो. जाता ना तर बघतेसच किती गर्दी पण असते बसला? घरी  मला वेळेत पोहोचायच असतं" माझं पाल्हाळ.

"ए मग तू येताना आणि जाताना दोन्ही वेळेला रिक्षा करतेस?"

"हो" 

"पण मग खूप पैसे होत असतील."

आता माझं गिल्ट वाढायला लागलं आणि धीर सुटायला लागला.

"हो ग, " माझी सारवा सारवी," सकाळी डबे, मुलांचं आवरून निघायचं म्हणुन घाई, तर संध्याकाळी सासूबाई, सांभाळणारी ताई सगळ्यांना घाई असते. म्हणून मग रिक्षाच बरी पडते."

हार मानेल तर मीना कसली. "तुमच्या जवळच्या बस स्टॉप वर शेअर रिक्षा मिळत असेल बघ. ती घे. एनएमएमटी ला ये. तिकडे बसेस ची लाईन असते......" बोलतच राहिली. इकडे तिच्या डोळ्यासमोर सकाळची रणधुमाळी उभी राहिली. मिनिटा मिनिटांची सकाळी मारामारी असते आणि बाई वेगळ्याच ट्रॅकवर आहेत.  रिक्षा ने १५ मिनिटात घरी पोहचतेय म्हणून जॉब चालूतरी आहे नाहीतर काही खरं नाही.

एकीकडे मीनाची टकळी अजून चालूच आहे. " ...अग बघ मग किती पैसे उगाच जातात. तू आता बस ट्राय करून बघच."

"आता कृपा करून आवरत घे, अजून माझे पैसे मी कसे वाचवावे म्हणून सल्ले देत बसलीस तर आता शेअर रिक्षेचे पैसे तुला द्यायला लावीन...मग वाचवत बस माझे पैसे..."  मन बोंबलत होत...शेवटी तिच्या आणि मीनाच्या नशिबाने आला तो कळवा नाका. शेअर रिक्षा चे पैसे देऊन दोघी आपापल्या दिशेने निघाल्या.

***

" काय ग तू नोकरी सोडलीस म्हणे? " शेजारच्या बिल्डिंगमधल्या मामींनी हटकले.

अत्यंत हळुवार कोपऱ्यालाच हात घातला मामींनी.

घरी आणि जॉबवर दोन्हीकडे होत्या काही अडचणी, खूप प्रयत्न करूनही नव्हते निघत इतर काही मार्ग. मग दोघांनी मिळून निर्णय घेतला. 

"हो"

"कसं ग होणार? तुम्ही मुली इतक्या शिकता सवरता आणि आता घरी बसायचं.."

" थोडे दिवस तरी घरी गरज आहे वेळ द्यायची. पुढचं मग बघू काय होतंय.." तिन जरा टोन डाऊन करायचं प्रयत्न केला. 

"नाही ग, फार वाईट वाटतं बघ तुझ्या साठी.." आणि बघता बघता मामिंच्या डोळ्यात पाणी. आता मात्र ती कावरी बावरी झाली. परत परत विचार करू लागली ' खरंच आपली इतकी दयनीय अवस्था आहे का? आपण तर विचारांती हा निर्णय घेतलाय, काही घाई तर नाही ना केली?..' तेवढ्यात तिची विचार शृंखला 

तुटली ती मामींच्या समोरून येणाऱ्या सविताला केलेल्या प्रश्नाने "क्या रे कल क्यू इतना जोर जोरसे आवाज आ रहा था? क्या हुआ??" आणि त्या दोघींच्या गप्पा मधून तिने हळुच काढता पाय घेतला.

***

काही लोक त्यांच्या अतीअनुकंपेने आपल्याला अगदी बुचकळ्यातच टाकतात. तुम्हाला कधी अशी अतिदयाळू (की भोचक ??) माणसं भेटलीयेतं का?