Feb 25, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

चौकट... चांगली की वाईट ?

Read Later
चौकट... चांगली की वाईट ?


" अहो, कशी दिसते आहे मी , सांगा पाहू .."
राधाने आपल्या पतीला विचारले.

" मी खरं सांगितल ...तर ते तुला पटणार नाही आणि खोटं सांगितल तर ते ही आवडणार नाही. आता मलाच प्रश्न पडला ; काय उत्तर देवू, तुझ्या प्रश्नाचं ? "
माधव आपल्या पत्नीला, राधाला गंमतीने म्हणाला.

" म्हणजे काय हो ? " राधा ने विचारले.

" मॅडम, आपण मुळातचं इतक्या सुंदर आहात की तुम्हांला मेकअप वगैरेची काय गरज ! " माधव ने स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला.

तेवढ्यात ..

" आई,बाबा ..चला ना.. लवकर ...मी पण छान तयार झाली आहे. "
मनस्वीच्या बोलण्याने माधव व राधाचे पुढे होणारे संभाषण थांबले.

आणि माधवलाही आपण खूप मोठ्या संकटातून सुटल्यासारखे वाटले.
आणि


या आनंदातच तो आपल्या फॅमिलीसह मोहनच्या घरी गेला.


माधवच्या ऑफिसातील मोहनकडे वास्तुशांतीची पूजा होती. मोहनने नवीन घर बांधले होते आणि पूजेच्या निमित्ताने आपले नातेवाईक, मित्रमंडळी व ऑफिसमधील लोकांना सहपरिवार आमंत्रण दिले होते.

मोहनचे घर मोठे आणि सुंदर होते. सर्व सुखसुविधांनी परिपूर्ण होते. पूजेच्या कार्यक्रमाचेही छान नियोजन केलेले होते. सर्व गोष्टींतून श्रीमंती दिसत होती.

मोहनची पत्नी तर रेशमी साडी नेसलेली,अंगभर दागिन्यांनी नटलेली लक्ष्मीचं दिसत होती.

राधाला तर असे झाले होते - काय पाहू आणि काय नाही? घराला बघावे की घराच्या मालकीणीला !
तिच्या साडीचे कौतुक करावे की दागिन्यांचे !
तिच्या या रूपापुढे तर आपण काहीच नाही असेही राधाच्या मनात येऊन गेले.

मोहनची मुलगी ही मनस्वीला आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींना आपले घर आनंदाने,उत्साहाने दाखवित होती.

राधाला आणि मनस्वीला मोहनचे घर खूप आवडले होते.

माधवही मोहनने कमविलेले ऐश्वर्य पाहत होता.आणि अधूनमधून राधाच्या व मनस्वीच्या चेहऱ्यावरील भावभावना बघत होता.

पूजा आणि त्यानंतर स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेऊन सर्व पाहूणे मंडळी आनंदाने, हसतमुखाने मोहनची प्रशंसा करीत आपआपल्या घरी परतले होते.


घरात पोहचेपर्यंत राधा व मनस्वीचे बोलणे सुरूच होते...

' किती छान घर ना !
जेवण ही छान होते. सर्व जण खूप छान दिसत होते..साडी किती छान....
दागिने तर एकदम मस्त....
वगैरे वगैरे..

माधवला हे माहितच होते . असे काही ऐकायला मिळणार ते...

माधव एवढा वेळ शांतच होता.

पण न राहवत त्याने विचारले , " आपल्या घरात तुम्ही सुखात आहात की दुःखात ? "

दोघीही एकदम बोलल्या " सुखात ..."

माधव - "पण तुमच्या आजच्या वागण्या,बोलण्यातून तर काही वेगळेचं जाणवते आहे...

मी माझ्या नोकरीत समाधानी आहे. माझ्या पगारात आपल्या सर्वांच्या गरजा पूर्ण करतो. स्वतः चे घर आहे. चांगले खायला- प्यायला मिळते आहे. मनस्वीलाही चांगले शिक्षण मिळत आहे. इतर हौसमौज होत असते. मगं अजून काय हवे ?

स्त्रीला स्वतः कडे कितीही चांगल्या साड्या असू दे ..दागिने असू दे...
तरी तिला इतर स्त्रियांच्या साड्यांचा,दागिन्यांचा हेवा वाटतोचं..
त्यामुळे राधा,तू ही या गोष्टीला अपवाद नाही म्हणा..
तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरील हावभाव टिपत होतो मी तिथे...
खूप रमून गेल्या होत्या दोघी ..

मलाही मोहनचे घर आवडले .
पण ... त्याने चांगल्या मार्गाने कमविलेल्या पैशांतून घर केले असते तर अजून जास्त आवडले असते ."

राधा व मनस्वी ह्या आपले बोलणे ऐकायच्या मूडमध्ये दिसत नाही आणि सर्वांना झोप ही येत होती. असे लक्षात येताच माधवने आपले बोलणे थांबवले व तोही झोपायला गेला.

मनस्वी व राधा यांना तर लगेच झोप लागली पण माधवला तर झोप लागतच नव्हती.
त्याच्या डोक्यातील विचार त्याला त्रास देत होते..' वडिलांना जेमतेम पगाराची नोकरी, त्यामुळे घरात नेहमी पैशाची चणचण! आईपण विनातक्रार सर्व परिस्थिती समजून नीटनेटका संसार करायची.

वडील नेहमी म्हणायचे,
" गरीब असलो तरी चालेल ; पण वाईट मार्गाने पैसा कमवून श्रीमंत होणार नाही!"

आणि वडिलांच्या या तत्वांचा आम्हा मुलांवरही परिणाम होत होता.

प्रामाणिकपणा,ईमानदारी ,कष्ट करण्याची हिंमत ,लढण्याची जिद्द या शिकवणुकीमुळे मी ही कष्टाने, प्रामाणिकपणे अभ्यास करीत शिक्षण पूर्ण केले. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत सरकारी नोकरी मिळवली. केलेल्या मेहनतीचे चीज झाले . असे वाटू लागले.

पण हा आनंद फार दिवस टिकला नाही..

नोकरीला लागताच अनेक समस्या, अनेक प्रश्न तोंड आ वासून उभे होते.

सरकारी कामे म्हटली म्हणजे शिपायापासून ते मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत सर्वांची पैसे घेऊनच काम करून देण्याची प्रवृत्ती!

आपले काम लवकर व्हावे यासाठी सरळ मार्गाने काम न करता पैसे देवून काम करून घेणे ...
आणि अशा लोकांमुळे पैसे घेऊन काम करणारे अधिकारी..

पण अशा लोकांमुळे सरळ मार्गी लोकांचे नुकसान होत असते.

मंदिरात रांगेत उभे राहून दर्शन घेण्यासाठी वेळ नसणारे पैसे देवून झटपट दर्शन घेऊन मोकळे होतात.
आणि रांगेत दर्शनासाठी थांबणारा ताटकळत उभाच राहतो....

एखाद्या पदासाठी लायकी नसतानाही फक्त पैशाच्या जोरावर नियुक्ती होते आणि गरीबाकडे लायकी असतानाही फक्त पैसा नसल्याने त्याला पद मिळत नाही.

या सर्व गोष्टीला जबाबदार कोण ?

पैसा देणारा की घेणारा ?

मी माझे काम प्रामाणिकपणे करीत असतो. आपण कितीही सांगितले की,' मी त्यातला नाही.'

तरीही लोक विश्वास ठेवत नाही. अगदी जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी सुद्धा..
उलट हे सर्वजण माझ्या कडून काही काम करून घेण्यासाठी किरकिर करीत असतात. कधीकधी तर भांडतात देखील.

पण मी माझ्या तत्वांवर ठाम असतो. कायद्याच्या आणि माझ्या अधिकाराच्या चौकटीत बसेल तेच काम मी करीत असतो.

माझ्या पदाचा,अधिकाराचा कधीही गैरवापर करीत नाही.

मी माझ्या अधिकारांची,नियमांची,
तत्वांची आणि पदाची चौकट पार करून कोणतेही गैर काम करीत नाही.

कोणालाही मदत जरूर करेल पण चौकटीत राहूनच...

माझ्या अशा वागण्याने माझ्यावर अनेक जण नाराज असतात. प्रसंगी जीवे मारण्याची धमकीही मिळत असते.

पण ...
मी डगमगत नाही. माझा माझ्या कर्मावर पूर्ण विश्वास आहे.

मोहनसारखे अनेक व्यक्ती असतात जे पैशाच्या मोहाला बळी पडून आपल्या अधिकाराचा ,नोकरीचा गैरवापर करून लोकांची कामे करीत असतात.
अशा लोकांचा खूप राग येतो मला..'

असे विचार मनात चालू असतानाच माधवला झोप लागली.


दुसऱ्या दिवशी माधव सायंकाळी कामावरून घरी येतांना मनस्वीसाठी तिच्या आवडीचे आईसक्रीम व राधाला आवडणारा मोगऱ्याचा गजरा आणला.


मनस्वी तर खूप खूश झाली. हे तिच्या बोलण्यातून माधवला जाणवले. आणि राधालाही आपण आणलेली भेट आवडली हे तिच्या डोळ्यातून जाणवत होते.

आणि त्या दोघींचा आनंदी चेहरा पाहून माधवही खूप खूश होता.

मग .. या निखळ आनंदासाठी जास्त पैशांची आणि ते पण चुकीच्या मार्गाने मिळविण्याची काय गरज ? हा प्रश्न त्याच्या मनात आलाच...


असेच छान दिवस जात होते.

माधव त्याच्या नोकरीत, संसारात सुखी होता...आनंदी, समाधानी होता.

मोहनही त्याच्या संसारात,नोकरीत आनंदी होता. दिवसेंदिवस प्रगती करीत होता.


आणि अचानक एके दिवशी...

माधवने कामावरून घरी आल्यावर राधाला सांगितले, " मोहनला पैसे घेतांना रंगेहाथ पकडले ,आता त्याच्यावर कारवाई होणार."

राधा- " अरे बापरे! आता पुढे काय ? "

माधव - " आता काय ? चौकशी, विचारपूस, संपत्तीवर जप्ती, नोकरीवरून बडतर्फ वगैरे गोष्टी सुरू राहतील.."

राधा - " त्यांच्या घरातील व्यक्तींना कसे वाटत असणार ? "

माधव - " असा प्रसंग तुमच्यावरही आला असता ,जर मीही त्याच्याप्रमाणे चौकट पार केली असती तर...."


राधा - " नका हो असं काही बोलू ..."

माधव - " अगं ,खरं तेच बोलतोय ना !
सुरुवातीला सर्व चांगल वाटतं पण नंतर त्याचे परिणाम भोगावेच लागतात ना !

घरातल्यांनाही पैसा गोड वाटत गेला. आता भोगा कर्माची फळं ..

मी माझ्या तत्वांशी एकनिष्ठ राहिलो म्हणून टिकून आहे. मला त्रास देणारे भरपूर आहेत. मला फसविण्याचा प्रयत्न करणारे ही आहेत. पण मी नाही घाबरत ...
कर नाही तर त्याला डर कशाला ?
मी आपली मर्यादा नाही ओलांडत त्यामुळे माझ्या वर असा प्रसंग येत नाही. "

राधा - " खरं आहे तुमचं...वाईट मार्गाचा पैसा वाईटच करतो आयुष्याचे..."

माधव - " अगं , ज्यामुळे इतरांना त्रास होतो. अन्याय, अत्याचार होतो. अशा वाईट रूढी,परंपरांच्या चौकटीतून बाहेर पडलेच पाहिजे.

अंधश्रद्धा, जात,धर्म, वर्ण, स्त्रीपुरुष भेदभाव यावर आधारित असलेल्या अनिष्ट रूढी समाजाला घातक असतील तर त्या चौकटी नकोचं....

पण पूर्वीपासून चालत आलेले चांगले संस्कार, आपली संस्कृती आणि तसेच आपले आत्मसंरक्षण,कुटुंबातील व्यक्तींचे एकमेकांवरील प्रेम,विश्वास या सर्व गोष्टी ज्यात बसतात ती चौकट तर आपण चांगलीच म्हणायला हवी ना ! ज्यात आपले आणि समाजाचे हित सुरक्षित राहते...

आणि प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीने आपल्या पदाचा,अधिकाराचा योग्य वापर केला तर ...
तो व्यक्ती ही सुखी राहील आणि समाजही सुखी होईल.

पण सुरुवात आपल्या स्वतः पासून झाली पाहिजे ना!

म्हणजे आपला भारत लवकरच भ्रष्टाचारमुक्त होईल....आणि भारतातील प्रत्येक घराची चौकट हसरी होईल.


समाप्त
नलिनी बहाळकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//