ईस बार सोच नई..!

ही एक कौटुंबिक कथा आहे आणि त्याला एक सामाजिक पैलू आहे..तो म्हणजे वृक्षतोड...वटपौर्णिमेला वडाची फ



आज ऋचाची पहिलीच वट-पौर्णिमा होती. Lockdown मुळे बाहेर जाऊन वडाची पूजा वैगरे काही करण शक्य नव्हतंच. म्हणून सासूबाईंचा घरी फांदी आणून पूजा करायचा विचार होता.
"अग ऋचा उद्या वटपौर्णिमा आहे..तुला वडाची पूजा करायचीय..जन्मोजन्मी अमेय तुला नवरा म्हणून लाभावा आणि त्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून प्रार्थना करायची. पण बाहेर जाऊ नाही शकत त्यामुळे फांदीची घरीच पूजा करू."
खरतर मला हे फांदीची पूजा करणं नाही जमणार अस टाकावं का बोलून...असा विचार चेहरयावर झळकत होता तिच्या..तोच अमेयने तिला खुणेने गप्प राहा अस सुचवलं. शेवटी नवी नवरी ती गप्प राहिली.
" हो चालेल आई ..." अस म्हणून ती अमेयच्या पाठोपाठ आत गेली.
" तु का गप्प बसवलं मला..मुळात पूजा , उपवास, व्रत-वैकल्य हा माझा स्वभाव नाहीय. पण तरीही माझा त्याला विरोध नाही. ज्यांना जस पटत, जमत, आवडत तस करावं. पण प्रत्येक घरात एक फांदी तोडून नेली तर दुसऱ्या दिवशी त्या वडाची दैना बघावी जाऊन..त्यापेक्षा एक नवीन वड किंवा दुसरं झाड लावावं. जे जगवावं...नाहीतर पुढच्या पिढयांकडे वड पूजा करायला सोडाच बघायला पण शिल्लक नसतील...! "
" तुझं बरोबर आहे पण तिला पटेल का ? उगाच वाद होईल "
" बरं पण मला असं वाटत माझी खरी मत त्यांना माहिती असावीत..नाहीतर नंतर कधीतरी वाद होतील "
अस म्हणून ऋचा स्वयंपाक घरात वळली..दुपारची कामं आवरत आलीच होती. पोळ्या भाजता भाजता तिने विषय काढलाच..
"आई , मला हे फांदीची पूजा करून मानला नाही बर वाटणार..यावर्षी आपण वडाची मानसपूजा केली तर ? पुढच्या वर्षी अगदी वडाखाली जाऊन शात्रोक्त पूजा करू आपण.."
" अग अस कसं आपल्या रिती आहेत या..तुला करावंच लागेल..अमेय महत्त्वाचा की वडाची एक फांदी..आणि एक फांदी तोडून अस काय होतय..वडाची पूजा करून संसार करायला लागणार मनोधैर्य वाढत बाई..!"
ऋचा काही बोलणार इतक्यात तिच्या आजेसासूबाई देवघरातून बाहेर आल्या..अर्थातच हा संवाद ऐकूनच...पण त्यांनी ऋचाला खुणेने गप्प केलं.
आणि बोलणं थांबवलं..!
दुपारची जेवणं झाल्यावर त्या आपल्या सुनेला वसुधाला एकटीला बाजूला घेऊन म्हणाल्या..
" मघाशी ऋचासमोर बोलले असते तर तुला वाईट वाटलं असत...माझ्या सुनेसमोर मला बोलतेय अस...पण तिला जसं वाटत तसं तिला करू देत..आणि काहीतरी चांगलंच सांगतेय ती..काय हरकत आहे संसारासाठी लागणार मनोधैर्य वाढवायला मानसपूजा केली तर..उलट जास्त मनोधैर्य वाढेल ना...आणि तसही या घरात मी कधीच तुला काही चांगले बदल करायला रोखलं नाहीय..किंबहूना चुकीचे बदलसुध्दा तुला करू दिले..कालांतराने तुझं तुला उमगत गेलं की हे चुकीचं आहे..आणि तु आपोआप परत काही चांगल्या जुन्या पद्धती अंगिकारल्यास..तसच ऋचाही करेल...पण आज तिला विरोध करून मनाविरुद्ध फांदीची पूजा ,उपवास करावा लागला तर ती ऐकेल..कारण घरात नवीन आहे म्हणून..पण तिचा पहिला सण..तो आनंद तिला नाही घेता येणार..ती अढी घेऊन कदाचित ती कायम तुझ्याकडे बघेल..जे तिला करायचं ते तिला करू देत..नवीन पिढी , नवे विचार, पूजेच्या नव्या संकल्पना हे सगळं आपण संयमाने घेतलं तर नवी नाती रूजतील...जुन्याच्या अट्टाहास नको..परिवर्तन हाच सृष्टीचा नियम आहे..!"
दुसऱ्या दिवशी वसुधाताईनी आणि ऋचाने मिळून हसतमुखाने घरातून वटवृक्षाची मानसपूजा केली...पण पुढच्या वर्षी त्या वडाच्या झाडाखाली जाऊन पुजा करणार आहेत बरं का....!!!