जागतिक अन्न दिन

Importance Of Food

" वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जिवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रम्ह
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।"

भारतीय संस्कारात पूर्वीपासून अन्नग्रहण करण्याच्या कृतीस केवळ जीवधर्म न समजता त्यास आध्यात्मिक अधिष्ठान दिलेले आहे.
अन्नाला आपण पूर्णब्रम्ह मानावे.भोजनाला केवळ पोटाची खळगी भरणे समजू नये,तर यज्ञकर्म समजून प्रसन्न मनाने भोजन करावे हे संस्कार आपल्याला सहजपणे केले जातात.
भारतीय संस्कृतीने अन्न हे पूर्णब्रम्ह मानले. मात्र दैनंदिन जीवनात आपण अन्नाला खऱ्या अर्थाने पूर्णब्रम्ह मानतो का ? जागतिक क्रमवारीनुसार भुकेल्या देशांच्या यादीत भारत ६७ वा तर अन्न वाया घालवणाऱ्यांमध्ये ७ व्या क्रमांकाचा देश ठरला आहे.
अन्नाची नासाडी कशी होते ?
शेतात पीक आल्यापासुन ते उपभोक्ता अन्नाचा उपभोग घेईपर्यंत..
शेतातून बाजारात आणि बाजारातून टप्प्याटप्प्याने येत असताना ,मालाची ने- आण करताना वाया जाते.साठविलेले अन्नधान्य ,भाजीपाला, फळे हे पावसामुळे,वातावरणातील बदलामुळे खराब होते.
पाऊस पडला नाही तर पिके जळून जातात आणि जास्त आला तर तयार धान्य सडते.तयार झालेले धान्य साठविण्यासाठी शीतगृहे,वातानुकूलित जागा यांचा अभाव असल्यामुळे ही धान्याची नासाडी होते.
तसेच,लग्न समारंभ,धार्मिक कार्यक्रम किंवा इतर मोठे समारंभ यात खुप अन्न वाया जाते.जेवण बनविण्याचा अंदाज चुकणे म्हणजे गरजेपेक्षा जास्त बनविणे,वाजवीपेक्षा जास्त अन्न ताटात घेणे.
हॉटेल्स,रेस्टॉरंट मध्ये ही अन्नाची नासाडी होत असते.
अनेकांच्या घरात गरजेपेक्षा जास्त धान्य, भाजीपाला, फळे आणले जाते आणि खराब झाल्यास फेकले जाते.
भारतात एकीकडे अनेक लोक उपासमारीने मरत असतात आणि दुसरीकडे अन्न हे वाया जात असते.
भारताप्रमाणेच अनेक देशांमध्ये उपासमारीची आणि अन्न नासाडीची समस्या आहे.
ही समस्या विचारात घेवून लोकांमध्ये अन्न वापराबाबत जागरूकता आणण्यासाठी सन १९८० पासून १६ ऑक्टोबरला \"जागतिक अन्न दिन\" साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने सुरू केले आहे.
२०३० पर्यंत जगात कोणीही भुकेले राहणार नाही.यासाठी ही मोहीम सुरू आहे.
उपासमारी पिडीतांना मदत करणे तसेच अन्नाचे महत्त्व सर्वांना सांगणे हे उद्देश या दिनाचे आहेत.
\" आमची कृती आमचे भविष्य - चांगले उत्पादन, चांगले पोषण,चांगले वातावरण आणि चांगले जीवन \" अशी या वर्षीच्या जागतिक अन्न दिनाची संकल्पना आहे.
या दिवशी सर्वांना अन्नाचे महत्त्व सांगितले जाते.
धान्य शेतात पेरण्यापासून ते अन्न शिजवून खाण्यासाठी तयार होण्यापर्यंत किती प्रक्रिया असते आणि त्यासाठी किती वेळ लागतो? या सर्व गोष्टींसाठी पैसाही खर्च होतो.
अन्न तयार होण्यासाठी भरपूर मेहनत,पैसा,वेळ लागतो पण वाया घालण्यासाठी कितीसा वेळ लागतो ?
अन्नधान्य उत्पादनासाठी वीज,पाणी,खते, कीटकनाशके, इंधन, मनुष्यबळ अशा अनेक गोष्टींचा वापर केला जातो.त्यामुळे अप्रत्यक्षपणे या गोष्टी ही खर्च होतात.
घरातील मोठ्यांनी अगोदर आपल्याकडून होणारी अन्नाची नासाडी टाळावी आणि मगं आपल्या मुलांना समजावून सांगावे. लवकर खराब होणारे नाशवंत अन्नधान्याचा जास्त साठा करु नये,साठवणुकीच्या पदार्थांची व्यवस्थित साठवणूक करावी म्हणजे ते खराब होणार नाही.
प्रत्येक व्यक्तीने स्वयंशिस्तीने अन्नाचा नीट आणि योग्य वापर केला,अन्न वाया घातले नाही तर जगात कोणीही उपासमारीने मरणार नाही,म्हणजेचं जागतिक अन्न दिन साजरा करण्याचे सार्थक होईल आणि उद्दिष्ट ही पूर्ण होईल.


अन्नाचे महत्त्व जाणुनि
सोडवू उपासमारी समस्या
अन्न वाचवू असा संकल्प करुनि
अन्न दिन साजरा करु या