Jan 19, 2021
स्पर्धा

भारावलेली ती 

Read Later
भारावलेली ती 

भारावलेली ती 

तिने सुधा मूर्ती यांचे खूप लेख वाचले होते आणि ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून गेली होती ,साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे त्या प्रतीक आहेत ,तिने त्यांचे काही इंटरव्हयू पण ऐकले की ,ज्यात ती त्यांच्या बोलण्याने इतकी भारावून गेली की,तिने तिच्या जगण्याची दिशा बदलवून टाकली. ती नोकरी करत होती,मुलांकडे लक्ष देत होती ,त्यांचा अभ्यास घेत होती ,रोजच्ं जीवन जगणं चालू होतं,पण सगळं असूनही तिला जीवन अळणी वाटत होतं ,पण कुठे काय चुकतय्ं हे मात्र कळत नव्हते. घरात सगळे निर्णय घेण्याचे अधिकार तिला होते ,असही नव्हतं की ,ती मन मारून जगत होती. ती ज्या कॉलेज मध्ये जॉब करत होती ,तिथे सुधा मुर्ती प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या ,तिथे त्यांनी त्यांच्या आयुष्यातले काही प्रसंग सगळ्यां सोबत शेअर केले ,ती त्यांची फैन असल्याने , सगळं कान देऊन ऐकत होती.त्यांच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तिला लागत होता आणि आता तिला समजलं होतं की,आयुष्यात कोणत्या प्रकारचं मीठ मिसळलं पाहिजे , म्हणजे तिला जे हवं ते समाधान मिळेल. तिने मनातच काहीतरी विचार केला आणि तिला वाक्य आठवलं,"न हरता,न थकता,न थांबता,प्रयत्न करणा-यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत्ं" याचं उत्तम उदाहरण म्हणजे,शिवाजी महाराज आणि मी तर शिवरायांच्या जन्मभूमीत जन्माला आली आहे , मी ज्या समाजात राहते ,त्या समाजाप्रती माझी काही कर्तव्य आहेत ,ती आता मला आयुष्याच्या या वळणावर हाक देत आहेत ,त्याची सुरुवात कुठून तरी केली पाहिजे ,आता दहा दिवसांनी तिच्या मुलीचा वाढदिवस होता ,तिने मनात काहितरी ठरवले ,कसली तरी माहिती  इंटरनेट वर शोधून काढली आणि फोन लावला ,त्यांना कोणत्या गोष्टींची गरज आहे ,ते विचारले , त्यांच्या आश्रमात वेगवेगळ्या वयोगटातील मुली राहत होत्या.

त्यातील काही कॉलेज आणि स्कूल मध्ये जाणा-या होत्या ,त्यांना लेगिज आणि टॉपची गरज होती ,तिथे ज्या सुपरवायजर होत्या त्यांनी वेगवेगळ्या साईज आणि किती हव्यात याची माहिती फोनवरून दिली ,तिने ते सगळे सामान घेऊन दुकानदाराला तिथे पोहोचवायला सांगितले ,नंतर ते सगळे मिळाले का याची चौकशी केली.सुपरवायजर मैडम तिला म्हणाल्या ,तुम्ही आश्रमाला भेट देऊ शकता ,म्हणजे सगळ्या मुली तुमचे आभार मानतील. ती त्यांना म्हणाली , जमेल तेव्हा येईल,कारण  तिला माहित होतं एकदा ती तिकडे गेली की ,ती या सगळ्यात गुंतणार आणि मग घराकडे दुर्लक्ष होणार आणि म्हणतात ना,दिलेल्या दानाची खबर या हाताची त्या हाताला लागू नये.तिला हे सगळं केल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचे आंतरिक समाधान मिळते,तिला असे वाटते ,ह्याच गोष्टीची आपल्या आयुष्यात कमी होती. तिला आठवले ,जेव्हा ती हायस्कूल मध्ये होती ,तेव्हा ती गाईड मध्ये होती ,त्यांची शिक्षिका त्यांना दोन दिवसांसाठी तिथे राहायला घेऊन जायची ,त्या गावातील सगळे साफसफाई करायचे,त्यावेळी सगळी कामं मिळून करण्यात एक वेगळीच मजा यायची.आता सुध्दा असं काहीतरी करावं ,अशी तिची इच्छा झाली आणि म्हणतात ना इच्छा असेल तर मार्ग सापडतोच. 

तिने तिची कल्पना दोन मैत्रिणीला सांगितली ,एक तयार झाली ,एकीने कारण सांगून वेळ मारून नेली,दोघीं मिळून पंचवीस जणींचा ग्रुप तयार केला आणि यावर्षी वेगळ्या पध्दतीने हळदीकुंकु साजरे करायचे ठरले ,त्या सगळ्या मिळून एका आदिवासी खेड्यात गेल्या ,तिथल्या बायकांना जमा केले ,त्यांच्याशी मन मोकळेपणाने गप्पा मारल्या ,त्यांच्यातल्या काही जणींनी त्यांची पारंपारिक गाणी म्हटली ,काही जणी फुगड्या खेळल्या ,त्या सगळ्यां बरोबर यांनी सगळ्यांनी खुप मजा केली ,त्यांना सगळ्यांना हळदीकुंकु लावून एक महिन्याचा किराणा देण्यात आला ,मग सगळ्या जणी तिथून निघाल्या ,त्या बायकांच्या चेह-यावरचा आनंद पाहून इतर सगळ्या महिलांनी तिचे आभार मानले ,मग त्या सगळ्या जणींनी मिळून ठरवले की ,इथून पुढे जसे जमेल तसं या कार्यात सहभागी व्हायचं. दिवाळीला सगळ्या जणी मिळून फराळ बनवत आणि त्या खेड्यात जाऊन देऊन येत, शाळा सुरु झाली की,शाळेसाठी लागणारे साहित्य ,त्यासाठी त्यांनी ओळखीच्या लोकांकडून आर्थिक मदत मिळवली. आता तिची मुलं कॉलेजला जाऊ लागली होती ,तिने त्यांनाही स्वावलंबी बनवले होते ,तेही कधी कधी,त्यांना जेव्हा वेळ असेल तेव्हा तिच्या बरोबर जात होते ,नवराही जायचा ,मग काय फैमिली पिकनिक आणि त्या बरोबर थोडी समाजसेवाही व्हायची , तिने सगळ्या घराला स्वार्था बरोबर परमार्थ कसा करायचा ह्याचा स्वतःच्या आचरणातून एक आदर्श घालून दिला होता.

हे करत असताना तिच्या डोक्यात एक कल्पना आली ,तिने ती सगळ्यांना बोलून दाखवली,सगळ्यांना तिचं म्हणणं पटलं,ज्यांना शक्य आहे त्यांनी आर्थिक मदत करायची ,स्वतःला शक्य नसेल तर दुस-यांकडून मिळवण्याचा प्रयत्न करायचा किंवा श्रमदानाची मदत करायची ,ते खेडं नंतर दत्तक घ्यायचं ठरवलं,त्यांच्यात त्यांनी काही कॉलेजच्या मुलांना सामील करून घेतले,त्या मुलांना आर्थिक मदत मिळवून देऊ लागल्या , ज्याला जसा वेळ असेल त्यानुसार ग्रुपने खेड्यात जाऊ लागल्या .

मुलांनी गावातल्या तरुण मुलांना हाताशी धरुन स्वच्छता मोहीम सुरु केली,तीही सगळ्यांच्या बरोबरीने जे काम पडेल ते करायची ,कारण तिची ही धारणा होती की ,कोणतच काम हलकं नसतं ,कारण ती ज्या सुधा मुर्तींमुळे भारावली होती ,त्याही अहंकार गळून पडावा म्हणून वर्षातून एकदा भाजीच्ं दुकान लावतात आणि हार बनवून देण्याची सेवाही करतात ,मग मला तर संधी चालून आली आहे ,मी का नको घेऊ आणि तिचा उत्साह पाहून तरुण पिढी अजून जोशात काम करायची.

त्या खेड्यातले काही लोक असे होते की,त्यांना हे जे काम करतात ,त्याचा काही उपयोग होणार नाही ,असं त्यांना वाटायचं ,मग तरुण मुलं नाराज व्हायची. मग ती सगळ्या मुलांना समजावयाची ,निंद्काचे घर असावे शेजारी असे म्हणतात,कारण त्यामुळे आपण आपले ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करतो आणि एक लक्षात ठेवा,कोणतेही कार्य अडथळयाशिवाय पार पडत नाही ,शेवट पर्यंत जे प्रयत्न करीत राहतात ,त्यांनाच यश प्राप्त होते.त्यांना जे बोलायचे ते बोलू द्या.

काही तरुण मंडळी होती ,त्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या काही डॉक्टर मित्रांना गावात बोलवले ,सभा घेतल्या ,सगळ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.बायकांना स्वत:ची काळजी कशी घ्यावी,ही घरोघरी जाऊन माहिती दिली. हे सगळं करताना नोकरी ,मार्गदर्शन आणि घर या तीनही आघाड्या सांभाळताना खूप त्रेधा तिरपीट उडायची ,पण घरच्यांची साथ आणि तिच्या ध्येयाने तिला इतकं पछाडलं होतं की,रोज ती एका नव्या प्रेरणेने उठायची आणि कामाला लागायची.

एका कंपनीच्या मदतीने शाळेत वेगवेगळी चित्रे भिंतीवर काढून घेतली,शौचालयही बांधून घेतले.

सरकारची शौचालयाच्या योजनेबद्दल सगळ्यांना माहिती करून दिली ,त्यासाठी सगळ्या प्रकारची तसदी घेतली आणि तीन वर्षात प्रत्येक घराचं शौचालय ऊभं राहिलं.मोदी सरकार आल्या नंतर ,प्रत्येक व्यक्तिचे जन धन खाते उघडण्यात आले,गैसची सुविधा घराघरात पोहोचली.

प्रौढ शिक्षण वर्ग ,गावातल्या काही तरुण मुलांच्या मदतीने सुरु केले ,आता गावातील प्रत्येक व्यक्ती सही करत होती ,ज्या गोष्टी वर सही करायची ,ती वाचल्या शिवाय सही करत नव्हती.सौर उर्जेवर आता सगळे लाइट लागत होते ,गावाच रुप सात वर्षात पूर्णपणे बदललं होतं.  गावात महिलांचे बचत गट सुरु झाले होते,त्या माध्यमातून काही जणींनी व्यवसाय सुरू केला होता. सगळे साक्षर झाल्याने ,व्यसनमुक्ती केंद्राच्या सहाय्याने काही लोकांची दारु सोडवण्यात आली होती. 

आदर्श गाव पुरस्कारासाठी गावाची निवड करण्यात आली होती आणि पुरस्कार मिळाला . त्या निमित्ताने गावक-यांनी तिचा सत्कार ठेवला होता ,आज तिच्या नव-याचा आणि मुलांचा ऊर अभिमानाने भरून आला होता ,ती यासाठी आधी तयारच नव्हती ,पण परत तिच्या डोक्यात एक कल्पना आली आणि ती तयार झाली ,सगळ्यांनी तिचे भरभरून कौतुक केले आता तिची वेळ होती ,तिने माईक हातात घेतला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला,तिने बोलायला सुरुवात केली ,हा जो वसा घेतला आहे ,तो जो पर्यंत जीवंत आहे ,तोवर सुरु ठेवायचा आहे ,या गावातले काम संपले आहे ,आता जे आहे ,ते अबाधित ठेवणे ही तुमची जबाबदारी ,आता मोर्चा शेजारच्या गावाकडे,माझं स्वप्न साकार करण्यास खूप जनांचे हात लागले आहेत ,त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी विरोध केला,त्यांचेही धन्यवाद ,कारण त्यांच्यामुळे ध्येय साध्य करण्यासाठी खूप मेहनत घेतली,या गोष्टीचा विचार नाही केला की लोक काय म्हणतील. मी तर सुधा मुर्ती यांच्या मुळे भारावून गेले आणि हे सगळं घडण्यासाठी निमित्तमात्र ठरले. 

आपल्याला पुढचा जो टप्पा गाठायचा आहे,त्यासाठी माझे सारे सहकारी  माझ्या सोबत असणारच आहेत ,अजून सहका-यांची आपल्याला गरज भासणार आहे ,तर तुमच्या पैकी जे इच्छुक असतील ते आम्हाला मदत करू शकतात . मी मार्ग दाखविणार ,पण आपल्या सगळ्यांना मिळून त्यावर मार्गक्रमण करावे लागेल ,मग तयार आहात ना .

गर्दीतून तरुण मंडळींचा जोरात आवाज आला ,हे पाहून तिचे मन गलबलले आणि ती परत नव्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत आहे .

 

यशस्वी होणे ,याची व्याख्या काय,

बंगला ,गाडी,पैसा ,अडका म्हणजे काय,

बाह्य सुखाची चव चाखणं,हेच यशस्वी होणं असतं काय,

 

 माणसागणिक  बदलत राहते,व्याख्या यशाची,

कुणाला आस असते आंतरिक सुखाची ,

तर कुणाला भौतिक सुखाची ,

परिस्थितीनुसारही बदलते व्याख्या यशाची,

 

सगळेच जगतात स्वत:साठी,

कधीतरी जगून बघ दुस-यांसाठी,

नकोस बनू कधीही दुस-यांच्या प्रगतीत आडकाठी,

हे सगळं करताना मात्र,मोजावी लागते किंमत मोठी,

 

आयुष्यात मागे वळून पाहताना ,

असावी चेह-यावर समाधानाची झालर,

नसावं आपल्यावर कुणाच्या दु:खाच खापर,

तोंडात असावी नेहमी साखर ,

घाला सर्वांवर मायेची पाखर,

 

माणूस म्हणून जगताना, करावा लागतो संघर्ष ,

संघर्ष केल्यावर मात्र ,मिळतो वेगळाच हर्ष,

या हर्षाची असते ,एक वेगळीच नशा ,

जी देते जगण्यासाठी,एक वेगळी दिशा,

या दिशेने वाटचाल करताना ,अनेक अडथळे येतात,

न डगमगता जो करतो वाटचाल ,त्याला खूप सारे अनुभव मिळतात,

जेव्हा ध्येय साध्य होते ,तेव्हा सगळ्यांना प्रेरणा मात्र देतात .

 तुम्हाला जर कथा प्रेरणादायी वाटली असेल तर नावासहित शेअर करू शकता आणि आनंदात रहा,वाचत रहा , हसत रहा आणि अभिप्राय अवश्य द्या.

 

रुपाली थोरात 

 

Circle Image

रूपाली रोहिदास थोरात

Assistant professor

I love to read and write , from my college time, I am writing poems, whenever thoughts come in mind ,I wrote it in words, but no platform to share with others . when I saw this site, I got a platform to share my thoughts and views with all, Thanks to Era creators to giving me such a wonderful platform as well inspiring new writers, Hope all of you will enjoy our journey of reading and writing and will give comments to encourage me . also suggestions are welcome by me so that I can improve because always we are learners at the end of our life. Rupali Thorat